मार्च २९ २०१७

चिंता करी जो विश्वाची ... (२१)

श्री समर्थ रामदास स्वामीं ज्ञानदानाचे पुण्यकर्म अखंडित आचरत होते. जनसामान्याचे अज्ञान,  त्यापोटी निपजलेला अंधविश्वास आणि अनाचार यांचा विनाश व्हावा, हीच त्यांची तळमळ होती. अत्यंत निःस्वार्थ आणि विरागी वृत्तीने ते हे कार्य करीत होते. 
संसारचक्रात गुंतून अनेक दुःख चिंतांचे भारवाही झालेले जन त्यांना पाहवत नव्हते. त्यांना मुक्ती मार्गाची दिशा गवसावी म्हणून गूढ आणि क्लिष्टं  असे ब्रम्हज्ञान त्यांनी सोप्या, जनसामान्यांच्या भाषेत रूपांतरित केले. 

जे परमतत्वं आहे, ते निराकार आहे. ते दृश्यं नसून जाणिवेतच आहे. त्याचे आकलन व्हावे याकरिता कठोर परिश्रम, वैराग्यवृत्ती, धर्मनिष्ठा आणि ज्ञान या सर्वाचीच आवश्यकता आहे. ज्याला मोह, मायेचे पाश बांधून ठेवू शकत नाहीत, जो अलिप्त आणि विरागी वृत्तीने वावरतो, संसाराच्या, नातीगोती आणि संबंधांच्या सर्व बंधनातून जो मुक्त झालेला आहे, त्यानेच या मोक्ष, मुक्तीच्या मार्गावर पाऊल ठेवावे. 
मूर्तिपूजा, वेदपठण, हरिकथा, नामस्मरण तसेच दानधर्म, यज्ञादी धार्मिक कृत्ये करणे हा काही खरा मुक्तीमार्ग नव्हे. मोक्षप्राप्तीकरिता कठोर साधना आवश्यक आहे. ही वाटचाल खडतर खरीच, परंतु अंती मोक्षप्राप्तीचे फलित आहे. यासाठी निर्गुण भक्ती हाच एकमेव मार्ग आहे. 

असे सार साचार ते चोरलेसे ।
इहीं लोचनी पाहता दृश्य भासे ॥
निराभास निर्गुण तें आकळेना । 
अहंतागुणे कल्पितांही कळेना ॥ 
 
आत्मा अमर आहे आणि तो दरवेळी नवीन शरीरासह जन्म घेत राहतो. प्रात्येक जन्मीची सुखदुःख भोगणे त्यांस क्रमप्राप्त असते. अशा या जन्म-मरणाच्या अखंडित फेऱ्यातून सुटका,  म्हणजेच मुक्ती. एकूण चार प्रकारे मुक्ती साधता येते  आणि ती  प्राप्त करण्याचे अधिष्ठान म्हणजे अविचल ईश्वरभक्ती हेच आहे असे ते सांगतात. पृथ्वी, पाताळ आणि स्वर्ग म्हणजे त्रैलोक्य आणि त्यातील देव, देवतांचे वास्तव्य स्थान म्हणजे स्वर्ग. ज्यास स्वर्गप्राप्ती झाली, त्यांस जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळाली. 

लोकीं राहावें ते स्वलोकता । समीप असावे ते समीपता ।
स्वरूपची व्हावे ते स्वरूपता । तिसरी मुक्ती ॥

पण यात वर्णन केलेल्या  तिन्ही मुक्ती पेक्षा श्रेष्ठ अशी चौथी मुक्ती म्हणजे सायोज्यमुक्ती असे समर्थ सांगतात. सायोज्यमुक्ती ही निर्गुण, निराकाराच्या उपासनेअंती प्राप्त होते.  ही अढळ आहे, शाश्वत आहे. ती प्राप्त झालेल्याचे, देवलोकातून कधीच अधः पतन होत नाही.

ब्रम्हांड नसेल कल्पांती । पर्वतासहित जळेल क्षिती ।
तेव्हा अवघेची देव जाती । मां मुक्ती कैच्या तेथे ॥
तेव्हा निर्गुण परमात्मा निश्चळ । निर्गुण भक्ती तेहि अचळ ।
सायोज्यमुक्ती ते केवळ । जाणिजे ऐसी ॥ 

अशी सायोज्यमुक्ती प्राप्तं करणे तितकेसे सहजसाध्य नाही. अगाध ज्ञान, अविचल भक्ती असेल तरीही हा मुक्तीमार्ग आक्रमिणे दुष्करच . कुणी म्हणेल, मी ज्ञानी - प्रकांड पंडित, महान भक्त. माझा मुक्तीमार्ग मीच शोधेन. पण अंततः त्याला उमगेल की हा भ्रम आहे. त्याचे श्रेष्ठत्व कुचकामी आहे. कारण त्यास अहंकाराची लागण झालेली आहे. जेव्हा तो आपले क्षुद्रत्व जाणून, गुरूचरणी लीन होईल, तेव्हाच त्यांस मुक्तीमार्गाचे ज्ञान प्राप्त होईल. असा सद्गुरू महिमा समर्थांनी वर्णिला आहे.  

जे वेदांस साकडे (कठीण) । जे शब्दांसी कानडे (दुर्बोध) ।
तें सत्शिष्यांस रोकडे। अलभ्य लाभे ॥ 

परंतु कुणाचे शिष्यत्व पत्करावे? कुणास गुरूपद बहाल करावे? याबाबत समर्थ श्रोत्यांस सावधान करतात. स्वतः: स ज्ञानी म्हणविणारे अनेक असतील, परंतु ते गुरूपदास योग्य आहे किंवा नाहीत हे तपासून बघणे जरूरीचे आहे. 

समाज हा मानव रूपात कल्पिला असता, सर्व जाती जमाती त्याची विविध अंगे असतात. सर्वांचे महत्त्व समान. यातील कुणीही दुर्बळ अथवा व्याधिग्रस्त असल्यास समाजपुरूषाच्या कार्यक्षमतेस हानी होईल. त्यातील शिरोभाग म्हणजे अर्थात बुद्धिबळ म्हणजे ब्राम्हण, स्कंध आणि भुजा म्हणजे रक्षणकर्ता क्षत्रिय, उदर म्हणजेच अखंड जीवन उर्जेचा स्त्रोत हा वैश्य, वाणी, व्यापारी , आणि ज्याच्या आधारावर समाज उभा आहे, जो मूलभूत जरूरीची कार्ये करीत समाजाला पुढे जाण्यास मदत करतो, जो  समाजाचा पाया आहे तो  म्हणजेच  शूद्रं . 
समर्थ सांगतात, ब्राम्हण हा गुरूपदास योग्य असतो. ब्राम्हण सदोदित ईश्वराच्या सान्निध्यात असतो. धर्मग्रंथांचे  वाचन, मनन करून व्युत्पन्न, ज्ञानी झालेला असतो. म्हणून गुरूपदास सर्वोतोपरी योग्य असतो. 

गुरू तो सकळांसी ब्राम्हण । जऱ्ही  तो जाला क्रियाहीन ।
तरी तयासीच शरण । अनन्यभावें असावे ।
ब्राम्हणवचने प्रमाण । होती शूद्रांचे ब्राम्हण । 
धातुपाषाणी देवपण । ब्राम्हणाचेनी मंत्रे ॥ 

ब्राम्हणा ठायी सारे ज्ञान, पावित्र्य सामावलेले असेल , त्याच्या योगेच मुक्ती प्राप्तं करता येणे शक्य असेल, तर सद्गुरूचा शोध घेण्याचे कारणच काय? ब्राम्हण पूजन करावे, ब्राम्हण भोजने घालावी, ब्राम्हणाकरवी हरिकथा करून मनोभावे श्रवण करावे, हाच तर मुक्ती मार्ग नाही ना? असा विचार करणाऱ्यास समर्थ समजावतात, हे सारे वरवरचे आहे. भौतिक सुखापुरते मर्यादित आहे. परंतु त्या पलीकडे असलेला मुक्तीमार्ग कठीण आहे, अवघड आहे. त्या मार्गावरून वाटचाल करावयाची असल्यास, सद्गुरू कृपेवाचून कोणताही पर्याय नाही. 

स्वधर्मकर्मी पूज्य ब्राम्हण । परी ज्ञान नव्हे सद्गुरूविण ।
ब्रम्हज्ञान नसता सीण । जन्ममृत्यू चुकेना ॥
सद्गुरूविण ज्ञान काही । सर्वथा होणार नाही । 
अज्ञान प्राणी प्रवाही । वाहातची गेले ॥ 

अनेक प्रकारे पूजा-अर्चना केली, कष्टसाध्य विद्या संपादित केली, हरिनामाचा अखंड जप केला,  तरी हे सारे गुरूकृपेवाचून निष्फळ आहे. ज्या प्रमाणे अंधारात केलेल्या शर वृष्टीने कधी निशाणा वेधला जात नाही, त्या प्रमाणे सद्गुरूच्या मार्गदर्शना अभावी केलेली साधना निष्प्रभ ठरते. केलेले सर्व सायास मातीमोल होतात. 

सद्गुरूकृपा न जोडे । आणि भलतीच कडे वावडे ( भटकतो) ।
जैसे आंधळे चाचरोन पडे । गारी (दलदलीत) आणि गडधरा (खाचखळग्यात) ॥ 
जैसें नेत्री घालिता अंजन । पडे दृष्टीस निधान । 
तैसे सद्गुरूवचने ज्ञान - । प्रकाश होये ॥ 

सद्गुरू कृपेने अदृश्य ते दृश्य होते, गूढ ते गोचर होते. निर्गुण निराकाराचे अस्तित्व उमगते, आणि मुक्तीपथावरची वाटचाल सुकर होते. या जगी जे थोर, ज्ञानी, संत, महंत झाले त्या सर्वांवर सद्गुरूकृपेचा वरदहस्त होताच. 

सकळ सृष्टीचे चाळक । हरिहरब्रम्हादिक । 
तेही सद्गुरूपदी रंक । महत्त्वा न चढेती ॥
असो जयासि मोक्ष व्हावा । तेणे सद्गुरू करावा ।
स्द्गुरूविण मोक्ष पावावा । हे कल्पांतीही न घडे ॥ 

अशी सद्गुरूची महती. सदा संतसज्जनाच्या संगतीत राहून ज्ञानार्जन  होते,  ब्राम्हणा योगे पुण्य मिळते आणि सद्गुरूकृपेने मोक्षप्राप्ती होते. म्हणून सद्गुरूचा शोध घेणे अनिवार्य आहे. केवळ ज्ञानी आहे, ब्राम्हण आहे म्हणून तो सद्गुरू होत नाही. 
सद्गुरूची गुणलक्षणे देखिल समर्थांनी नोंदवलेली आहेत. जो ज्ञानी आहे, परंतु त्यांस गर्व नाही, जो दुराभिमानी नाही, ज्याचे चारित्र्यं निर्मळ आहे, आचरण शुद्ध आहे, ईश्वराप्रती जो एकनिष्ठ आहे , ज्ञानप्राप्तीकरिता जो सदैव तत्पर आहे , जो अविचाराने, आधारविहीन भाष्यं करीत नाही, आणि ज्याच्या मनात इतरांसाठी सहानुभूती  आहे अशा व्यक्तीचीच सद्गुरूपदी निवड करावी. 

जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी ।
कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी ।
प्रभू दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे ।
तयाचेनि योगे समाधान बाणे ॥ 

(क्रमशः)

संदर्भ : (१)   श्री ग्रंथराज दासबोध 
            (२)    श्री मनाचे श्लोक  

Post to Feed
Typing help hide