चिंता करी जो विश्वाची ... (२२)

प्रचीतीविणें बोलणे व्यर्थ वाया । विवेकेविणें सर्वही दंभ जाया । 

बहू सज्जला नेटका साज केला । विचारेविणें सर्वही व्यर्थ गेला ॥

असा उपदेश श्री समर्थ रामदास स्वामी त्यांच्या श्रोत्यांना नेहमीच करीत असत. आपल्या वागण्या, बोलण्याला, कर्म आणि व्यवहाराला सुविचाराचे अधिष्ठान असलेच पाहिजे, अन्यथा ज्ञान, साधना, कर्तृत्व, संपत्ती, पराक्रम आणि कीर्ती -- सारे काही व्यर्थ आहे असे ते सांगत. अविचाराने, अविवेकाने वागणाऱ्या, बोलणाऱ्याला, जनमानसात आदराचे स्थान कदापिही  प्राप्तं होणार नाही हे निश्चित असा सल्ला ते श्रोतृवृंदाला देत असत. 
असे संयमी , विचारी वागणे बोलणे अंगी बाणण्यासाठी ज्ञानार्जन करणे अती आवश्यकच. त्यामुळे गुरुकृपा होणे अनिवार्य आहे. समाजात वावरताना महाज्ञानी, प्रकांडपंडित कितीतरी भेटतील, परंतु त्यांना गुरूपद देणे योग्य होईल का याचा विचार करणे अगत्याचे आहे. जो अनेक मंत्र तंत्र जाणतो, भूत-भविष्याचे ज्ञान आपणास आहे असे भासवितो, जारण, मारण, वशीकरण करण्यात जो प्रवीण आहे, आणि जो तुमच्या सर्व मनोकामना आपल्या सिद्धींच्या साहाय्याने पूर्ण करण्याचे आश्वासन देतो,  तो सद्गुरू नव्हेच --

गुरू पाहतां पाहतां लक्ष कोटी । बहूसाल मंत्रावळी शक्ती मोठी ।
मनी कामना चेटके धातमाता (चेटूक करणारे आणि बहुपाठी ) । जनी व्यर्थ रे तो नव्हें मुक्तीदाता ॥ 

स्वतःला ज्ञानी समजणारे कित्येक असतील, परंतु सद्गुरू कधी आत्मप्रौढी मिरवीत नाही. त्यांचे आत्मतेज त्यांच्या व्यक्तीमत्वातच दृग्गोचर होते." शब्दाहूनही कृती श्रेष्ठ" -- या उक्तीचे ते जिवंत, चालते -बोलते उदाहरण असतात. तसेच जे जनास शिकविले ते सर्वप्रथम स्वतः आचरणात आणले -- असे त्यांचे वागणे असते. "लोकां सांगे ब्रह्मज्ञान -- आपण कोरडे पाषाण " असे वागणारे,  ते सद्गुरू नव्हेतच हे समजून घ्यावे. 

नव्हे वाउगी चाहुटी काम पोटी । क्रियेवीण वाचाळता तेची मोठी ॥ 
मुखीं बोलिल्यासारखे चालताहे । मना सद्गुरू तोची शोधूनी पाहे ॥ 

असे हे सद्गुरूचे माहात्म्यं. अशी ही सद्गुरूची गुणलक्षणे आहेत. पण असे अलौकिक गुण प्राप्तं असलेले, लाखात बोटावर मोजण्याइतकेच. मग विद्या प्राप्त करावी तरी कशी?  
समर्थ या समस्येचेही निरसन करतात. विद्यादान हे एक पवित्र कार्य आहे. आणि जो हे करतो त्यांस गुरू मानणे योग्यच. प्रत्येक मनुष्याचे प्रथम गुरू हे त्याचे माता-पिता असतात. बालकास चालणे, बोलणे, आणि समाजात कसे वागावे याचे ज्ञान त्यांच्याकडूनच मिळते. म्हणून ते आदरणीय आणि गुरूपदास योग्यच. परंतु व्यावहारिक ज्ञाना व्यतिरिक्त ज्ञान देणारा तो सद्गुरू. साहित्य, शास्त्रे, कला, मंत्र इत्यादीचे ज्ञान देणारे शिक्षकही गुरू,  परंतु सद्गुरूपदास याहूनही काही अधिक आगळे असणे जरूरीचे असते. 

विद्या सिकविती पंचाक्षरी । ताडेतोडे नानापरी ।
 कां पोट भरे जयांवरी ते विद्या सिकविती
जो यातीचा व्यापार । सिकविती भरावया उदर । 
 तेही गुरू परी, साचार - सद्गुरू नव्हेती ॥ 

मग सद्गुरू कोणास समजावे? त्यांना कसे ओळखावे ? सद्गुरूचा शोध, हा खडतर अशा ज्ञानमार्गावरील पहिला पाडावंच जणू. जर तो यशस्वीपणे पार पडला तर योग्य स्थानी पोहोचण्याची आशा. नाही तर नशिबात भटकणे आणि भरकटणेच.  
अशा या परमयोगी सद्गुरूची योग्यता जाणावी कशी, याचे विवेचन समर्थ करतात. 

जो ब्रह्मज्ञान उपदेसी । अज्ञानअंधारे निरसी । 
जीवात्मयां परमात्मयांसी । ऐक्यता करी ॥
विघडले ( भिन्न/ वेगळे झाले ) देव आणि भक्त । जीवाशिवपणे द्वैत ।
तया देवभक्ता येकांत (एकरूप) -। करी, तो सद्गुरू ॥ 

म्हणजे जो ईश्वराच्या सान्निध्य आहे, ज्याने परमेश्वराचे सत्यस्वरूप जाणले आहे आणि जो ईश्वराप्रती पोहोचण्याच्या प्रवासाचा योग्य मार्गदर्शक आहे, त्यांसच सद्गुरूपदी विराजित करावे. सद्गुरू या संसाराच्या मायाजाळातून मुक्ती देतात. सद्गुरूयोगे अनेक दु:खांचे, संकटांचे निराकरण होते. सद्गुरू त्यांच्या शिष्यांना संकटकाळी अंतर देत नाहीत. त्यांना सर्वोतोपरी साहाय्य करण्यास ते सदैव  तत्पर असतात, त्याकरिता प्रसंगी ते अनेक आपत्तीचाही सामना करतात. 
भवव्याघ्रे घालूनी उडी । गोवत्सास ताडातोडी । 
केली, देखोनि सीघ्र सोडी । तो सद्गुरू जाणावा ॥
प्राणी मायाजाळी पडिले । संसारदुःखे दुखविले ।
 ऐसे जेणे मुक्त केले । तो सद्गुरू जाणावा ॥ 

सद्गुरूस द्रव्यलोभ नसतो, त्यांना  प्रसिद्धी नको असते. सत्तेचा त्यांना लोभ नसतो. असते ती ईश्वराप्रती शुद्ध निष्ठा, ज्ञानावरील अविचल विश्वास. लोकानुनयास्तव, आपणांस बहुसंख्येने शिष्यगण लाभावे या कारणासाठी, ते कसलीही तडजोडी स्विकारीत नाहीत. गरीब-श्रीमंत, उच्च- नीच  असा भेदाभेद त्यांच्या मनी कदापिही नसतो. ज्यांस शिष्य म्हणून स्वीकारले, त्यांस आपल्याजवळील सारे ज्ञान प्रामाणिकपणे आणि समरसून प्रदान करणे हेच त्यांच्या जीवनाचे इतिकर्तव्य असते. अशा सद्गुरूचे शिष्यत्वं लाभणे हे परमभाग्यच. 
सद्गुरूचे गुणवर्णन, समर्थ आपल्या सहज, सोप्या आणि रसाळ वाणीने करतात, ज्याचे श्रवण करताक्षणी सद्गुरू स्वरूपाविषयीचे  सारे संदेह विलय पावतात. 

मुख्य सद्गुरूचे लक्षण । आधी पाहिजे विमळ ज्ञान । 
निश्चयाचे समाधान । स्वरूपस्थिती ॥ 
याहिवरी वैराग्य प्रबळ । वृत्ती उदास केवळ । 
विशेष आचारें निर्मळ । स्वधर्मविषई ॥
याहीवरी अध्यात्मश्रवण । हरिकथा निरूपण ।
जेथे परमार्थ विवरण । निरंतर ॥ 
जेथे सारासार विचार । तेथे होये जगोद्धार ।
नवविधा भक्तीचा आधार । बहुत जनांसी ॥
म्हणोनी नवविधा भजन । जेथे प्रतिष्ठले साधन ।
हे सद्गुरूचे लक्षण । श्रोती वोळखावे ॥ 

मुक्तीमार्गावरील मार्गदर्शन, हेच सद्गुरूचे प्रमुख कर्तव्य आहे. त्याकरिता आवश्यक ती कठोर साधना, उपासना ते त्यांच्या शिष्यांकरवी करवून घेतात. त्यात कसलीही दयामाया नाही. कारण उपासनेत कणभरही  हीण राहिले, तर शिष्यास अंतिम ध्येय पारखे होईल हा विचार सतत आहे. आपल्या शिष्यांना त्यांच्या ज्ञानार्जनाचे, आणि त्याकरिता केलेल्या कठोर परिश्रमाचे योग्य ते फलित प्राप्तं व्हावें हीच सद्गुरूच्या अंत: करणी तळमळ असते. त्यात त्यांचा कसलाही स्वार्थ नसतो. शिष्याचे हित, हेच सद्गुरूचे ध्येय असते. म्हणूनच सद्गुरूच्या  प्रत्येक आज्ञेचे मनः पूर्वक पालन करणे हे शिष्याचे कर्तव्य असते. सद्गुरूप्रती निः संदेह आणि अविचल निष्ठा असायला हवी. मनात कसलाही किंतु नको आणि सद्गुरूंच्या हेतुविषयी संशय नसावा. असे सद्गुरू आणि सत्शिष्य एकत्र येणे म्हणजे 'मणिकांचन'  योगच जणू. 
समर्थ सांगतात, अनेक विषयांचे, कला आणि कौशल्याचे ज्ञान देणारे अनेक गुरू असतात. परंतु या सर्वाहूनही आगळा-वेगळा  असा सद्गुरू एकमेव -- त्यांना आपणच ओळखायला हवे. 

असो ऐसे उदंड गुरू । नाना मतांचा विचारू ।
परी जो मोक्षदाता सद्गुरू । तो वेगळाची असे ॥
नाना सद्विद्येचे गुण । याहिवरी कृपाळुपण । 
हे सद्गुरूचे लक्षण । जाणिजे श्रोतीं ॥ 
(क्रमशः ) 
संदर्भग्रंथ :   (१) श्री ग्रंथराज दासबोध 
                  (२) श्री मनाचे श्लोक