चिंता करी जो विश्वाची ... (२४)

श्री रामदास स्वामी, समाज प्रबोधनाचे कार्य अखंड आणि अथक करीत होते. समाजाची सर्वोतोपरीने प्रगती होण्यासाठी ज्ञानाचे अदान-प्रदान होणे जरुरीचे आहे असे त्यांना वाटे. त्यातूनच नवीनं, आणखी काही चांगले -- घडू शकेल यावर त्यांचा विश्वास होता. परंतु हे घडून  येण्यासाठी समाजात स्थैर्य, शांतता आणि सलोख्याचे वातावरण असणे अत्यंत जरुरीचे आहे याचीही त्यांना जाणीव होती. 
समाजात वावरताना अनेक व्यक्ती सामोऱ्या येतात, अनेक घटना, प्रसंग घडतात, वादविवादाचे प्रसंग ओढवतात, अडचणी, संकटे घेराव घालतात.सुखाचे आनंदाचे प्रसंगही घडतात. यश मान-सन्मान,  कीर्ती, ऐश्वर्याची प्राप्ती होते. परंतु परिस्थिती कशीही असली तरी वागण्या-बोलण्याचा विवेक विसरू नये. सर्व जनलोकांबरोबर  नेहमीच संयम, सहकार्यआणि सहृदयतेचा व्यवहार ठेवावा.  अनाठायी वादविवाद करून आपसातील संबंधांना पूर्णविराम देऊ नये. कारण अशाने वातावरण दूषित होऊन, सामान्य जीवन अवघड होऊन जाते असे समर्थ सांगत असत. 

जनी वादवेवाद सोडूनि द्यावा । जनी सूखसंवाद सूखे करावा ॥
जगी तोची तो शोकसंतापहारी । तुटे वाद संवाद तो हितकारी ॥
तुटे वाद संवाद त्याते म्हणावे । विवेके अहंभाव याते जिणावे ॥
अहंतागुणे वाद नानाविकारी । तुटे वाद संवाद तो हितकारी ॥ 

अशा रितीने समाजात सुसंवाद असेल तर ज्ञानदान आणि ज्ञानार्जन ही दोन्ही  कार्ये सुकर होतात. 

ज्ञानदान  करणारे सद्गुरू आणि ज्ञानार्जन करणारे सत्शिष्य, या दोहोंचे गुणवर्णन समर्थांनी मोठे विस्तारपूर्वक केले आहे. ज्ञानार्जन कसे?, कुठे?, आणि कुणी करावे याचेही नियम  सांगितले आहेत. ज्ञानसाधनेचे अनन्य महत्त्व  विशद केले आहे. समर्थ स्वतः श्रीरामाचे परमभक्त होते. परंतु जपजाप्य, नामस्मरण आणि पूजाअर्चा करण्यातच सारे आयुष्य व्यतीत करावे, असा उपदेश त्यांनी कधीच केला नाही. कर्मकांडे, तंत्रमंत्र आणि अंधश्रद्धा, यांचा त्यांनी स्पष्ट शब्दात विरोधच केला होता. ईश्वरभक्तीचे सोंग रचून, सर्वसामान्य भोळ्या लोकांची फसवणूक करणाऱ्या ढोंगी लोकांपासून सावध राहण्याचा सल्ला ते नेहमीच देत असत.  

अनेक लोक अनेक प्रकारे उपदेश करतात सल्ला देतात. प्रत्येकाचे मत वेगळे. काही  परमेश्वर प्राप्ती साठी मंत्र, तंत्र सांगतात. हे मंत्र सुद्धा अनेक. इथे अगणित देव, आणि त्या प्रत्येक देवाचे  असंख्य भक्त.  प्रत्येकजण त्यांच्या देवाचा वेगळा  मंत्र जपण्यास सांगतात,  कारण त्यांच्या  मते त्याचाच देव हा सर्वश्रेष्ठं. कुणी ओमकार मंत्र सांगतात तर कुणी शिवमंत्र, कुणी विष्णु मंत्र तर कुणी अवधूत मंत्र. जितके देव .. तितके मंत्र. त्यांमुळे सामान्यांचा गोंधळ होतो. नक्की कुणाचे ऐकावे ते काही सुधरत नाही. 
पृथाकारे स्वतंत्र । जितुके देव तितुके मंत्र । 
सोपे अवघड विचित्र । खेचर दारूण बीजाचे ॥
पाहो जाता पृथ्वीवरी । देवांची गणना कोण करी ।
तितुके मंत्र वैखरी । किती म्हणौनी वदवावी ॥ 
"व्यक्ती तितक्या प्रवृत्ती" ह्या उक्तीची सार्थता अनुभवाला येण्यासारखीच स्थिती. प्रत्येकजण स्वतः ज्ञानी, महाज्ञानी असण्याचा दावा करतात. परंतु प्रत्येकाचा मार्ग निराळा. ज्ञानसाधना कशी करावी? ज्ञान म्हणजे नेमके काय? याच्या व्याख्या निराळ्या. नक्की कोणते ज्ञान प्राप्तं केल्याने मनुष्याची सामाजिक, वैयक्तिक आणि आत्मिक उन्नती होईल यावर देखिल अनेक मतांतरे. 
येक सांगती कर्ममार्ग । येक उपासनामार्ग ।
येक सांगती अष्टांग योग । नाना चक्रें ॥
येक तपें सांगती । येक अजपा निरोपिती ।
येक तत्त्वे विस्तारिती । तत्त्वज्ञानी ॥
येक सांगती सगुण । येक निरोपिती निर्गुण ।
येक उपदेशिती तीर्थाटन । फिरावे म्हणूनी ॥ 
या सर्व गदारोळात सामान्याचे हाल होतात. सर्वच ज्ञानी, महाज्ञानी. कुणाचे खरे मानावे? कुणाकडे दुर्लक्ष करावे? कुणाचा प्रतिवाद करावा? काहीच कळत नाही. म्हणून समर्थ सांगतात हे सर्व व्यर्थ आहे. आत्मज्ञानाविना सारे निरर्थक आहे. यासाठी स्वतःच्या बुद्धीने विचार करायला पाहिजे. योग्यं अयोग्यं पारखता यायला हवे तरच ज्ञानप्राप्ती होईल. प्रत्येकाचा उपदेश प्रमाण मानायचा म्हणाले तर हाती काहीच लागणार नाही. 
ऐसी उपदेशांची स्थिती । पुरे आता सांगो किती ।
ऐसे हे उपदेश असती । असंख्यात ॥
ऐसे उपदेश अनेक । परी ज्ञानेविणे निरार्थक । 
येविषई असे एक । भगवद्वचन ॥
नानाशास्त्रं पठेल्लोको नानादैवतपूजनम् ।
आत्मज्ञानं विना पार्थ सर्वकर्म निरर्थकम् ॥
परमेश्वराची भक्ती सदोदित अंतरी असावी असे ते सांगत असत. परंतु सुखी आणि समृद्ध आयुष्य जगण्यासाठी तेव्हढेच पुरेसे नाही हेही ते जाणून होते. त्या करिता विविध विषयांचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे असे त्यांचे म्हणणे होते. आणि ज्ञानार्जनाची प्रक्रिया कधीच संपत नाही तर अखंडित चालू असते असे त्यांचे सांगणे होते. म्हणून शहाण्या मनुष्याने सदा सावध आणि दक्ष असावे. मिळालेला प्रत्येक ज्ञानकण जोपासावा, त्याचे विश्लेषण आणि संवर्धन करावे. यामुळे अनेक नवीन कल्पना प्रत्यक्षात येणे शक्य होईल. अजूनही अज्ञात असलेल्या काही माहितीवर प्रकाश पडू शकेल, त्यायोगे समाजाची आणि मानवजातीची भरभराट होईल असा उपदेश समर्थांनी केला. 
हे कार्य, म्हणजे प्रथम ज्ञान संपादन, नंतर त्याचे संवर्धन, वृद्धी आणि जोपासना , करणे एकट्यादुकट्याचे काम नाही. त्यात अनेकांचा सहभाग असणे जरूरीचे आहे. त्याकरता  मनातील अहंभाव, वैरभाव यांचा त्याग करून सर्वांशी मनमोकळा संवाद साधता येणे जरूरीचे आहे. अन्यथा मिळालेले, प्राप्तं केलेले ज्ञान हे परिपूर्ण असणार नाही. म्हणून समर्थांनी  शिष्यांना आणि श्रोत्यांना, त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे असावे ते सांगितले आहे.
क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादें। न लिंपे कदा दंभ वादे विवादें ॥
करी सूखसंवाद जो ऊगमाचा (परमसत्य, ब्रम्हं) । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ 
सदा आर्जवी प्रिय जो सर्वलोकीं । सदासर्वदा सत्यवादी विवेकी ॥
न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ 
असे व्यक्तिमत्त्व आणि स्वभाव असणाऱ्या व्यक्ती, वादविवाद टाळून इतरांशी संवाद साधण्यात यशस्वी होतात. त्यायोगे ज्ञानाचे अदानप्रदान सुलभ होते. अशाप्रकाराने प्रसारित आणि विस्तारीत होणारे ज्ञान म्हणजे नेमके काय याचीही व्याख्या श्री समर्थांनी दासबोधात केली आहे. मनुष्य जन्मल्या पासून ते मृत्यूपर्यंत स्वतःचे अस्तित्व या पृथ्वीतलावर टिकविण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. या साठी त्याला अनेक साधन सामग्रीची जरूरी भासते. ती मिळविण्याकरिता, निर्मिण्याकरता त्याला प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी काही कौशल्ये आत्मसात करणे जरूरीचे असते. अन्न, वस्त्रं, निवारा या मूलभूत गरजांची पूर्ती झाल्यावर मनोरंजनाची आवश्यकता भासते. त्यासाठी कलानिर्मिती केली जाते. तसेच बौद्धिक समाधान मिळविण्यासाठी निरनिराळे ग्रंथ, चर्चा इत्यादी घडून येतात. पण हे सर्व करण्याकरिता जे कौशल्य लागते ते म्हणजे ज्ञान नव्हे असे समर्थ सांगतात. 
भूत भविष्य वर्तमान । ठाऊके आहे परिच्छिन्न ( स्पष्टं, संपूर्ण ) 
यासीही म्हणीजेत ज्ञान । परी ते ज्ञान नव्हें ॥ 
बहुत केले विद्यापठण । संगीतशास्त्र रागज्ञान । 
वैदिक शास्त्र वेदाधेन । हेहिं ज्ञान नव्हे ॥ 
अनेक व्यवसाय, कला, कौशल्ये लोक आत्मसात करतात. परंतु  ते सर्व म्हणजे ज्ञान नव्हे.  विविध भाषा, विद्या,  अनेक शास्त्रे,  रंग, रस, गंध, स्वर, काव्य, नाद, रूप आदींच्या  परीक्षणाची तंत्रे, इत्यादीमध्ये प्रावीण्य प्राप्तं करतात. परंतु ते सुद्धा ज्ञान नव्हेच असे समर्थ सांगतात. 

असो सकल कलाप्रवीण । विद्यामात्र परिपूर्ण ।
तरी ते कौशल्यता, परी ज्ञान - । म्हणोंची नये ॥
हे ज्ञान होयेसे भासे । परंतु मुख्य ज्ञान ते अनारिसे ( याहून वेगळे ) ।
जेथे प्रकृतीचे पिसे । समूळ वाव (मिथ्या ) ॥ 

मग हे आत्मज्ञान म्हणजे आहे तरी काय ? दुसऱ्याच्या अंतरीचे जाणावे, भूत, भविष्य वर्तावे, जन्म-मृत्यूचे रहस्य जाणून घ्यावे हे सर्व ज्ञान आहे.. परंतु आत्मज्ञान याहून वेगळेच असते. ज्याला ते प्राप्तं  झाले, त्यांस मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळाला असे समजावे. असे हे पूर्णज्ञान प्राप्तं करणे अशक्य जरी नसले तरी कठीण नक्कीच आहे. त्याकरता स्वतःचा स्वार्थ, लोभ  दूर करता यायला हवा. मोह, मायेच्या बंधनातून मुक्ती मिळवायला हवी, आणि  महत्त्वाचे म्हणजे कठोर परिश्रम करण्याची तयारी असायला हवी. या सर्वाबरोबरच अहंकाराचा त्याग करणे जमले पाहिजे. स्वभावात लीनता बाणायला हवी. हे सर्व साध्य झाले तर ज्ञानप्राप्ती होणे शक्य होईल. 

देहेबुद्धिचा निश्चयो ज्या ढळेना ।
तया ज्ञान कल्पांतकाळी कळेना ॥
परब्रम्ह तें मीपणें आकळेना । 
मनी शून्य अज्ञान हें मावळेना ॥ 

(क्रमशः) 

संदर्भ :    (१) श्री ग्रंथराज दासबोध 
              (२) श्री मनाचे श्लोक