द डर्टी पार्टस ऑफ द बायबल - खिळवून ठेवणारे पुस्तक

किंडल नामक खवीसाने आयुष्यात प्रवेश केल्यावर वाचनानुभव अगदी आमूलाग्र बदलला. आता हा बदल योग्य / अयोग्य या वादात पडण्याचे कारण नाही. कुठल्याही गोष्टीला योग्य/अयोग्य यातले एक टोपण बसवून टाकणारी मंडळी मला आदरणीय वाटतात, अनुकरणीय नाही.
सुरुवातीला भसाभसा पुस्तके उतरवून घेतली. बुकबब (bookbub) नामक वेबसाईट रोज एक ईमेल पाठवून त्या दिवशीचे 'डील्स' काय आहेत ते कळवते. त्यातली फुकट्यात असणारी पुस्तके हावरटासारखी उपसली.
तीनेक महिन्यांनी लक्षात आले की तीनेकशे पुस्तके किंडलमध्ये बसली आहेत आणि त्यातली दहासुद्धा वाचून झालेली नाहीत. मग जरा शुद्धीवर आलो नि लगाम खेचला.
एकंदरीतच पुस्तक हाताळण्याचा अनुभव गेला नि कुठेही, कधीही आणि कितीही वेळ वाचनाचा अनुभव सुरू झाला. दिवे गेले तरी अडत नाही. डिक्शनरी पुस्तकातच अंतर्भूत, तंत्रज्ञानाधारित नवीन खेळणे मिळाले की जे होते ते झाले.
फुकट मिळालेली पुस्तके बरीचशी वाचण्यायोग्य म्हणण्यापेक्षा चाळण्यायोग्यच होती. एकंदरीतच काहीतरी हरवत चालल्याची भावना बळावत चालली. हातात पुस्तक धरण्याची सवय मोडल्याने चुकचुकल्यासारखे वाटत होतेच.
आणि 'द डर्टी पार्टस ऑफ द बायबल' हे पुस्तक हाती लागले!
एखादा अत्युत्कट अनुभव येऊ घातला असेल तर मनातल्या मनात शहारल्यासारखे होते. हे पुस्तक वाचायला सुरुवात केल्यावर तसे झाले. पुस्तकांच्या बाबतीत गेल्या दशकभरात असे झाल्याचे आठवत नव्हते. चांगली पुस्तके वाचली भरपूर या दशकात, पण असे शहारणे झाले नाही. आधी स्टाईनबेकचे 'टॉर्टिआ फ्लॅट' आणि जॉन केनेडी टूलचे 'अ कॉंफेडरसी ऑफ डन्सेस' वाचताना असे झाल्याचे स्मरते.
एक आधीच सांगून ठेवतो, की पुस्तकातली भाषा बरीचशी 'थेट' आहे. रोखठोक रांगड्या शब्दांनी ज्यांच्या बालमनाला धक्के बसतात त्यांनी इकडे फिरकू नये. अर्थात ही 'थेट' भाषा ठरवून आणलेले अवसान नाही. ते पात्र जसे विचार करेल तसे फक्त लेखकाने ठोकपणे मांडले आहे इतकेच. "आपण कित्ती कित्ती बंडखोर नि आपली भाषा कशी ज्वलज्जहाल, आपण भेंचोत क्रांती करूनच टाकू" असा उबगवाणा कलाकारी आवेश अजिबात नाही.
१९३६ साली कथानक सुरू होते मिशिगनमध्ये. एका बॅप्टिस्ट धर्मोपदेशकाचा 'व्हर्जिन' मुलगा. त्याच्या मनाचा अवकाश व्यापणाऱ्या दोनच गोष्टी - देव आणि मुली. देव आहे की नाही, बायबल खरे आहे की नाही हे देवाच्या दिशेने जाणारे विचार. आणि आपल्याला पहिला शरीरसुखाचा अनुभव कधी येईल, कुणाबरोबर येईल, हे मुलींच्या दिशेने जाणारे विचार. बऱ्याच गोष्टी घडतात, नि कथानक (आपल्या नायकाला घेऊन) इलिनॉयमार्गे टेक्ससच्या दिशेने सरकते. वाटेत एक तत्त्वज्ञ 'होबो' कथानकात मिसळून जातो. या कथेवर जर चित्रपट निघाला तर मॉर्गन फ्रीमनखेरीज दुसरे कुणी त्या होबोच्या भूमिकेसाठी असू शकतच नाही.
थोडी फँटसी, थोडी भावुकता, थोडा तर्कशुद्ध विचार, जे काही मिश्रण आहे ते अगदी भयंकर भन्नाट आहे, एखाद्या जमलेल्या पिना कोलाडासारखे.
पुस्तक संपत येताना हुरहूर लागते, आता हे संपणार म्हणून! ही अजून एक खूण.
कथानक सांगून विरस करीत नाही. इच्छा, वेळ आणि पैसे हा त्रिवेणी संगम जमला तर वाचूनच टाका. पेपरबॅक महाग आहे (७२८ रुपये), पण किंडल २०१ रुपयांत आहे.
लेखक - Sam Torode