मे २५ २०१७

युएस कॅपिटॉल उत्तरार्ध

 ~ पूर्वार्ध ~ 
पहिल्या दिवशी कॅपिटॉल बाहेरून पाहिल्यावर दूसर्‍या दिवशी आम्ही कॅपिटॉल आतून पाहण्यास परतलो. सुरक्षा तपासणी पार पाडून आम्ही व्हिजिटर सेंटर मध्ये पोचलो. 
व्हिजिटर सेंटरमधले पुतळे
        
आमच्या मुलीचे स्ट्रोलर बरोबर असल्यामुळे आम्हाला लिफ्ट वापरायचा पास दिला गेला.  शिवाय कॅपिटॉलच्या गायडेड टूर आमची वेळ आम्हाला देण्यात आली. तिथून आम्ही आतच असलेल्या भव्य थिएटरात जाऊन बसलो. लवकरच कॅपिटॉलची माहिती आणि इतिहासपर माहितीपट दाखवायला सुरुवात झाली. मात्र आमच्या कन्येला आम्ही हा माहितीपट पाहावा ही बाब काही रुचली नाही आणि तिने आम्हाला तिथून लगेच बाहेर काढले ;-). तिथून पुढे गायडेड टूर सुरू झाली. आम्हा प्रत्येकाला एक हेड सेट कानाला लावायला देण्यात आले. शिवाय लेकीलाही एक हेड सेट खेळायला दिला. या हेडसेट्सच्या साहाय्याने टूर गाइडचे बोलणे आम्ही सहजपणे ऐकू शकत होतो. 

तिथून आम्हाला "Rotunda" च्या भव्य दालनात मध्ये नेण्यात आले. रोटूंडा म्हणजे एक वर्तुळाकार दालन ज्याच्या छतावर (बहुतेक वेळी) घुमट असतो. या दालनाचे बांधकाम १८१८ साली सुरू होऊन १८२४ साली पूर्ण झाले. यावरच्या घुमटाची निर्मिती १८५७ ते १८६६ दरम्यान झाली. रोटूंडाचा व्यास ९६ फूट अन उंची १८० फूट आहे. या जागेत जगप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ लिबर्टी संपूर्णपणे मावू शकते.रोटूंडा दालनाचा उपयोग बर्‍याचदा नवे पुतळे आणि चित्रे यांच्या उद्घाटनासाठी वापर केला जातो. इथे वेगवेगळ्या राज्यांनी कॅपिटॉल मध्ये ठेवण्यासाठी दिलेले पुतळे आणि पेंटिंग्ज यांचा समावेश असतो. बहुतांश पुतळे माजी राष्ट्राध्यक्ष अन अमेरिकेच्या इतिहासातील प्रसिद्ध व्यक्तिंचे असतात. संपूर्ण कॅपिटॉलमध्ये अमेरिकेतल्या प्रत्येक राज्याकडून किमान एक पुतळा आलेला असतो. राज्यांना पुतळा बदलण्याचाही पर्याय मिळतो. यासाठी अट एवढीच असते की अगोदरचा पुतळा त्या राज्याने सार्वजनिक ठिकाणी ठेवावा (जसे त्या राज्याचे स्टेट कॅपिटॉल किंवा तिथले म्युझियम). रोटुंडामधली पेंटिंग्ज बहुतेक करून ऐतिहासिक घटनांवर आधारित असतात. 

 इथल्या घुमटाच्या छतावरचे चित्र Constantino Brumidi याने १८६५ साली काढून पूर्ण केले आहे. चित्राचे नाव आहे "दुवा क्र. १". "Apotheosis" चा अर्थ आसा होतो की एखाद्या माणसाला देवत्व बहाल करणे. या चित्रात असे दाखवले आहे की जॉर्ज वॉशिंग्टन यांना देवत्व लाभले आहे. त्यांच्या बरोबर स्वर्गात स्वातंत्र्य, अधिकार, विजय आणि प्रसिद्धीच्या देवता आहेत. तसेच त्यांच्या भोवती १३ मूळ वसाहती कुमारिकांच्या स्वरूपात आहेत.त्याखाली पृथ्वीवर रोमन देवदेवता अमेरिकन इतिहासातील प्रमुख व्यक्तींबरोबर संवाद साधत आहेत. Brumidi याने अमेरिकन इतिहासातील आणखीन काही प्रसंग चितारले आहेत. जसे की कोलंबसचे अमेरिकन किनार्‍यावरचे आगमन आणि कॅलिफोर्नियातील गोल्ड रश. ही चित्रे रोटूंडाच्या भोवती जवळजवळ ५८ फूट उंचीवर चितारली आहेत. मात्र हे करत असताना Brumidi बरोबर अपघात झाला. त्यानंतर त्याने त्याच्या मृत्यू पर्यंत इतर काही चित्रांवर काम केले. १८८० साली Brumidi च्या मृत्यू नंतर त्याच्या डिझाइन असलेले उर्वरित प्रसंग Filippo Costaggini याने पूर्ण केले. Filippo Costaggini याने हे काम १८८९ साली पूर्ण केले. तरी रोटूंडा भोवती ३१ फूट जागा रिकामी राहिली. Allyn Cox याने १९५२-५३ मध्ये ही रिकामी जागा भरून काढली.या फोटोत म्युरलसारखी दिसणारा जो प्रकार आहे ती प्रत्यक्षात पेंटिंग्जची मालिका आहे व द्विमितीय असूनही त्रिमितीय परिणाम साधत आहे. यामध्ये अमेरिकेचा इतिहास चितारला आहे. १८५१ साली रोटूंडाचा लाकूड आणि तांब्याने बनलेला घुमट आता कास्ट आर्यन ने नव्याने बांधला गेला. या नव्या घुमटाची डिझाइन थॉमस वॉल्टरची होती. काँग्रेसने नागरिकांना बहाल केलेला सर्वाचं सन्मान "काँग्रेशनल गोल्ड मेडल" वितरण सोहळा येथे पार पडतो. पहिले "काँग्रेशनल गोल्ड मेडल" मिळवण्यात पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारा पहिला अमेरिकन अ‍ॅस्ट्रोनॉट जॉन ग्लेन आणि चंद्रावर पहिल्यांदा पाऊल ठेवणार्‍या नील आर्मस्ट्राँग, बझ अलड्रिन आणि मायकेल कॉलिन्स यांचा समावेश आहे. रोटूंडा मध्ये आतापर्यंत सुमारे ३० जणांना त्यांच्या मृत्यूनंतर अंत्यदर्शनासाठी ठेवले गेले आहे. याला "दुवा क्र. २" असे संबोधले जाते. यात प्रेसिडेंट रॉनल्ड  रिगन आणि प्रेसिडेंट जॉन एफ केनडी यांचा समावेश आहे. तसेच "Lying in Honor" मध्ये अशा अमेरिकन नागरिकांचा समावेश असतो ज्यांनी कधी पब्लिक सर्व्हिसचे पद अथवा सैन्यात भाग घेतलेला नाही. राईट्स चळवळीमध्ये अग्रेसर असणार्‍या दुवा क्र. ३ यांचा त्यात समावेश आहे.
भिंतीवरची ही पेंटिंग्ज भिंतीप्रमाणेच वक्र वाटावीत म्हणून भोवतालच्या चौकटीची रचना त्याप्रमाणे केली आहे.
     
नेटिव्ह राजकुमारी Pocahontasच्या बाप्तिस्म्याचा प्रसंग
डिस्कवरी ऑफ मिसिसिपी
 
दुवा क्र. ४
 
डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स
 यानंतर आम्ही Old Senate Chamber मध्ये गेलो. १८५९ पर्यंत सिनेटचे कामकाज या सभागृहवजा दालनात चालायचे. गमतीचा भाग असा की ज्यावेळी इथे सिनेटचे कामकाज सुरू नसायचे त्यावेळी इथे चक्क फार्मर्स मार्केट (अमेरिकेतला आठवडी बाजार) भरायचे. या दालनात भाजीपाल्यापासून जिवंत कोंबड्याही विकत मिळत असत. १८६० ते १९३५ या काळात इथेच अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाचे कामकाज चालले.  
डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्सची प्रत 
या दालनाच्या शेजारी विद्यमान हाउस स्पीकर पॉल रायन यांचे कार्यालय आहे.
 अमेरिकन वृत्तवाहिन्यांवर बरेचदा संध्याकाळच्या बातम्यांमध्ये त्यांचे प्रतिनिधी वृत्तांकन करताना व सिनेटर्स अन हाउस ऑफ रिप्रेझेंटेटीव्ज (काँग्रेस) च्या सदस्यांचे बाइट घेताना दाखवले जाते. अर्थात त्यावेळी अवतीभवती पर्यटक मात्र नसतात.         

इथून पुढे आम्हाला एक विचित्र नाव असलेल्या दालनात नेले गेले. हे दालन रोटूंडाच्या खाली आहे. या दालनाचे नाव होते "The Crypt" असे होते. चर्च किंवा चॅपेलच्या तळघरात काही वेळा कुणा मोठ्या व्यक्तीची कबर असते. अशा दालनास क्रीप्ट म्हणतात. जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या मृत्यूनंतर त्यांचे दफन या दालनाच्या मध्यभागी पुरावेत असे त्यावेळी काँग्रेसच्या सदस्यांचे मत होते.  मात्र प्रत्यक्षात असे काही झाले नाही, पण या दालनाला "The Crypt" हे नाव मात्र चिकटले. याही दालनात अनेक उल्लेखनीय पुतळे आणि भव्य चित्रांचा समावेश आहे. तसेच कॅपिटॉलची वास्तू ज्या जमिनीवर बांधली गेली आहे त्या जागेच्या मूळ मालकाचाही पुतळा इथे बघायला मिळतो. तसेच प्रसिद्ध मॅग्ना कार्टाची काचेवरची सोनेरी अक्षरांतली प्रतदेखील येथे ठेवली आहे. 
क्रीप्टमधला प्रेसिडेंट एब्रहम लिंकन यांचा पुतळा
  कॅपिटॉल मधल्या पुतळ्यांविषयी एक बाब गाईडाने आवर्जून सांगितली. ती म्हणजे लवकरच कॅपिटॉल मधील पुरूष आणि स्त्रियांच्या पुतळ्यांची संख्या एकसारखी करणे हे उद्दीष्ट. सध्या स्त्रियांच्या पुतळ्यांची संख्या पुरुषांच्या पुतळ्यांपेक्षा कमी आहे. याशिवाय दिलेली माहिती म्हणजे जुने पुतळे बहुतेक करुन संगमरवरी आहेत तर नवे पुतळे ब्राँझचे. इथे आमची गायडेड टूर संपली. मात्र गाइडने पुन्हा व्हिजिटर सेंटर मध्ये जाऊन तिथला स्टॅच्यू ऑफ फ्रीडम हा पुतळा पाहायला सांगितला. हा पुतळा कॅपिटॉलच्या घुमटावरील स्टॅच्यू ऑफ फ्रिडमची प्रतिकृती आहे. घुमटावर ठेवलेला स्टॅच्यू ऑफ फ्रीडम तत्कालीन गुलामांनी बनवला ही माहिती न लपवता सांगितली जाते जेणेकरून इतिहासाची पुनरावृत्ती होवू नये.

गायडेड टूर संपल्यानंतर आम्ही व्हिजिटर सेंटरमधल्या एक्झिबिशन हॉलला भेट दिली. येथे कॅपिटॉलच्या वेळोवेळच्या बांधकामाचे फोटोज, आरेखने, परिसराचे मॉडेल्स वगैरे ठेवले आहेत. तसेच कॅपिटॉलबाबत विविध माहिती आकर्षक स्वरूपांत प्रदर्शनार्थ ठेवली आहे. या हॉलमधली सर्वाधिक आकर्षक गोष्ट म्हणजे. कॅपिटॉलच्या घुमटाची प्रतिकृती.
       

 
कॅपिटॉलमधली प्रत्येक वस्तु आकर्षक वाटेल अशीच होती, उदा जागोजाग ठेवलेल्या डस्टबीन्स   

 दोन दिवस युएस कॅपिटॉलचे आतून बाहेरुन निरीक्षण करताना वेळ कसा निघून गेला ते अजिबात कळले नाही. भरपूर पायपीट होणे हे ओघाने आलेच. शरीराला थकवा जाणवत असला तरी मनात मात्र कॅपिटॉलच्या इमारतीची भव्यता, तिचे स्थापत्यसौंदर्य, नेटकेपणा, स्वच्छता, आतली शिल्पकला व जागतिक दर्जाचे पुतळे अन पेंटिंग्ज या सर्वांमुळे भारावून गेल्याची भावना होती. कॅपिटॉलचे सुरक्षारक्षक अन व्हिजिटर सेंटरचे कर्मचारी यांचे सौजन्यपूर्ण आचरणही या अनुभवाला अधिक संस्मरणीय बनवणारे होते.                 

कॅपिटॉलच्या अनेक आठवणी अन काही खरेदी केलेली सॉव्हेनियर्स घेऊन आम्ही कॅपिटॉल मधून बाहेर पडलो.  आशा आहे तुम्हाला हे वर्णन आवडले असेल. कॅपिटॉलचे आतून फोटो काढणे हे बाहेरच्या फोटोजपेक्षा मला बरेच अवघड गेले. एकूणच युएस कॅपिटॉलच्या फोटोजला न्याय देण्यासाठी एकादा कसलेला फोटोग्राफरच हवा हे मला पुन्हा एकदा कळले. भविष्यात इतर स्टेट कॅपिटॉल्सला भेटी देऊन त्याबाबत लिहिण्याचा मानस जाहीर करतो अन युएस कॅपिटॉलच्या उत्तरार्धाचा समारोप करतो.       

माहितीचा स्रोतः विकी व युएस कॅपिटॉलचे रोटुंडा अ‍ॅप व तिथे मिळालेली गायडेड टूर.

Post to Feedखूपच रंजक
धन्यवाद
विनंती

Typing help hide