जून १० २०१७

चिंता करी जो विश्वाची ... (२५)

श्री रामदास स्वामी परोपरीने ज्ञानार्जनाचे, ज्ञानसंपादनाचे महत्त्व लोकांना सांगत असत. या पार्थिव जगात सुख आणि समाधानाने जगण्यासाठी ज्ञानसाधना जरूरी आहे असे त्यांचे सांगणे होते.  
त्यांनी कौशल्ये आणि ज्ञान यातील फरक देखिल सांगितला आहे. प्रत्येकाला काही ना काही कौशल्य असणे आवश्यक आहे, कारण त्या योगे स्वतःची आणि कुटुंबाची उपजीविका करणे शक्य होते. भौतिक सुखसाधनांच्या प्राप्तीसाठी या कौशल्यांचा उपयोग होऊ शकतो. परंतु आत्मिक, आध्यात्मिक उन्नतीसाठी ते पुरेसे नाही. त्यासाठी उत्तम गुरूंच्या मार्गदर्शनाखाली कठोर साधना करायला लागते. बहुसंख्य लोकांना ते उमगत नाही. आपण आत्मसात केलेली कौशल्ये म्हणजेच ज्ञान आहे अशा समजुतीत ते जीवन व्यतीत करतात. भौतिक सुखाखेरीज अन्य काहीही त्यांना प्राप्तं होत नाही, आणि अर्थात आपल्या या नुकसानाची जाणीवही त्यांना नसते. जेव्हा संकटे सामोरी येतात अथवा अंतकाळ समीप येतो त्या वेळी समज येते की आपण जे ज्ञान समजत होतो, त्याचा उपयोग या घडीला केवळ शून्य आहे. 

सुख सुख म्हणतां हे दुःख ठाकूनी आले ।
भजन सकळ गेले चित्त दुश्चित जाले ।
भ्रमित मन कळेना हीत ते आकळेना । 
परम कठिण देही देहबुद्धी वळेना ॥ 

अशी परिस्थिती ओढवल्यावर भान येते, स्थितीची जाणीव होते .. परंतु तोवर वेळ निघून गेलेली असते आणि पश्चातापाशिवाय हाती काहीच  उरत नाही. म्हणून समर्थ त्यांच्या श्रोत्यांना आणि शिष्यगणांना सावधानतेचा इशारा देतात. आपले हित कशात आहे हे आपणच ओळखले पाहिजे. चार लोकं सांगतात ते ऐकावे जरूर -- परंतु कृती करताना स्वतःची बुद्धीच प्रमाण मानावी, म्हणजे जन्माचे कल्याण होईल असे ते सांगत. खरे ज्ञान कोणते?  ते ओळखून,   अर्जित करावे म्हणजे अंतकाळी निराशा येणार नाही असे त्यांनी सांगितले होते. 

ज्ञानाचे सत्यस्वरूप म्हणजे आत्मज्ञान. ते नेमके काय असते आणि कसे आत्मसात करावे याचे सविस्तर वर्णन समर्थ त्यांच्या दासबोध या ग्रंथात करतात. जेव्हा सारे भेदाभेद लयाला जातात, मनातील सारे किंतु मावळतात, जेथे बुद्धीचे सारे तर्क विरून जातात आणि चराचराची जाणीव लोप पावून परब्रम्ह आणि साधक  यांचे अद्वैत साधले जाते,  तेच शुद्ध ज्ञान असते. 

जेथे दृश्य प्रकृती सरे । पंचभूतिक वोसरे ।
समूळ द्वैत निवारे । या नाव ज्ञान ॥ 
मनबुद्धी अगोचर । न चले तर्काचा विचार । 
उल्लेख परेहूनी पर । या नाव ज्ञान ॥

समस्त प्रकृतीचे भान असणे, त्याचे ज्ञान असणे यांस  पदार्थज्ञान म्हणावे.  या सर्वाचे मूळ स्वरूप जाणवते ते म्हणजे स्वरूपज्ञान. ज्यावेळी साधकाला उन्मनी अवस्था प्राप्तं होते, तेव्हा तो स्वस्वरूप बघू शकतो. भौतिक जगापासून जे वेगळे आहे असे स्वरूप त्यांस दृग्गोचर होते. आत्मरूपाला तो प्रत्यक्ष अनुभवू शकतो. यालाच समर्थ स्वरूपज्ञान असे म्हणतात. 

दृश्य पदार्थ जाणिजे । त्यांस पदार्थज्ञान बोलिजे ।
शुद्ध स्वरूप जाणिजे । या नांव स्वरूपज्ञान ॥
ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण । शुद्ध स्वरूपची आपण ।
या नाव शुद्ध स्वरूपज्ञान । जाणिजे श्रोती ॥ 

आपण आपणांस ओळखले की, अज्ञानाचा अंध:कार फिटतो. पृथ्वी आणि त्यावरील पंचमहाभूते, ग्रह, तारकांनी व्यापलेले अवकाश आणि साऱ्या जीवसृष्टीचे  अस्तित्व  आपल्या अस्तित्वाशी एकरूप होते,  शुद्ध ज्ञानाचा साक्षात्कार होतो.  सृष्टीचे जे मूलतत्त्वं आहे त्याचे नुसते उच्चारण केल्याने नाही, तर त्याच्या सत्यार्था पर्यंत जेव्हा साधक पोहोचतो, तेव्हा त्यांस ज्ञानप्राप्ती होते.  ज्ञानाच्या प्राप्तीमुळे 'स्व' चे खरे स्वरूप सामोरे येते. साऱ्या भ्रम-भ्रांतीचा विलय होतो. शंका-कुशंका लोप पावतात, अनिश्चिततेचा ऱ्हास होऊन शाश्वत सत्याची ओळख होते. कसलीही बंधने उरत नाहीत, मत-मतांतरांची सुजाण चर्चा घडते -- ज्यात  कसलीही किल्मिषे नसतात आणि अंती मतैक्य देखील सहजतेने घडते. असे ज्ञान हेच शुद्ध निर्मळ ज्ञान असते. हे शुद्धज्ञान स्वयंभू असते. ते साधकाला निव्वळ साधनेने प्राप्तं होते. 

शोधिता आपले मूळ स्थान । सहजची उडे अज्ञान ।
या नाव म्हणिजे ब्रम्हज्ञान । मोक्षदायेक ॥
आपणासी वोळखो जाता । आंगी बाणे सर्वज्ञता ।
तेणे येकदेसी वार्ता । निशेष उडे ॥
मी कोण ऐसा हेत -। धरून, पाहतां देहातीत । 
अवलोकिता नेमस्त । स्वरूपची होये ॥ 

ज्ञानप्राप्तीने भौतिक जगाची जाणीव संपून अंतरात्म्याचे स्वरूपदर्शन घडून येते. भारतवर्षात अनेक थोर ऋषी-मुनी झाले, ज्ञानी -महाज्ञानी झाले, जसे की व्यास, वशिष्ठ, शुक, वाल्मीकी, अत्री, नारद आणि अजून किती तरी. सर्वांनी ज्ञानप्राप्ती साठी अपार कष्ट केले. अनेक धर्मग्रंथ, वेद, पुराणे यांचे वाचन, मनन आणि चिंतन केले. त्यातील तत्त्वज्ञान आणि सिद्धांतांचा मतितार्थ शोधला. तो आपल्या शब्दात बद्ध करून इतरांस ऐकवला. त्या साऱ्याचे सार हे एकच, कारण शुद्धज्ञान हे एकमेव आहे. त्यात द्वैत नाही, विभाजन नाही,  कुठल्याही संशयाला थारा नाही. सारे शुद्ध आणि स्पष्ट. 

सकळ साधनांचे फळ । ज्ञानाची सिगची (परिपूर्णता) केवळ ।
जेणे संशयाचे मूळ । निशेष तुटे ॥
छपन्न भाषा तितुके ग्रंथ । आदिकरून वेदांत । 
या इतुकियांचा गहनार्थ । येकची आहे ॥ 

तीर्थयात्रा, दानधर्म अथवा तपश्चर्येने शुद्धज्ञानाची प्राप्ती होत नाही, तर त्यासाठी अखंड साधना करावी लागते. सर्व साधनांचे अंतिम ध्येय एकच असते  --- ज्ञानप्राप्ती. गुरूकृपेने ही ज्ञानप्राप्ती शक्य होते. त्यानंतर समर्थ त्यांच्या शिष्यांना साधनेचा मार्ग दर्शवतात. साधना करण्यासाठी चित्त, बुद्धी स्थिर असायला हवी. गुरूमुखीचे बोल श्रवण करून त्याचे सतत मनन आणि चिंतन करायला हवे. सर्व ग्रंथात जो श्रेष्ठ आहे आशा वेदांताचा अभ्यास करावा. अशा या महान वेदांताचा मतितार्थ समर्थ त्यांच्या शिष्यांना समजावून सांगतात. 

वेदांताचे मर्म आहे ते म्हणजे परब्रम्हाशी परिचय. आणि ते  ब्रम्हं  म्हणजे दूसरेतिसरे काहीही नसून तू स्वतःच आहे. वेदांत आपल्याला शिकवितो ".... अहं ब्रम्हास्मि ". तू आणि ब्रम्हं एकरूप आहात. ...तू स्वतः  ब्रम्हस्वरूप  आहेस. तुला तुझ्या या स्वरूपाचे दर्शन घडेल तेव्हा अत्यंतिक समाधानाचा लाभ होईल. स्वस्वरूपाचे दर्शन जेव्हा तुला घडेल, त्यावेळी समस्त सृष्टी मिथ्या आहे हे तू जाणशील. देहस्थितीची जाणीव लयाला जाईल. तुला तुझे आत्मभान येईल. तेच तर आत्मज्ञान आहे. ज्याची भौतिकाची जाणीव सुटत नाही, त्यांस असा साक्षात्कार होणे नाही हेच त्रिवार सत्य.  

या नांव शिष्या आत्मज्ञान । येणे पाविजे समाधान ।
भवभयाचे बंधन । समूळ मिथ्या ॥
देह मी वाटे ज्या नरा । तो जाणावा आत्महत्यारा ।
देहाभिमाने येरझारा । भोगिल्याच भोगी ॥ 

अशा प्रकारे आत्मज्ञान हेच मुक्तीचे देखिल साधन आहे असे समर्थ सांगतात.  ब्रम्हज्ञान प्राप्तं झाले, की  साधकास वैराग्यप्राप्ती  होते. त्याकरिता त्याला वेगळे सायास करावे लागत नाही. ज्याची वृत्ती अशी विरागी झाली, त्यास पूर्णज्ञानाची प्राप्ती झाली हे निश्चित समजावे.  क्षुद्र भौतिक सुखाच्या मोहजाला मध्ये फसून जो अशा अपूर्व ब्रम्हस्वरूपाकडे पाठ फिरवितो,  त्याच्यासारखा कर्मदरिद्री तोच.   

ऐक शिष्या सावधान । आतां भविष्य मी सांगेन ।
जया पुरूषास जे ध्यान । तयासी तेंची प्राप्तं ॥
म्हणोनी जे अविद्या । सांडून धरावी सुविद्या ।
तेणे गुणे जगद्वंद्या । पाविजे सीघ्र ॥

मोह हाच सर्व दुःखाचे, असमाधानचे मूळ आहे. म्हणून त्याचा त्याग करून शुद्धज्ञानाची साधना करणे हितकारक आहे, असा उपदेश समर्थ त्यांच्या शिष्यांना करतात. ज्या प्रमाणे शरीर व्याधिग्रस्त झाले असता वेदना होता. परंतु त्यावर योग्य मात्रेचे औषध घेतले असता ती व्याधी नाहीशी होऊन वेदनेचा निचरा होतो. तसेच मोह-माया ही मनुष्याच्या आत्म्यास, बुद्धीस जडलेली व्याधी आहे. आणि शुद्ध आणि पूर्णज्ञानाच्या प्राप्तीमुळे ही व्याधी दूर होऊन  अवर्णनीय अशा सुख आणि शांतीची प्राप्ती होईल असे समर्थ सांगतात.  निद्रिस्त मनुष्याला स्वप्ने दिसतात. त्या स्वप्नातील मिथ्या जगात जेव्हा त्याचा संकटांशी सामना होतो, तेव्हा भयातिरेकाने त्याची अवस्था केविलवाणी होते. जेव्हा तो जागृतावस्थेमध्ये येतो, तेव्हा त्याला सत्य परिस्थितीचे आकलन होऊन भय-भितीचा अंत होतो. समर्थ त्यांच्या शिष्यांना सांगतात, जो ज्ञानसाधक नाही, त्याची स्थिती ही निद्रिस्त मनुष्याप्रमाणे आहे. जेव्हा त्यांस ज्ञानप्राप्ती होईल तेव्हा सत्य परिस्थितीचे आकलन होऊन परमसुखाची प्राप्ती होईल. 

जगी पाहतां सांच ते काय आहे ।
अति आदरे सत्य शोधूनी पाहें ।
पुढें पाहतां पाहतां देव जोडे ।
भ्रम भ्रांती अज्ञान हें सर्व मोडे ॥

(क्रमशः) 

संदर्भ :     (१) श्री ग्रंथराज दासबोध 
                (२) श्री मनाचे श्लोक 
                (३) करूणाष्टकेPost to Feed
Typing help hide