पाऊस

चहा काय फक्कड झालाय. असा चहा फक्त तीच करू जाणे. चवीपुरतं आलं, चवीपुरती साखर आणि आटवलेलं दूध. दिवसभराचा सगळा शिणवठा त्या एका कपात विरघळून जातो! हातात रुपालीनी केलेला चहा आणि बाहेर धुवांधार पाऊस! टेरेस मधला झोका आणि हवेतला गारवा! खूप काळ ढग दाटून आल्यावर अनिर्बंध पडणारा पाऊस. बापरे! रुपालीचा चहा आणि हा असा पाऊस हे कॉम्बिनेशन डेडली आहे. फारच अंतर्मुख करतं. नेहमीच असं होतं. नको नको म्हणत असतानाही काही जुने क्षण नजरेसमोर येतात आणि मग माझ्या हातात फक्त त्या सरी झेलणं तेवढं शिल्लक राहतं.

रुपालीला पहिल्यांदा पाहिलं तो दिवस काय सुंदर गेला माझा. Beauty! She was beautiful! रात्रीची झोप उडवायला तिची एकच भेट पुरेशी होती. आज दहा वर्षांनंतरही तिच्यात जराही बदल झालेला नाही. Amazing! त्या दिवसात तिचं सौन्दर्य आणि तिच्या हाताची चव ह्या दोन गुणांमुळे तीचा 'अरेंज मॅरेज मार्केट' मधला भाव खूपच वाढला होता. कसं काय कोण जाणे पण नशिबातल्या फाशांचं दान माझ्या बाजूनी पडलं. मला अजूनही लक्ख आठवतात ते दिवस! पहिल्या काही मुलींच्या नकारानंतर झालेला हिरमोड आणि मग रुपालीची भेट! माझी सगळी स्वप्न रंगवून टाकली तिनी. त्या वेळी मला वाटलं की ते लग्न हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण होता. असं वाटलं होतं की आकाशातली परीच उतरली आहे खाली, माझ्या शेजारी. लग्नाच्या त्या सगळ्या गडबडीतही किती शांत राहिली होती ती. शांत आणि निर्विकार. अगदी दहा वर्षांनंतरही तशीच आहे ती. शांत आणि निर्विकार! Pathetic!

नाही; चुकतंय! चुकतंय! असं म्हणतात की कायम माणसाची चांगली बाजू बघावी. काय आवडतं मला रुपालीचं? तिचं रूप, तिच्या हाताची चव, आणि.. आणि? अजून काहीच चांगलं वाटत नाही मला तिच्यात? पण अजून काय पाहिजे? ती मला कधीही कशालाही विरोध करत नाही. ती माझ्या कोणत्याही गोष्टीत नाक खुपसत नाही. मित्र म्हणतात माझ्यासारखा भाग्यवान मीच! खरंच तसं आहे का? नाक खुपसणे लांबच राहिलं, ती माझ्या कोणत्याच गोष्टीत अजिबात रस घेत नाही. तिच्यासमोर मन कधीच मोकळं करता येत नाही. किती वेळा प्रयत्न केलाय मी. पण..

का विचार करतोय मी हा? परत परत तेच उगाळून काय होणार?

रुपाली चांगली आहे, मी तिच्यावर खूप प्रेम केलं पाहिजे, रुपाली चांगली आहे..

छ्या! काही उपयोग होत नाहीये आज. विचारांनी अगदी काहूर माजवलंय डोक्यात! हा पाऊस येतो आणि सगळी गडबड करून टाकतो! हे विचारांचं ओझं कोणाबरोबर तरी share करावंसं वाटतं. असं वाटतं की पावसानी स्वैर झालेल्या मनाला अगदी मोकळं सोडावं. वाटतं की खूप बोलावं. जुने प्रसंग आठवावे. पहिली भेट. पहिलं गिफ्ट. पहिली जवळीक. पहिला स्पर्श.. पण ह्या सगळ्यात ती होती का? सगळं कसं एकतर्फी चाललं होतं माझं. असं वाटलं होतं की थोडा वेळ गेला ती बहरेल आपोआप. काही लोकांना वेळ लागतो अशी नाजूक नाती समजून घ्यायला. माझी रसिकता अगदी उतू जात होती तेव्हा. आणि ती आपली निर्विकार! Job मिळेपर्यंत झालेल्या आर्थिक ओढाताणीमुळे पहिलं प्रेम असं काही अनुभवताच आलं नाही. अरेंज मॅरेज च्या प्रोसेस मध्ये मनापासून आवडली ती रुपाली. इतकी वर्ष मनात साठवून ठेवलेल्या सगळ्या भावना अचानक मुक्त झाल्यासारखं वाटलं होतं मला. माझी सखी, माझी जोडीदार, माझं प्रेम, माझा आधार अशा अनेक रूपात तिला पाहत होतो मी. आणि ती मात्र होती निर्विकार! समोरच्यानी प्रतिसादच दिला नाही की मनाची अगदी तडफड होते. किती वेळा तिला अशा वागण्यामागचं कारण विचारलं मी. हरप्रकारे विचारूनही तिनी मला कधीच काही सांगितलं नाही. तिच्याकडे कधी काही नव्हतंच सांगण्यासारखं. मग वाटायचं की सगळं सोडून द्यावं. हिला कळतच नाहीये काही. अगदी हरल्यासारखं, फसवल्यासारखं वाटायचं अशा वेळी. इतकं निर्विकार कोणी कसं असू शकतं?

ह्याउलट मृणू... मृण्मयी! बोलकी, उत्साही, आनंदी, पटकन मनाचा ठाव घेणारी! कधी आली ती माझ्या इतक्या जवळ?

दोन? नाही जवळपास तीन वर्ष झाली तिला पहिल्यांदा भेटून. Interview द्यायला आली आणि जाताना माझं मनच जिंकून गेली. Brilliant! smart! Well read and well travelled! आणि ह्या सगळ्यांहून उठून दिसणारी तिच्यातली रसिकता! अहाहा! तिनंच आमची ऑफर  नाकारली म्हणून बरं झालं. नाहीतर मी काही दिवसातच आकंठ बुडालो असतो तिच्या प्रेमात! त्या पहिल्या भेटीतून सावरायला वेळच मिळाला नसता मला.

पण देवाला काळजी होती रुपालीची. त्यानी वेळ दिला मला सावरायला. रुपालीच्या पहिल्या भेटीने जशी माझी झोप उडवली होती तशीच मनूच्या भेटीनंतरही उडाली. स्वप्नरंजनातच किती दिवस घालवले मी. परत teenager झालो होतो मी त्या दिवसात. माझी मनू, माझी मृणू! हात कसे थरथरत होते तिला पहिला message करताना! काय म्हणेल ती? काय विचार करेल माझ्याबद्दल? माझी ओळख ठेवली असेल का तिनी? एक ना दोन, हजार विचार येत होते डोक्यात त्या दिवशी. आणि मग तिचं ते उत्तर आणि त्यानंतरची भेट. मी कितीही casual वागायचं ठरवलं तरी तिनी ओळखलंच. माझ्या भेटीने तिचीही झोप उडाली होती हे ऐकून जणू अंगावर मोरपिसच फिरलं माझ्या! असं वाटलं की माझ्या नशिबाच्या फाशांनी कित्येक वर्षांनंतर परत एकदा माझ्या बाजूनी दान पाडलं. मृणू  आली माझ्या आयुष्यात!

पाऊस वाढला वाटतं. चहा संपला? अजून एक चहा मिळाला तर काय बहार येईल!

किती तरी वेळा भेटलो तिला त्यानंतर. अगणित वेळा. पण प्रत्येक वेळी दोन भेटीत बरेच दिवसाचं अंतर पडायचं. Cool down period mandated by God? का झालं असेल असं? रुपालीची मागच्या जन्मीची पुण्याई, दुसरं काय? पण तरीही छान चाललं होतं. मृणूबरोबरच्या त्या भेटी माझ्या मनाची तगमग शांत करायला पुरेशा होत्या. ती तिच्या जादूने मला परत नवाकोरा बनवून टाकायची. माझ्यात साठलेला सगळा थकवा, मनस्ताप, चिडचिड ती हळुवार फुंकरून उडवून लावायची. परत एकदा इतकी वर्ष मनात साठवून ठेवलेल्या सगळ्या भावना अचानक मुक्त झाल्यासारखं वाटायला लागलं होतं मला. माझी सखी, माझी जोडीदार, माझं प्रेम, माझा आधार अशा अनेक रूपात तिला पहायला लागलो होतो मी.

कधी वाटतं तिच्या घरी तिच्या लग्नाचा विषय निघालाच नसता तर? मग मला त्या प्रश्नाला एवढ्या लवकर सामोरं जावं लागलं नसतं. आणि इतक्या तातडीनं तो निर्णय घ्यावाच लागला नसता.

काल ती मला शेवटचं भेटायला आली होती. परत कधीच भेटणार नाहीये ती आता. पुढच्या आठवड्यात लग्न आहे तिचं. दुसऱ्या पुरुषाबरोबर! God, I am feeling jealous! तो कसा ठेवेल तिला? ती खुश राहील ना त्याच्याबरोबर? का माझी आठवण काढेल?

आठवणी! तेवढंच शिल्लक आहे आता. रुपालीला नाही सोडू शकत मी. कुठे जाईल ती? ती जशी आहे तशी स्वीकारायला पाहिजे मला. मृणूलाही पटली माझी बाजू. समंजसपणे स्वीकारला तिनी माझा हा निर्णय! लग्नानंतर ती हा देश सोडून जाणार आहे. कायमची! पोटात कुठेतरी तुटतंय! नाही! आता तिचे विचार मनातून दूर केले पाहिजेत. आणि रुपालीबरोबर परत एकदा डाव मांडला पाहिजे. कारण तेच योग्य आहे. आजचा हा पाऊस माझ्या मनाला स्वछ करेल का? जुन्या आठवणींचे मनात उमटलेले ठसे पुसून जातील का? मी नवीन कोरा होईन का पुन्हा एकदा आयुष्याची सुरवात करायला?

पण काहीही म्हणा, आज मनातला थोडा गुंता सुटल्यासारखा वाटतोय! सगळे विचार आपापल्या जागी पोचले आहेत. त्यांना न्याय मिळाला आहे असं वाटतंय. उद्यासाठी दिशा मिळाल्यासारखं वाटतंय! पण आता बास ना हा पाऊस! थांबतच नाहीये. खिडकीतून बाहेर बघूच नये. पाऊस ऐकत नाही तर आपणच मान वळवावी.

अरेच्चा! रुपाली! ही इथे काय करतीये? हातात अजून एक चहा? वाचलं का हिनं माझं मन? काय वाचलं असेल? किती अबोल डोळे आहेत हिचे. कशाचा थांग म्हणून लागत नाही. माझ्या मनात पावसानी किती रणकंदन माजवलंय आणि ही मात्र कोरडीच! कसं जाणार आयुष्य कोण जाणे!