पदवी आणि पात्रता

     नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात १०० टक्के गुण मिळ्वणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे असा उल्लेख आहे. खरे तर प्रत्यक्षात या विद्यार्थ्यांना १००% गुण नाहीतच पण त्यांना प्रत्यक्ष पडलेल्या गुणात  चित्रकला,संगीत,खेळ अश्या अवांतर कलागुणांसाठी गुणजमा करून  त्यांची १००% ची पूर्ती करण्यात आली आहे.यातून शिक्षणखात्यास काय साध्य करायचे आहे हे कळत नाही. 
     या बातमीबरोबरच  दुसरीकडे  पुणे किंवा आणखी कोणत्याही विद्यापीठाच्या डॉक्टरेट पदव्यांमधील बोगसपणावर मधून मधून बातम्या येतात काही नांवे येतात व नंतर त्यांचे काय होते कोणास माहीत. अलीकडे खुद्द शिक्षणमत्र्यांनीच ५०% डॉक्टरेट बोगस आहेत असे जाहीरच केले आहे.कोट्यावधी रुपयांचे चारा घोटाळे, किंगपिशर घोटाळे ,सहारा घोटाळे यावरील कारवाईचे  पुढे तडीस काय गेले याची किती जणांना माहिती आहे ? डॉक्टरेटचा विषय तर त्याच्यापुढे अगदीच नगण्य.
     प्रत्येक परीक्षेतील गुणांचे व शिक्षणक्षेत्रात डॉक्टरेटचे महत्व अलीकडेच वाढलेले दिसते.एकूण शिक्षणाचेच प्रमाण वाढले.आमच्या वर्गात असलेल्या ४० विद्यार्थ्यांपैकी फक्त मी एकटाच काय तो कॉलेजची पायरी चढू शकलो आणि तेही शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे. आता दुसरे काही करणे शक्य नाही म्हणून शिक्षण चालू ठेवणे असा प्रकार सुरू आहे.ज्ञानसंपादनाच्या हेतूने शिक्षण घेणे ही वृत्ती फारच कमी प्रमाणात आढळते.अमेरिकेसारख्या संपन्न राष्ट्रातही ऊठसूट महाविद्यालयीन शिक्षण घेणे हा प्रकार आढळत नाही उलट महाविद्यालयातून माघार घेणाऱ्या स्टीव्ह जॉब्ज, बिल गेटस सारख्यांनी संगणक क्षेत्रात क्रांती केलेली दिसते. त्यातही साहित्यक्षेत्रात संशोधन करण्यासाठी एकाद्या साहित्यिकाचा अभ्यास किंवा साहित्यातील एकादी विशिष्ट बाजू उदा:"संस्कृत साहित्यातील वसंत ऋतू" नाहीतर असाच विषय घेऊन मार्गदर्शक प्राध्यापक पुरे म्हणेपर्यंत त्या विषयाचा कीस पाडला की केव्हां तरी प्रबंध तयार होतो. या प्रकारच्या प्रबंधात संशोधनाचा भाग कितपत असतॉ हाच संशोधनाचा विषय ठरेल.डॉ.रा.चिं.ढेरे किंवा डॉ.दुर्गा भागवत यांच्यासारखे संशोधक हे माननीय अपवाद सोडले तर साहित्यक्षेत्रातील डॉक्टरेट याच पद्धतीने मिळवली जाते कारण प्राध्यापक पदासाठी ती आवश्यक असते.कधी कधी एकाद्या जुन्या प्रबंधाची नक्कलही असते.इतका जुना प्रबंध कुणालाच माहीत नसल्यामुळे तो मान्य होऊन त्यावर डॉक्टरेटचा शिका सादर करणाऱ्यवर बसतो. 
      बऱ्याच हौशी डॉक्टरेट लोकांचा यात समावेश करण्याचे कारण नाही कारण सेवानिवृत्त झाल्यावर केवळ हौस म्हणून ते डॉक्टरेट करता व त्यातून फक्त नावामागे डॉ.ही उपाधी लावायला मिळणे एवढाच उद्देश असतो.त्यात त्याना आनंद मिळालेला असतो हेच महत्वाचे.
     शिक्षणाच्या काही क्षेत्रात उदा अभियांत्रिकी  क्षेत्रात आता प्राध्यापक पद मिळण्यासाठी डॉक्टरेट आवश्यक आहे.वैद्यकीय क्षेत्रात बहुधा अजूनही पोस्टग्रॅज्युएटच आवश्यक आहे डॉक्टरेट नसावी.परंतु अभियांत्रिकी क्षेत्रात डॉक्टरेटची काय आवश्यकता आहे समजत नाही.आमच्या विद्यार्थीदशेत अभियांत्रिकी पदवीधारकच सर्व प्राध्यापक होते आणि ते यथायोग्य शिकवत होते. ते नंतर पदव्युत्तर पदवी घेतल्यावर किंवा डॉक्टरेट झाल्यावर फार उत्तम शिकवू लागले असते अश्यातला भाग नाही उलट त्यासाठी त्यांचा बराच वेळ स्वत:चाच अभ्यास करण्यात गेल्यामुळे त्यांच्या शिकवण्यावर उलटच परिणाम झाला असता.
     प्राध्यापकपदासाठी डॉक्टरेट असणे आवश्यक या नियमाचा हा दुष्परिणाम आहे असे म्हणावे लागेल.डॉक्टरेट झाल्यामुळे शिक्षकाच्या शिकवण्याच्या पद्धतीत काही सुधारणा झाली का यावर कोणीच विचार करत नाही तामुळे बोगस डॉक्टरेट्ची संख्या वाढणे स्वाभाविक आहे.अभियांत्रिकीतील मी प्राध्यापक असतानाचा माझा अनुभव येथे लिहिण्यासारखा आहे.आमच्या महाविद्यालयात अंशकालीन पदव्युत्तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील विद्यार्थी अर्थातच दिवसा नोकरी करणारे असत आणि त्यामुळे गृहपाठ वेळेवर करणे त्यांना जमत नसे जे स्वाभाविक होते त्यामुळे तशी थोडी सूट आम्ही प्राध्यापकच त्यांना देत असू पण एक विद्यार्थ्याने एका विषयाचे जर्नल अंतीम तारखेपर्यंत जमा न केल्याने त्या विद्यार्थ्यास परीक्षेस बसण्याची परवानगी मी माझ्या विषयापुरती नाकारली.त्याने माझ्यावर बराच दबाव आणण्याचा प्रयत्न करूनही मी ठाम राहिल्याने तो परीक्षेस बसू शकला नाही व अश्या प्रकारे त्याला तो अभ्यासक्रम अर्धवटच सोडून द्यावा लागला.परंतु त्यानंतर आठ वर्षाने त्या विद्यार्थ्याने "सर,त्यावेळी तुम्ही मला अडवले पण आता मी दुसऱ्या विद्यापीठातून डॉक्टरेटही मिळवली आहे" असे मॉठ्या अभिमानाने मला सांगितले. त्याबद्दाल मी त्याचे अभिनंदनही केले व त्याच्या डॊक्टरेटच्या विषयासंबंधी काही प्रश्न विचारल्यावर त्याला त्या विषयाचे नावही आठवत नाही असे आढळले.ही परिस्थिती २५ वर्षापूर्वीची आहे.
     तंत्रशिक्षणविभाग याविषयी किती जागरूक आहे याचे उत्तर देणे अवघड आहे कारण त्याकाळात (२५ वर्षापूर्वी) डॉक्टरेट होऊन आल्यावर त्या व्यक्तीची नेमणूक अभियांत्रिकी माहाविद्यालयात प्राध्यापक म्हणून न होता तंत्रनिकेतनचे प्राचार्य म्ह्णून होत असे जेथे प्राचार्यास शिकवण्याचे कामच नसे. आता तंत्रशिक्षणखात्याचा किती प्रभाव खाजगी अभियांत्रिकि महाविद्यालये वा तंत्रनिकेतने यावर आहे हे अनेक महाविद्यालयातील प्राध्यापकांना वर्षभराचे वेतन मिळावे म्हणून न्यायालयात जावे लागते यावरून समजते व न्यायालयात काळ दवडणारे प्राध्यापक डोक्टरेट झाले तरी शिकवण्यावर कसे मन केंद्रित करणार हा प्रश्नच आहे.त्यामुळे त्यांची डॉक्टरेट बोगस आहे की नाही यापेक्षा त्याना केलेल्या कामाचा पगार मिळतो की नाही हा प्रश्न महत्वाचा आहे.     
      माझ्या भाच्याने त्याच्या बायकोने व बहिणीने तिघांनीही फार्मास्युटिकल क्षेत्रात २५ वर्षापूर्वीच डॉकटरेट घेऊनच ते नोकरीस लागले ते त्यांच्यावर बंधन नव्हते (कारण भाचीचा नवरा डॉक्टरेट नसूनही फार्मास्युटिकल क्षेत्रात त्यांच्याहीपेक्षा अधिक कार्यरत आहे.) व त्या क्षेत्रात पुढील संशोधनात ते मग्न आहेत याला डॉक्टरेटचा खरा उपयोग म्हणता येईल. डॉक्टॉरल डिग्रीचा तोच खरा अर्थ आहे.
     माझ्या दुसऱ्या भाच्याने अभियांत्रिकीमधील डॉक्टरेट केली आहे तर त्याच्या भावाने वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरेट केली आहे.या उच्च पदवीचा त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांना किती उपयोग होतो या विषयावर त्यांनीच प्रकाश पाडावा असे मला वाटले. त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणे झाले तेव्हां त्यांनी डॉक्टरेटचा फारसा उपयोग त्यांच्या सध्या करत असलेल्या कामासाठी होतो असे म्हणता येणार नाही असे स्पष्ट उत्तर दिले. बऱ्याच वेळा अमेरिकेतील वास्तव्य वाढवण्यासाठी डॉक्टरेट करण्याचा उपयोग होतो असे त्याने हसत हसत सांगितले.ज्याना खरोखरच संशोधनाची आवड असते ते डॉक्टरेटच्या पदवीच्या मागे लागत नाहीत ,ते खरेखुरे संशोधन करतात आणि त्यामुळे त्यांना ती पदवी प्राप्त होते.
      किर्लोस्कर उद्योगसमूहाचे निर्माते लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे शिक्षण फार उच्च श्रेणीचे नव्हते तर त्यांचे चिरंजीव शंतनुराव किर्लोस्करही एम.आय.टी (USA) चे पदवीधरच होते.जे आर डी ही अभियांत्रिकीमधील अतिशय उच्च पदवीधारक नव्हते.त्यामुळे प्रत्यक्ष अभियांत्रिकी क्षेत्रात किंवा संगणक क्षेत्रातही (उदा.स्टीव्ह जॉब्ज, बिल गेट्स) उच्च पदवीपेक्षाही वेगळाच दृष्टिकोण आवश्यक असतो असे दिसते.उच्च पदवीची आवश्यकता संशोधन क्षेत्रातच असते.त्यामुळे शिक्षणक्षेत्रातील डॉक्टोरल पदवीचा अनावश्यक आग्रहच अश्या "कॉपी पेस्ट" डॉक्टरेटचा सुकाळ होण्यास कारणीभूत आहे असे वाटते.