जुलै २० २०१७

चिंता करी जो विश्वाची ... (२७)

श्री रामदास स्वामींनी सकल विश्वातील मनुष्यजातीचे विभाजन चार विभागात करता येईल असे म्हणले आहे. बद्ध , मुमुक्ष, साधक आणि सिद्ध असे चार प्रकार त्यांनी दासबोधात सांगितले आहेत. या पैकी ज्यांना बद्ध म्हणता येईल असे लोक अवगुणी अथवा दुर्गुणी असतात आणि म्हणूनच त्यांना सर्वात हीन असे म्हणले आहे. स्वतःच्या बुद्धीचा, कौशल्याचा उपयोग केवळ स्वार्थाकरता करतात. असे करताना अन्य कुणाच्या नुकसानीची, त्रासाची ज्यांना पर्वा वाटत नाही, जे स्वार्थ, विकार आणि वासनांच्या जोखडात अडकलेले असतात, अशा सर्व लोकांना 'बद्ध' असे संबोधिले आहे. 

नाना प्रकारीचे दोष - । करिता, वाटे परम संतोष ।
बाष्कळपणाचा हव्यास । या नाव बद्ध ॥ 

असेही त्यांचे वर्णन करता येईल. अशा पद्धतीने जीवन व्यतीत करणाऱ्यांना अंतसमयी पश्चात्ताप करणे प्राप्तं होते. म्हणून वेळीच सावध होऊन दुर्गुणांचा त्याग करावा. भक्तिमार्गाची वाट निवडून ज्ञानोपासना करावी.  परमेश्वराची उपासना करताना सर्व चिंतांचे निराकरण होऊन मनःशांतीचा लाभ होईल, कारण भक्ताच्या रक्षणाचा भार देव नेहमीच आपल्या शिरी वाहत असतो, असा उपदेश स्वामी समर्थांनी केला आहे.

देहेरक्षणा कारणे यत्न केला । परी शेवटी काळ घेवोनी गेला
करी रे मना भक्ती या राघवाची । पुढे अंतरी सोडी चिंता भवाची ॥ 
भवाच्या भयें काय भितोस लंडी ( भित्रा) । धरी रे मना धीर धाकासि सांडी ॥
रघूनायकासारिखा स्वामी शिरी । नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी (यमराज) ॥ 

आपल्या सर्व श्रोते आणि शिष्यगणांचे, समर्थ अशा पद्धतीने सांत्वन करतात. श्रद्धा आणि भक्तीचे अनुसरण करून, स्वतःतील दुर्गुणांचा त्याग केला असता कुठल्याही भयचिंतांचे सावट तुमच्या सुखशांतीवर येणार नाही असे आश्वासन देतात. आपल्याच दुर्गुणात, अविचारात बद्ध असणाऱ्यांना त्यातून मुक्त होण्याचा मार्ग समर्थ दाखवितात. आपल्या दुर्गुणांना, दुष्कृत्यांना ज्यांनी जाणले आहे, आणि जे आता पश्चात्तापाच्या अग्नीमध्ये रात्रंदिवस जळत आहेत, अशा व्यक्तींना समर्थ मुमुक्ष असे संबोधितात. 

ऐसा प्राणी जो कां बद्ध । संसारी वर्तता अबद्ध (अनिर्बंध, अनियमित) ।
तयास प्राप्तं झाला खेद । कालांतरी ॥
संसारदुःखे दुखवला । त्रिविधतापे पोळला ।
निरूपणे प्रस्तावला । अंतर्यामी ॥ 

अशा प्रकारे पश्चात्तापदग्ध झालेला मनुष्य, पूर्वायुष्यातील केलेल्या चुका, अन्याय, पाप आठवून खंतावत असतो. स्वतःमध्ये असलेल्या अवगुणांची त्याला ओळख पटलेली असते. आणि त्या पायी होणारे दुष्परिणाम त्याला दिसत असतात. त्यामुळे मनोमन भयभीत झालेला तो, त्यातून सुटकेचा काही मार्ग मिळतो का याची शक्यता चाचपत असतो. अशा लोकांना समर्थ "मुमुक्ष"  म्हणतात. 

पूर्वी नाना दोष केले । ते अवघेची आठवले ।
पुढे येऊनी उभी ठेले । अंतर्यामी ॥ 
आठवे येमाची यातना । तेणे भयेची वाटे मना ।
नाही पापासी गणना । म्हणौनिया ॥
नाही पुण्याचा विचार । जाले पापाचे डोंगर ।
आतां दुस्तर हा संसार । कैसा तरो ॥ 

अशा विचारात मुमुक्ष मग्न असतो. घडोघडी आपले अविचारी वर्तन आठवून कष्टी होत असतो. किती भल्यांचे शाप मला लागले?  किती सज्जनांचा उपमर्द करून त्यांना दुखविले? किती जणांची साधनसंपत्ती वाममार्गाने हस्तगत करून त्यांना यातना दिल्या?  हे आठवणे त्याला नकोसे होऊ लागते. या ऐवजी आपण काय करायला हवे होते, जेणेकरून अशा असंख्य पापांचे धनीपण माथी आले नसते, हे त्याला समजून येते. अशा व्यक्तींबद्दल समर्थ सहानुभूतीने बोलतात. अवगुणात बद्ध असलेले असंख्य जन, ज्यांना त्यांच्या पापाची जाणीव देखील नसते, अशापेक्षा तुम्ही नक्कीच वरच्या पायरीवर आहात असा दिलासा ते त्यांना देतात. 

कोण उपाये करावा । कैसा परलोक पावावा ।
कोण्या गुणे देवाधिदेवा ।  पाविजेल ॥
नाही सद्भाव उपजला । अवघा लौकिक संपादीला ।
दंभ वरपांगे (वरवरचा, पोकळ) केला । खटाटोप कर्माचा ॥
कीर्तन केले पोटासाठी । देव मांडिले हटावटी (बाजारात) ।
आहा देवा बुद्धी खोटी । माझी मीच जाणे ॥ 

असा विलाप करणाऱ्यांचे समर्थ सांत्वन करतात. अजूनही समय हातून निसटलेला नाही. अजून काही चांगले होण्यास वाव आहे. परंतु त्या साठी स्वतःच्या दोष, दुर्गुणांचा त्याग करण्याची मानसिक तयारी हवी. नुसता शाब्दिक पश्चात्ताप उपयोगाचा नाही, तर मनापासून यावर उपाययोजना करण्याची इच्छा हवी. तसे केल्यास 'वाल्याचा', 'वाल्मीकी' होऊ शकतो. 

सत्य तेची उछेदिले । मिथ्य तेची प्रातिपादिले ।
ऐसे नाना कर्म केले । उदरंभराकारणे ॥
ऐसा पोटी प्रस्तावला । निरूपणे पालटला ।
तोची मुमुक्ष बोलीला । ग्रंथांतरी ॥
पुण्यमार्ग पोटी धरी । संतसंगाची वांछा करी ।
विरक्त जाला संसारी । या नाव मुमुक्ष ॥

वाममार्ग पत्करून, कपटनीती वापरून मिळवलेल्या वैभवाचा, प्रसिद्धी आणि लोकप्रियतेचा फोलपणा त्यांना आता कळून आलेला असतो. अंतसमयी या सर्वांचा काहीच उपयोग होणार नाही. सदाचार, सद्भावना, आणि पुण्यकर्मेच आपल्याला तारणार आहे, याची मुमुक्ष व्यक्तींना पूर्णपणे खात्री पटलेली असते. आता ते लोक स्वतःच्याच दोषाचे पुनःपुन्हा उच्चारण करू लागतात. आपल्या दुष्कृत्यांची अशा प्रकारे जाहीर कबुलीच देत असतात. समर्थ सांगतात आपण केलेल्या अपराधांची जाणीव होणे, त्याचा स्वीकार करणे हे सुधारणेच्या मार्गावरील पहिले पाऊल आहे. 

गेले राजे चक्रवर्ती । माझे वैभव ते किती ।
म्हणे धरू सत्संगती । या नाव मुमुक्ष ॥
आपले अवगुण देखे । विरक्तीबळे वोळखे ।
आपणासि निंदी दुःखे । या नाव मुमुक्ष ॥ 

अशा प्रकारे आपल्या पूर्वायुष्यातील चुका आठवून मुमुक्ष जन दुःखी होत असतात. परोपरीने स्वतःची निंदा करीत, परमेश्वराची क्षमायचना करतात. या पापाच्या कर्दमातून बाहेर येण्याची वाट ते शोधत असतात. अशांना समर्थ सांगतात, तुमच्या सर्व पापयातनातून मुक्तीचा मार्ग तुम्हाला संत, सज्जनांच्या सहवासात मिळेल. मनोभावे सत्संग केल्यास, अंतिम मुक्ती दृष्टिपथात येईल. नुसती आपल्या दोषांची निंदा करून नाही, तर त्या दोषांचा त्याग केल्याने मोक्षप्राप्ती होईल. त्यासाठी मनामध्ये प्रामाणिकपणा हवा. नुसता वरवरचा देखावा न करता खरोखरीची समर्पण वृत्ती हवी. असे जो करील, त्याच्या साठी मोक्षद्वार कधीच बंद होणार नाही. 

देहाभिमान कुळाभिमान । द्रव्याभिमान नानाभिमान ।
सांडूनी, संतचरणी अनन्य -। या नाव मुमुक्ष ॥
अहंता सांडूनी दूरी । आपणासी निंदी नानापरी ।
मोक्षाची अपेक्षा करी । या नाव मुमुक्ष ॥ 

अशा प्रकारे जो मुमुक्ष झाला, त्याला मोक्षप्राप्ती नक्कीच होणार. मुमुक्ष व्यक्ती आता विरक्त असतात. संसार, सुखसाधने, संपत्तीच्या मोहावर त्यांनी मात केली असते. परमार्थ साधनेने ते पापक्षालन करीत असतात. सत्संग आणि सदाचार यांची महती त्यांना पूर्णपणे समजलेली असते. अंतसमयी अधिकार, धन अथवा प्रसिद्धी कामास येत नाही हे सत्य त्यांना उमगलेले असते. सहानुभूती आणि सेवाभावाने जोडलेली माणसे ही कुबेराच्या खजिन्याहूनही मोलाची असतात हे त्यांनी अनुभवातून जाणलेले असते. मुमुक्ष कधीही आपल्या पूर्वायुष्याकडे परतण्याची कामना करीत नाही. वर्तमान काळात मुमुक्षपणे वावरून ते आपल्या उज्वल आणि निर्मळ भविष्याकडे वाटचाल करीत राहतात. 

ज्याचे थोरपण लाजे । जो परमार्थकारणे झिजे ॥
संतापाई विश्वास उपजे । या नाव मुमुक्ष ॥
स्वार्थ सांडून प्रपंचाचा । हव्यास धरिला परमार्थाचा ।
अंकित होईन सज्जनाचा । म्हणे तो मुमुक्ष ॥ 

(क्रमशः) 

संदर्भ :   (१)   श्री मनाचे श्लोक 
              (२)   श्री ग्रंथराज दासबोध 
Post to Feed
Typing help hide