ऑगस्ट १४ २०१७

चिंता करी जो विश्वाची ... (२८)

श्री समर्थ रामदास स्वामी यांनी,  मनामध्ये काही एक संकल्प धरून दासबोध ग्रंथाची रचना करण्याच्या प्रकल्पाला सुरूवात केली होती. वैराग्यवृत्तीने जगताना, संपादन केलेले ज्ञान आणि अनुभव ते ग्रंथामध्ये अंकीत करीत होते. गोसावी वृत्तीने सर्वसंचार करीत असताना, पाहिलेले, ऐकलेले आणि समजलेले सारे सारे काही ते श्रोत्यांना आणि शिष्यांना सांगत होते. अपेक्षा एकच होती, ऐकणाऱ्याने त्यातून बोध घ्यावा, स्वतःबरोबरच इतरांचेही जीवन सुखी आणि संपन्न करावे. 

समर्थांनी अखिल विश्वातील मनुष्यजातीचे वर्गीकरण, चार प्रकारात करता येईल असे सांगितले आहे. ते म्हणजे बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध. 
"बद्ध" म्हणजेच बंदिवान असलेले, आपल्याच अवगुणात जखडलेले असे. तर  "मुमुक्ष" म्हणजे आपल्या चुकांची, अपराधांची, अवगुणांची जाणीव झालेले आणि त्यातून मुक्त होण्याचा मार्ग शोधणारे असे लोक. 

 अवगुणांच्या आणि दुष्कर्मांच्या गर्तेत अडकलेल्या, अनिष्ट आचार-विचारात  "बद्ध" असलेल्या जनलोकांना समर्थांनी काही समजुतीचे बोल सांगितलेले आहेत. तुमच्या दुर्गुणांच्या कैदेतून मुक्तं होण्याचा उपाय तुमच्याच हाती आहे असे ते म्हणतात. 

नको रे मना वाद हा खेदकारी ।
नको रे मना  भेद नाना विकारी ॥
नको रे मना शिकवू पुढिलांसी (दुसऱ्यांना) ।
अहंभाव जो राहीला तूजपासी ॥ 

काही जण स्वतःला अनुभवी, ज्ञानी आणि इतरांहून अधिक शहाणे समजतात. दुसऱ्यांना  शिकविणे, सल्ला देणे, त्यांच्यातील कमीपणा जाणवून देणे इ. त्यांना प्रिय असते. समर्थ अशा  बोलघेवड्यांना समज देतात. इतरांना काही शिकविण्या आधी स्वतः,स्वतःचे परीक्षण करावे.  ज्ञानार्जन ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. आता 'मी' परिपूर्ण  आहे असे मानून दुसऱ्यांना तुच्छ लेखू नये. त्या ऐवजी आपल्यातील हीण हेरून त्यांचा नायनाट करावा. प्रत्येक क्षणी अधिक  चांगले, अधिक उच्च प्रतीचे करण्याची, शिकण्याची तयारी ठेवावी. कपट, अहंकार आणि स्वार्था सारख्या क्षुद्रं गुणांचा त्याग करून, सौजन्याचा, नम्रतेचा मार्ग अनुसरावा ---  असा उपदेश समर्थांनी केला आहे. 
आपल्यातील  अवगुणाचा त्याग करून, नीतिवंत आयुष्य जगण्याची कामना करणाऱ्यांनाही समर्थ चार शब्द सांगतात. आपल्या उन्नतीचा मार्ग, आपणच शोधावा लागतो. दुसरा कोणी फार तर मार्गदर्शन करेल, शहाणपणाचा सल्ला देईल. पण प्रयत्नं ज्याचे त्यानेच करायचे असतात. एकदा स्वतःचा निश्चय झाला, की काहीही अशक्य नाही, परंतु त्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांचे अधिष्ठान पाहिजे. वाईट संगतीचा त्याग करून, सज्जनांच्या सहवासात कालक्रमणा केल्याने, इच्छीत मार्ग नक्की मिळेल असा उपदेश समर्थांनी केला आहे. 

मने कल्पिला विषयो (अशुद्ध कल्पना) सोडवावा ।
मनें देव निर्गुण तो वोळखावा ॥ 
मनें कल्पिता कल्पना ते सरावी (नष्ट व्हावी)। 
सदा संगती सज्जनाची धरावी ॥ 

पाप-पुण्य, नीती-अनीती, सत्कर्म-दुष्कर्म या सर्वाचे कारकत्व चित्त आणि बुद्धी मध्येच असते. म्हणून चित्त आणि बुद्धी स्थिर आणि शुद्ध करण्याचा दृढ  संकल्प केला असता, तुमचे मनोरथ नक्कीच सिद्धीस जातील, असा दिलासा श्री रामदास स्वामींनी श्रोत्यांना आणि शिष्यगणांना दिला आहे. 

अवगुणांमध्ये बद्ध असलेल्या जनास भान येते, आपल्या चुकांची  जाणीव होऊन त्यांचे परिमार्जन करण्याचा मार्ग शोधू लागतात. अशांची गणना आता मुमुक्ष जनात होऊ लागलेली असते. पापक्षालन करण्यासाठी मुमुक्ष जन देवाच्या द्वारी शरण येतात. संत-सज्जनांच्या सेवेत आणि सहवासात  रमतात. कारण अशा करण्याने उन्नतीचा, मुक्तीचा मार्ग मिळण्याची आशा त्यांना असते. सज्जनांच्या सहवासात आणि संताच्या आशीर्वादाने त्यांच्यातील दुष्प्रवृत्तीचा ऱ्हास होऊन त्यांना साधकत्व प्राप्तं होते. 

"साधक" कुणास म्हणावे? त्यांची लक्षणे काय आहेत? याचे सविस्तर वर्णन श्री रामदास स्वामींनी दासबोध या ग्रंथामध्ये केले आहे. 

अवगुणांचा करूनी त्याग । जेणे धरिला संतसंग ।
तयासी बोलिजे मग । साधक ऐसा ॥ 
जो संतासी शरण गेला । संतजनी अश्वासिला ।
मग तो साधक बोलिला । ग्रंथांतरी ॥
उपदेशिले आत्मज्ञान । तुटले संसारबंधन ।
दृढतेकारणे करी साधन । या नाव साधक ॥ 

अशाप्रकारे "मुमुक्ष" जन आता "साधक" झालेले असतात. कुठल्याही सांसारिक पाशांची  त्यांना  क्षिती राहिलेली नसते. आत्मज्ञान प्राप्तं करून मोह, मायेच्या बंधनातून ते  मुक्तं झालेले  असतात. सज्जनांचा सहवास आणि संताच्या अनुसरणाने चित्त आणि बुद्धी स्थिर होते. त्यामुळे भविष्यकाळाचे भय अथवा चिंता त्यांना  त्रस्त करीत नाहीत. साधक जनांचे आचार विचार, सात्त्विक आणि निर्मळ  असतात. क्रोध, द्वेष, हव्यास इ. तामसी गुणांपासून ते आता दूर असतात. अपरिमित अशा मनः शांतीचा  अनुभव घेत असतात. ज्ञानग्रहण करताना  तत्पर असतात. सारासार विचारशक्ती पूर्णतः जागृत ठेवून त्यांची ज्ञानसाधना सुरू असते. सर्व संदेहांचे निराकरण होऊन, पूर्ण ज्ञानाच्या दिशेने  वाटचाल चालू असते. 

देहबुद्धी विवेके वारी । आत्मबुद्धी दृढ धरी ।
श्रवण  मनन केलेंची करी । या नाव साधक ॥
विसंचूनी (विसरून, दुर्लक्षून) दृश्यभान । दृढ धरी आत्मज्ञान । 
विचार राखे समाधान । या नाव साधक ॥ 

असे साधक जनांचे वर्णन समर्थांनी केलेले आहे. दृश्यं जगाची माया साधकांना मोहवू शकत नाही. जे अदृष्टात आहे, सामान्य जनांच्या दृष्टीआड आहे, असे पूर्णब्रह्म त्यांच्या दृष्टीसमोर साकार होते. सत्य-असत्य, कल्पित-अकल्पित याची जाणीव त्यांना झालेली असते. दृष्टीपुढील भ्रमाचे पटल विरल होत होत नाहीसे झालेले असते. साधक जन ईश्वराच्या सान्निध्य असतात. त्यांची वृत्ती शांत आणिक सात्त्विक असते. हिंसक अथवा तामसी विचार त्यांच्या जवळ येऊ शकत नाहीत. राग, लोभ, क्षोभ, चिंता त्यांना आता त्रस्तं करीत नाहीत. ते स्वतः या सर्वांपासून मुक्तं असतात, परंतु जे अजूनही या चक्रात अडकलेले आहेत त्यांच्या प्रती सहानुभूती बाळगून त्यांच्या सहाय्यास अनुकूल असतात. असे साधक जन समाजासाठी अतिशय लाभदायी असतात. कारण ते जनताजनार्दनास शांततेची, सौख्याची शिकवणूक देतात. दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करण्याचे महत्त्व समजावतात, आणि समाजाच्या प्रगतीस सहाय्यक ठरतात. 

असत्क्रिया ते सोडिली । आणि सत्क्रिया ते वाढविली ।
स्वरूपस्थिती बळावली । या नाव साधक॥ 
अवगुण त्यागी दिवसेंदिवस । करी उत्तम गुणांचा अभ्यास ।
स्वरूपी लावी निजध्यास । या नाव साधक ॥ 

अशा प्रकारे साधकजन उत्तरोत्तर उन्नतीच्या मार्गावरून पुढे जात असतात. अनेक उत्तम ग्रंथांच्या परिशीलनाने आणि संत, ज्ञानी आणि सज्जना समवेत करीत असलेल्या वैचारिक आदान-प्रदानामुळे अधिकाधिक प्रगल्भ होत असतात. सत्य आणि भ्रम यातील फरक त्यांना उमगू लागलेला असतो. "चकाकते ते सर्व सोने नसते" या उक्तीची सार्थकता त्यांनी अनुभवलेली असते. कसबी सोनार जसे सुवर्णातील हीण पारखून ते काढून टाकतो, आणि शुद्ध सोन्याचे अलंकार घडवितो. तद्वतच साधक जन अनेक विचार, तत्त्वं , सिद्धान्त पारखत असतात. जे त्यांच्या बुद्धीच्या कसोटीवर खरे ठरतात, त्यांचाच ते स्वीकार करतात. त्यांचे विचार अधिक परिपक्वं होत असतात. 

जे या जनांसी चोरिलें । मनास न वचे अनुमानले ।
तेंची जेणे दृढ केले । या नाव साधक ॥ 
जे बोलताची वाचा धरी (वाणी कुंठीत होते) । जे पाहताची अंध करी ( सामान्य दृष्टीस दिसत नाही) ।
ते साधी नाना परी । या नाव साधक ॥
जे साधू जाता साधवेना । जे लक्षू जाता लक्षवेना । 
तेंची अनुभवें आणि मना । या नाव साधक ॥ 
जेथे मनची मावळे । जेथे तर्कची पांगुळे ।
तेची अनुभवा आणी  बळे । या नाव साधक ॥ 

अशा प्रकारे साधक आत्म ज्ञान प्राप्त करितात. भ्रम आणि मायेवर ते विवेक बुद्धीने मात करतात. स्वानुभव आणि ज्ञानाच्या बळावर ते अतार्किक आणि अज्ञानी प्रथांवर, विचारांवर विजय मिळवितात. जे सामान्य जनांच्या दृष्टी आड आहे अशा सत्याचे त्यांना आकलन झालेले असते. स्वतःकडे पाहण्याची एक प्रौढ. प्रगल्भ दृष्टी त्यांना प्राप्तं झालेली असते. तिच्या बळावर ते स्वतःचे स्वरूपदर्शन करू शकतात. अशा प्रकारे आत्मज्ञान प्राप्तं केलेले साधकजन, साऱ्या अवगुणांचा निःपात करतात. त्यांच्या ठायी सद्गुणांचेच वास्तव्य आता असते.सत्प्रवृत्तींच्या योगे वाईट, अनिष्टं वृत्तीचा उच्छेद करणे त्यांना साधलेले असते. आपल्या अखंड आणि अविरत साधनेने ते सामान्य जनांच्या आदरास प्राप्तं झालेले असतात. आता ते सामान्य सांसारिक नसतात. सारी लोभ. मायेची बंधने त्यांनी तोडलेली असतात. आता. संयमीत आणि अनासक्तं जीवनशैलीचा स्वीकार केलेला असतो. धनसंचय, सत्ता, अधिकार या सर्वांचा त्यांनी त्याग केलेला असतो. 

विवेकबळे गुप्त जाला । आपोआप मावळला ।
दिसतो, परी देखिला । नाहीच कोणीं ॥
मीपण मागे सांडिले । स्वये आपणास धुंडिले । 
तुर्येसही ओलांडिले । या नाव साधक ॥ 
पुढे उन्मनीचा सेवटी । आपली आपण अखंड भेटी ।
अखंड अनुभवी ज्याची दृष्टी । या नाव साधक ॥ 

साधक जनांचा "मी" पणा पूर्णतः निवळलेला असतो. परब्रम्हाशी त्यांनी अद्वैत साधलेले असते. स्वतःच्या ज्ञानाचा, साधनेचा, द्रष्टेपणाचा अहंकार देखिल नष्टं होऊ लागलेला असतो. आपले सत्यस्वरूप दर्शन त्यांना झालेले असते. काल्पनिक भय विरून पूर्ण जागृतावस्था प्राप्तं झालेली असते. वैराग्यवृत्तीने, तटस्थ वृत्तीने लौकिक जगात वावरणे साध्यं झालेले असते. नातीगोती, माया, ममता या सर्वात त्यांना आता काहीच स्वारस्यं नसते. सारे संदेह, विकल्प लयास गेलेले असतात. मनात संशयाला कसलीही जागा नसते. चित्तवृत्ती स्थिर झालेली असते. 

द्वैताचा तटका (संबंध) तोडिला । भासाचा भास मोडिला ।
देही असोनी विदेह जाला । या नाव साधक ॥ 
जयास अखंड स्वरूपस्थिती । नाही देहाची अहंकृती ।
सकळ संदेहनिवृत्ती । या नाव साधक ॥ 

साधक जनांस पंचमहाभूतांचा धाक नसतो. भ्रमित कल्पना त्यांची दिशाभूल करू शकत नाहीत. वृत्ती निःस्पृह आणि उदार झालेली असते. आपल्याजवळील सारे काही इतरांस देणे त्यांना सहज शक्य होते, कारण लोभाचा पूर्ण क्षय झालेला असतो. सामान्य जनांस संसारात गुंतवून ठेवणारे सारे गुण दूर करण्यात त्यांना यश आलेले असते. त्यांमुळे निर्विकल्प साधनेचा मार्ग त्यांच्यासाठी मोकळा झालेला असतो. ज्ञानप्राप्तीमुळे त्यांना आता जन्ममृत्यूचे भय वाटेनासे होते. अंगी विरक्ती बाणल्याने थोरपणा, अधिकार, वैभव इत्यादींचा मोह संपलेला असतो, त्यामुळे ते सर्व प्राप्तं करण्या साठीच्या धडपडीला पूर्णविराम मिळालेला असतो. अष्टसात्विक भावनांचा मनी सदैव वावर असल्याने दु:ख, क्रोध, पश्चात्ताप इ इत्यादी नकारात्मक भावनांचा निचरा होतो. मन शांत, प्रसन्न असते. साधना आणि भक्ती अविरत करत राहण्यात कसलाही अडसर उरत नाही. 

ज्ञाने विवेक माजला । तेणे निश्चयो बळावला ।
अवगुणांचा संव्हार केला । वैराग्यबळे ॥
अधर्मास स्वधर्मे लुटिले । कुकर्मासी सत्कर्मे झुगटिले (झुगारले) ।
लांटून (लोटून दिले, बाजूला सारले) वाटा लाविले । विचारे अविचारासी ॥ 

अशा प्रकारे साधकजन पूर्णतः स्वयंसिद्ध झालेले असतात. त्यांचे त्यांच्या विकारांवर, विचारांवर नियंत्रण असते. कुठलीही बाह्य प्रेरणा अथवा उत्तेजना त्यांना त्यांच्या विहित कार्यापासून वेगळी करू शकत नाही. अधिकाचा हव्यास सोडून दिल्याने ईर्ष्या, मत्सर, निराशा अशा त्रासदायक भावना त्यांना ज्ञानसाधनेपासून विचलित करू शकत नाहीत. साधक नेहमी दक्ष आणि सजग असतात. आळस, कुपथ्य आणि अनिष्ट विकारांपासून दूर असतात. त्यांचा जीवनमार्ग निश्चित झालेला असतो. त्यात कसलाही किंतू उरलेला नसतो. नित्यनेमांना साधक जन कधीच टाळत नाही. परिश्रमी आणि नियमित जीवन वृत्तीचा त्यांनी स्वीकार केलेला असतो. त्यांच्या या विरक्त जीवनात विलास आणि उपभोगांना कसलेही स्थान नसते. साधे आणि सात्त्विक जीवनमान त्यांच्या ज्ञानसाधनेसाठी उपयुक्तच असते. अशा प्रकारे अखंड आणि अविरत ज्ञानसाधना करीत सद्गुणांची उपासना करीत असता साधक जन अंततः "सिद्ध" होतात. 

स्वरूपी घातले मना । यातनेसी केली यातना ।
साक्षेप आणि प्रेत्ना । प्रतिष्ठिले ॥
अभ्यासाचा संग धरिला । साक्षपासरिसा निघाला । 
प्रेत्न सांगाती भला । साधनपंथे ॥
सावध, दक्ष तो साधक । पाहे नित्यानित्यविवेक ।
संग - त्यागूनी येक - । सत्संग धरी ॥ 

(क्रमशः) 

संदर्भ : 
            (१) श्री मनाचे श्लोक 
            (२) श्री ग्रंथराज दासबोध 

Post to Feed
Typing help hide