दिल जलता है तो --- !

     २७ ऑगस्ट १९७६ या दिवशी आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने एका सुरेल गायकाचा अचानक अंत झाला. आपले "दिल जलता है तो जलने दो " हे गीत त्याने नुकतेच गाइले होते.लतादीदीबरोबर अमेरिकेतील डेट्राइट या शहरात त्याचा दौरा चालू होता आणि तो दौरा अर्धवट टाकूनच आपल्या जीवनाचा निरोप त्यास घ्यावा लागला होता.
      २२जुलै १९२३ या दिवशी मुकेशचन्द माथुरचा जन्म पंजाबातील लुधियाना शहरी झाला.पिताजी जोरावरचन्द माथुर आणि त्यांच्या पत्नी चान्द रानी यांचे हे सहावे अपत्य.त्याच्याहून लहान आणखीही चार भावंडे त्याला होती.वडील अभियंता होते. दिल्लीत रहात होते.
    लहानपणापासूनच मुकेशला गाण्याचे फार वेड ! आणि आवाजही चांगला होता.त्या काळात तरुण पिढीचे दैवत म्हणजे के.एल.सहगल आणि मुकेशला त्याच्याच गाण्याचे वेड. आपल्या खोलीत बसूनच त्याचे गायन चालायचे ! मुकेशची बहीण सुंदर प्यारीला संगीत शिकवायला येणाऱ्या मास्टरजीना शेजारच्या खोलीत बसून त्यांचे संगीत ऐकणारा मुकेशच चांगला शिष्य होऊ शकतो हे ध्यानात आले. त्यांच्याकडून जी काय तुटपुंजी संगीताच्या ज्ञानाची शिदोरी मिळाली तेवढेच काय ते मुकेशचे संगीतशिक्षण.मधून मधून आपले कौशल्य छोट्या छोट्या मैफिलीतून तो मित्रमंडळींसमोर पेशही करायचा.पण संगीत हा पोटापाण्याचा व्यवसाय होऊ शकतो हे जोरावरचंद यांना मान्य नसावे त्यामुळे दहाव्या इयत्तेनंतरच शिक्षण सोडून सार्वजनिक बांधकामखात्यात त्यानी मुकेशला चिकटवून दिले.पण  तेथे राहूनही आपला संगीताचा व्यासंग त्याने चालू ठेवला आणि काही वाद्यांवरही प्रभुत्व मिळवले.
         त्याच काळात एका लग्नात त्याच्या नात्यातच असलेले  मोतिलाल मुंबईहून  आलेले होते आणि त्यांच्यासमोर "पहा आमचाही बच्चा कसा गातो " असे म्हणून मुकेशला गाण्यासाठी त्याच्या नातेवाइकानी पुढे ढकलले. मोतिलाल चित्रपटक्षेत्रात नावाजलेले अभिनेते होते आणि थोडेफार गातही होते. त्यामुळे मुकेशचे गाणे त्याना बरेच भावले आणि त्याला आपल्याबरोबर मुंबईस घेऊन जायला तयार झाले.  आपल्याघरी त्याची रहायची सोय करून मोतिलाल यांनी त्यांना पंडित जगन्नाथ प्रसाद यांचेकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण मिळावे अशी योजनाही केली पण त्याचबरोबर आपला मार्ग स्वत:च शोधावा असा सल्लाही दिला. 
         त्याकाळात पार्श्वगायनाची पद्धत फारशी रूढ झालेली नव्हती व मुकेशला गोड गळ्यानरोबरच रुबाबदार व्यक्तिमत्वही लाभले असल्याने शिवाय मोतिलाल यांचे अप्रत्यक्ष का होईना सहाय्य होतेच त्यामुळे फारसा संघर्ष करावा न लागता "निर्दोष"या १९४१ मध्ये निर्मिती झालेल्या चित्रपटात गायक नट म्ह्णून त्याला प्रवेश मिळाला."दिलही बुझा हुआ हो तो" हे त्याचे पहिले चित्रपट गीत.त्या चित्रपटात नलिनी जयवन्तबरोबर त्याने भूमिका केली होती आणि संगीत दिग्दर्शक अशोक घोष यानी चित्रपटास संगीत दिले होते. पण तो चित्रपट काही खास चालला नाही आणि काही काळ मुकेशला संधीची वाट पहाणे नशिबी आले पण त्या काळात त्याने पार्श्वगायन हेच आपले क्षेत्र आहे हे जाणून त्यातच स्वत:ला झोकून द्यायचे असा निर्णय केला.. 
          चित्रपट जरी यशस्वी झाला नाही तरी चित्रपटातील हीरो आणि गायक असा दुहेरी प्रभाव चित्रपटशौकिनांवर पडल्याशिवाय थोडाच रहातो, पण चित्रपटात प्रवेश करण्यापूर्वीच मुकेशच्या व्यक्तिमत्वाची जादू सरला नावाच्या उमलत्या कळीवर पडली आणि मुकेशचेही दिल तिने घायाळ केले. पण या दोन प्रेमी जनांचे मीलन होण्यात बरेच अडथळे होते. पहिला प्रमुख अडथळा म्हणजे सरला ही त्रिवेदी या गुजराती ब्राह्मण कुटुंबातली तर मुकेश पंजाबदा पुत्तर  आणि त्यात कायस्थ म्हणजे त्रिवेदींच्या दृष्टीने कनिष्ठ जातीचा .त्यावेळी मुकेश घरदार नसणारा आणि आर्थिक प्राप्तीही बेताचीच असलेला.  शिवाय सिनेमातील माणूस म्हणजे भानगडीचाच असनार हे समीकरण रूढ होतेच.याउलट रायचन्द त्रिवेदी म्हणजे सरलाचे पिताजी लक्षाधीश.अश्या सगळ्याच गोष्टी अगदी प्रतिकूल त्यामुळे त्यांच्याकडून लग्नास मान्यता मिळणे शक्यच नव्हते.उलट सरलाच्या प्रेमप्रकरणाचा सुगावा लागताच तिला घराबाहेर पडण्याचीही बंदी घालण्यात आली होती .  श्रावणातील सोमवार म्हणून शिवमंदिरात जाण्याची मिळालेली मुभाच काय ती तिला लाभलेली संधी आणि तिचा बरोबर वापर करत तिने आणि मुकेशने  कान्दिवलीच्या   शिवमंदिरात मोतिलाल यांच्याच उपस्थितीत लग्नाचा बेत पार पाडला. तो दिवस होता २२ जुलै १९४६! मुकेशचा २३ वा वाढदिवस त्याच दिवशी होता. हे लग्न काही फार टिकणार नाही असा सगळ्यांनाच वाटत होते. पण मुकेशच्या अंतापर्यंत त्यानी एकमेकास साथ दिली. तोपर्यंत त्याचा परिवार दोन मुलगे आणि तीन मुली असा बहरलाही होता.त्यातील नितिन यानेही वडिलांचा कित्ता गिरवला.  
             पार्श्वगायक म्हणून मुकेशची खरी ओळख झाली ती मोतिलाल यांच्याच १९४५ मध्ये निघालेल्या "पेहली नजर" या चित्रपटामुळे.आह सितापुरी यांनी लिहिलेल्या गीतांना अनिल विश्वास यानी त्या चित्रपटास संगीत साज चढवला होता.अनिलदांच्या समोर मोतिलालनी मुकेशला सादर करून "याला एक संधी गाण्याची देऊन पहा"असा आगह केला आणि मुकेशचे गाणे ऐकल्यावर अनिलदांनाही वाटले की "आहे, पोरात काहीतरी चमक आहे" पण चित्रपट निर्माता मझर याला हा निर्णय पसंत नव्हता.कारण यापूर्वीचा मुकेशचा ’निर्दोष’ चालला नव्हता  "या नव्या पोराला घेऊन माझ्या पिक्चरचे वाटोळे करायचे नाही मला." असे त्याने स्पष्ट बजावले.अर्थात मोतिलालना हे  आवडले नाही.खरे तर "माझी गाणी मुकेश म्हणेल अशी त्यांची प्रथम अटच होती.पण अडॅलतट्टू निर्मात्यापुढे त्याचे काही चालले नाही म्हणून त्यानी "ठीक आहे तर मग माझी गाणी मीच म्हणतो." असा आपला निर्णय  सुनावला आणि निर्मात्याला तर नट म्हणून मोतिलालच हवा असल्याने त्याला हे मान्य करण्यावाचून गत्यंतर नव्हते. आता अनिलदांवर मात्र हे एक संकटच आले,कारण मुकेश ऐवजी मोतिलालकडून गाणे म्हणवून घेणे म्हणजे त्यांच्या दृष्टीने आगीतून फुफाट्यात पडण्यासारखेच होते.त्यामुळे त्यानी "दोघांचेही राहू द्या मोतिलालची गाणी मीच म्हणतो" असे निर्वाणीचे अस्त्र काढले.यालाही निर्मात्याची काही हरकत नव्हती.
        यात बिचारा मुकेश आपली एवढी चांगली संधी गेल्यामुळे जाम वैतागला व "संगीत दिग्दर्शकच गाणी म्हणू लागले तर आमच्यासारख्यांचे काही खरे नाही "असे म्हणू लागला.त्याचे हे उद्गार अनिलदांच्या कानावर गेले  तसे त्यांनाही मुकेशला संधी द्यावी असे वाटतच होते शेवटी त्यानी मुकेशला व निर्मात्याला बोलावून घेतले आणि निर्मात्याला सांगितले "याच्याकडून आपण गाणी म्हणून घेऊ आणि जर तुला पसंत पडलीच नाहीत तर मी ती पुन्हा म्हणेन आणि मगच ती आपण चित्रपटात टाकू" निर्मात्याने कसाबसा होकार दिला.आणि शेवटी सगळी गाणी मुकेशच्या आवाजातच तयार झाली.
     पण त्यातही "दिल जलता है तो जलने दो" निर्मात्याला काही केल्या पसंत पडेना ते गाणे पिक्चरमधूनच काढून टाकण्याचा त्याने हट्ट धरला शेवटी अनिलदांनी चित्रपट रिलीज झाल्यावर एक आठवडाभर वाट पहा आणि जर ते गाणे प्रेक्षकांना पसंत पडले नाही तर दुसऱ्या आठवड्यात ते काढून टाका अशी तडजोड करण्यास त्याला तयार केले .चित्रपट प्रदर्शित झाला आणि "दिल जलता है" याच गाण्याला जनतेने डोक्यावर घेतले आणि ते काढून टाकण्याचा प्रश्नच उरला नाही.आणि त्याचबरोबर मुकेशचे गायक म्हणून स्थान निश्चित झाले.    
     मुकेशवर त्या काळातील प्रसिद्ध गायक नट कुन्दनलाल सहगल यांचा अतिशय मोठा प्रभाव होता तो सदैव आपल्या संगीतातील या दैवतासारखाच गाण्याचा प्रयत्न करायचा.असं म्हणतात की  "दिल जलता है तो जलने दो" हे त्याने गाइलेले गीत ऐकल्यावर  "आश्चर्य आहे,मला तर मी हे गीत म्हटल्याचे आठवतही नाही"असे उद्गार स्वत: सेहेगलनीच काढले. त्यावेळी रेकॉर्डवर गायकाचे नाव नसे. या गाण्याविषयी आणखी एक काळीज हेलावून टाकणारी गोष्ट म्हणजे डेट्रॉइटला झालेल्या कार्यक्रमात मुकेश यानी हे गाणे म्हटले आणि त्यांचे हे शेवटचेच गीत ठरले.
     मुकेशला सेहगलच्या प्रभावाखालून मुक्त करण्याचे श्रेय नौशाद यांच्याकडे जाते. मुकेशला त्यांनी स्पष्ट सांगितले,"तुला पब्लिककडून वहावा मिळाली आहे पण खरे तर ती ’मुकेश’ला नाही तर ’के.एल.सहगल’ला मिळाली आहे जर मुकेश म्हणून आपली कारकीर्द घडवायची असेल तर तुझ्या पद्धतीने तुला गायला पाहिजे."असे त्यानी त्याला बजावले पण त्याचबरोबर  एक गमतीची गोष्ट म्हणजे "अन्दाज"मध्ये त्यानी दिलिपकुमारची गाणी मुकेशकडून गाऊन घेतली आणि राजकपूरची रफीकडून.पण पुढे मात्र मुकेशने जरी बहुतेक सर्व नायकांना आवाज दिला असला तरी त्याची जास्त प्रसिद्धी राजकपूरसाठी केलेल्या पार्श्वगायनामुळेच झाली व तो राजकपूरचा आवाज म्हणून ओळखला गेला. आणि त्यांची दोस्तीही इतकी खास होती की मुकेश गेल्याचे कळल्यावर राजकपूरला अश्रू आवरले नाहीत."आज मेरी आवाज चली गयी" असे उद्गार त्याने काढले.
   .       मुकेशव्या आवाजास एक विशिष्ट बाज होता.तॉ आवाज खरोखर त्याच्या काळजातूनच आला आहे असे वाटे. पण तरीही शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी म्हणण्यास त्याचा आवाज अनुकूल नव्हता असेच म्हणावे लागेल. तसा शास्रीय संगीताचा अभ्यासही त्याला करता आला नव्हता. संगीतदिग्दर्शकांनाही याची कल्पना असल्यामुळे शंकर जयकिशनसारख्या मुकेशभक्त संगीतदिग्दर्शकांनी देखिल एकादेच रागदारीवर आधारित "मतवाली नार " सारखे गाणे त्याच्याकडून म्हणून घेण्याचे धाडस केले.(तसे शंकर जयकिशन यांनी शारदाकडूनही काही गाणी वदवण्याचा चमत्कार केला होता ) शंकर जयकिशन यांचे सहाय्यक व नंतर पूर्णपणे संगीतदिग्दर्शक झालेल्या दत्ताराम यानी मात्र "आसू भरी है "सारखे पूर्णपणे शास्त्रीय म्हणता येईल असे गाणे मुकेशकडून फारच उत्तम पद्धतीने म्हणून घेतले आहे.तीच गोष्ट "मुझे तुमसे कुछ भी ना चाहिये "(कन्हैया) या गाण्याबद्दल म्हणता येईल. पण अशी गाणी अपवादच ! राजकपूरच्याच "दिल ही तो है" चित्रपटात इतर सर्व गाण्यांसाठी मुकेशचा आवाज वापरणाऱ्या रोशन याना  "लागा चुनरिमे दाग " गाण्यासाठी मात्र मन्ना डेचा वापर करावा लागला.
    सचिनदेव बर्मन,सलिल चौधरी यांनी त्याच्या आवाजातील दर्द अचूकपणे वापरून "चलरी सजनी ""कही दूर जब दिन "अशी अविट गोडीची गाणी बनवली.नौशाद यांनीही मुकेशचा वापर अश्याच पद्धतीने करून त्यातील विशिष्ट उच्चारपद्धती गाण्याची गोडी वाढवू शकेल अश्या पद्धतीने वापरला. पण तरीही या संगीतदिग्दर्शकांबरोबर मुकेशची अतिशय थोडी गाणी आहेत.
      कल्याणजी आनंदजी, शंकर जयकिशन व त्यानंतर लक्ष्मी- प्यारे ही जोडी हे मुकेशचा घाउक वापर करण्यात अधिक आघाडीवर होते ,त्यात शंकर जयकिशन यांनी संगीत दिलेल्या चित्रपटात राजकपूरचेच बरेच आहेत पण तसे कल्याणजी  आनंदजी यांच्याबाबतीत नसले तरी त्यानी मुकेशचा अधिक वापर केला आणि तो कोठेही अयोग्य वाटला नाही.लक्षीकांत प्यारेलाल यांच्याही बाबतीतही असेच म्हणता येईल.त्यांनीही मुकेशचा आवाज तेवढ्याच मोठ्या प्रमाणात वापरला आहे. त्याखालोखाल त्याचकाळात रवी ,आणि चित्रगुप्त यांनीही मुकेशचा आवाज  वापरला आहे.
  " वो सुबह फिर कभी तो आयेगी" किंवा "आ अब लौट चले" "ओठोंपे सचाई रहती है" "सब कुछ सीखा हमने" "जीना यहां मरना यहां "अशी काही गाणी अशी आहेत की ती इतर कोणी म्हटल्याची कल्पनाही आपण करू शकत नाही.ती चित्रपटात राजकपूरने म्हटली आहेत हे वेगळेच. पण यहुदीमधील "ये मेरा दीवानापन है" किंवा "सारंगा तेरी यादमे" किंवा "दिल ढूंढता है"ही गाणी राजकपूरने म्हटली नसूनही मुकेशनेच म्हणायला हवी होती हे मान्य करावे लागेल. "सुहाना सफर " या दिलीपकुमारसाठी म्हटलेल्या गाण्यात जो ताजेपणा जाणवतो तो अगदी वेगळाच त्यावेळी हाच का दर्दभरी गीते गाणारा मुकेश असे वाटते.
       ओ.पी.नय्यर,मदनमोहन व सी.रामचंद्र या त्या काळातील महत्वाच्या संगीतदिग्दर्शकांनी मात्र मुकेशच्या आवाजात फारच कमी गाणी संगीतबद्ध केलेली दिसतात.पण त्याचबरोबर कारकीर्दीची सुरवात करून देणाऱ्या अनिलदा व सैगलच्या प्रभावातून मुक्त करणाऱ्या नौशाद यांच्या संगीत दिग्द्रर्शनाखालीही मुकेशने खूपच कमी म्हणजे अनुक्रमे १९ व २६ गाणीच म्हटली आहेत.रोशन यांनीही मुकेशचा आवाज कमीच वापरला पण त्याच्याकडून गाऊन घेतलेली सर्व गाणी गाजली.     
     मुकेशने अभिनेता व निर्माता या भूमिकाही पार पाडण्याचा थोडा प्रयत्न केला पण त्यात त्याला काही फार यश लाभले असे म्हणता येत नाही.  आपल्या दीर्घ कारकीर्दीत मुकेशने कमीच (तेराशेच्या आसपास) गाणी गाइली. (एक मराठी गाणेही त्याने गायले आहे. सप्तपदी चित्रपटातील "एकदा येऊन जा")त्याचे एक कारण म्हणजे १९५१ मध्ये  त्याने स्वीकारलेला "माशुका"हा चित्रपट,त्यात त्याने भूमिका केली होती व करारानुसार तो चित्रपट पूर्ण होईपर्यंत इतरत्र कोठे कसलेच काम न करण्याची अट चुकून मान्य करून बसला .आणि त्याचा कालावधि बराच लांबला. ’अनुराग’ हा एक चित्रपटही त्याने काढला व त्याचे संगीतही दिले पण या गोष्टी त्याच्या कारकीर्दीस फायदेशीर न ठरता त्या काळात मुकेशने गायन संन्यास घेतला असा गैरसमज होऊन त्याची त्याला मोठीच झळ बसली.
     एक व्यक्ती म्हणून मुकेशचा सच्चेपणा त्यांच्या आयुष्यातील एका घटनेवरून समजतो.त्या काळात स्टेजशोज करण्यास त्याने सुरवात केली होती .मॉरिशसहून एक व्यक्ती त्याचे स्टेजशोज आयोजित करण्यासाठी आली होती व त्याला भेटण्यासाठी मुकेश आपल्याबरोबर  १२-१३ वर्षाच्या  नितिनला घेऊन गेला.करार करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने मुकेशला ३००० रु (त्यावेळी त्याचे मूल्य बऱ्यापैकी होते) अनामत म्हणून दिले त्यावेळी मुकेशने ते पैसे तसेच आपल्या मुलाच्या हातात देऊन म्हटले,"बेटा ही रक्कम तू घे. शो अजून तीन महिन्यानंतर आहे.मधल्या काळात जर माझे काही बरेवाईट झाले तर हे पैसे कोणी दिले होते त्याला परत करण्याची जबाबदारी तुझी राहील"हे ऐकून बिचारा नितिन रडायलाच लागला.अर्थात तसे काही झाले नाही. पण पुढे बऱ्याच वर्षानंतर तसेच घडायचे होते आणि दौरा चालू असतानाच मुकेश जग सोडून गेला.
        चार वेळा फ़िल्मफ़ेअर ऍवॉर्ड ,तीन वेळा बेंगाल फिल्म जर्नॅलिस्ट ऍवॉर्ड व एकदा नॅशनल फिल्म ऍवॉर्ड ने मुकेशला भूषवण्यात आले. आज मुकेशला जाऊन ४१ वर्षे होत आहेत तरी त्याने गायलेली गीते रसिकांच्या काळजावर दीर्घ काल राज्य करत रहाणार यात शंकाच नाही.