कुणाला भीत नाही मी कुणाचे खात नाही मी

कुणाला भीत नाही मी कुणाचे खात नाही मी 
स्वताचे गीत गुणगुणतो कुणाचे गात नाही मी
तुझ्या शहरात असशिल खूप मोठा राज्यकर्ता तू
जरा जाणून घे इतके तुझ्या राज्यात नाही मी
स्वतःला जॉब नसताना जिच्यावर खर्चला पैसा
अता मी भेटलो तर बोलली स्मरणात नाही मी
जरा दिसलोच कोठे तर नजर ती चोरते हल्ली
तिच्या लक्षात आहे की तिच्या लक्षात नाही मी
तहाच्या संपल्या आहेत उरल्या शक्यता साऱ्या 
असे समजून घे आता तुझ्या भाग्यात नाही मी
गरीबांच्या घरी मी खात असतो कोरडी भाकर
तुझ्या त्या पंचपक्व्यानातल्या ताटात नाही मी
--स्नेहादर्शन