८४ नाबाद !

    वयाच्या १० व्या वर्षापासून सुरवात करून आपल्या आवाजाची मोहिनीअजूनही रसिकांच्या मनावर चालूच ठेवणाऱ्या आशाताईंचा आज ८४ वा जन्मदिवस (८ सेप्टेंबर १९३३). आजही तितक्याच उत्साहाने त्या गात आहेत.त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्च्हा !
  यशाचा हा चढता आलेख सुखासुखी त्यांना लाभला नाही.त्यासाठी अतिशय कठिण परिश्रम व अनेक आपत्तींचा सामना त्यांना करावा लागला.मंगेशकर घराण्याचा वारसा व लतादीदींसारख्या बहिणीचा आधार मिळाला तरी त्याना आपली वाटचाल स्वतंत्रपणेच करावी लागली. दीनानाथांसारखा थोर गायक नट पिता म्हणून लाभला तरी ते छत्र त्यांच्या वयाच्या नवव्या वर्षीच हिरावले गेले.वयाच्या १० व्या वर्षी पार्श्वगायनाची संधी "माझा बाळ " या मराठी चित्रपटासाठी "चल चल नव बाळा " या गाण्यात दत्ता डावजेकर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मिळाली.तर वयाच्या १५ व्या वर्षी "चुनरिया " या हिंदी चित्रपटासाठी "सावन आया " हे गीत गाण्यासाठी पहिली संधी मिळाली.त्याचे संगीत दिग्दर्शक होते हंसराज बेहल.पण त्यानंतर लगेचच म्हणजे वयाच्या १६ व्याच वर्षी त्यांच्या जवळ जवळ दुप्पट वयाच्या गणपतराव भोसले या लतादीदींच्या स्वीय सचिवावरच त्यांचे प्रेम जडले व घरच्यांच्या विरुद्ध जाऊन त्यांच्याशी लग्नही त्यानी केले पण त्याना त्यातून कुठलेच सौख्य मिळाले नाही व त्याना गणपतरावांचे घर .दोन लहान मुले व एक पोटात अश्या अवस्थेत सोडावे लागले.
    मधल्या काळात लतादीदी प्रसिद्ध झाल्या होत्या त्यामुळे त्यांच्यासमोर आपल्या खुजेपणाची जाणीव हा मोठा अडसर आपले स्वतंत्र अस्तित्व प्रस्थापित करण्यास होता  त्याचबरोबर गीता दत्त,समशाद बेगम याही गायिका ऐन भरात असल्यामुळे लतादीदीनी नाकरलेली व इतरही पडेल चित्रपटातील गाणी गाणेच त्यांच्या नशिबी आले तरीही प्रत्येक ठिकाणी आपली अशी एक वेगळी प्रतिमा तयार करण्यात त्यानी कसूर केली नाही त्यामुळे हेलेनचा किंवा कॅबरे डान्सचे गीत गाण्यास योग्य असा आवाज अशी जरी ओळख काही काळ झाली तरी हिरा कोठेही पडला तरी त्यास ओळ्खणारे पारखीही असतातच तसे ओ.पी.नय्यर याना त्यांच्या आवाजातील जादू ओळ्खता आली शिवाय "लताशिवाय मी संगीत देऊ शकतो " हा त्यांचा दावाही खरा करण्यास आशाबाईंचा आवाज त्यांच्या कामी आला.१९५६ मध्ये निघालेल्या "सी.आय.डी." व त्यानंतर तसाच गाजलेला "नया दौर" या चित्रपटांनी त्यांचे स्थान प्रस्थापित झाले.नय्यर भोसले  यांच्या युतीमधून ३२४ गीते तयार झाली.नय्यर यांच्या मते त्यांच्या गीतांना जसा जोरकस,त्याचबरोबर जीवघेणा (sensuous) स्वर आवश्यक होता तसा बाज लताच्या स्वराचा नव्हता.त्यामुळे आशाताईंचा उपयोग लताला पर्याय म्हणून नाही तर एक स्वतंत्र ओळख असणारा आवाज म्हणून त्यानी केला. त्या आवाजाचा बाज बर्मनदा यांच्याही ध्यानात आल्यावर त्यानीही आशाकडून "कालापानी" " चलतीका नाम गाडी" मधील "अच्छा जी मै हारी" किंवा "हाल कैसा है जनाबका" अशी खरोखरच जीवघेणी गाणी म्हणून घेतली. अर्थात अगदी नौशाद,सी.रामचंद, या त्या काळातील महत्वाच्या संगीतकारांनाही त्यांची दखल घ्यावी लागली व त्यांच्या आवाजात सुमधुर गीतेही तयार करता आली.
  त्यानंतर पंचमदानी त्यांच्या आवाजाचा पुरेपूर उपयोग करून घेतलाच त्याचबरोबर त्याना जीवनसाथीही करून घेतले .पंचम व आशादीदी या जोडगोळीने अनेक प्रकारच्या गीतांना जन्म दिला व त्यात संगीताचे विविध प्रकार हाताळले गेले.त्या सर्वांचा उल्लेखही करणे हा स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो.त्यात पाश्चिमात्य संगीत त्याच बरोबर भारतीय शास्त्रीय संगीत या दोन्हींचाही सारखाच वाटा आहे व या दोन्ही प्रकारांना आशादीदींनी सारखाच न्याय दिला आहे."आजा आजा" (तीसरी कसम) "पिया तू अब तो आजा" (कारवां)" दम मारो दम( "(हरे रामा हरे कृष्णा) हा एक प्रकार तर" पिया बावरी"(खुबसूरत) हा दुसरा प्रकार.पण स्वत: आशाताईंच्या मते इज़ाज़त मधील गुलजार यांचे "मेरा कुछ सामान"हे गीत   त्यांच्या आवजाचा दर्जा स्पष्ट करते.तीच गोष्ट खय्याम यांनी उमराव जान मध्ये संगीत दिलेल्या गजलांची. वेगवेगळ्या भाषांमधून त्यानी गायिलेल्या गीतांची संख्या अकरा हजाराच्या आसपास असून गिनिज नुकात याची नोंद आहे. 
    केवळ चित्रपटगीतांवरच भर न देता अनेक प्रकारचे अल्बम्स त्यानी विविध व्यक्तीच्या बरोबर केले आहेत व त्यात पाश्चात्य कलाकारांचाही समावेश आहे. नाबाद ८३ हा सलिल कुलकर्णी बरोबर केलेला मराठी गीतांचा अल्बम हा अलीकडील.
    आशाताईंना गाण्यानरोबर खाण्याचाही शौक आहे.चांगले गाता येण्यासाठी चांगले खाणे आवश्यक आहे तसे चांगले पदार्थ तयार करता येणेही आवश्यक आहे असे त्यांचे मत ! त्याचमुळे रेस्टॉरंट्सची साखळीही त्यानी निर्माण केली आहे.
   जीवनाचा विविधांगी परामर्श घेणाऱ्या आशाताईंना या वाढदिवसाच्या दिवशी त्यानी  शतायुषी होऊन अशीच सुमधुर निर्मिती करीत रहाचे ही शुभेच्छा !