सप्टेंबर १४ २०१७

चिंता करी जो विश्वाची ... (२९)

समर्थ रामदास स्वामींनी, मनुष्य जातीचे विभाजन हे त्यांच्या गुणावगुणांप्रमाणे चार प्रकारात होते असे म्हणले आहे. जे अवगुणी आहेत, त्यांच्या विकार, दोषात बंदीवान आहेत, अशांना  "बद्ध जन" असे संबोधिले आहे. त्यांच्यात काही बदल घडल्याने अथवा स्वतःच्या दुर्गुणाची जाणीव झाल्याने त्यांना पश्चात्ताप होतो. स्वतःमध्ये काही सुधारणा व्हावी अशी इच्छा जागृत होते. अशा  व्यक्तींना  "मुमुक्ष" असे संबोधिले आहे. मुमुक्ष जेव्हा संतसज्जनांच्या संगतीत राहून ज्ञानसाधनेचा मार्ग अनुसरतात   तेव्हा  त्यांना "साधक" म्हणले जाते .  श्री रामदास स्वामींनी साधकाचे गुणवर्णन  देखिल विस्ताराने  केले आहे. 
साधक कुणाला म्हणावे ? 
ज्याने सर्व अनिष्टं वृत्तींचा त्याग केला आहे. साऱ्या अवगुण आणि दोषांना  नाकारून, निरामय ज्ञानसाधनेचा मार्ग स्वीकारला आहे. अशा व्यक्तीस साधक म्हणावे. साधकाची वाटचाल "सिद्ध" पदाच्या प्राप्तीकडे सुरू होते. अंतिम ध्येयाच्या प्राप्तीकरता त्यांना अनेक अवगुणांचा/ दुर्गुणांचा त्याग करावा लागतो. तेव्हाच सिद्धत्व प्राप्त होते. 

त्याग घडे अभावाचा । त्याग घडे संशयाचा ।
त्याग घडे अज्ञानाचा । शनै शनै ( हळू हळू ) ॥
ऐसा सुक्ष्म अंतर्त्याग । उभयांस घडे संग ।  
निःस्पृहास बाह्य त्याग । विशेष आहे ॥ 

सिद्धत्व प्राप्तं झालेली व्यक्ती कशी असेल? अशा व्यक्तींच्या ठायी कोणती लक्षणे दिसून येतात? त्याचीही चर्चा समर्थ सविस्तरपणे करतात. शुद्ध ज्ञान प्राप्तं झालेल्या व्यक्ती अधिक सात्त्विक असतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यात राग, द्वेष, मत्सर, कपट, हेवा इत्यादी तामसी गुणांचा पूर्णतः अभाव दिसून येतो. भौतिक सुखसाधनांचा त्यांना मोह नसतो. घरदार, नातेवाईक, मित्र परिवार या सर्व पाशातून त्यांना मुक्ती मिळालेली असते. कसलीही वासना/ लालसा मनात शिल्लक राहिलेली नसते. त्यामूळे चित्त स्थिर असते. विचार अधिक सुस्पष्टं आणि निर्मळ झालेले असतात. अशा व्यक्तींच्या सहवासात शांती आणि समाधान प्राप्तं होते. 

जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी ।
कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी ॥
प्रभू दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे ।
तयाचेनि योगे समाधान बाणे ॥ 

 सामान्य जनांस जे अप्राप्यं आहे, त्याचा शोध घेण्याचा साधकाचा निश्चय असतो. शुद्ध ज्ञान प्राप्तं करणे हेच साधकांचे ध्येय असते. सृष्टी आणि सृष्टीकर्ता परमेश्वर यांना जाणून घ्यायची उत्सुकता त्यांच्या मनी सर्वकाळ जागृत असते. सामान्य जनांस जे अवगत नाही, त्याचाच शोध त्यांना घ्यायचा असतो. असंख्य रूपात, अनेक स्थानी नेहमी प्रकट होणाऱ्या परमेश्वराचे आकलन त्यांना करून घ्यायचे असते. त्यांच्या या अखंड आणि अविश्रांत केलेल्या ज्ञानसाधनेचे फलित त्यांना प्राप्तं होते. पूर्ण  आणि शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होते. आणि साधक सिद्ध पदास प्राप्तं होतो. 

साधू वस्तु ( ब्रह्म ) होऊन ठेला । संशय ब्रम्हांडाबाहेरी  गेला ।
निश्चये चळेना ऐसा जाला । या नाव सिद्ध ॥ 

साधूजनांस पूर्ण ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर कसल्याही संशयाला तीळमात्रही जागा शिल्लक राहिली नसते. सृष्टीचे सारे ज्ञान असते. परब्रह्मांविषयीचे संदेह फिटलेले असतात. सामान्य जनांच्या मनात असलेल्या भय, शंका साधूसाठी लयाला गेलेल्या असतात. विशुद्ध ज्ञान प्राप्तीमुळे सारे दोष, अवगुण, शंका, भीती आणि संशय या सर्वांची जाग अपूर्व अशा मनःशांतीने घेतली असते. अशा प्रकारे मूलतः अवगुणात बद्ध असलेला सामान्य व्यक्ती, मुमुक्ष होतो. तदनंतर साधनामार्ग अनुसरत साधक होतो. आणि त्याच्या अविरत परिश्रमाचे फलस्वरूप म्हणून त्यांस सिद्ध पदाची प्राप्ती होते. 

बद्धपणाचे अवगुण । मुमुक्षपणी नाही जाण ।
मुमुक्षपणाचे लक्षण । साधकपणीं नाही ॥
साधकासी संदेहवृत्ती । पुढे होतसे निवृत्ती ।
याकारणे निःसंदेह श्रोती । साधू वोळखावा ॥ 

संशय हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. संशयामुळे मिळवलेले ज्ञान फोल ठरते. संशय सद्गुणी माणसाला नीच पदाला नेतो. म्हणून संशय हा ज्ञान मार्गातील मोठा अडसर आहे. संशयाला दूर केले तरच संपूर्ण ज्ञानाची प्राप्ती होते. आणि मनुष्य सिद्धत्वं प्राप्तं करतो. म्हणून संशयाचा त्याग ही सिद्ध पदाला पोहोचण्याच्या मार्गातील पहिली पायरी आहे.

संशयारहित ज्ञान । तेचि साधूचे लक्षण ।
सिद्धाआंगी संशय हीन । लागेल कैसा ॥
कर्ममार्ग संशये भरला । साधनी संशये कालवला ।
सर्वांमध्ये संशय भरला । साधु तो निःसंदेह ॥ 
संशयाचे ज्ञान खोटे । संशयाचे वैराग्य पोरटे । 
संशयाचे भजन वोखटे (खोटे) । निर्फळ होय ॥ 

संशयी वृत्तीचे इतके सारे दुष्परिणाम असतात. म्हणून मनातील संशय काढून टाकावा. संशय हा परमार्थ साधनेतील अडथळा आहे. संशयग्रस्त मनाने केलेली भक्ती, साधना निरूपयोगी ठरते. मनातील संशयाचे निराकरण करूनच साधनामार्ग स्वीकारला असता मोक्षप्राप्ती होईल, असे समर्थांनी दासबोधात सांगितले आहे. संशय विरहित चित्त, हेच साधूचे व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल. अवगत केलेल्या ज्ञानावर पुरेपूर विश्वास असेल, तरच त्या ज्ञानाच्या बळावर वादविवाद करावा. निःसंदेह ज्ञानामुळे वक्त्याच्या बोलण्याला धार येते. त्याचे बोलणे श्रोत्यांसाठी, (ज्यामध्ये अनेक विद्वान देखिल असतात) रोचक ठरते. वक्तृत्वाला एक निश्चित असा आधार असतो. असे बोलणे श्रोते मनःपूर्वक श्रवण करतात. त्यातील विचारांना काळजीपूर्वक समजून घेतात. तेच जर वक्ता अनिश्चित  असेल, अपुऱ्या ज्ञान आणि माहितीच्या आधारे बोलत असेल, आणि त्याला स्वतःलाच तो बोलत असलेल्या विषयासंबंधी पूर्ण, निःसंदेह ज्ञान नसेल, तर ते बोलणे श्रोत्यांना कंटाळवाणे वाटते. वाक्यांवर रचलेली वाक्ये भारूडभरती आणि रुचिहीन वाटतात. म्हणून जो स्वतःच्या ज्ञानाविषयी पूर्ण आश्वस्त आहे, तोच खरा साधू  हे ओळखावे. 

निश्चयेविण सर्व काहीं । अणुमात्र ते प्रमाण नाही ।
वेर्थचि पडिले प्रवाहीं । संदेहाचे ॥
निश्चयेविण जे बोलणे । ते अवघेचि कंटाळवाणे ।
बाष्कळ बोलिजे वाचाळपणे । निरार्थक ॥
असो निश्चयेविण वल्गना । ते अवघीच विटंबना ।
संशये काही समाधान । उरी नाही ॥ 

साधूपण प्राप्तं होण्यासाठी चित्तवृत्ती शांत आणि समाधानी असायला हवी. संशयाने निर्माण होणारा खेद, द्वेष, संताप पूर्णतः निमाला असला पाहिजे. ही स्थिती प्राप्तं करण्यासाठी संशयी वृत्ती सोडून द्यायला हवी. स्वतःच्या ज्ञानाविषयी / माहिती विषयी आत्मविश्वास असायला हवा. काही बोलण्यापूर्वी मनाचा निश्चय झालेला असावा. जे काही बोलणार, सांगणार ते आधी मनाशी सुनिश्चित करून त्याची सत्यता, यथार्तता पडताळून पाहणे आवश्यक आहे. एकदा मुखातून बाहेर पडलेला शब्द परत फिरविणे हे साधूपणाचे लक्षण नव्हे. ज्या श्री रामाची श्रद्धा, भक्तिपूर्वक पूजा करायची, त्यांचे एकवचनी बाणा आणि सत्यप्रियता, न्यायप्रियता हे गुण अंगिकारले पाहिजेत. तरच ती खरी साधना होईल. 
पुढे समर्थ म्हणतात,  बोलण्यात, वचनात निश्चय असायला पाहिजे. कुणास प्रश्न पडेल की , हा निश्चय म्हणजे नेमके काय? 
मग त्याची व्याख्या समर्थ उलगडून सांगतात. 

ऐक निश्चय तो ऐसा । मुख्य देव आहे कैसा ।
नाना देवाचा वळसा (गोंधळ) । करूचि नये ॥ 
जेणे निर्मिले सचराचर । त्याचा करावा विचार ।
शुद्ध विवेके, परमेश्वर । वोळखावा ।। 

साधकाला सिद्धत्वं केव्हा प्राप्तं होते? तर जेव्हा त्यांस परमेश्वराचे स्वरूपदर्शन होते. आत्मज्ञानाची प्राप्ती होते.  साधूस नक्की माहीत असते, की सर्व जगाचा स्वामी एकच आहे. अनंत मतांच्या  गलबल्याला तो दुर्लक्षितो आणि ठाम पणे उच्च रवाने सांगतो, की शुद्धस्वरूपी ज्ञान हे सर्वांस समानच आहे. मग त्यांच्या साधनेच्या / अभ्यासाच्या पद्धती वेगळ्या असल्या, तरी त्या सर्व मार्गाने चालणाऱ्या पथिकांचे अंतिम ध्येय एकच असते. अशा प्रकारे आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर, साधूस साक्षात्कार होतो की परमेश्वर देखिल एकच आहे. सर्व चराचर ज्याने व्यापिलेले आहे, सर्व प्राणिमात्र ज्याचे अंशरूप आहेत, जो अनेक रूपाने, अनेक स्थानी प्रकट होत असतो, असा  देव एकच आहे. अशा सर्वांभूती, सर्वसाक्षी ईश्वराविषयी समर्थांनी म्हणले आहे -- 

नव्हे जाणता नेणता देवराणा । ये वर्णिता वेदशास्त्रां पुराणां ॥ 
नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा । श्रुती नेणती नेणती अंत त्याचा ॥ 
वसे ऱ्हुदयी देव तो जाण ऐसा । नभांचेपरी व्यापकू जाण तैसा
सदा संचला येत ना जात काही । तयावीण कोठे रिता ठाव नाही ॥ 

परमात्म्याचे स्वरूपदर्शन घडलेल्या सिद्धाने सदासर्वकाळ विरागी वृत्तीने  राहावे,  असे समर्थ म्हणतात. कारण साधुजनास सामान्यजन आदर्शवत समजतात. त्यांचा श्रद्धा-भक्तिपूर्वक आदर करतात. सामान्यांच्या श्रद्धेचा, भावनांचा  सन्मान राखण्यासाठी, साधूने व्रतस्थ जीवनशैली अनुसरावी. कुठलाही अतिरेक, कुपथ्य अथवा व्यभिचार न करता सात्त्विक, निरामय जीवनपद्धतीचा अवलंब करावा. त्या योगे  साधनेत देखिल कसलीही बाधा येत नाही आणि सर्वसामान्यांच्या आदर, सन्मानास ते पात्रं ठरतात. 

आपल्या देवास वोळखावे । मग मी कोण हे पाहावे ।
संग (मी पणा, आत्माभिमान) त्यागून राहावे । वस्तुरूप ॥ 
तोडावा बंधनाचा संशयो । करावा मोक्षाचा निश्चयो ।
पाहावा भूतांचा अन्वयो । वितिरेकीसी (सृष्टीच्या आदी आणि अंताचा विचार ) ॥ 
पूर्वपक्षेसिं सिद्धांत । पाहावा प्रकृतीचा अंत ।
मग पावावा निवांत । निश्चय देवाचा ॥ 

साधुंच्या मनात ईश्वराविषयी, त्यांच्या स्वरूपाविषयी संदेह नसतो. सर्वांभूती ईश्वर एकच आहे हे सत्य जाणल्याने द्वैतभाव संपलेला असतो. कुणाविषयी आकस अथवा श्रेष्ठत्वाचा वाद नसतो. अशा साधूची वृत्ती निगर्वी असते. कसलाही मोह अथवा लालसा नसल्याने मन शांत, समाधानी असते. ज्ञानसाधनेतील सर्व अडचणींवर मात केलेली असल्याने, साधना अधिक प्रखर आणि प्रभावी होते. ज्ञानाची अनेक दालने त्यांच्यासाठी उघडलेली असतात. त्याचा फायदा अर्थातच इतर सामान्य जनांस देखिल होतोच. साधुजनाने अज्ञानाचे, अहंकाराचे अडथळे दूर करून सहजसाध्य केलेल्या वाटेवरून मार्गक्रमणा करून त्यांची,  आणि पर्यायाने संपूर्ण समाजाची उन्नती साधली जाते. 

अशा प्रकारे जनसामान्यांचे श्रद्धास्थान असलेल्या,  "सिद्ध" पदास पोहोचलेल्या साधुजनास आचार-विचारांचा विवेक राखण्याचा सल्ला श्री रामदास स्वामींनी दिला आहे. अहंकार हा मनुष्याचा शत्रू आहे. आत्मपौढी आणि दुराभिमानाच्या योगे तुम्ही जनलोकांच्या अनादरास पात्रं व्हाल असे ते बजावतात. कमी बोलावे. बोलाल ते सत्य आणि सार्थच असावे. श्रोत्यांच्या प्रश्नांना आदरपूर्वक, योग्य उत्तरे द्यावीत. कुणाची उपेक्षा करू नये.  कुणाचा अपमान  अथवा त्यांच्या अज्ञानाची हेटाळणी करू नये. कारण सर्वसामान्यांचे अज्ञान दूर करणे,  हेच साधूचे परमकर्तव्य आहे. गर्व आणि आत्माभिमानामुळे  तुमच्या कर्तव्यपूर्ती मध्ये बाधा येईल, म्हणून मनात नेहमी विनम्र भाव असायला हवा . सामान्यांप्रती सहानुभूती असली पाहिजे. 

सिद्ध असता आत्मज्ञान । संदेह वाढवी देहाभिमान । 
या कारणे समाधान । आत्मनिश्चये राखावे ।।
आठवता देहबुद्धी । उडे विवेकाची शुद्धी ।
या कारणे आत्मबुद्धी । सुदृढ करावी ॥
आत्मबुद्धी निश्चयाची । तेचि दशा मोक्षश्रींची । 
अहमात्मा हे कधिचि विसरो नये ॥ 

(क्रमशः)

संदर्भ - 
              (१)  श्री मनाचे श्लोक 
              (२) श्री ग्रंथराज दासबोध 


Post to Feedजमत का नाही
धन्यवाद !
उत्तराबद्दल आभारी आहे.
आचरण आणि सिद्धत्व यांची दासबोधात मोठी गल्लत आहे
सत्य
सत्याचा आचरणाशी काही संबंध नाही

Typing help hide