ऑक्टोबर १९ २०१७

चिंता करी जो विश्वाची ... (३०)

श्री रामदास स्वामींनी ज्ञानदानाचे व्रत स्वीकारले होते. मोठ्या निष्ठेने ते त्या व्रताचे पालन करीत होते. 
सर्वसामान्य जनांचे अज्ञान दूर करून, त्यांना शहाणपणाच्या, व्यवहारज्ञानाच्या चार गोष्टी सांगून त्यांचे आयुष्य सुकर करणे हे रामदास स्वामींचे उद्दिष्ट्य होते.  त्यांनी त्यांच्या दासबोध या ग्रंथात व्यवहार चातुर्याच्या काही सोप्या पद्धती सांगितल्या आहेत. त्यांचे अनुकरण केल्याने जीवनात उद्भवू शकणारे संभाव्य धोके, अडचणी टाळता येणे शक्य होते. 

सर्वसामान्य मनुष्य उदरनिर्वाहासाठी उपजीविका शोधत असतो. ज्याला ज्या ठिकाणी अर्थार्जनाची संधी प्राप्तं होईल तिथे जाणे त्यास क्रमप्राप्त असते. आपल्या ओळखीचे भवताल  सोडून अनोळखी जागी जाणे, तिथे राहणे हे अशक्य नसले तरी अवघड नक्कीच असते. नव्या ठिकाणी माणसे, जागा, चालीरीती सारेच अनोळखी असते. अशावेळी आपल्या जुन्याच सवयी, चालीरीती आणि विचार तसेच ठेवून जगणे अव्यवहार्य असते. म्हणून समर्थांनी सांगितले आहे, तुम्ही ज्या ठिकाणी जाल, तसेच व्हा. तिथल्या लोकांप्रमाणेच राहणीमान असू द्या. तिथले नियम, रीती समजून घ्या आणि त्याचे यथायोग्य पालन करा. असे केल्याने नवख्या ठिकाणाचे लोक देखिल तुमचा स्वीकार करतील, त्यांच्या समूहात सामील करून घेतील. तुम्ही स्वतःमध्ये बदल करणे गरजेचे आहे, अन्यथा तुमचे जिणे दुष्कर होईल.
आयुष्य सुरळितपणे जगता यावे, या साठी वर्तन, व्यवहार कसे असावेत या बद्दल समर्थांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे. 

मना श्रेष्ठ धारिष्ट्य जीवी धरावे ।
मना बोलणे नीच सोशीत जावे ॥
स्वये सर्वदा नम्र वाचे वचावे ।
मना सर्व लोकांसी निववावे ॥ 

असा उपदेश समर्थांनी दिला आहे. असे वागल्याने कुणाशी वैर अथवा भांडण-तंटे होण्याची शक्यता मावळते .. आणि कुठल्याही अडथळ्यांशिवाय जीवनक्रम चालू राहतो. ज्यावेळी मनुष्य परक्या ठिकाणी राहण्यास जातो, त्या वेळेस तर असे वागणे अत्यंत उपयुक्त ठरते. कुठेही असले तरी श्रेष्ठ आणि सामर्थ्यशाली लोक ज्यांना अनेक जण पूज्य मानतात आणि त्यांच्या आज्ञेनुसार वर्तन करतात, अशा लोकांबरोबर योग्य प्रकारे संपर्क ठेवणे इष्ट असते.

कोणी येके ग्रामी अथवा देसी । राहणे आहे आपणासी ।
न भेटता तेथिल्या प्रभुसी । सौख्य कैचे ॥ 
म्हणौनि ज्यास जेथे राहाणे । तेणे त्या प्रभूची भेटी घेणे ।
म्हणिजे होये श्लाघ्यवाणे । सर्व काही ॥ 

ज्या गावी, ज्या देशी राहायचे,  तिथल्या अधिकारी  व्यक्तींच्या संपर्कात असणे शहाणपणाचे असते. कारण त्यांच्या  प्रभावाने,  इतर सामान्य जन देखिल सौजन्याने व्यवहार करतील. संशयाने पाहणार नाहीत, अथवा  कसल्याही कार्यात अडथळा आणणार नाहीत. परंतु जर तुम्ही योग्य व्यक्तींच्या संपर्कात नसाल तर मात्र तुमचे तेथील राहणे दुष्कर होण्याची शक्यता असते. 

त्यास (प्रमुख अथवा अधिकारी व्यक्ती) न भेटता त्याचे नगरी । राहाता धरितील बेगारी ।
तेथे न करिता चोरी ।  आंगी लागे ॥ 
या कारणे जो  शाहाणा । तेणे प्रभुसी भेटावे जाणा ।
ऐसे न करिता दैन्यवाणा । संसार त्याचा ॥ 

आपल्याहून वरिष्ठ व्यक्तींचा योग्य त्या प्रकारे सन्मान करणे हेच सामान्य व्यवहारज्ञान श्री रामदास स्वामींनी सांगितले आहे. जे लोक कर्तृत्ववान आहेत, अनुभवी आहेत आणि त्याच बरोबर ते अधिकार स्थानावर आहेत, त्यांचा  शब्द मानणारे अनेक लोक आहेत, - असे सज्जन हे आदर आणि सन्मानास योग्य असतात. अशा व्यक्तींच्या ओळखीने, संपर्काने आणि त्यांच्या प्रभावाने अनेक कार्ये  निर्विघ्नपणे मार्गी लागतात.

त्यानंतर समर्थ समाजात असलेल्या  अधिकारीक स्थानांची उतरंड कशी असते त्याचे वर्णन करतात. सर्वोच्च स्थानी कुणी एक असेल, परंतु त्याच्या आधिपत्याखाली अनेक प्रभावशाली जन असतात. 

ग्रामी थोर ग्रामाधिपती । त्याहूनही थोर देशाधिपती ।
देशाधिपतीहूनि नृपती । थोर जाणावा ॥ 
राष्ट्रांचा प्रभू तो राजा । बहुराष्ट्र तो माहाराजा ।
महाराजाचाही राजा । तो चक्रवर्ती ॥
येक नरपती येक गजपती । येक हयपती येक भूपती ।
सकळांमध्ये चक्रवर्ती । थोर राजा ॥ 

समाजामध्ये श्रेष्ठत्वाची अशी मांडणी असेल. त्यापैकी आपल्या परिघातील जो श्रेष्ठ आणि ज्येष्ठ, त्याचा नेहमीच मान राखावा.  ही झाली मर्त्य मानव समाजातील  श्रेष्ठत्वाची सारणी.  परंतु मानवजातीच्या  श्रद्धास्थानी ज्या अनेक देव-देवता  असतात, त्याच्यात सुद्धा अशा तऱ्हेचीच संरचना दिसून येते. ब्रम्हा, विष्णु आणि महेश्वर या तीन श्रेष्ठ देवता. त्यांतही ब्रम्हदेव सर्वसृष्टीचा कर्ता, सर्व ब्रम्हांडाचा रचनाकार, म्हणून सर्वश्रेष्ठ. आणि अशा या विश्व निर्मात्या  ब्रम्हाला निर्माण करणारा,  तो -  एकमेव आणि सर्वश्रेष्ठ असा अनुक्रम लावलेला दिसतो. 
श्री रामदास स्वामी सांगतात, अशा एकमेव, जगन्नियंत्याला ओळखणे, हे  सुजाण सजगतेचे निर्देशक आहे.  जो परमात्म्याचे स्वरूप जाणतो, त्याला या जगतातील कोणतीही चिंता संभ्रमित करू शकत नाही. 

श्री समर्थ सांगतात, हर प्रयत्नांनी जगताचा स्वामी जाणावा. त्याची मनोभावे, श्रद्धाभक्तीपूर्वक पूजा-अर्चनां करावी. त्या योगे सामान्यांचे जीवन सुफळ संपूर्ण होईल. अन्यथा सर्व काही -- म्हणजे यश, धन, कीर्ती, मानसन्मान सुख मिळवले, परंतु या सर्वांचा जो कर्ता करविता, त्यांस ओळखले नाही. ओळखले नाही म्हणून पूजिले नाही, त्याचे आदर-सत्कार केले नाहीत. त्याच्या ऋणांप्रती कृतज्ञता व्यक्त केली नाही, तर सारे काही व्यर्थ आहे.

जेणे संसारी घातले । आवघे ब्रम्हांड निर्माण केले ।
त्यासी नाही वोळखिले । तोची पतित ॥ 
म्हणोनी देव ओळखावा । जन्म सार्थकची करावा ।
न कळे तरी सत्संग धरावा । म्हणिजे कळे ॥ 

देव जाणण्याच्या, ओळखण्याच्या प्रयत्नांना यश आले नाही, तर थोर, आदरणीय आणि ज्ञानी व्यक्तींच्या संगतीत रमावे. त्यांच्या अनुभवायोगे नेणत्यासही सर्वात्मकाची ओळख होईल, असे समर्थांनी सांगितले आहे. 

जाणिजे परमात्मा निर्गुण । त्यासिच म्हणावे ज्ञान ।
त्यांवेगळे ते अज्ञान । सर्वकाही ॥ 

उत्तम रीतीने जीवनयापन करण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या कृती करणे आवश्यक आहेत याचे सविस्तर उत्तर समर्थांनी दासबोधातून दिले आहे.  उपजीविका चालविण्यासाठी जेथे कुठे जाण्याची आवश्यकता असेल तेथे जाणे योग्यच आहे. तसेच ज्या देशी, ज्या स्थानी तुम्ही वस्ती करणार, तिथले राहणीमान, रीतीरिवाज यांची माहिती करून घेणे आणि त्यांनुसारच वर्तन ठेवणे इष्ट, असे समर्थ सांगतात. चार जण जसे राहतील तसे राहावे, जसे वागतील तसेच वागावे.  असे करणे हितकारी असते. कारण वेगळेपण, सामान्यजनात सहजतेने उठून दिसते. सहाजिकच वेगळेपण असणाऱ्याकडे सामान्य जन अधिक चिकित्सेने पाहतात. घडोघडी त्याचे परीक्षण करतात आणि आपले सामान्य निकष लावूनच न्यायनिवाडा करतात, जो काहीवेळा चुकीचा आणि अन्यायकारक असू शकतो. परंतु संख्याबलाच्या जोरावर तोच निवाडा मान्य देखिल होऊ शकतो. परंतु काही असे असतात, की जे वेगळे असूनही किंबहुना त्यांच्या वेगळेपणामुळेच लोकमानसात आदराचे स्थान प्राप्तं करतात. अशांना अर्थात साधू, संत, महंत असे संबोधिले जाते. कारण सामान्य जनांची अशी धारणा असते, की संत, महंत हे ईश्वराच्या अधिक निकट असतात. त्यांना देव स्वरूपाचे सत्य दर्शन घडलेले असते. ते ज्ञानी असतात. म्हणूनच पूजनीय असतात. 

जो जाणेल भगवंत । तया नांव बोलिजे संत ।
जो शाश्वत आणि अशाश्वत । निवाडा करी ॥ 
चळेना ढळेना देव । ऐसा ज्याचा अंतर्भाव ।
तोची जणिजे माहानुभाव । संत साधू ॥
जो जनामध्ये वागे । जनांवेगळी गोष्टी सांगे ।
ज्याचे अंतरी ज्ञान जागे । तोची साधू ।

पुढे समर्थ सांगतात, अर्थार्जन करता यावे, कुटुंबाची उपजीविका चालावी या करीत सर्वच  लोक  ज्ञानार्जन करतात. कोणते ना कोणते कौशल्य आत्मसात करतात, ज्या योगे काही उत्पन्न मिळेल. पण असे पोटार्थी ज्ञान हे काही खरे ज्ञान नव्हे. ते प्राप्तं करणे आवश्यक असते. परंतु फक्त तेव्हढेच केल्याने, समाधान काही प्राप्तं होत नाही. सांसारिक गरजा भागविणारे ज्ञान हे फक्त भौतिक  गरजा भागविण्यास उपयुक्तं असते. परंतु आत्मिक उन्नती साधायची असेल तर जे सत्य आहे त्याचा शोध घ्यावा लागेल. 

पोट भराव्याकारणे । नाना विद्या अभ्यास करणे ॥
त्यासी ज्ञान म्हणती, परी तेणे - । सार्थक नव्हे ॥
देव वोळखावा येक । तेंची ज्ञान ते सार्थक ।
येर अवघेची निरार्थक । पोटविद्या ॥ 

असे हे पूर्णज्ञान ज्याने प्राप्त केले आहे, अशाच सज्जनांच्या संगतीत राहणे इष्ट. कारण ज्ञानी जनांच्या सहवासाने अज्ञान दूर होणे शक्य असते. अज्ञानी लोकांच्या सहवासात राहण्याने असे काही घडण्याची अपेक्षा बाळगणे अनुचितच आहे. स्वतःची उन्नती साधायची असेल तर आपणाहून श्रेष्ठ व्यक्तींच्या सहवासात राहणे अधिक उचित.  त्यांच्याकडील ज्ञानाने, उत्तम गुणामुळे आपल्यातील न्यून दूर करणे शक्य असते. परंतु हेच जर तुम्ही तुमच्याच बरोबरीच्या, तुमच्याच सारख्या, अथवा तुमच्याहून कनिष्ठ दर्जाच्या व्यक्तींसमवेत सतत राहिलात, तर असे होणे कदापिही शक्य नाही.

अज्ञानास भेटता अज्ञान । तेथे कैचे सापडेल ज्ञान ।
करंट्यास करंट्याचे दर्शन । होता, भाग्य कैचे ॥ 
अबद्धापासी गेला अबद्ध (गैरशिस्तीचा) । तो कैसेनि  होईल सुबद्ध । 
बद्धास भेटता बद्ध (अज्ञानी) । सिद्ध नव्हे ॥
या कारणे ज्ञाता पाहावा । त्याचा अनुग्रह घ्यावा ।
सारासारविचारे जीवा । मोक्ष प्राप्त ॥ 

(क्रमशः)
संदर्भ :    (१) श्री मनाचे श्लोक 
              (२)  श्री ग्रंथराज दासबोध 


Post to Feed
Typing help hide