चिंता करी जो विश्वाची ... (३१)

श्री समर्थ रामदास स्वामींनी अतिशय सोप्या भाषेत,  धर्मग्रंथात बंदिस्त असलेले ज्ञान सर्वसामान्य जनलोकांपर्यंत पोहोचविण्याचा  प्रयत्न चालविला होता. स्वतःची बुद्धिमत्ता,  धर्मग्रंथांच्या वाचन, परिशीलनाने  आलेली प्रगल्भ जाण आणि अखंड प्रवास, जनसंपर्काने आलेले समृद्ध अनुभव यांचा वापर करीत ते सामान्य जनांस उपदेश देत असत.  

सर्वसामान्य लोक स्वतःच्या आयुष्यामध्ये व्यस्त असतात. त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेची चिंता असते. त्यासाठी ते कष्टही करीत असतात. परंतु काही वेळा कौशल्य, प्रामाणिकपणा आणि कष्ट करण्याची तयारी असूनही म्हणावे तसे यश लाभत नाही. त्यामुळे निराशा येते. 
समर्थ अशाच लोकांसाठी काही बहुमूल्य विचार, सल्ले  देत असत. काही वेळा थोड्याफार व्यवहारज्ञानाची जोड लाभली असता, कौशल्य आणि योग्यतेला अपेक्षित असलेली   फलप्राप्ती होऊ शकते, असे त्यांचे सांगणे होते. 

उपजीविकेसाठी आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असते. त्याकरिता कोण्या एका गुरूचे शिष्यत्व पत्करणे आवश्यक असते.  तसेच धार्मिक आणि आत्मिक उन्नती प्राप्त करण्यासाठी देखिल कुणाचा उपदेश घेणे क्रमप्राप्तं  असते. कारण केवळ भौतिक समृद्धीने मनुष्यास सुख आणि समाधान प्राप्तं होत नाही हे त्रिवार सत्य. गुरू उपदेशाखेरीज ज्ञानप्राप्ती होणे अशक्य.  त्यांमुळे सद्गुरूंचा शोध अनिवार्य ठरतो. 
परंतु समर्थ येथे श्रोत्यांस सावध करतात. उपदेश करणे अनेकांना प्रिय असते. स्वतःला ज्ञानी आणि श्रेष्ठ समजून, दुसऱ्यास उपदेश करण्यास अनेक जण सरसावतात. परंतु उपदेश ग्रहण करण्याची आकांक्षा ज्यांना आहे, त्यांनी  उपदेशकाची पारख करावयास हवी. अयोग्य व्यक्तीकडून घेतलेला उपदेश हा निरुपयोगी ठरतो. म्हणून समर्थ सांगतात --

ब्रम्हज्ञानेविण उपदेश । तो म्हणो नये विशेष ।
धान्येविण जैसे भूंस  । खाता नये ॥ 

सर्वज्ञानी असल्याचा आव आणून, दुसऱ्यास शिकविण्याचा अट्टहास करणाऱ्यांना वेळीच दूर सारणे आवश्यक असते. कारण अशांचे बोलणे, सांगणे हे केवळ पोकळ आणि म्हणूनच व्यर्थ असते.  ज्यांचे चारित्र्य उज्ज्वल आहे, ज्यांचे हेतू निर्मळ आहेत आणि ज्यांचे ज्ञान वादातीत आहे,  अशा व्यक्तीसच गुरू मानून त्यांच्याकडून  उपदेश घ्यावा. 
ज्याने उपदेश स्वीकारायचा त्यांसही समर्थ काही गोष्टी आवर्जून सांगतात. ज्ञानार्जन करीत असताना, सारासार विवेक बुद्धी अखंड जागृत असणे आवश्यक आहे. हीण कोणते, आणि अस्सल सुवर्ण कोणते याची पारख असायला हवी. केवळ आकर्षक,प्रभावी व्यक्तिमत्त्व असणारा,  अनेक शाब्दिक करामती करणारा गुरू, हा खरा ज्ञानी असेलच असे नाही. कारण, "चकाकते ते सर्व सोने नसते" -- याचे भान ठेवणे अती आवश्यक आहे. ज्ञान आत्मसात करीत असताना उपयुक्त कोणते ते ओळखून स्वीकारावे आणि निरुपयोगी ते टाकून द्यावे असेही समर्थ सांगतात. अन्यथा केलेली ज्ञानसाधना ही निष्फळ होईल. 

नाना साली भक्षिल्या । अथवा चोईट्या  चोखिल्या ।
खोबरें सांडून खादल्या । नरोट्या जैशा ॥
तैसे ब्रम्हज्ञानेंविण ।  नाना उपदेशाचा सिण ।
सार सांडून असार, कोण -। शाहाणा सेवी ॥ 

ज्ञान आत्मसात करीत असताना अखंड सावध बुद्धीमत्ते बरोबरच शुद्ध अंतःकरण असावे असेही ते सूचित करतात.  दुभंग अथवा द्विधा मनः स्थितीत असणारे, तसेच मनात तामसी विचार बाळगणारे साधक हे ज्ञानार्जनास अपात्र असतात. शिष्य/ श्रोते यांचे चित्त शांत आणि शुद्ध असेल तरच मिळालेल्या ज्ञानाचा ते उत्तम पद्धतीने उपयोग करू शकतात. 

समर्थ त्यांच्या शिष्यांना सृष्टीचे, तिच्या अस्तित्वाचे मर्म उलगडून सांगतात.  सृष्टीच्या रचनाकाराने तिची निर्मिती केली. त्यामध्ये जीवसृष्टीचे प्रायोजन केले. त्या करिता पंचमहाभूतांची निर्मिती केली. पण हे सारे अशाश्वत आहे. कधी ना कधी यांचा नाश अटळ आहे. मग अविनाशी काय आहे तर ते ब्रम्हतत्वं. जे सृष्टीच्या आधी पण होतेच, आणि तिच्या अंतानंतरही ते असणार आहे. म्हणून या परब्रह्माचे ज्ञान प्राप्तं करणे म्हणजेच पूर्णज्ञानाची प्राप्ती होणे आहे. 

सकळ सृष्टीची रचना । ते हे पंचाभूतिक जाणा ।
परंतु हे तगेना।  सर्वकाळ ॥
आदिअंती ब्रह्म निर्गुण । तेचि शाश्वताची खूण ।
येर पंचभूतिक जाण । नासिवंत ॥ 

पंचमहाभूतासह सारी सृष्टी नाशिवंत आहे. परंतु या सर्वाचे आद्य जे परब्रह्म ते अविनाशी आहे. जे सृष्टीच्या आधी, सृष्टी समवेत आणि सृष्टीच्या अंतानंतरही असणार आहे. जे महाज्ञानी आहेत त्यांनी हे ओळखले आहे. त्यांना परब्रह्माचे ज्ञान आहे. आपले पृथ्वीतलावरील अस्तित्व ही केवळ माया आहे, हे त्यांनी जाणलेले असते. समर्थ श्रोत्यांस सांगतात, या पंचमहाभूतांना व्यापूनही जो उरलेला आहे, त्या जगदीशाला जाणून घ्यावे. आयुष्य हे नुसते क्षणभंगुरच नाही, तर एक भ्रम आहे हे सदोदित चित्ती असो द्यावे. 

पृथ्वी आप तेज वायो आकाश । या सबाह्य जगदीश ।
पंचभूतांसीं आहे नाश । आत्मा अविनाशरूपी ॥ 
जें जें रूप आणि नाम । तो तो आवघाचि भ्रम ।
नामरूपातीत वर्म । अनुभवें जाणावें ॥

असे  हे अनादीअनंत  ब्रह्म जाणून घेण्याचा सारे प्रयत्न करतात. आपापल्या  परीने त्याचे दर्शन करतात. अनेक तत्त्वचिंतक आणि महाज्ञानी त्यांची बुद्धिमत्ता या कामी खर्ची घालतात. तेव्हा हे ब्रम्हस्वरूप त्यांच्या ज्ञानचक्षूंसमोर साकार होते. त्याचेच वर्णन ते करतात...

जे शस्त्रे तोडिता तुटेना । जें पावके जाळिता जळेना ।
कालविता कालवेना । आपेंकरूनी ॥ 
जें वायोचेनी उडेना । जें पडेना ना झडेना । 
जे घडेना ना दडेना ।  परब्रह्म तें ॥
ज्यासी वर्णचि नसे । जें सर्वाहूनि अनारिसे (विलक्षण) ।
परंतु असतचि असे । सर्वकाळ ॥
दिसेना तरी काये जालें । परंतु ते सर्वत्र संचले ।
सूक्ष्मचि कोंदाटले । जेथे तेथे ॥ 

असे हे निर्गुण, निराकार परब्रह्म सूक्ष्म दृष्टीने अभ्यासावे. जे सामोरे दिसते ते पाहावे. परंतु जे दृश्य आहे ते संपूर्ण  नसून, जे अदृश्य आहे त्यात सारे काही सार साचलेले आहे हे जाणून असावे. स्वतःची विवेक बुद्धी वापरून, जे गुपित आहे ते उलगडावे. जे ज्ञान असाध्य आहे, ते प्राप्तं करण्यासाठी अथक आणि अहर्निश साधना करावी, म्हणजेच जे सत्यब्रम्ह आहे ते हाती गवसेल, असा उपदेश समर्थांनी केलेला आहे.
ह्या ब्रह्माचे स्वरूप कसे विशद करावे? सामान्यांना त्यांच्याच भाषेत ते समजावून कसे सांगावे? तर त्यांस देव असे संबोधावे ...

पृथ्वी नव्हे आप नव्हे । तेज नव्हे वायू नव्हे ।
वर्णवेक्त ( व्यक्त होईलसा वर्ण) ऐसे नव्हे। अव्यक्त ते ॥
तयास म्हणावे  देव । वरकड लोकांचा स्वभाव ।
जितुके गांव तितुके देव जनाकारणे ॥ 

अशा रितीने देवाचे स्वरूप साकार झाले. सर्वसामान्य लोकांसाठी हा देव अनंत रूपात  प्रकट होत राहतो. " जैसा भाव -- तैसा देव"  ही उक्ती प्रत्ययाला येते. एकदा ज्याची उपासना करायची, त्या देवाची स्वरूप निश्चिती झाली  की आत्मशोधाचा प्रयत्न करावा. देव जाणणे जितके अवघड, तितकेच किंबहुना त्याहूनही जास्त,  स्वतः ला ओळखणे  कठीण. समतोलपणे आत्मपरीक्षण करणे  तितकेसे सोपे नाही. 

माझे शरीर ऐसें म्हणतो । तरी तो जाण देहावेगळाचि तो ।
मन माझें ऐसे जाणतो । तरी तो मनहि नव्हे ॥
पाहाता देहाचा विचार । अवघा तत्त्वांचा विस्तार ।
तत्वें तत्त्व झाडिता सार । आत्माच उरे ॥ 

असे आत्मस्वरूपाचे ज्ञान झाल्यानंतर, जन्ममृत्युचे भय ओसरते. पापपुण्याचा विचार विराम  पावतो.  मनुष्य स्वतः ची  ओळख म्हणजे, त्याचे स्वरूप आणि मन असे आजवर समजत असतो. परंतु  आत्मज्ञानाची प्राप्ती होते, तेव्हा ही  'मी' पणाची जाणीव लोप पावते.  त्याबरोबरच साऱ्या भय, शंका, वेदना यांचा ऱ्हास होतो.  विवेकबुद्धीने जेव्हा तो स्वतःचे आत्मस्वरूप पाहतो, तेव्हा साऱ्या दुःखाचा, दैन्याचा  नाश होतो आणि त्यांस मोक्षपदाची प्राप्ती होते. म्हणून सर्वप्रथम स्वतः स ओळखावे, त्यायोगे सारे भ्रम लोप पावतील. 

देहेबुद्धीने बांधला । तो विवेके मोकळा केला ।
देहातीत होता पावला । मोक्षपद ॥ 
जाले जन्माचे सार्थक । निर्गुण आत्मा आपण येक ।
परंतु हा विवेक । पहिलाच पाहावा ॥
जागे होता स्वप्न सरे । विवेक पाहाता दृश्य वोसरे ।
स्वरूपानुसंधाने तरे । प्राणीमात्र ॥ 

आशारितीने ज्ञान प्राप्ती झाल्याने, सांसारिक ताप, चिंता दूर जातात. चित्त समाधानी असते. भविष्याची चिंता नसते. मृत्यूचे भयही सरते. ज्ञानसाधनेसाठी आता कसलीच आडकाठी राहिलेली नसते. 

त्या ब्रम्हबोधे  ब्रम्हचि जाला । संसारखेद तो उडाला । 
देहो प्रारब्धी टाकिला । सावकास ॥
यासी म्हणिजे आत्मज्ञान । येणे पाविजे समाधान ।
परब्रम्ही अभिन्न । भक्तचि जाला ॥ 

असे देव दर्शन घडल्याने, मनातील साऱ्या कुशंकाचा नाश होतो. आशा-निराशेच्या खेळातून मुक्ती मिळते. जन्ममृत्यूचे भय संपते. भक्त आणि परब्रह्म  यांचे अद्वैत साधलेले असते. भक्त आधी साधक आणि अंती साधू होतो. 

देहेबुद्धी हे ज्ञानबोधे त्यजावी ।
विवेकें तये वस्तूची भेट घ्यावी ।।
तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे ।
म्हणोनी सदा तेंचि शोधीत जावें ॥ 

(क्रमशः) 

संदर्भ  : 
              (१)  श्री मनाचे श्लोक 
              (२)  श्री ग्रंथराज दासबोध