फेब्रुवारी २०१८

चिंता करी जो विश्वाची ... (३२)

निर्गुण, निराकार अशा परब्रह्माचे स्वरूपदर्शन घडलेल्या साधकास सर्व माया, मोहापासून मुक्ती मिळते. भौतिक जगातील दुःख, वेदना, चिंता यांची जागा अवर्णनीय अशा शांतीने घेतलेली असते. पूर्णज्ञानाचे समाधान प्राप्त होते. अशा स्थितीतील साधकाच्या मनःस्थितीचे वर्णन, श्री रामदास स्वामींनी यथायोग्य शब्दात केलेले आहे.  समर्थ म्हणतात आत्मज्ञान प्राप्तं केलेली व्यक्ती भौतिक सुख, दु; खाच्या पलीकडे पोहोचलेली असते. 

आता होणार ते होयेना का । आणि जाणार ते जायेना का ।
तुटली मनातली आशंका । जन्ममृत्याची ॥
संसारी पुंडावे चुकले । देवां भक्तां ऐक्य जाले ।
मुख्य देवास वोळखिले । सत्संगेकरूनी ॥ 

अशी स्थिती आल्यानंतर मनावर साचलेले सर्व भ्रम दूर होतात. मग ज्या परब्रम्हाचे सत्यदर्शन घडले आहे, त्याचे विस्तारपूर्वक वर्णन ते करतात.
मूळ स्वरूपी आत्मा अत्यंत निर्मळ असतो. त्यावर कसल्याही दुर्गुणांचे थर चढलेले नसतात. जसे विस्तीर्ण अंतराळ  आहे, तसेच या आत्म्याचे रूप असते. शांत आणि निश्चल. जे कधी तुटत नाही, ढळत नाही, ज्याचा कधी संकोच होत नाही, जे कधी मलीन होत नाही. जे सूक्ष्माहून अतिसूक्ष्म आणि उदंडाहूनही उदंड आहे. जे कधी नाहीसे होत नाही, जे अखंड सन्मुख असते.  असे हे अभंग आणि अविचल  परब्रह्म साऱ्या विश्वास व्यापून राहिलेले असते. ज्यांचे ज्ञानचक्षू जागृत असतात, त्यांना ते दिसते. अन्य जनास ते "सन्मुख असोनही दिसेनासे" असे असते. 
असे हे ब्रह्म निर्मळ, निर्गुण, निराकार असते. त्यावर  भूतलावरील मोहमायेचे आवरण आले की सामान्य जनास ओळखू येत नाही. परंतु जे ज्ञानी आहेत,  त्यांचा "नीर-क्षीर विवेक" जागृत असतो, ते सारे काही जाणतात. 

अविनाश तें ब्रह्म निर्गुण । नासे ते माया सगुण ।
सगुण आणि निर्गुण । कालवले ॥
या कर्दमाचा विचार । करूं जाणती योगेश्वर ।
जैसे क्षीर आणि नीर राजहंस निवडिती ॥

अशा तऱ्हेने परब्रह्माच्या विस्तीर्ण व्यापाची जाणीव झाल्यावर, आपले क्षुद्रपण प्रकर्षाने जाणवते. या आफाट ब्रह्मांडाच्या पसाऱ्यात आपले महत्त्व आणि स्थान किती तुच्छ आहे हे कळते.  मनामध्ये साचलेला सारा अभिमान, अहंकार गळून पडतो. "मी" म्हणजे कुणीच नाही याचे भान येते.  आत्माभिमान संपल्यावर त्याला अनुषंगून येणारे ईर्ष्या, लालसा, वासना, द्वेष इ. सारे दुर्गुण देखील नाहीसे होतात. आत्म्याचे लखलखीत स्वरूप सामोरे येते. दुराभिमान विरून जातो. 

तत्त्वझाडा निःशेष होता । तेथे निमाली देहअहंता ।
निर्गुण ब्रम्ही ऐक्यता । विवेकें जाली ॥
विवेकें देहाकडे पाहिलें । तो तत्त्वें तत्त्व वोसरले ।
आपण काही नाही, आलें -। प्रत्ययासी ॥ 

असे आत्मज्ञान प्राप्तं केल्यावर, आपले श्रेष्ठत्व मिरविण्याची इच्छा संपते. त्या  पुरातन, प्राचीन अशा परब्रह्माप्रती, केवळ एक विनम्र भक्तिभाव साचून राहतो. जन्म-मृत्यू, पाप-पुण्य याचा विचार मनामध्ये उरलेला नसतो. अपार शांतीचा अनुभव येतो आणि मोक्ष-मुक्तीची प्राप्ती होते. 

निर्गुणासी नाही जन्ममरण । निर्गुणासी नाही पापपुण्य ।
निर्गुणी अनन्य होता आपण । मुक्त जाला ॥
तत्त्वी वेटाळून घेतला । प्राणी संशये गुंडाळला ।
आपणासी आपण भुलला । कोहं म्हणे ॥
तत्त्वी गुंतला म्हणे कोहं । विवेक पाहता म्हणे सोहं ।
अनन्य होता अहं सोहं । मावळली ॥ 
 
असा अनन्यभाव मनामध्ये जागृत होताच, आत्मब्रम्हाच्या दिव्यत्वाची प्रचिती येते. त्याचे श्रेष्ठत्व पुनः पुन्हा प्रत्ययास येते. 
हे अनादी ब्रह्म सर्वकाळ अस्तित्वात आहे.  त्यात कसलाही खंड नाही.  ते भंग पावत नाही, आक्रसत नाही. कसलेही मालीन्य, किटाळ त्यावर येऊ शकत नाही. कुठल्याही बाह्य घटनेचा त्यावर परिणाम होऊ शकत नाही. सृष्टीच्या प्रत्येक स्थितीचे ते साक्षी आहे. 

सृष्टी निर्मात्याने पृथ्वीवर जीवसृष्टीची रचना केली. त्यासाठी त्याला पोषक अशा पंचमहाभूतांची योजना केली. या घटनेलाही युगे लोटली. एकूण  चार युगे आहेत असे मानले गेले आहे. सध्या चालू  आहे ते कलियुग. या आधीची तीन युगे म्हणजे कृत युग, त्रेता युग आणि द्वापार युग. प्रत्येक युग हे अनेक हजार वर्षांचे आहे. पण ही  हजार वर्षांची कालगणती मानवासाठी. ज्याने या सृष्टीची रचना केली त्या ब्रह्मासाठी तोच काळ केवळ एक दिवसाइतकाच  आहे. आणि सृष्टीचा रक्षणकर्ता विष्णू -- त्याच्यासाठी तर  एक पळभरा इतकाच काळ होतो. ही काळाची तुलना बघितली, की या प्रचंड विश्वामध्ये मानवाचे अस्तित्व किती नगण्य आहे हे जाणवते.  मानवाचा स्वतःच्या कर्तृत्वाबद्दलचा अभिमान किती अर्थहीन आहे, हे कळते. 

कृतायुग सत्रा लक्ष अठ्ठावीस सहस्त्र । त्रेतायुग बारा लक्ष शहाण्णौ सहस्त्र । 
द्वापार आठ लक्ष चौसष्टी सहस्त्र । आता कलयुग ऐका ॥
कलयुग च्यारि  लक्ष बत्तीस सहस्त्र । च्यतुर्युगे त्रेताळिस लक्ष वीस सहस्त्र ।
ऐसी च्यतुर्युगे सहस्त्र । तो ब्रम्हयाचा  येक दिवस ।।
ऐसे ब्रह्मे सहस्त्र देखा । तेव्हा विष्णूची येक घटिका ।
विष्णू सहस्त्र  होता ऐका । पळ येक ईश्वराचे ॥
ईश्वर जाये सहस्त्र वेळ । ते शक्तीचे अर्ध पळ ।
ऐसी संख्या बोलिली सकळ । शास्त्रांतरी ॥ 

अशा या अतिविशाल काळापुढे मनुष्याचे आयुष्य किती क्षुद्रं?  केवळ क्षणभंगुरच.  युगानुयुगे  सृष्टीचे  उत्पत्ती-स्थिती-लय,  हे चक्र अव्याहत फिरते आहे. त्यात कधीच खंड पडलेला नाही. आणि या सर्वाचे जे मूळ ब्रह्म, त्याची थोरवी कशी वर्णन करणार. ते नेहमीच स्थिर आहे. अभंग आहे. त्याचे हे विशालकाय स्वरूप, शब्दबद्ध करणे कठीणच. 

ऐशा अनंत शक्ती होती । अनंत रचना होति जाती । 
तरी अखंड,  खंडेना स्थिती ।  परब्रम्हाची ॥ 
परब्रम्हासी कैची स्थिती । परी हे बोलावयाची रिती ।
वेदश्रुती नेति नेति । परब्रम्हीं ॥ 

या सृष्टीचा रचनाकार, पालनकर्ता, रक्षणकर्ता कोण आणि कसा असेल, या बद्दल अनेक लोकांची अनेक अनुमाने असतात.  सामान्यजन ब्रम्हस्वरूपाबद्दल अज्ञानी असतात. किंवा त्या निर्गुण निराकाराला, सगुण रूपात शोधत राहतात. कुणी त्याला ब्रम्हा म्हणतात, कुणी विष्णु तर कुणी त्यांस महेश्वर असे संबोधतात. प्रत्येकास आपलेच आराध्य दैवत थोर आहे असे वाटते, आणि ते दूसऱ्यांना पटवून देण्याची त्यांच्यात ईर्ष्या असते. त्या पायी अनेक वाद-विवादांची निर्मिती होते, समाजात अशांती निर्माण होते. परंतु जे ज्ञानी साधुजन आहेत, त्यांना नेमके सत्य माहिती असते. 

येक म्हणती विष्णु थोर । येक म्हणती रुद्र थोर ।
येक म्हणती शक्ती थोर । सकळांमध्ये ॥
ऐसें आपुलालेपरी बोलती । परंतु अवघेंचि नासेल कल्पांती ।
यद्दृष्टं तं नष्टं हे श्रुती । बोलतसे ॥

सृष्टीचा लय होणे हे विधिलिखित आहे, परंतु त्या नंतरही ब्रह्माचे स्थान अटळ आणि अढळ असणार आहे.
सर्वांमध्ये  थोर असा परमेश्वर हा एकमेव आहे. तो निर्गुण, निराकार आहे. त्यास स्थ आणि काळाची बंधने असू शकत नाही. हे ब्रह्मसत्य जो जाणतो तो खरा ज्ञानी, ब्राम्हण. कोश्रेष्ठ आणि कोण कनिष्ठं  असा वाद अज्ञ लोक करत राहतात. कारण  त्यांचा  आत्माभिमान, अजून संपलेला नसतो. पूर्ण ज्ञान प्राप्तं करण्याइतके त्यांच्या साधने मध्ये नसते. त्यांमुळे निरलस असे सत्य ते पाहू शकत नाहीतपरंतु जे विवेकी, स्थिरबुद्धीचे ज्ञानी जन आहेत, त्यांच्या मनात श्रेष्ठं, कनिष्ठ अशा कल्पनांचा कसलाही गोंधळ नसतो. 

जो जन्मासी येऊन गेला । तो मी थोर म्हणताच मेला ।
परी याचा विचार पाहिला । पाहिजे श्रेष्ठी ॥ 
जयांसि जाले आत्मज्ञान । तोचि थोर माहाजन ।
वेद शास्त्रे पुराण । साधु संत बोलिले ॥ 

परब्रम्ह हेच एकमेव सत्य आहे, हे ज्ञान ज्यांस मिळाले, त्यांस मोक्षप्राप्ती झाली असे समजावे. कोण सान आणि कोण थोर या व्यर्थ वादामध्ये आपले आयुष्य वाया  घालवू नये. श्रेष्ठत्वांचा निर्णय सर्वाअंती होणारच आहे, पण तो करण्याची क्षमता मर्त्य मानवामध्ये नाही. म्हणून आपणास मिळालेले हे क्षणैक आयुष्य सत्याची उपासना करण्यात व्यतीत करावी. परमेश्वराचे सत्य स्वरूप जाणून घ्यावे. तेव्हाच मुक्ती प्राप्तं होईल. 

नव्हे जाणता नेणता देवराणा ।
न ये वर्णिता वेदशास्त्रां पुराणां ॥
नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा ।
श्रुती नेणती नेणती अंत त्याचा ॥ 
मही निर्मिली देव तो ओळखावा ।
जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा ॥
तया निर्गुणालागि गुणीं पाहावें ।
परी संग सोडूनि सूखे राहावे ॥ 

(क्रमशः) 

संदर्भ :  (१)  श्री ग्रंथराज दासबोध 
            (२)  श्री मनाचे श्लोक 

Post to Feedहा भाग फारच छान झाला आहे
संदर्भ -
सत्य लेखनावर अवलंबून नाही

Typing help hide