चिंता करी जो विश्वाची ... (३३)

तो निर्गुण निराकार । तेथे नाही उत्पत्ती विस्तार ।

स्थानमानाचा विचार । ऐलीकडे ॥ 
श्री समर्थांनी पूर्णब्रह्माचे असे वर्णन केले आहे.निर्गुण आणि निराकार असे पूर्णब्रह्म कालातीत आहे.  ते  आहे पण दिसत नाही.   जाणवते,  परंतु त्याचे स्वरूप वर्णन करता येत नाही. स्थळ आणि काळाच्या मर्यादा त्याला असत नाहीत.  सृष्टीच्या उत्पत्तीच्या आधीसुद्धा  होते, आणि सृष्टीच्या लयानंतर देखिल त्याचे  अस्तित्व अबाधित असणार  आहे.  पृथ्वीच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितीत त्याचे स्थान आणि अस्तित्व अखंडित आणि अनाहत  आहे.  परंतु हे अदृश्य, निराकार तत्त्व सर्वसामान्य बुद्धीला उमजत नाही.  जे दृश्य आणि साकार आहे त्यालाच ते सत्य मानतात. ते सत्य नसून केवळ माया आहे हे त्यांना कळत नाही. माया भ्रम उत्पन्न करते. भासमान सृष्टीची निर्मिती करते. जे सत्य आहे त्याला दुर्लक्षून, भ्रमित झालेली मती त्या मिथ्या मायेलाच सत्य मानते.  सत्य आणि आभास यातील फरक कळेनासा होतो..  सामान्य जन  मायेच्या मोहपाशात बद्ध होतात.   जीवनात अशांती, अपूर्णता, आणि असमाधानाचा संचार होतो. भौतिक सुखदुःखांच्या भासमान आवर्तामध्ये  मनुष्य गुंतून जातो. 
अशा भ्रमित आणि आशंकित  सामान्यजनांना, आभासी मायेपासून वेगळे करावे या हेतूने, श्री समर्थ रामदास स्वामींनी,  मिथ्या माया आणि सत्य ब्रह्म यातील फरकाचे साध्या, सोप्या, सहज समजेल अशा भाषेत विश्लेषण केले आहे. 
ब्रह्म निर्गुण निराकार । माया सगुण साकार ।
ब्रम्हासि नाही पारावार । मायेस आहे ॥ 
माया दिसे ब्रह्म दिसेना । माया भासे ब्रह्म भासे ना ।
माया नासे ब्रह्म नासेना । कल्पांतकाळी ॥ 
संकल्पना अधिक स्पष्ट व्हावी म्हणून ते पुढे सांगतात माया चंचल आहे. तिचे रूप सतत पालटत असते.  मायेस मर्यादा आहेत. तिचा शेवट निश्चित आहे. परंतु परब्रम्ह अरूपी आहे, निराकार आहे. स्थिर आणि निश्चल आहे. ते अमर्याद आणि अंतहीन आहे. 
माया पंचभूतिक अनेक । ब्रह्म ते शाश्वत एक ।
मायाब्रम्हांचा विवेक । विवेकी जाणती ॥
माया लाहान  ब्रह्म थोर । माया असार ब्रह्म सार ।
माया अर्ति (अलीकडे) पार ( अंत) - । ब्रम्हासी नाही ॥ 
असे समजावले तरी श्रोत्यांच्या मनातील संभ्रम काही संपत नाही.  म्हणून समर्थ अधिक स्पष्टीकरण देतात. 
जे दृष्टीला दिसते आहे, ती सर्व माया. तर जे आहे परंतु दिसत नाही,   ज्ञानी केवळ  त्यांच्या  ज्ञानचक्षुंनी जे बघू शकतात, ते म्हणजे परब्रह्म. ते साकार नाही. अरूप आणि   अमर्याद आहे. सर्व चराचरामध्ये त्याचे अस्तित्व आहे. मनुष्य देहात जसे प्राण, तसेच हे ब्रह्म सर्व विश्वामध्ये भरून राहिलेले आहे. माया गढुळली जाते, तिचे स्वरूप बदलते, मायेला सुरूवात आणि शेवट  आहे. परंतु ब्रह्म या सर्वांपासून अलिप्तं आहे. त्याला ना जन्म, ना मृत्यू. त्यांमुळे त्या योगे उपजणारे दुःख, वेदना आणि भोग देखिल नाहीत. माया विकारी आहे, तर  ब्रह्म  निर्विकार आहे. मायेची अनंत रुपे आहेत, परंतु ब्रह्म  अरूपी आहे.  ब्रह्मामध्ये कसलीही खोट नाही. ते विटत नाही, आटतही नाही. माया  असत्य आहे. भ्रम आणि भास आहे. ती सामान्यजनांची  मती भ्रष्ट करते आणि त्यांना  मोक्षमार्गापासून दूर करते. म्हणून समर्थ त्यांच्या श्रोत्यांना सल्ला देतात, की सारे मायापाश दूर सारून सत्यब्रम्हाची उपासना करण्यातच सर्वांचे हित आहे.
गोंडाळ (शेवाळे) सांडून नीर घेईजे । नीर सांडूनि क्षीर सेविजे ।
माया सांडूनि अनुभविजे । ब्रह्म तैसे ॥ 
ब्रह्म आकाशाऐसे निवळ । माया वसुंधरा डहुळ ।
ब्रह्म सूक्ष्म केवळ । माया  स्थूळरूपी ॥ 
मायेमध्ये दोष उत्पन्न होतो, ती अस्थिर आणि चंचल असते. ती अपूर्ण असते, तिला अनेक आधीव्याधी ग्रासतात. ती क्षतिग्रस्त होते. तिचे स्वरूप बदलते. कधी ती विरूप आणि बेरंग होते. तिच्या मध्ये कोमलता, निरागसता नसते. तिचे स्वरूप कालांतराने अशुद्ध होते. अनेक भय आणि चिंतांची उपज ही माया करते. सत्यापासून, पूर्णज्ञानापासून तिच्या अधीन असलेल्या मनुष्यजातीस दूर करते. तिला अनेक मर्यादा असतात. तरीही तिलाच सत्य मानून अनेकजण फसतात. 
परंतु जे निराकार ब्रह्म आहे,  पूर्ण सत्य आहे, ते या पेक्षा अधिक आगळे असते. मायेला असणारी कुठलीही बंधने, मर्यादा त्याला नसतात. ते विशाल, अमर्याद आणि सनातन असते. त्याच्या प्रखरतेमध्ये कुठलेही हीण टिकत नाही. 
माया घडे ब्रह्म घडेना । माया पडे ब्रह्म पडेना । 
माया बिघडे ब्रह्म बिघडेना । जैसे तैसे ॥
ब्रह्म असतचि असे । माया निरसिताच निरसे । 
ब्रह्मास  कल्पांत नसे । मायेसि आहे ॥
माया कठिण ब्रह्म कोमळ । माया अल्प ब्रह्म विशाळ ।
माया नासे, सर्वकाळ -। ब्रम्हचि असे ॥ 
हे सत्य ज्याला उमगले त्यांच्या सुख, शांती,  समाधानास पारावार उरत नाही. माया पाशातून स्वतःची सुटका करून घेऊन सत्याची उपासना केल्याने मोक्ष प्राप्ती निश्चितच होते. 
सत्याची उपासना करावी कशी असा संभ्रम श्रोत्याच्या मनी उपजतो. जे दिसत नाही, ते भजावे कसे? पुजावे कसे? हे काही केल्या उमगत नाही.  देव-धर्म आणि त्याच्या अनुषंगाने येणारी अनेक कर्मकांडे .. म्हणजे स्नान-संध्या, पूजा-अर्चना,  व्रतवैकल्ये या सर्वांस काहीच अर्थ नाही का?  अशी शंका निर्माण होते.  देव म्हणजे जर माया आहे, मानव निर्मित आहे तर त्याची उपासना का करावी?  असा विचार बळावतो. जे चराचर माझ्या जीवनास आधारभूत आहे,  साकार आहे, ते सारे  सत्य की निव्वळ भ्रम? 
श्रोत्यांच्या  या  शंकांचे निरसन करणे क्रमप्राप्तं आहे. म्हणून समर्थ सत्य संकल्पनेचे अधिक विस्तारपूर्वक विवरण करतात. 
जीवसृष्टी ही अतिप्राचीन आहे.  सृष्टीमध्ये पूर्वापार अस्तित्वात आहे. म्हणून ती सत्यच आहे. त्यांचे अस्तित्व हा भ्रम नव्हे. परंतु जे दिसते ते नाश पावणारे आहे, अविनाशी नाही हे ही सत्यं आहे. अमरत्वाची कल्पना असत्य आहे. सृष्टीमध्ये ज्ञानी आहेत तसेच अज्ञानी देखिल. विवेकी आहेत तसेच अविवेकी पण आहेत. ज्ञानी जन सत्य-असत्य, सगुण-निर्गुण, माया- ब्रह्म यातील फरक जाणतात, मर्यादा ओळखतात.  अज्ञानी लोकांना या कशाचीच जाणीव नसते.  आपल्या समजुतीत, ज्ञानात काही त्रुटी आहे, हे त्यांना मान्य नसते.  असे लोक त्यांची मते  बदलत नाहीतच, परंतु  वेगळे विचार असणाऱ्यांना देखिल, आपल्यासारखे वागणे भाग पाडतात. मग सारे सुख नासून जाते. अशांती पसरते. 
सृष्टीमध्ये बहुजन । अज्ञान आणि सज्ञान ।
म्हणौनिया समाधान । होत नाही ॥ 
ऐका अज्ञानाचे मत । सृष्टी आहे ते शाश्वत ।
देव धर्म तीर्थ व्रत । सत्यचि आहे ॥ 
बोले सर्वज्ञाचा राजा । मूर्खस्य प्रतिमापूजन । 
ब्रम्हप्रळयाच्या पैजा । घालू पाहे ॥ 
सर्वसामान्यांना प्रलयाची,  सृष्टीच्या अटळ अंताची भीती घातली जाते. या प्रलयापासून स्वतःचे, पूर्वजांचे आणि वारसांचे रक्षण करण्यासाठी कर्मकांडाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. परंतु हे सारे काही सत्य नसते. 
समर्थ सांगतात, धार्मिक कर्मकांडे करणे जरूरीचे नसले तरी नित्य नैमित्यिक कृत्ये मात्र जरूर करावीत. स्नान, संध्या, जप, दानधर्म या योगे जगण्याला  आत्मिक आणि नैतिक अधिष्ठान प्राप्त होते. अन्यथा जीवन म्हणजे केवळ दिशाहीन भटकणे होऊन जाईल असे ते म्हणतात. तीर्थयात्रा केल्याने, त्या क्षेत्रीच्या ज्ञानी जनांचा सहवास लाभतो. संवाद, चर्चा होतात. काही शंकांचे निरसन होते. विचारांचे आदानप्रदान होते. हे सर्व करीत असताना, यथायोग्य गुरू चे शिष्यत्व स्वीकारल्यास, सत्यमार्गीचा प्रवास अधिक सहज, सुखकर होतो. सत्य आणि असत्यातील फरक सद्गुरू जाणतात, आणि त्यांच्या शिष्यांना देखिल तो दाखवून देतात.  शिष्यांच्या शंकांचे निरसन करतात. 
मानवाचे अस्तित्व म्हणजे त्यांचे मन असे ते सांगतात. मनुष्याचे मन जसे घडते, तेच स्वरूप, तसेच व्यक्तिमत्त्व त्याला प्राप्तं होते.  मन आणि मानवी जीवन हे एकरूप आहे. मनुष्यापासून मन वेगळे करता येत नाही. मनास जे दिसते, जाणवते, उमगते तेच त्याच्यापुरतेतरी सत्य असते. म्हणून मनाला घडवणे, रीत शिकविणे, त्याची जोपासना करणे आवश्यक असते. समर्थ सांगतात, देव ही संकल्पना देखिल मानवी मनाची उपज आहे.  निराकार असणारे ब्रह्म दृष्टीआड असते. परंतु उपासना करण्यासाठी मानवाला सगुण, साकार मूर्तीची आवश्यकता भासते. म्हणून असंख्य देव आणि त्यांचा महिमा वर्णन करणाऱ्या कथा निर्माण  होतात. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत राहतात. या काल्पनिक दैवतांमध्ये  समाज, समाजातील लोक इतके गुंतले जातात, की तेच सत्य आहे असा दृढ विश्वास त्यांच्या ठायी उत्पन्न होतो. मूळ ब्रह्म बाजूला राहते, आणि देवी-देवतांच्या भक्तीत सारा समाज रंगतो. प्रत्येकाचे आराध्य दैवत निराळे. संकटकाळी तेच आपल्याला तारतील असा समज जनसामान्यांच्या  मनात असतो. परंतु तसे घडत नाही. जे प्रारब्ध आहे ते काही चुकत नाही. मग निराशा येते. 
येके कल्पनेचे पोटी । होति जाती अनंत सृष्टी ।
तया सृष्टीची गोष्टी । साच केवी ॥
कल्पनेचा केला देव । तेथे जाला दृढभाव । 
देवालागी येता खेव । भक्त दुःखेदुःखावला ॥ 
मानवी मनातून उपजलेले देव, आणि त्यांची अनेक रुपे. प्रत्येकजण आपल्या परीने, आपले दैवत साकार करीत असतात. कुणाचा देव रेशमाचा,  कुणाचा मृत्तिकेचा, कोणी देवाला पाषाणात घडवितात, कुणी काष्ठं रूपात,  तर कुणी धातू रुपात साकार करतात.  परंतु भक्तांना समजत नाही की, खरा देव हा एकच आहे.  जो अदृश्य आहे, अमूर्त आहे. अथक  ज्ञानोपासनेनंतरच त्याचे सत्यस्वरूप उमगते. भजन, पूजन आणि कीर्तन  करून कुठलाही देव प्रसन्न होत नसतो. कारण ही सर्व कर्मकांडे देखिल मानवनिर्मितच आहेत. स्वतःच्या दैवताचे श्रेष्ठत्व अधोरेखित करण्यासाठीच ती केली अथवा करवली जातात .  परंतु कधी ना कधी तरी भ्रमनिरास होतोच. 
आमचा देव बहु  सत्य । आह्या आकांती पावत ।
पूर्ण करी मनोरथ । सर्वकाळ ॥ 
आता याचे सत्त्व गेले । प्राप्त होते ते जाले ।
प्राप्त न वचे पालटिलें । ईश्वराचेनी ॥
धातू पाषाण मृत्तिका । चित्रलेप काष्ठ देखा । 
तेथे देव कैचा मूर्खा । भ्रांति पडली ॥ 
हे आपुली कल्पना । प्राप्तांऐसी फळे जाणा ।
परी त्या देवाचिया खुणा । वेगळ्याची ॥  
म्हणून समर्थ सांगतात, सगुणाची पूजा करताना ध्यानी असू द्यावे, की हे त्या निर्गुण, निराकाराचे मनोकल्पित स्वरूप आहे. सत्य आहे ते अमूर्त आणि अदृश्य आहे. कल्पनेने रचलेली सृष्टी सत्य  मानणे आणि त्या साठी सत्याकडे पाठ फिरविणे, हे अज्ञानी असण्याचेच लक्षण आहे. नीती, नियमाच्या चौकटीत राहून, धर्माचे अधिष्ठान असलेले जीवन व्यतीत करणे योग्यच. परंतु सारासार विचारशक्ती जागृत असणे जरूरीचे आहे.  जे प्रत्यक्ष दिसते, तेच केवळ सत्य असे मानणे चुकीचे आहे.  सत्य याहून काही वेगळे आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. समस्त सजीव आणि निर्जीव सृष्टी नाशिवंत आहे.  भासमान आहे.  "येके कल्पनेचे पोटी । बोलजेती अष्ट सृष्टी ।" असे म्हणले आहे.  मग यातील सत्य कोणती आणि कशी मानावी?  संत,  सज्जन आणि सद्गुरूंच्या सहवासाने, या दृश्याच्या पल्याड असलेले एकमात्रं  शाश्वत आणि  अक्षत सत्य जाणून घ्यायलाच पाहिजे. 
म्हणोनि सृष्टी नासिवंत । जाणती संत महंत ।
सगुणी भजावे निश्चित । निश्चयालागी ॥
सगुणाचेनि आधारे । निर्गुण पाविजे निर्धारे ।
सारासारविचारे । संतसंगे ॥ 

(क्रमशः)

संदर्भ :  श्री ग्रंथराज दासबोध