चिंता करी जो विश्वाची ... (३४)

श्री समर्थांनी  पूर्णब्रह्म आणि मायेच्या सत्य स्वरूपाचे विवरण केले. जे दृश्य आहे ती माया आहे, असत्य आहे. आणि सत्य जे आहे ते अदृश्य आणि निराकार आहे असे समजावले. परंतु श्रोत्यांच्या मनीचे शंकानिरसन काही होईना. जर सगुण मूर्ती स्वरूपात पुजलेले देव म्हणजे माया आहे, तर त्यांची उपासना का करावी?  भजन, पूजन, कीर्तन हे सर्व निरर्थकच म्हणायचे का ? 

म्हणून ते समर्थांना विचारतात ..
जे समस्त नासिवंत । त्यासी भजावे  किंनिमित्य ।
सत्य सांडून असत्य । कोणे भजावे ॥
असत्याचा प्रत्यये आला । तरी मग नेम का लागला ।
सत्य सांडून गल्बला । कासया करावा ॥ 
निर्गुणाची उपासना केल्यास मोक्षप्राप्ती होते असे सांगता. आणि तरीही सगुण मूर्तीतल्या देवाची उपासना करावी असेही म्हणता.  यातून कसलाच अर्थबोध होत नाही . नक्की काय करावे हे उमगत नाही. असे श्रोत्यांनी विचारल्यावर त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी समर्थ सविस्तर उत्तर देतात. 
गुरूआज्ञा प्रमाण मानणे हे शिष्याचे कर्तव्य आहे.  सद्गुरूंच्या शिकवणुकीबद्दल  शंका घेणे पाप आहे. अवघड वाटणारे मार्ग, सद्गुरू त्यांच्या शिष्यांसाठी सुकर करतात. त्या करता ते त्यांचे ज्ञान, अनुभव आणि बुद्धिमत्ता खर्ची घालतात. त्यांनी अथक प्रयासाने आणि परिश्रमाने मिळविलेले ज्ञान, शिष्यांना सहजतेने देतात. कुठलीही शिकवणूक देताना, शिष्यांच्या हिताचे रक्षण करणे हाच हेतू सदैव त्यांच्या मनामध्ये असतो. म्हणून अशा सद्गुरूंच्या शिकवणुकी बद्दल संशय न घेता, त्यांच्या आज्ञेचे पालन करणे, हेच उत्तम आहे. 
गुरूचे वचन प्रतिपाळणे । हे मुख्य परमार्थाचे लक्षण ।
वचनभंग करिता विलक्षण । सहजेचि जाले ॥
म्हणोनि आज्ञेसी वंदावे । सगुणभजन मानावे ।
श्रोता म्हणे हे देवे । काय प्रयोजिले ॥ 
सद्गुरुकृपेचा महिमा सांगून देखिल, शिष्यगणाचे समाधान काही होईना.  गुरूविषयी आदर असूनही, त्यांच्या सांगण्यातील विरोधाभासाचे आकलन होत नाहीच.  सारे जग हे मिथ्या आहे. देव हे मानवी मनाने  कल्पिलेले, परमात्म्याचे सगुण रूप आहे. असे असून देखिल त्याच्या भक्ती आणि उपासनेने मोक्षप्राप्ती होईल असे सांगता, हे कसे? 
म्हणून ते विचारतात - 
होणार हे तों पालटेना । भजने काय करावें जना ।
हे तों पाहतां अनुमाना । काहीच नये ॥
स्वामींची आज्ञा प्रमाण । कोण करील अप्रमाण ।
परंतु याचा काय गुण । मज निरोपावा ॥ 
एव्हढे समजावून देखिल शिष्यांना सांगितलेले पूर्णतः  पटत नाही, हे लक्षात आल्यावर समर्थ अधिक विस्तृत पणे समजावण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात, जीवनाला आवश्यक असणारी सारी कर्मे तुम्ही करता.  जसे की  भोजन करणे, वस्त्रे परिधान करणे, निवाऱ्याकरिता गृहनिर्मिती करणे, आजार आणि रोग निवारण्यासाठी औषधे करणे. तुम्हाला माहीत आहे, की ही सृष्टी आणि त्यावरील जीवन ही माया आहे. तरीही या सृष्टीचे आणि जीविताचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता. सारे काही नाशिवंत आहे हे कळत असूनही, आपला आणि परका असा भेद करता. ज्यांस आपला मानले त्याच्या समाधानासाठी प्रयत्नशील राहता. एव्हढे सारे करता, मग  हरिभजन करण्यास तरी काय प्रत्यवाय आहे?  हरिभजन आणि देवदेवतांची उपासना करणे समाजाच्या आत्मिक, मानसिक शांततेसाठी, आरोग्यासाठी लाभदायकच आहे. मनुष्यजीवन हे क्षणभंगुर आहे हे माहिती असून देखिल, जीवनोपयोगी असलेली सारी कर्मे करता.  त्यातच सगुण उपासना देखिल आहे असे समजून घ्या.  तुम्ही पुजीत असलेली सगुणरूपे ज्या परमात्म्याची आहेत, त्याच्या आज्ञेचे पालन करण्यास सारे श्रेष्ठ देव देखिल तत्पर असतात. मग तुमच्या आणि माझ्या सारख्या  सामान्यजनांची काय कथा?  कधी स्वार्थासाठी, अथवा कधी निव्वळ नाईलाजाने, तुम्ही समाजातील धनी आणि मानी व्यक्तींना शरण जाता. असे असताना पावित्र्य आणि उच्चं आदर्शांचे प्रतिक स्वरूप पुजल्या जाणाऱ्या देवी-देवतांसमोर नतमस्तक होण्यात कसला कमीपणा ? ज्येष्ठ आणि  श्रेष्ठ जे करतात/सांगतात, त्यांस कनिष्ठाने अनुसरावे हा तर धर्मच आहे. 
ज्ञान विवेकें मिथ्या जाले । परंतु अवघे नाही टाकिलें ।
तरी मग भजनेंचि काय केले । सांग बापा ॥
साहेबास लोटांगणी जावे । नीचासारिखे व्हावें ।
आणि देवास न मानावे । हे कोण ज्ञान ॥ 
हरीहर ब्रम्हादिक । हे जयाचे आज्ञाधारक ।
तूं येक मानवी रंक । भजेसिना तरी काय गेलें ॥
समर्थ म्हणतात, आम्ही श्रीरामचंद्रांच्या कुळातले, त्याचेच सेवक. तो सर्वश्रेष्ठ आणि समर्थ हे जगन्मान्य सत्य. त्याची सेवा यथायोग्य घडावी म्हणून तर सारी ज्ञानोपासना केली. जर त्याच्या सेवेमध्ये आम्ही काही अनमान केला, तर आमचे पतन होईल. गुरू जे सांगतात ते सारे पूर्ण विचाराअंतीच असते.  त्यांस अविचार म्हणणे हे अयोग्य नाही का?  सद्गुरूंचे  सांगणे  जो मानणार नाही, त्याचे प्रारब्ध तितकेसे उज्ज्वल नसणार हे तर नक्कीच -- असे करणारा  कुणीही असो. सामान्य असेल तर दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडेल, आणि राजपदावर असेल तर स्थानभ्रष्ट होईल. काही दुराभिमानी  स्वतः स ज्ञानी समजतात.  त्यांची समजूत असते की,  सत्य आणि असत्य त्यातील फरक त्यांनी जाणला आहे. म्हणून अशा मायावी दैवतांची उपासना करणार नाही.  कुणीही काहीही सांगितले, तरी मला योग्य वाटेल तसेच वागणार असे म्हणतात.  असे लोक वरपांगी विरोध दर्शवित नाहीत, परंतु अंतस्थता  गुरुआज्ञे विषयी संशय घेतात. म्हणूनच ते   निः संशय  कर्मदरिद्री आहेत असे समजावे. 
मी थोर वाटे मनी । तो नव्हे ब्रह्मज्ञानी । 
विचार पाहतां देहाभिमानी । प्रत्यक्ष दिसे ॥
वस्तुभजन करीना । ना न करी ऐसेही म्हणेना ।
तरी हे जाणावी कल्पना । दडोन राहिली ॥ 
ना तें ज्ञान ना तें भजन । उगाचि आला देहाभिमान ।
येथे नाही किं अनुमान । प्रत्यय तुझा ॥ 
वृथा अभिमान बाळगणाऱ्यास कसलीच प्राप्ती होत नाही. ना त्याचे ज्ञान अलौकिक असते ना आत्मप्रचित. अशी प्रौढी मिरविणाऱ्याचे सत्य स्वरूप, कधी ना कधी सामोरे येतेच. म्हणून समर्थ सांगतात, असे काही करू नये , बोलू नये ज्या योगे परमात्म्याचा अपमान होईल.  देवाला नाकारण्यात कोणताच शहाणपणा नसतो. कारण तोच कर्ता-करविता आहे.  
समर्थांचे आराध्यदैवत श्रीराम. त्यांचा गुणमहिमा ते सांगतात. श्रीरामचंद्र का आदरणीय आहेत? त्यांच्या समोर का नतमस्तक व्हावे?  तर त्यांनी दुर्जनांचा संहार केला. स्वपराक्रमाने, स्वकर्तृत्वाने सज्जनांचे संरक्षण केले, दुर्बळांना आधार दिला. असे करताना आदर्श वर्तणुकीचा जणू  परिपाठच दिला. सुऱ्हुदांबरोबर, आप्तस्वकीयांबरोबर  ज्या आदराने, सचोटीने ते वागत, तशीच वागणूक परकीयांना आणि शत्रूंनादेखील त्यांनी दिली. आपल्या सद्गुणांचा उपयोग लोकरंजनासाठी केला. जनहितार्थ वैयक्तिक सुखदुःखाची देखिल पर्वा केली नाही. या कारणाने श्रीराम श्रेष्ठ आहेत. म्हणून त्यांना देवत्व प्राप्त झाले असे समर्थ सांगतात. श्रीरामाचा आदर्श मनामध्ये ठेवून  कार्य केले, तर यश निश्चितच लाभेल असे आश्वासन देतात. समर्थ पुढे सांगतात, या सर्व स्वानुभवाच्या गोष्टी आहेत. श्रीरामाच्या भक्तीनेच यश आणि कीर्ती प्राप्तं होईल. पण जो स्वतःस मोठा कुणी समजून चालेल त्याची कार्यसिध्दी होणे नाही.  समर्थ त्यांच्या शिष्यांना सांगतात की, त्यांनी जे सांगितले आहे ते सर्वांनी आचरणात आणावे, मग त्यांना स्वतःस देखिल तसाच अनुभव येईल. 
रघुनाथभजने ज्ञान जाले । रघुनाथभजने महत्त्व वाढले ।
म्हणौनिया तुवां केले । पाहिजे आधी ॥
हे तो आहे सप्रचित । आणि तुज वाटेना प्रचित ।
साक्षात्कारे नेमस्त । प्रत्ययो करावा ॥ 
कोणतेही कार्य करताना श्रीरामास स्मरून करावे. कर्म करीत असताना कर्ता श्रीराम आहेत हे ध्यानी असो द्यावे,  म्हणजे इच्छित कार्य सिद्धीस जाईल. परमात्म्याचे थोरपण  मान्य करण्यात कसलाही संकोच मानू नये, कारण ते सत्यच आहे. तो सर्वव्यापी आहे, तर तुमचे अस्तित्व विशाल काळाच्या एका तुकड्यात  बंदिस्त आहे.  म्हणून स्वतःचे खुजेपण जाणून असावे. 
आपण आहे दों दिसांचा । आणि देव बहुतां काळांचा । 
आपण थोडे वोळखिचा । देवासि त्रैलोक्य जाणे ॥ 
या कारणें रघुनाथभजन । त्यासी मानिती बहुत जन ।
ब्रम्हादिक आदिकरून । रामभजनी तत्पर ॥ 
ईश्वराची उपासना करीत असताना सारी पापे, दोष आणि दुर्गुणांचा क्षय होतो. ईश्वर उदार आहे, क्षमाशील आहे. तो सर्व भक्तांच्या अपराधांना माफ करतो. अशा परमेश्वराची उपेक्षा करणे सर्वथा चुकीचे आहे. श्रीरामाची भक्ती जो करतो त्यांस सत्य आणि असत्य त्यातील अंतर दिसून येते.स्वप्नसृष्टीतून  जागृत अवस्थेत आलेल्यांस जसे वास्तवाचे भान येते, तद्वतच रामभक्तास आयुष्याच्या क्षणभंगुरतेचे ज्ञान होते. वृथा अभिमान, आसक्ती, स्वार्थ या साऱ्यांचा निचरा होतो. 
असे सांगितल्यावर श्रोत्यांच्या मनी आक्षेप उपजला. रामभक्तास कळते की जग हे मिथ्या आहे, मग तरी ते दृश्य का आहे? ते आमच्यासमोरून नाहीसे का होत नाही ?  आम्ही ज्या जगात वावरतो, ज्या सृष्टीमध्ये जीवन उपभोगतो, ते सारे मिथ्या, मायावी आहे. मग आमचे जीवन हे केवळ भासमानच आहे का? 
समर्थ त्यांना सांगतात --
दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी ।
अकस्मात आकारले काळ मोडी ।
पुढें सर्व जाईल कांही न राहे ।
मना संत आनंत शोधूनि पाहे ॥
जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे ।
जगी पाहतां ज्ञानचक्षी नरक्षे ।
जगी पाहतां पाहणे जात आहे । 
मना संत आनंत शोधूनि पाहे ॥ 
(क्रमशः)
संदर्भः श्री मनाचे श्लोक 
          श्री ग्रंथराज दासबोध