भग्नं राऊळी - उभी सावळी ।
देवरायाची मूर्त आगळी ।
कुणी प्रवासी, न वाटसरूही ।
विसावलेला तिथे जरी ॥
नसे धूप अन नसे आरती ।
वेदमंत्र ना पूजा पठण ।
दर्वळत नाहीत पुष्पमाळा ।
ना किणकिणती पण नाजूक कंकण ॥
गर्द तरूंचा छायेमध्ये ।
कळस जरासा उगीच चमके ।
फडफडत्या पंखांची नक्षी ।
कधी नभावर अलगद उमटे ॥
सूर्यबिंब ढळे अस्ताचली अन ।
वेढून घेती संध्याछाया ।
रानोमाळी दाटून येई ।
भय जागवी काजळमाया ॥
दूरदूरच्या नील नभावरी ।
शुभ्र चांदणी चमके न्यारी ।
कुणी अनामिक ठेवून गेला ।
एकच पणती या गाभारी ॥