जून २०१८

तू गेल्यावरती कळले

तो सूर नवा ते गाणे,
तो अर्थ ते पाहणे,
ती इच्छा आतील आर्त
स्पर्शास स्वतःचा स्वार्थ...

कळले सारे काही,
तू गेल्यावरती कळले १

तो प्रश्न अन ते उत्तर,
त्या 'नाही'चे भाषांतर,
या नात्याचा परमार्थ
उपमा खळीस सार्थ

सुचले सारे काही,
तू गेल्यावरती सुचले २

ते न येण्याचे कारण
कागदी फुलांचे तोरण
तव चोख हिशोबी स्वत्व
जलपर्णी सम लवचीक तत्त्व

दिसले सारे काही,
तू गेल्यावरती दिसले ३

ती वळणांची मोहकता
ती ओलाव्याची घनता
शब्दांस जे होते रंग
अन सुरांस होते अंग

गेले सारे काही
तू गेल्यावरती गेले ४

ते प्रतारणेचे शल्य
ती ओढ अन ते कैवल्य
स्वप्नांचा सुंदर गाव
खोल आतले भाव

ढळले सारे काही,
तू गेल्यावरती ढळले ५

अपघाताचे क्षण ते
मिलनाचे सारे प्रण ते
त्या शृंगाराच्या वाती
त्या स्पर्श-पुलकित ज्योती

टळले सारे काही
तू गेल्यावरती टळले ६

तृणपाती धुलिकण
हृदयाचे ते व्रण
मी केले पुसून कोरे
ते सुगंधलेले सारे

मळले सारे काही तू गेल्यावरती मळले ७

Post to Feed

सुंदर!
प्रतिसाद

Typing help hide