जून ११ २०१८

हिरा

"अगं सुनंदे",   मंगलाताई थोड्या वैतागूनच म्हणाल्या. "किती गं सांगशील एका दमात !!!" 

सुनंदा ही मंगलाताईंची नणंद. मंगलाताईंच्या एकुलत्या एक मुलासाठी स्थळ बघणे चालू होते. अशाच एका स्थळाबद्दल सुनंदेला स्फोटक माहिती हाती लागली होती. आणि मंगलेच्या कानावर घातल्याशिवाय तिला काय स्वस्थ बसवेना. 

"अगं १००% खरी आहे ही माहिती, काळजी घे गं" असा मंगलाताईंच्या जीवाला घोर लावून सुनंदेने फोन ठेवला. 

"काय चाललंय काही कळेना बघा" मंगलाताई हॉल मध्ये पेपर वाचत बसलेल्या आपल्या अहोंना म्हणाल्या. विनायकरावानी ओळखले सुनंदेचा फोन येऊन गेलेला दिसतोय. त्यांनी पेपर बाजूला ठेवला आणि आणि मंगलाताईंकडे मोर्चा वळवला. 

"आज काय नवीन बातमी सुनंदेकडून?" विनायकराव आपल्या बहिणीला पुरते ओळखून होते. त्यांचीच ठरलेली ३ लग्ने सुनंदेच्या इकडून तिकडून आणलेल्या बातम्यांनी मोडली होती. एक स्थळ खरेच वाईट होते पण बाकीची २ स्थळे किरकोळ दोष असूनही स्वीकारता आली नाहीत त्यांना. 

"काही नाही, नेहमीचेच हो सुनंदा वन्संचे आडाखे" मंगलाताई म्हणाल्या. इतर वेळी छोट्या मोठ्या बातम्या आणतात त्या आज जरा जास्तीच मीठ मसाला लावून मोठी बातमी सांगितली. किती खरे किती खोटे देवालाच ठाऊक. 

मंगलाताई आणि विनायकरावांचा एकुलता एक सुपुत्र निखिल, आतल्या खोलीत बसून आपले ऑनलाईन काम करण्यात मग्न होता. बाहेरची चर्चा ऐकून त्याला खरंतर खूप हसायला येत होते आणि आपल्या लग्नाची चाललेली गम्मत तो खरंच एन्जॉय करत होता. 

निखिल अतिशय हुशार, देखणा आणि उच्चं विद्या विभूषित होता. अमेरिकेत जाऊन सायन्स आणि मॅनेजमेंट ची डिग्री घेऊन केवळ आई बाबांच्या आग्रहास्तव तो भारतात परत आला होता. आल्या आल्याचं त्याला चांगल्या पगारीची नोकरी सुद्धा चालून आली होती. त्यामुळे आई बाबा लगेच लग्न करून टाकून आपल्याला बांधून ठेवणार हे त्याला माहीतच होते.  अर्थात त्याची हरकत नव्हती कारण त्यालाही अरेंज मॅरेज करायचे होते त्यामुळे तो गम्मत बघत बसला होता. 

"निखिल, कसा आहेस?" सुनीता च्या मेसेज ने तो भानावर आला. "काय म्हणतेस, कशी आहेस तू" त्याने आपली उगाच जुजबी चौकशी केली. मुलींशी जास्त मोकळेपणे बोलणे म्हणजे अडकणे असे त्याला वाटायचे त्यामुळे तो मोजकेच बोलत असे. 

"मला तुझ्या घरी येऊन जरा बोलायचं आहे" सुनीता म्हणाली. निखिल जरा विचारात पडला. मागच्याच आठवड्यात तो आणि आई बाबा सुनीताला बघायला तिच्या मामाच्या घरी गेले होते पुण्यात. 

पत्रिकाही जुळत होती. निखिलला पाहिजे तशी सुशिक्षित, सुंदर आणि गुणी मुलगी होती सुनीता. निखिलच्या ओळखीतली असल्याने त्याने थेट सांगितले नसले तरी होकार होताच त्याचा. पण सुनीताने मात्र मला विचार करायला वेळ पाहिजे म्हणून थोडे दिवस मागून घेतले होते. मंगलाताईंना थोडा राग आला होता पण तसे तोंडावर न दाखवता त्यांनी जास्त खळखळ केली नव्हती. विनायकरावानी मात्र सुनीताला कारण विचारून बघितले पण तिने मला थोडे दिवस द्या असे सांगून त्यांनाही जास्त काही बोलू दिले नाही. 

"आई बाबाना विचारून सांगतो" निखिल ने टिपिकल गुणी मुलासारखे उत्तर दिले. त्याने विचारून येईपर्यंत सुनीताला ती २ मिनिटे खायला उठत होती. 

"अरे निखिल लग्नाआधी सासरच्या घरी मुलगी जात नाही" मंगलाताईंनी विरोध करून बघितला थोडा पण ह्या दोघांपुढे त्यांना काही बोलता आले नाही. 

"बोलाव तिला इकडे, कधी येणारे" विनायकरावानी संमती दिली. 

"इकडेच आहे ती मुंबईत, अर्ध्या तासात पोचेल इथे" निखिल ने दुसरा धक्का दिला. मंगलाताईंना थोडी भीतीच वाटू लागली होती. काय सांगते पोरगी आता. सकाळीच सुनंदेने नको नको ते सांगितलेय आणि आता ही मुलगीच घरी येतेय. 

पाऊणेक तासाने घराची बेल वाजली. मंगलाताईंनी दार उघडले. दारात सुनीता एकटीच उभी होती. 

"ये सुनीता" मंगलाताईंनी हसून स्वागत केले. "बस इथे , मी निखिल ला बोलावून आणते" 

घामाघूम सुनीताला थंडगार सरबत देऊन आणि १५ मिनिटे पंख्याखाली बसवून थंड केल्यावर, विनायकरावानी थेट विचारले. 

"अगं अश्या घाईघाईत इथे येण्याचे कारण काय, आणि एकटीच कशी आलीस?" 

"काका, काकू , निखिल" सुनीता मनापासून बोलू लागली. "मी तुमच्याकडून काही दिवस मागून घेतले ते का आणि कशासाठी हे मला प्रत्यक्ष सांगायचे होते म्हणून मी आले इथे. आपली परवानगी असेल तर मी एक सलग काही गोष्टी सांगू इच्छिते". 

"सांग मुली तुला कोणाची भीती बाळगायची गरज नाही" विनायकरावानी तिला शांत केले. 

"माझ्या घरची माणसे चांगल्या आचार विचारांची नाहीत, काका" सुनीताचे डोळे पाणावले. विनायकरावांना थोडा अंदाज आला पण निखिल आणि त्याची आई जरा डोळे विस्फारून एकमेकांकडे बघून लक्ष देऊन ऐकू लागले. 

"मी ३ मुलींमधील धाकटी मुलगी" माझ्या दोन्ही मोठ्या बहिणींची लग्ने झालीत पण माझे आई बाबा आणि त्या दोघी मिळून त्यांच्या सासरच्यांना अतोनात त्रास देत आहेत. घरगुती छळ आणि पोलीस च्या धमक्या देऊन दोन्ही घरांचे जगणे मुश्किल केलेय त्यांनी. वडिलांना दारूचे व्यसन आहेच पण तुम्ही ज्या मामाकडे आलात तेही चांगले नाहीत. 

माझे आई वडील मामा सगळ्यांच्या डोक्यावर कर्ज आहे , आम्ही भाड्याच्या घरात राहतोय. मला पगार चांगला असला तरी जवळ जवळ सगळा पगार घरातच जातो. 

"ह्या लोकांची एवढी हिम्मत" निखिल जरा खवळलाच होता पण विनायकरावानी त्याला शांत केले. 

"अगं मग तू कशी काय राहत आहेस तिथे" मंगलाताईंनी विचारले. 

"मी माणसांची लोभी आहे काकू, कशीही असली तरी आपली माणसे आपली असतात त्यांना सोडून कुठे जाऊ" 

"तुम्हाला अशा साठी सांगितले की माझे लग्न झाल्यावर तुमच्या कडून पैसे उकळण्याचा डाव आहे त्यांचा, तुमचे आयुष्य खराब करून टाकतील ते लोक. प्लिज तुम्ही मला नकार द्या, निखिल चे आयुष्य मला वाया नाही घालवायचे. मला निखिल सारखा मुलगा परत मिळणार नाही हे खरे पण मी फक्त स्वतःचा विचार करून त्याचे आयुष्य वाया नाही घालवू शकत" 

५ मिनिटे घरात शांतता होती. मग विनायकराव उठले , सुनीताच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले "तू काळजी नको करुस मुली, मी बघतो काय ते. तू जा आता निवांत घरी" 

"निखिल सोडून ये तिला बस स्टॉप वर आणि शिवनेरीचे तिकीट काढून दे" त्यांनी आज्ञा केली. 

निखिल आणि सुनीता बाहेर पडल्यावर मंगलाताईंनी विनायकरावांना टोचलेच. "अहो पहिल्यांदा सुनंदेची बातमी १००% खरी निघाली की"

"निखिल आल्यावर बोलू" असे म्हणून विनायकराव पेपर घेऊन बसले. 

"आलो सोडून तिला बसला , जागा मिळाली. थोडी रडत होती पण नंतर शांत झाली" निखिल आल्या आल्या म्हणाला. 

"मंगले, बाहेर ये" विनायकरावानी तिला बोलावले. "काय म्हणत होती सुनंदा सकाळी?" 

"अहो सगळं हेच जे तिने सांगितले, असला कसला परिवार. आपल्या मुलाचे काय हाल होतील. ताबडतोब नकार देऊया. तिलाही चालतेय ना." 

"चुकतेस तू मंगला, गेले सहा महिने आपण स्थळे बघतोय, सगळे कोळसेच हाती लागले. आज हिरा सापडलाय. एवढी धाडसी मुलगी कादंबरीत सुद्धा मिळणार नाही. तिला स्वतःपेक्षा निखिलची काळजी आहे ह्यातच सगळे आले."

"काय मग निखिल, तुझा विचार काय?" विनायकरावानी निखिलकडे बघून विचारले. 

"उद्या अक्षय्य तृतीया आहे , वामन हरी पेठे आणि संध्याकाळी डेक्कन क्वीन ने पुणे" निखिल हसत हसत म्हणाला. 

मंगलाताई हसावे का रडावे अशा नजरेने मुलगा आणि नवऱ्याकडे अर्धा तास गोंधळून बघत होत्या. 

Post to Feedगोंधळ च !
भांगेत तुळस !

Typing help hide