चिंता करी जो विश्वाची ... (३६)

श्री रामदास स्वामी  ईशस्वरूपा संबंधींच्या संदेहाचे  निराकरण करत होते.  सर्वसामान्य जनांच्या मनातील शंकांचे निरसन व्हावे या  साठी त्यांनी विविध उदाहरणे दिली,  ज्या योगे क्लिष्ट विषय काहीसा सोपा व्हावा. जे दृश्य आहे ते सत्य नाही. बाह्यस्वरूप हे केवळ मायावी आहे. त्याच्या पलीकडे जे परब्रह्म स्थिरावलेले आहे, ते जाणण्यासाठी कठोर साधना करणे क्रमप्राप्तं आहे असे त्यांचे सांगणे होते. 

सर्वज्ञानी असल्याचा आणि परब्रह्माचे स्वरूप जाणल्याचा आव आणणारे, अशा वल्गना करणारे अनेक असतात. परंतु त्यांचे ज्ञान हे केवळ पोकळ असते. निव्वळ शब्दांचे फुलोरे.  ईशस्वरूपाचा खरा अर्थ त्यांनी जाणलेलाच नसतो. म्हणून आत्मप्रौढीने ते आपल्या न-ज्ञानाचे प्रदर्शन मांडतात. काही जण या सर्व बाह्य देखाव्याला भुलतात देखिल. परंतु समर्थ सांगतात, जो खरा ज्ञानी आहे, तो निगर्वी असतो. ब्रम्हस्वरूपाच्या दर्शनाने तो विनम्र झालेला असतो. अशा ज्ञानी जनांच्या सांगण्यात आणि वागण्यात विरोधाभास कधीच नसतो. प्रकट दिसणाऱ्या मायावी सृष्टीच्या अंतरंगात दडून राहिलेले  ज्ञानाचे गुप्तधन त्यांना प्राप्त झालेले असते.  असे ज्ञानीजन  शिष्यांना आणि  साधकांना, ते ज्ञान मुक्तहस्ताने प्रदान करतात. 
मूढ आणि अज्ञानी लोक बाह्यस्वरूपाला फसतात. जे दिसते आहे तेच सत्य आहे असे  मानून चालतात. पण जे शहाणे असतात त्यांना अंतस्थ स्वरूप माहिती असते. सृष्टीच्या गूढगर्भी जे सत्य वसलेले आहे, त्यांचे त्यांना आकलन झालेले असते. त्यांमुळे बाह्यस्वरूप त्यांना फसवू शकत नाही. काय महत्त्वाचे आणि काय नाही? काय राखायचे आणि काय सोडून द्यायचे? काय मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करायचे आणि कोणत्या गोष्टींकडे पाठ फिरवायची? हे त्यांना नेमके माहिती असते. आपल्या  जवळील या ज्ञानाचा फायदा सर्वसामान्यांना व्हावा या साठी ते प्रयत्नशील असतात. 
द्रव्य ठेऊन जळ सोडिले । लोक म्हणती सरोवर भरले ।
तयाचे अभ्यांतर कळले । समर्थ जनासी ॥
तैसे ज्ञाते हे समर्थ । तेंहिं वोळखिला परमार्थ ।
इतर ते करिती स्वार्थ । दृश्य पदार्थाचा ॥
प्रत्येकाला त्याच्या योग्यतेनुसार सारेकाही प्राप्तं होत असते. जे ज्ञानी आहेत, विचारी आहेत त्यांना भौतिक जगतातील दुःख, विवंचना त्रस्त करीत नाही.  अती दुःख, अती चिंता अथवा अती क्रोध यांच्या  आहारी ते कधीच जात नाहीत. स्थिर बुद्धी आणि वैराग्यपूर्ण वृत्तीच्या आधारे कठीण परिस्थितीवर मात करू शकतात. म्हणून समर्थ म्हणतात --
जयांस आहे विचार । ते सुकासनी जाले स्वार ।
इतर जवळील भार । वाहातचि मेले ॥ 
सार सेविजे श्रेष्ठी । असार घेयिजे वृथापृष्ठी (निरूद्योगी) ।
साराआसाराच्या   गोष्टी । सज्ञान जाणती ॥ 
दृश्यातील नेमका अर्थ सज्ञान लोक जाणतात. इतरजण धान्य टाकून, त्याची फोलपटे चिवडीत बसतात. बाह्याकाराच्या मायाजालात ज्ञानी अडकून राहत नाहीत. कारण त्यांनी त्या दृश्याचे मर्म जाणले असते. बाह्यरूपाने त्यांची मती भष्ट होत नाही. कारण योग्य आणि अयोग्य यातील अंतर  त्यांनी जाणलेले असते. कुठले निव्वळ शंख आणि  कशात  मोती दडलेला आहे याची निवड ते अचूक करू शकतात.  
जे बिनमोलाचे, कचकड्याचे आहे ते बाहेर उठून दिसते. जे असत्य आहे, अपुरे आहे त्याचा खूप गाजावाजा होत असतो. "उथळ पाण्याला खळखळाट फार .. "  ही उक्ती सार्थ ठरवीत जे खरं म्हणजे टाकाऊ आहे, त्याचाच उदोउदो झालेला पाहायला मिळतो. परंतु जे अनमोल आहे, ते मात्र खोल कुठेतरी झाकलेले असते. त्याचा कुठेही गवगवा नसतो.  त्याची कुणीच कुठेही जाहिरात करीत नाही. आणि तशी गरजही नसते. जे अस्सल आहे, त्यांची ओळख कधी ना कधी जगाला होतेच होते. 
गुप्त परीस चिंतामणी । प्रगट खडे काचमणी ।
गुप्त हेमरत्नखाणी । प्रगट पाषाण मृत्तिका ॥ 
कोठे दिसेना कल्पतरू । उदंड सेरांचा विस्तारू ।
पाहतां नाही मळियागुरू  (चंदन) ।  बोरी बाभळी उदंडी ॥ 
जे श्रेष्ठ आहे त्याची वरोबरी करणे सामान्यांना शक्य होत नाही. अनेक जण व्यापार करतात, अनेक उद्योगधंद्यांमध्ये यश, धन आणि कीर्ती प्राप्तं करतात. परंतु त्यांना कुबेराची उंची कधीच गाठता येत नाही. ओढे, नाल्यांनी कितीही खळखळाट केला, तरी समुद्राची खोली त्यांना प्राप्तं होत नाही. गुराखी, मेंढपाळांनी   पराक्रमाच्या  कितीही वल्गना केल्या, तरी धुरंधर  सेनापतीची योग्यता त्यांच्यात नसतेच. तद्वतच जे योगी आहेत, ज्ञानी आहेत,  ज्यांनी बाह्याकाराच्या अंतरातला गूढार्थ जाणलेला आहे, त्यांची तुलना पोटार्थी  आणि  अनेकानेक मते  धुंडाळत स्वतःचेच स्वार्थी विचार जोपासणाऱ्याशी होऊच शकत नाही. 
दृश्यातील गूढार्थ जाणणे साधू-संतांनाच जमते.  इतर सामान्य, वरवर दिसणाऱ्या स्वरूपाला भुलतात. मग दृश्याचे सत्यस्वरूप जाणावे कसे?  
 समर्थ सांगतात, साधू-संताच्या संगतीत असावे. त्यांच्याकडून उपदेश घ्यावा. ज्ञानी जनांच्या सहवासाने  सामान्यांचे अज्ञान दूर होऊ शकेल. सत्संगाचे महत्त्व विषद करताना समर्थ सांगतात, ज्याप्रमाणे समाजातील यशस्वी आणि धनी जनांच्या संगतीत असल्याने फायदा होतो, त्याचप्रमाणे जे ज्ञानी आणि विचारवंत आहेत त्यांच्या कृपेने सामान्यांचे अज्ञान दूर होते. 
दिसेना जे गुप्त धन । तयासि करणे लागे अंजन । 
गुप्त परमात्मा सज्जन - । संगती शोधावा ॥ 
रायाचे सन्निध होता । सहजचि लाभे श्रीमंतता ।
तैसा हा सत्संग धरिता । सद्वस्तू लाभे ॥ 
जे उच्चं आहे उत्तम आहे, त्याच्या सहवासाने सामान्यास देखिल असामान्यत्व प्राप्त होऊ शकते. ज्या प्रमाणे परीसाचा स्पर्श होताच लोखंडाचेही सोने होते, त्याचप्रमाणे ज्ञानी आणि श्रेष्ठींच्या सहवासाने अज्ञानाचा अंधः कार दूर होतो. म्हणून जे चांगले आहे त्याचेच अनुसरणं करीत जावे. जे अयोग्य आहे, हीण आहे त्याची संगती सोडून द्यावी.
संतसंगतीने ज्ञानप्राप्ती होते. परब्रह्म  या दृश्याआगळे आहे, हेही कळून येते.  दिसत नाही म्हणून त्याचे अस्तित्व नाकारणे, हे तर केवळ अज्ञानच.   अदृश्य असूनही अवघे चराचर व्यापून राहिलेल्या परमात्म्यास जाणले असता साऱ्या गूढार्थांचा सहजच उलगडा होतो.  समर्थ सांगतात हे सारे ज्ञान, केवळ दूसऱ्यावर विसंबून राहण्याने मिळत नाही, तर त्या करीता स्वतः प्रयत्न करावे लागतात. अनुभव घ्यावे लागतात. मिळालेल्या अनुभवांचा  अर्थ  स्थिरबुद्धीने, आणि विवेकाने  शोधावा लागतो. आणि हे साधण्यासाठी साधनेची आवश्यकता असते. अर्थात ज्ञानार्जन करण्यासाठी प्रत्येकानेच संसारमार्ग सोडून वैराग्यवृत्ती स्विकारणे जरूरीचे नसते.  समर्थ त्यांच्या ज्ञानाचे, अनुभवाचे बोल सांगतात --
संसारत्याग न करितां । प्रपंचउपाधी न सांडिता ।
जनामध्ये सार्थकता । विचारेंचि होये ॥ 
हें प्रचितीचे बोलणे । विवेके प्रचित पाहाणे ।
प्रचित पाहे ते शाहाणे । अन्यथा नव्हे ॥ 
समर्थ आपले म्हणणे अधिक स्पष्ट क्ळावे म्हणून विस्ताराने लिहीतात -
स्वतः अनुभव घेणे आणि इतरांच्या सांगण्यावरून निष्कर्ष काढणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. प्रत्येक जण स्वतः चे  अनुभव, स्वतःच्या दृष्टीकोनातून वर्णन करतात. ते सांगणे तटस्थ आणि तौलनिक असेलच असे नाही. कारण प्रत्येकाची  बुद्धी, विचारपद्धती आणि स्वभाव त्यात अंतर असते. एकाच दृश्याचा, घटनेचा अर्थ,  प्रत्येकासाठी वेगळा असू शकतो. आणि अनुभवांचे वर्णन त्यांनुसार बदलत जाते. त्यांमुळे सत्य जाणून घेण्याकरिता आपण स्वतः बघणे, ऐकणे आणि समजून घेणे आवश्यक असते. स्वतःची विवेकबुद्धी अखंड जागरूक ठेवल्यानेच सत्यदर्शन होऊ शकते, अन्यथा नाही.  
सामान्यजनांना समजावे म्हणून समर्थ  त्यांना रोजच्या जीवनातील उदाहरण देतात. 
सप्रचित आणि अनुमान। उधार आणि रोकडे धन । 
मानसपूजा प्रत्यक्ष दर्शन । यांस महदांतर ॥ 
पुढे जन्मांतरी होणार । हा तो अवघाच उधार । 
तैसा नव्हे सारासार । तत्काळ लाभे । 
मागच्या जन्मीचे, पुढील जन्माचे अथवा  कल्पांताचे दाखले म्हणजे नुसते शाब्दिक  बुडबुडे. सारासाराचा विचार वर्तमानातच करणे जरूरीचे असते. तरच लाभ मिळण्याची शक्यता असते. पोकळ कल्पनाविलास अव्हेरून,  अचूक मर्म जाणले तरच भौतिक जगाच्या पाशातून मुक्ती मिळते. 
तत्काळची लाभ होतो । प्राणी संसारी सुटतो ।
संशय अवघाची तुटतो । जन्ममरणाचा । । 
मिथ्या भ्रमाच्या निराकारणाने, वृथा भय, चिंतांचे पाश गळून पडतात. निर्भय, निर्विकार आणि निरामय वृत्तीने, जगणे सहज होऊन जाते. मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो. समर्थ सांगतात जो कुणी  अनुभव न घेता, स्वतः ज्ञानोपासना  न करता,  केवळ अनुमानाने,  प्रसंगी असत्य बोलेल त्याचे पतन निश्चितच होईल.  हे सारे अनुभवाचे सांगणे आहे त्यामूळे त्यात संदेहाला काहीच जागा नाही.  परमेश्वर निर्गुण आणि निराकार अहे. सर्व चल आणि अचल, सजीव आणि निर्जीव  सृष्टीमध्ये सामावलेला आहे.  हे सत्य जाणले असता सर्वच संशय फिटतात आणि अपूर्व असे समाधान प्राप्तं होते. संसारी राहूनही, विरागी वृत्तीने राहीले असता भूत-भविष्याच्या, जन्म-मरणाच्या भय-भितीपासून मुक्ती मिळते.   माझे 'स्व'त्व हे माझ्या दृश्य रुपापुरते मर्यादित नाही, याची जाणीव असणे हेच खरे आत्मज्ञान . ज्याला कुणाला आत्मज्ञान प्राप्तं झाले त्यास मुक्ती साध्य झाली असेच समजावे. 
देवपण आहे निर्गुण । देवपदी अनन्यपण ।
हाची अर्थ पाहता पूर्ण । समाधान बाणे ॥ 
देहीच विदेह होणे । करून काहीच न करणे ।
जीवन्मुक्तांची  लक्षणे । जीवन्मुक्त जाणे ॥ 
येरवी हे खरे न वटे । अनुमानेची संदेह वाटे ।
संदेहाचे मूळ तुटे । सद्गुरूवचने ॥ 
(क्रमशः) 
संदर्भ :  श्री ग्रंथराज दासबोध