सप्टेंबर १९ २०१८

चिंता करी जो विश्वाची ... (३७)

श्री समर्थांनी सारासार विवेक बुद्धीचे महत्त्व अधोरेखित केले. स्वानुभवाविना काही बोलणे, सांगणे चुकीचे आहे असेही सांगितले. जो स्वतः अनुभव न घेता, केवळ अनुमानाने इतर जनांस शिकविण्यास तत्पर आहे, त्यांस आपणा पासून दूर ठेवणेच योग्य आहे असे ते सांगत. समर्थ त्यांच्या श्रोत्यांना, शिष्यगणांना शिकवित असत की कुणावरही अंधविश्वास ठेवू नका.   विनाकारण संशय घेणे जसे अयोग्य तसेच स्वानुभवाविना, केवळ कुणा दुसऱ्यांच्या सांगण्यावर विसंबून मत बनविणे हेही चुकीचेच आहे असा उपदेश त्यांनी दिला. 

समर्थांनी स्वतः कठोर साधना करून, अभ्यास, मनन आणि चिंतन करून ज्ञान प्राप्त केले होते. आपल्या कष्टसाध्य ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा इतर साधकांना व्हावा हीच त्यांची प्रामाणिक इच्छा होती. परब्रम्हस्वरूप कसे जाणावे याचे ज्ञान ते त्यांच्या शिष्यांना देत होते. त्यांनी सांगितले की परमात्म्याचे स्वरूप जाणले असता सर्व चिंतांचे निराकरण होते, आणि अपरंपार अशा मनः शांतीचा, समाधानाचा अनुभव येतो.
समर्थांचे असे सांगणे ऐकल्यावर शिष्यांनी  त्यांना विनविले --

अनुभवही पुसो जाता । म्हणती न ये किं सांगता ।
कोणापासी पुसो आता । समाधान ॥
जे ते अगम्य सांगती । न ये माझिये प्रचिती ।
विचार बैसे माझे चित्ती । ऐसे करावे ॥ 

शिष्याने असे विचारल्यावर समर्थांनी त्यांचे शंकानिरसन केले.   समाधान असे कुणास दाखविता येत नसते. शब्दांमध्ये त्याचे वर्णनही करता येत नाही.  ते  समजून घेण्यासाठी स्वप्रचितीचीच जरूरी आहे. ज्याप्रमाणे गुळाची गोडी, तो गूळ स्वतः खाल्ल्याशिवाय  कळणार नाही. दुसऱ्याने त्याचे कितीही वर्णन केले तरी उमगणार  नाही. तसेच हे आहे.   परब्रह्माचे स्वरूप आकळल्यावर जे सुख आणि समाधान प्राप्त होते ते वर्णनातीत आहे.

जे बोलास आकळेना । बोलिल्याविणहि कळेना ।
जयासी कल्पिता कल्पना । हिंपुटी होये ॥
ते जाणावे परब्रह्म । जे वेदांचे गुह्य परम ।
धरिता संतसमागम । सर्वहि कळे ॥

 खरे ज्ञान मिळविण्यासाठी दुसऱ्यांच्या बोलावर विसंबून राहणे योग्य नाही. ज्ञानप्राप्राप्तीसाठी  स्वाध्यायाची आवश्यकता आहे. ब्रम्हस्वरूप  स्वतःच अनुभवणे जरूरीचे आहे. त्यासाठी साधू, संत आणि ज्ञानी जनांच्या सहवासात असावे असे समर्थ म्हणतात. सद्गुरू केवळ वोलून, वर्णन करून ज्ञान देत नाहीत, तर शिष्य स्वतः परब्रह्माचे दर्शन करू शकतील अशी योग्यता त्यांना प्रदान करतात.   एकदा स्वतः अनुभव घेतल्यानंतर कसल्याही संदेहाचे कारणच उरत नाही.  

ब्रम्हदर्शनाची योग्यता प्राप्त व्हावी यासाठी कठोर परिश्रम, दृढ मनोनिग्रह आणि सदैव जागरूक विवेकबुद्धीची आवश्यकता असते.   सर्वप्रथम स्वतःचेच तटस्थपणे आणि समतोल बुद्धीने परीक्षण करावयास हवे. अशारितीने आत्मसंशोधन केल्यावर अनेक भ्रम दूर होतात. बुद्धीवर पसरलेले आत्मगौरवाचे पटल नाहीसे होताच सारे काही स्पष्ट दिसून येते. मायावी दृश्याच्या परिणामांपासून बुद्धी मुक्त होते. आत्मा हेच एक परमसत्य आहे, आणि उर्वरित भौतिक सृष्टी हा केवळ मायेचा खेळ आहे याचे ज्ञान होताच, मी आणि माझे याची जाणीव हरपते. असे झाल्यानंतर संपूर्ण समाधानाचा अनुभव येतो.  

पदार्थज्ञान जेव्हा सरे । द्रष्टा द्रष्टेपणें नुरे । 
ते समई उतरे । फुंज (गर्व) मीपणाचा ॥
जेथे मुराले मीपण । तेचि अनुभवाची खूण ।
अनुर्वाच्य समाधान । या कारणें बोलिजे ॥ 

साधकास जेव्हा ज्ञान प्राप्त होते, तेव्हाच त्यास साधूत्व प्राप्तं होते. असे ज्ञानी साधू जेव्हा इतरांस काही एक विचारांचे बोल सामान्य जनांस  ऐकवितात तेव्हा श्रोत्यांनी त्यातील अर्थ मनी साठवावा.   शब्द महत्त्वाचा नाही. अर्थ हा शब्दाआधी उपजतो. तो अर्थ व्यक्त करण्याकरिता शब्द त्या नंतर येतो. परंतु एकदा उच्चारण झाल्यानंतर शब्दाचे महत्त्व संपते. कारण त्याचे कार्य जे की अर्थाचे वहन करणे, ते साध्य झालेले असते. शब्दार्थ आणि शब्द यांची तुलना समर्थांनी अनुक्रमे धान्य आणि भुस्सा अथवा फोलपटे यांच्याशी केली आहे. ज्याप्रमाणे फोलपटांच्या आवरणामध्ये धान्य असते, तद्वत शब्दामध्ये अर्थ असतो. जसे आपण फोलपटे, भुस्सा टाकून देऊन धान्य साठवून ठेवतो, तसेच शब्द सोडून त्यातील अर्थ  तेव्हढा ध्यानी धरावा असे  समर्थ म्हणतात.  

अत्यंत विचाराचे बोल । तरी ते माईक फोल । 
शब्द सबाह्य सखोल । अर्थचि अवघा ॥ 
शब्दाकरिता कळे अर्थ । अर्थ पाहतां शब्द वेर्थ ।
शब्द सांगे ते येथार्थ । परी आपण मिथ्या ॥

शब्द हे अर्थवाही असतात. त्यांचा उपयोग ऐकणाऱ्यांपर्यंत अर्थ पोहोचविणे हाच असतो. तो साध्य झाल्यानंतर शब्दांचे उपयोगीत्व समाप्त होते. शब्दांने अनुभवाचे वर्णन केल्यानंतर त्याचे जे आकलन श्रोत्यांस होते त्यांस  "वाच्यांश" म्हणावे. आणि वाच्यांशातून जे आकलन झाले, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर  जे ज्ञान होते त्यांस लक्षांश म्हणावे. वाच्यांशाहून लक्षांश श्रेष्ठ, कारण तो दुसऱ्या कुणाच्या नाही तर स्वानुभवावर आधारित असतो. परंतु तो सुद्धा अखेर  काल्पनिकच. कारण परब्रह्माची शुद्ध अनुभूती घेण्यासाठी 'मी' पणाचा त्याग करणे आवश्यक असते. ते सुद्धा सर्वस्वी साधत नाही. कारण मी त्याग केला ही  सुक्ष्मशी जाणीव कुठेतरी शिल्लक असतेच. त्यांमुळे जो अनुभव आहे तो मी प्राप्तं केला ही समजूत असतेच. जोवर अशी द्वैत भावना आहे, तोवर मिळणारा प्रत्येक अनुभव हा फोल आणि मिथ्याच ठरतो.  

मिथ्या कल्पनेपासूनि जाला । खरेंपण कैचे असेल त्याला । 
म्हणौनि तेथे अनुभवाला । ठावचि नाही ॥
दुजेविण अनुभव । हे बोलणेचि तो वाव । 
याकारणे नाही ठाव । अनुभवासी ॥ 

जोवर द्वैताची भावना सरत नाही, तोवर अनुभव संभवत नाही. ज्याचा अनुभव घ्यायचा आहे, जो कुणी तो अनुभव घेणार आहे आणि प्रत्यक्ष अनुभव या तिन्हीचे अद्वैत साधल्यानंतर अवर्णनिय समाधान प्राप्त होते. बोलण्याचे अथवा काही सांगण्याचे प्रयोजनच राहत नाही.  जो अर्थवाही गाभा आहे तो ठेवून, बाकी सारे निरूपयोगी आहे,  त्याचा त्याग करावा.  

दिवस आणि रात्रीचे चक्र या सृष्टीमध्ये अव्याहत चालू असते. आणि हे चक्र फिरत राहण्याचे मूळ कारण म्हणजे सूर्य.  हा तेजोनिधी नसेल तर दिवस आणि रात्रीतील साऱ्या सीमारेखा नाहीशा होतील. शब्द अथवा मौनाचा स्फुर्तीदाता जो  ओंकार जर नसेल तर उच्चारण आणि मौनात फरक राहत नाही. याच प्रमाणे अनुभव आणि अनुभवभोक्ता यातील द्वैत ही मायेची करणी आहे. जर माया नसेल तर त्याच्यात अभिन्नत्व साध्य होईल.

हा अनुभव भोक्ता खरा कोण? तर तो एक शुद्ध स्वरूपी आत्मा असतो. भौतिक स्वरूपाचा विसर पडल्यानंतरच अद्वैताचा अनुभव येऊ शकतो. आत्मा शरीर धारण करून जेव्हा सृष्टीमध्ये  प्रवेश करतो तेव्हा त्यांस मानवी भावभावना देखिल प्राप्त होतात. मी पणा आणि भौतिक जगाबद्दलची आत्मियता या योगे अनेक सुख आणि दुः खांना सामोरे जावे लागते. परंतु सद्गुरूस शरण गेले असता त्यांस ज्ञानप्राप्ती होते. शाश्वत समाधानाकडे जाणारा मार्ग दृष्टिपथात येतो. संसार आणि त्यातील सुखदुःखे ही निव्वळ माया आहे याचे ज्ञान होते. त्यामुळे आपणाकडे जे आहे (आप्तस्वकीय, धन-संपत्ती, यश, कीर्ती, मानसन्मान) त्याबद्दल वाटणारी ओढ, लालसा संपुष्टात येते. आपणाकडे जे नाही त्या बद्दलचा शोक, संताप देखील शांत होतो.  अशा प्रकारे जे आहे आणि जे नाही त्या बद्दलचा विचार नाहीसा होतो. आणि असे झाल्यानंतर उदंड असे समाधानच केवळ उरून राहते.  

सुन्यत्वातील शुद्धज्ञान । तेणे जाले समाधान ।
ऐक्यरूपे अभिन्न सहजस्थिती ॥ 
अद्वैतनिरूपण होता । निमाली द्वैताची वार्ता ।
ज्ञानचर्चा बोलो जाता । जागृती आली ॥

म्हणून समर्थ त्यांच्या श्रोत्यांना विनवणी करतात, की आजवर संसारात, भौतिक सुखदुखात स्वतःस गुंतवून घेतलेत. त्यांमुळे सुख, समाधान आणि शांती  या सर्वांना ते पारखे झाले आहेत. या निद्रिस्तावस्थेतून जागृत होऊन शुद्ध ज्ञान प्राप्त करून घेतले, तरच त्यांचा अंतरात्मा सुख पावेल.   अशा शुद्ध ज्ञानाच्या प्राप्तीनंतर सृष्टीच्या मायाजालात अडकून राहिलेला आत्मा मुक्त होईल. भौतिकाची जाणीव नष्ट होऊन आत्मभान येईल. परब्रह्माशी एकरूपता साधेल आणि त्यातून  अवर्णनीय अशा समाधानाची प्राप्ती होईल.  

तेणे जितुके ज्ञान कथिले । तितुके स्वप्नावारी गेले ।
अनुर्वाच्य सुख उरले । शब्दातीत ॥
तेथ शब्देविण ऐक्यता । अनुभव ना अनुभविता ।
ऐसा निवांत तो मागुता । जागृती आला ॥ 

असे हे निरूपण ऐकल्यानंतर शिष्यांना अजून काही समजून घ्यायची आस होती. समर्थ देत असलेले अगाध ज्ञान, त्यातील कणही न सांडता आत्मसात करावे हीच त्यांची इच्छा होती. म्हणून मनात उमटलेला संदेह त्यांनी समर्थासमोर व्यक्त केला. शिष्य विचारतात, स्वामी आपण सांगितले --

अजन्मा (आत्मा) होता निजेला । तेणे स्वप्नी स्वप्न देखिला ।
सद्गुरूस शरण गेला । संसारदुःखे ॥ 

तर हा अजन्मा म्हणजे कोण समजावे? त्याने कसले स्वप्न पाहिले? हे सारे समजवून सांगावे.  
यावर समर्थ सांगतात, अजन्मा म्हणजे अनंत, अविनाशी आत्मा, तो तर तूच आहेस.   तुला जेव्हा मी पणाची, स्व-अस्तित्वाची  जाणीव झाली, तेव्हा  जाणवले तू एक साकार सजीव आहेस. तू सृष्टीच्या मायेत गुरफटलास. परंतु त्यातून सावरून ज्ञानप्राप्तीसाठी चहूवाटा धुंडाळल्यास. अनेक मतमतांतरे ऐकलीस. वाद-प्रतिवाद केलेस.   अंती सद्गुरूंना शरण गेल्यानंतर सारे संशय फिटले, शब्दांचा गलबला शांत होऊन त्यातील अर्थ तुला प्राप्त झाला. आत्मा सुखावला, शांत झाला. त्यांस (म्हणजेच तुला) वाटले जागृतावस्था प्राप्त झाली.   परमात्म्याच्या अभिन्नत्वाचा अनुभव मिळाला, आणि अंतिम समाधान  लाभले. पण हा तुझा भ्रम आहे. कारण या सर्वामध्ये अजूनही तुझे मी पण तुला चिकटून राहिलेच आहे. अजूनही हे सारे काही "मी केले -- मी प्राप्त केले" ही अहंकारी जाणीव तुला दूर करता आली नाहीच. त्यांमुळे तुला वाटत असलेली अभिन्नता, ऐक्यता अजूनही तुझ्यापासून दूरच आहे.  

तुजवाटे जागृती । मज जाली अनुभवप्राप्ती ।
या नाव केवळ भ्रांती । फिटलीच नाही ॥
जागा जालियां स्वप्न उर्मी । स्वप्नीं म्हणसी अजन्मा तो मी ।
जागेपणे स्वप्न उर्मी  । गेलीच नाही ॥
स्वप्नी वाटे जागेपण । तैसी अनुभवाची खूण । 
आली, परी ते स्वप्न सत्य । भ्रमरूप ॥ 

जागृतावस्थेचे तू केवळ स्वप्न पाहिलेस. परंतु जागृती याही पेक्षा वेगळी आहे. जेथे "मी" चे अस्तित्वच नाहीसे झालेले असते. अनुभव आणि अनुभव प्राप्त करणारा एकरूप होतात,  ती अवस्था म्हणजे जागृती. तेथे पोहोचल्यावर आलेल्या अनुभवाचे  वर्णन करण्यास शब्दसामर्थ्य अपुरे पडते.   परंतु त्याची गरजही राहिलेली नसते.

म्हणोनि ते समाधान । बोलिताचि न ये ऐसे जाण ।
निःशब्दाची ऐसी खूण । ओळखावी ॥ 

(क्रमशः ) 

संदर्भ :  श्री ग्रंथराज दासबोध 

Post to Feedहे एकूण एक बरोबरे
धन्यवाद !
धर्म हेच तर मानवतेच्या विभाजनाचं कारण आहे !
हरे राम !

Typing help hide