घोटाळे कसे जन्माला येतात?

आपल्या समाजात अद्यापिही आर्थिक निरक्षरता प्रचंड प्रमाणात बोकाळलेली असल्याने घोटाळे नि महाघोटाळे होतात यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.
सध्या चालू असलेली एक गंमत थोडक्यात पाहू.
'डी एच एफ एल' (देवान हाउसिंग फायनान्स लिमिटेड) या संस्थेची मालकी असलेली उपसंस्था म्हणजे 'डी एच एफ एल वैश्य हाउसिंग फायनान्स'. दुसरी उपसंस्था म्हणजे 'आधार हाउसिंग फायनान्स'. या दोन उपसंस्था एकत्र झाल्या. पाहा (दुवा क्र. १)
गंमत क्र १ - 'आधार' शब्द असला तरी सरकारी काहीही यात नाही. पण वेबसाईटवर 'प्रधान मंत्री आवास योजना' याचाही खुबीने वापर केला आहे.
या आधार हाउसिंग फायनान्सच्या एनसीडीला किती व्याज जनतेला मिळेल? ९.२५% ते ९.७५%. पाहा (दुवा क्र. २)
गंमत क्र २ - जनतेकडून घेतलेल्या मुदत ठेवी परतही करता येत नाहीत नि व्याजही देता येत नाही अशा अवस्थेतली गृहनिर्माण क्षेत्रातली एक कंपनी, तिचे ख्यातनाम प्रवर्तक, त्यांच्या समर्थनासाठी हिरीरीने उभे राहिलेले मान्यवर, हे सर्व गेल्या वर्षभरातलेच हां....
आधार हाउसिंग फायनान्सची मूळ कंपनी 'डी एच एफ एल' गृहनिर्माण क्षेत्रातलीच. ती कंपनी घरेच नव्हे तर घरे घेण्यासाठी कर्जही देते. त्या कर्जाचा दर काय आहे? ९% ते ९.७५%
थोडक्यात, तुम्ही आपले पैसे ९.२५% ते ९.७५% ने आधार हाउसिंग फायनान्सला कर्जाऊ द्या. आधार हाउसिंग फायनान्सची मूळ कंपनी ८.७०% ते ९.५०७५% व्याजाने ते पैसे जनतेला देईल. पाहा (दुवा क्र. ३)
महागंमत - कुठलाही व्यवसाय हा नफा मिळवण्यासाठी असतो. मात्र या व्यवहारातला नफा कसा, सरस्वती नदीसारखा गुप्त!