नोव्हेंबर १० २०१८

स्थित्यंतर

पूजा करताना वासुदेवभटजी गेंगाण्या आवाजात जसे सतत काहीतरी गुणगुणत असतात तसा पाऊस सकाळपासून संतत झिमझिमत होता. खरे तर पडवीतल्या चुलीपुढच्या कोपऱ्यात निखाऱ्यांच्या धगीला पासोडी पांघरून डुलक्या काढायला ही अत्यंत योग्य आणि उत्तम वेळ होती. पण असे बसून चालणार नव्हते.
देवळात रात्री समाराधनेचे जेवण होते. त्याच्या निवडणे - सोलणे - चिरणे इत्यादी हमाली-कामासाठी आई सकाळपासून तिकडे गेली होती. दुपारला ती परत आल्यावर मग सांगितलेल्या आणि न झालेल्या कामांची उजळणी झाली असती.
चिंगीचे केस निगुतीने विंचरायला झाले होते. कुठूनतरी तिने उवांची आयात केली होती.
बाबूच्या एकुलत्या धडक्या सदऱ्याला स्वारीने धस लावून आणला होता. त्याला टीप पडली नसती तर त्याला शाळेत न जायला उत्तम कारण झाले असते.
समोरच्या बुळकट पायऱ्यांवरून धडपडून आणि पाय सुजवून घेऊन मनू परतली होती. त्याला पोटीस बांधेस्तोवर तिचे भोकाड मिटले नसते.
शिवाय आईने ती येईस्तोवर डाळतांदूळ खिचडी करून बाबूला जेवू घालून शाळेत पाठवायला बजावले होते.
दहा घरच्या डाळी नि पंधरा घरच्या तांदळांचा आमच्या घरी संगम होई. ती भेळ निवडायच्या विचारानेच माझ्या अंगावर काटा येई.
थोडक्यात, शेकत बसून चालणार नव्हते.
आणि पावसाळ्याची ही ओली लाकडे फू फू करून पेटवताना चांगला दोन शेर घाम गळे आणि मग त्या धगीला बसवत नसे.
आईचे हे एक बरे होते. कामे तर सगळी मोठ्या माणसांसारखी सांगे.
आणि जोशीबाईंचे यजमान रात्री उशीरा का परत येतात किंवा सानेवकील संध्याकाळी हाताला गजरा बांधून कुठे जातात असले काही विचारले तर 'मोठे झाल्यावर कळेल तुला' असे म्हणून गप्प बसवी.
पण हे मत मी मोठ्याने कधी मांडत नसे. कारण आईची अवस्था बघून मला कलकलून येई.
बाबा असेपर्यंत आईचा थाट होता.
पैशाची साखर आणायलादेखिल तिला कधी बाहेर पडावे लागले नाही. मुळात ती बाहेर पडलीच तर तिचे पाऊल वाड्याच्या पायरीवरून थेट बग्गीत पडे.
ठिगळे लावून पत्रावळी झालेल्या तिच्या आताच्या लुगड्यांसारखे कापड तर आम्ही पायपुसणी म्हणूनदेखिल वापरत नव्हतो.
बाबा अचानक गेले काय, नि आम्ही वाडा, बग्गी, गुरे-वासरे सगळे सोडून या देवळातल्या दोनखणी खोलीच्या आणि पडवीच्या आश्रयाला आलो काय. नातेवाईक तसे आम्हांला कुणीच नव्हते. म्हणजे, आईला म्हणे कुणीच नव्हते आणि बाबांनी आईशी लग्न केले म्हणून म्हणे त्यांच्या सगळ्यांनी त्यांच्याशी संबंध तोडून टाकले होते.
तसे मला कुणी सांगितले नाही हो हे, पण मी काही अगदीच बहिरी अन मूर्ख नाहीये. पडवीच्या बाहेरच्या भिंतीला खिडकीखाली लपण्यासाठी एक झकास जागा होती.
घाईघाईने मी मनूसाठी पोटिस करायला घेतले. तेवढ्यात चिंगी कराकरा डोके खाजवत कोनाड्यातली बाबूची शाईची दौत काढायच्या प्रयत्नात होती तिला धपाटा घालून देवबाप्पासारखे गप्प बसवले. खोलीच्या दारात बसून शिट्टी मारायला शिकायची खटपट करणाऱ्या बाबूचे बखोट धरून ओलसर पंचाचा तुकडा देऊन न्हाणीघराकडे पिटाळले.
चरचरीत शेकणारे मनूचे पोटिस तिच्या पायावर ठेवले तेव्हा विंचू चावल्यासारखी ती खच्चून बोंबलली आणि हुंदकत झोपी गेली. मूर्ख कुठची. भल्या पहाटे आई उठली म्हणून उठून तिच्या मागे जाऊन अंधारात पायरीवरून धडपडायला सांगितले होते कुणी? आता डोळ्यावर झोप दाटणारच.
खिचडीच्या पातेल्यात आधणासाठी पाणी चुलीवर चढवून मी थाळ्यात दोन मापे डाळतांदूळ काढले आणि निवडायला पुढीलदारी आले. पडवीच्या मागे एक मोठे पिंपळाचे झाड आहे, त्यामुळे पडवीत अगदीच अंधारून येते. आणि या युद्धामुळे म्हणे आमच्याकडेच नव्हे, तर सगळीकडेच रॉकेलच्या नावाने ओरड होती.
मोहरीच्या आकाराचे दगड हुडकून हुडकून मी वैतागले. तेवढ्यात सोनचाफ्याचा घमघमीत गंध दरवळला आणि शकूमावशी आमच्या दरवाज्यासमोरून दीपमाळेकडे जाताना दिसली. शकूमावशी अख्खीच सोनचाफ्यासारखी दिसायची. पिवळसर गोरा रंग, शेलाटी बांधा, रेशमासारखे पिंगट केस आणि काळेभोर डोळे.
शकूमावशी दोन महिन्यांमागेच देवळाच्या नदीकडच्या ओसरीत रहायला आली होती. पांडूभटजींना सांगून आईनेच तिची व्यवस्था करवली होती.
एका सकाळी दीपमाळेच्या चौथऱ्यावर बसलेली ती आईला दिसली. मग आईने चौकशी करून तिची व्यवस्था लावली.
"काय शकूमावशी, फेरा कुठवर? "
माझ्या आवाजाने सावध होत चिंगीने दाराकडे धाव मारली. "शकूमावशी, मी पण येऊ? "
मग जागी होत मनूने सूर लावला "छकूमाछी, माना चिम्मुले"
बाबूने तर न्हाणीच्या आडोशातूनच बादलीवर तांब्याचा ठेका धरून जप लावला, "शकूमावशी, मला पेणसल, शकूमावशी, मला पेणसल".
अचानक उठलेल्या या कल्लोळाने शकूमावशी क्षणभर बावरली आणि मग सावरून आमच्या घराकडे येऊ लागली. तिला येताना पाहून सगळ्या माकडांनी टाळ्या पिटायला सुरुवात केली.
निसरड्या पायऱ्यांवरून जपून पावले टाकत शकूमावशी आत आली.
"काय दुर्गाक्का, आज स्वयंपाकाची जबाबदारी तुमच्यावर वाटतं? "
मग मीही संधी सोडली नाही. "हो ना, आणि त्यात हे भरडे तांदूळ नि मेली ती ओली लाकडं. धुरानेच जीव घुसमटायला होतो".
"पुरे, पुरे, आक्काबाई, ती म्हण माहीत आहे ना? 'नाचता येईना अंगण वाकडे, नि स्वैपाक येईना ओली लाकडे'".
शकूमावशीने माझ्याकडे पाहून मिष्किलपणे डोळे मिचकावले आणि ती हसू लागली. तशी सगळी भुतावळसुद्धा खिदळायला लागली. मी चांगले ठब्बू पैशाएवढे डोळे वटारून बघितले तरी कुणी गप्प झाले नाही. शकूमावशी असताना त्यांना काय भीती?
मग माझ्याजवळ येऊन खांद्यावर हात ठेवत ती समजावणीच्या स्वरात म्हणाली, "दुर्गे, अगं तुझी आई जिवानिशी परिस्थितीचा पहाड रेटते आहे त्यात तुझ्याखेरीज कुणाची गं मदत तिला? आणि तूसुद्धा काय, दोन दिवसांनी लग्न होऊन जाशील. तोवर तरी तूच आहेस ना? "
माझ्या लग्नाचा विषय काढलेला मला अज्जीबात आवडत नसे.
पांडूभटजींच्या बबनचे स्थळ म्हणे त्यांनी माझ्याकरता सुचवले होते. ही माहिती गुरवांच्या यमीची हो.
काय तरी बावळट ध्यान. सकाळी चौथऱ्यावर बसून प्रभातफेरीतल्या लोकांची टिंगल करत बसे आणि रात्री त्याच चौथऱ्याच्या आडोशाला बसून देशपांड्यांच्या सदाबरोबर विड्या फुंके. शी! फावड्यासारखे दात नि सदैव तेलकट चेहरा. सारखा मेला अधाश्यासारखा लसलसत्या नजरेने बघत असतो.
घाईघाईत मी विषय बदलला.
"शकूमावशी, तलाठीभाऊ एवढ्या सारख्या काय गं चकरा मारतात तुझ्याकडे? तेदिखिल कसली भणभणणारी अत्तरे लावून? "
"काय करणार अगं", शकूमावशी नजर चुकवत म्हणाली. "मिळेल तिथून मदत घ्यायची. आशाळभुताच्या जन्माचा भोग आलाय, तो भोगूनच संपवायचा".
"पण चांगले आहेत ते", चिंगीने ठामपणे जाहीर केले. "परवा संध्याकाळी मी बाहेर खेळत होते तर त्यांनी मला सांगितले की एवढ्यात शकूमावशीकडे येऊ नकोस म्हणून, आणि दोन अख्खे बत्तासे दिले".
शकूमावशी एकदम गोरीमोरी झाली.
एवढ्यात बाबू पुढे सरसावला. "आणि तू गं, हावरट, दोन्ही बत्तासे स्वतःच गिळून टाकलेस ना, गपाक गपाक करून? व्यॅsssss"
"नाही रे दादा", चिंगी रडकुंडीला येऊन म्हणाली. "शप्पत, मी ते दोन्ही घरी आणत होते तर हातातून निसटून ते चिखलात पडले".
"पुरे पुरे मंडळी, तुम्हांला चुरमुरे, बत्तासे आणि पेन्सिल हवी ना? आणते हो. येते गं दुर्गे. रेशनिंगच्या दुकानात म्हणे सरकार बायकांनासुद्धा नोकऱ्या देते आहे. चार अक्षरे शिकायला मिळाली आहेत तर बघू ती पोट भरायच्या कामी येतात का? "
शकूमावशी निघून गेली.
पाणी खळखळा उकळायला लागले होते. त्यात मी डाळ-तांदूळ ओईरले आणि चिंगीचे केस विंचरायला घेतले. जणू मी एकएक केस उपटत होते अशा भावनेने तिने रडायला घेतले. पुस्ती पुढ्यात ठेवून जीभ बाहेर काढून बाबू अभ्यासाचा आव आणून बसला होता, त्याने "ऍ ऍ ऑ" करीत तिला चिडवायला सुरुवात केली. मग आपण मागे रहायला नको म्हणून मनूनेही तिचा आवाज त्यातच मिसळून दिला. हा वाद्यवृंद टिपेला पोहोचला आणि आईने घरात प्रवेश केला. अंगावरचे पाणी पागळत ती दारातच गोणत्याच्या तुकड्यावर उभी राहिली.
घाईघाईत उठून मी त्यातल्यात्यात कोरडा पंचा तिच्यापुढे केला आणि खिचडी खाली लागायला लागली होती ती पटकन खाली घेतली.
माझी अगदी अपेक्षा होती की हताश स्वरात ती आता राहिलेल्या कामांची उजळणी करायला लागेल. आता मीही शक्य तितका हात उचललाच होता. याहून काम करायला मला काही चार हात नव्हते.
पण हे तिला कसे सांगणार? तिला चार हात होते.
निदान ज्या रीतीने ती कामाचा उरका पाडे, आणि तोदिखिल अधिक टापटिपीने, ते पाहता तसेच वाटे.
पण आई काहीच बोलली नाही. जमेल तेवढे अंग टिपून घेऊन ती चुलीकडेच्या कोपऱ्याला निचळ बसली. पावसात रंग उतरल्यासारखा तिचा गोरेपणा सपक झाला होता. तशी ती गबदुल कधीच नव्हती. पण आता तर तिची कातडी हाडांवरून तंबूसारखी ताणली गेली होती. नेहमीपेक्षा ती आज जरा जास्तीच थकलेली वाटत होती.
बाबूसाठी मी चटकन खिचडी उकरली आणि देसाईवकिलांकडून आलेल्या आंब्याच्या लोणच्यातली एक फोड केळीच्या पानावर काढून पान बाबूपुढे केले.
देसाईवकील आणि वकिलीणबाई दोघेही चांगले होते. त्यांच्या शकूच्या लग्नानिमित्त त्यांनी देवळात गावजेवण घातले होते तेव्हा उरलेली लोणच्याची अख्खी बरणी त्यांनी आम्हांला देऊन टाकली होती. उरलेला मसालेभात तर आम्ही सलग तीन दिवस खात होतो. वकिलीणबाईंकडे बघितले की साजुक तुपात स्निग्ध जळणाऱ्या फुलवातीची आठवण होई. त्यांच्या गोऱ्यापान हातावर सोन्याच्या चारचार बांगड्या सदैव मंद किणकिणत असत. देसाईवकील तर नाईलाज झाल्याखेरीज एक शब्दही बोलत नसत. कोर्टात वकिली करताना कसे बोलत कुणास ठाऊक.
बाबूमागोमाग चिंगी आणि मनू लगबगत चुलीजवळ आल्या. मनू आईच्या कुशीत घुसण्यासाठी ढुशा मारू लागली.
"दुर्गे, सगळ्यांचंच घे गं वाढून. मी दोन घटका पडते. मग जरा बाजारातून जाऊन यायचंय आपल्याला."
"आणि तुला गं? "
"अं मला नको काही. माझा आजचा बुधवारचा उपास ना. आणि माझं तसं फराळाचं झालंय तिकडे. "
आईचं हे उपासाचं जरा जास्तच वाढले होते. आणि फराळाचं झालंय म्हणजे काय, तर मिळालं असेल एकादं केळं.
मी चुलीच्या बाजूला ठेवलेले भांडंभर दूध गरम केले आणि हळदीची चिमूट त्यात सोडून तिच्यापुढे केले. तेवढं मात्र तिनं निमूटपणे घेतले.
बाबू शाळेत गेला. मग मी आमची पानं घेतली. घोट घोट करीत आईनं दूध संपवलं आणि कोपऱ्यात ती लवंडली. जेवण उरकून आमची पाने उचलून मी गाईला घालून आले. येऊन घासभर उरलेली खिचडी झाकून ठेवली आणि ओलसर भिजट जमिनीवरून शेणगोळा फिरवला तेव्हा ती अलगत उठली.
मग मीही जरा तोंडावरून पाणी फिरवून तोंड खसखसून पुसले. केसांवरून हात फिरवून केस थापटून सारखे केले आणि परकराचा खोचलेला ओचा सोडून परकर झटकून घेतला.
पावसाची झिमझीम आता जवळजवळ नाहिशी झाली होती. चिखलाचा राडा, आणि भिजट कुबट वास सगळीकडे पसरला होता. बाजारात फारशी वर्दळ नव्हती. कोपऱ्यावरच्या शाळेतून मुलांचे पाढे घोकणे दबल्या आवाजात ऐकू येत होते.
चालताना चिखल पायांच्या बोटांच्या सांदीतून सुळकन वर येई आणि पायाला गुदगुल्या होत. परकराच्या खालच्या बाजूला चिखलाची किनार चढू नये म्हणून परकर अर्धा वीत वर उचलून मी सावध चालत होते.
जगन्या कासाराच्याकडेच्या छोट्या गल्लीत आई वळली. पुढे होऊन तिने जगन्याच्या मागच्या घराच्या दाराची कडी वाजवली. "कोन त्ये? " अशी म्हाताऱ्या आवाजातली कुरकूर ऐकू आली आणि खळखळत दरवाजा उघडला.
ढब्बू पैशाएवढे कुंकू लावलेल्या आणि अंगभर सुरकुतलेल्या एका थोराड बांध्याच्या म्हातारीने "तुमी व्हय बामनीनबाई, या या" केले.
पायरीवरच चिखलाचे पाय आपटून झटकून आई आत शिरली.
"आवडाक्का, ती लुगडी कुठली म्हणत होतात ती बघायला आले होते".
"बसा, बसा, दाकिवते. आन ही कोन? ल्येक वाटतं? अगदी नचित्रावानी हाय हो", म्हातारीने कडाकडा माझ्या गालांवरून बोटे मोडली. मी जरा दचकलेच.
आम्हांला ओसरीतल्या एका विटक्या सतरंजीवर बसवून म्हातारीने खुंटीवरचे गाठोडे काढले. सतरंजीवर आमच्या पुढ्यात ते उघडत ती म्हणाली, "तशी सगळी सादारणशीच हाईत. तुमीच बगा मंजी जालं".
आईने गडद निळ्या रंगाचे लुगडे काढून मला विचारले, "हे ठीक आहे, नाही गं दुर्गे? "
मला काहीच कळले नाही. मुळात आईंने मला बरोबर का आणले होते तेच मला कळले नव्हते. आई लुगडी घ्यायला गेली हीच एक मोठी घटना होती. पण मला ती मत विचारायला बरोबर घेऊन जाईल याची कल्पना नव्हते. आता जबाबदारी पडलीच होती तर मी पोक्तपणे एक काळ्या खडीचे लुगडे निवडले. निळे आवडले होते, पण काळे जास्त आवडले.
लुगड्याच्या केळ्यातून आईने राणीछाप रुपयाची दोन नाणी काढली आणि म्हातारीला म्हणाली,  "आवडाक्का, आत्ताला तरी एवढेच आहेत. चालतील का? अजून मग एवढ्यात तरी... "
"आता तुमास्नी काय म्हनायचं बामनीनबाई. जास्तीचं काय बोलू नगासा. बसा. कोपभर च्या घेऊन जावा" करत कमरेचा बटवा काढून तिने त्यात नाणी ठेवली आणि आतल्या दिशेला तोंड वळवून हाक घातली, "अंजे, च्या आन बगू पटशिरी".
मग ऐसपैस पसरत तिने "मग काय, ल्येकीचं लगीन कंदी? " करत चऱ्हाट वळायला घेतले. सुदैवाने अंजी नावाची माझ्यापेक्षा जरा धाकटी, काळीशार मुलगी कानफुटके कप घेऊन लौकरच बाहेर आली.
त्या ओलसर अंधेऱ्या ओसरीत आलं घातलेला, गुळाचा तो काळसर चहा चांगलाच चविष्ट वाटला.
उठताना आई म्हणाली, "सोन्या, उचल बाई तुझी लुगडी. "
माझी लुगडी? मला एकदम भिरभिरे लागल्यासारखे झाले.
"अगं पण" करीत लुगडी उचलून मी उठेस्तोवर आई दार ओलांडून गल्लीत उतरलीदेखिल होती.
लगबगीने तिच्या मागोमाग जात मी बोलायला लागले, "अगं पण यापेक्षा बाबूला एक सदरा घ्यायचा होतास. सारखा धस लावून येतो बाई कुठनंतरी. "
एव्हाना आम्ही गल्लीच्या तोंडाशी आलो होतो. आई काही बोलणार एवढ्यात जानू न्हाव्याच्या दुकानासमोर केसरी वाचत बसलेल्या पटवर्धननानांनी खणखणीत हाक घातली, "वत्सलाबाई, देवळांत काय चाललांय कांय? अपेक्षा नव्हतीं हों. "
मला पारापाशी जाऊन उभी रहायला सांगून आई घाईघाईत त्यांच्याकडे गेली.
देवाला सोडलेल्या आणि सगळीकडे तोंड घालून माजलेल्या एखाद्या बैलासारखे नाना दिसत. त्यांचा आवाजही डुरकण्यासारखाच होता. मला ते कधीच आवडले नाहीत.
घरची गडगंज शेती होती. तिच्या बळावर ते सदैव अख्ख्या गावाला शहाणपणा शिकवीत असत.
सदैव भोचकपणे बघणारे ते घारे डोळे, सदाचीच वाढलेली खुरटी दाढी, पानाने पिचपिचलेले तोंड, सुटू लागलेल्या पोटावरचे कळकट जानवे आणि डोक्यावर गाठ मारलेली शेंडी.
जन्माने ब्राह्मण असूनही मला ते सदैव खाटकासारखे वाटत.
त्यांच्या तरण्याताठ्या सुनेचा अचानक मृत्यू झाला तेव्हा तर माझी खात्रीच पटली होती.
नानांचा मुलगा तसा बावळटच. बघावे तेव्हा खाली मान घालून बसलेला असे.
आणि तिच्या मृत्यूनंतर सगळीकडे तशी कुजबूजही चालही होती.
आता कुजबूजच ती, माझ्यासमोर कुणी थोडेच बोलणार? मी लहान ना?
'अनैतिक संबंध' असे काहीसे मी उडत उडत ऐकले. शब्दाचा अर्थ कळला नाही, पण आईला विचारायचा धीरही झाला नाही.
नानांशी काय ते बोलणे संपवून आई लगबगीने माझ्याकडे आली. पाराच्या खोरण्याला वळसा घालून आम्ही पुढे निघालो तशी नानांनी भर बाजारपेठेला ऐकून जाईल एवढ्या आवाजात जाहीर केले, "आज रात्रीपर्यंतच काय तो निकाल हो. फुकट्यातले समाराधनेचे जेवण जेव नि नीघ म्हणावे. उद्याची सकाळ उजाडली तर मग माझ्यासारखा दुसरा नाही, सांगून ठेवतो. "
काय झाले हे मी आईल एकदोनदा विचारण्याचा प्रयत्न केला, पण आई काहीच बोलली नाही. मीपण मग लुगड्याच्या घड्या दपटून निमूट चालत राहिले. मला तिने लुगडी का घेतली असतील याचा विचार करीत.
चिंगीला हाक मारून आम्ही बाहेरच पाणी मागवले आणि पाय धुऊन घरात गेलो. आम्ही घरात पाऊल टाकतो न टाकतो तोच अत्तराचा गंध दरवळला. आईने मागे वळून न पाहताच सांगितले, "दुर्गे, त्यांना हाक मार. "
तलाठीभाऊ हातात कसलीतरी पिशवी घेऊन लगबगीने चालले होते. डाव्या हाताने त्यांनी डोक्यावर ऐटबाजपणे छत्री धरली होती. मी हाक मारताच ते थबकले. मागे वळून बघत म्हणाले, "काय म्हणता दुर्गाबाई, काय काम काढलंत? "
"काम तिचं नव्हे, माझं आहे", आई उंबऱ्याच्या आतूनच म्हणाली.
कैरीचे लोणचे घालायला बसले की कैऱ्या कापून विळीच्या पात्याला धार चढते तशी तिच्या आवाजाला धार होती.
आईचा हा आवाज मला संपूर्णपणे अनोळखी होता.
"आज रात्रीपर्यंत तिचे सगळे सामान आणि ती येथून हलायला पाहिजेत. "
तलाठीभाउंचा चेहरा एकदम लालेलाल झाला. इतका, की मला भीती वाटली की तो फुटून त्यातून रक्त ठिबकेल म्हणून.
मग एकदम चंद्रावर ढग दाटून यावेत तसा त्यांचा चेहरा काळवंडत गेला.
क्षणभर स्तब्ध उभे राहून ते माघारी वळले आणि हळूहळू चालू लागले. छत्री मलूलपणे त्यांच्या खांद्यावर विसावली.
आई चुलीपुढे जाऊन निचळ बसली होती.
तिच्या गोऱ्यापान, रेखीव नाकाचा शेंडा थरथरत होता. यापलिकडे तिची काहीच हालचाल नव्हती.
मी तिला हाताला धरून उठवले आणि पासोडीवर आडवे केले. तिच्या अंगात चांगलीच धग जाणवत होती.
मी चटकन दामू गुरवाकडून भांडेभर दूध आणले आणि तिला डोकेदुखीची मात्रा उगाळून दिली. घोटभर दुधाने आईने ती मात्रा घशाखाली लोटली आणि गोधडी पांघरून ती आडवी झाली.
मग मी कण्या पाखडायला घेतल्या.
संध्याकाळी सगळ्यांसाठी कण्हेर करायला लागणार होती.
आई काही संध्याकाळच्या जेवणाला जाईल असे चिन्ह नव्हते. आणि ती नसेल तर आम्ही कोण कसे जाणार?
आणि समजा गेलोच असतो, तर पाखडलेल्या कण्या काही वाया गेल्या नसत्या.
माझ्या कण्या निवडून-पाखडून होईस्तोवर बाबू आला. त्याला उरलेली घासभर खिचडी खायला घालून मी त्याचा अभ्यास घेत बसले. मनू आईच्या कुशीत घुसून झोपली. चिंगी देवळात सागरगोटे खेळायला गेली.
या अशाच उवा आणते कारटी.
बाबूचा अभ्यास घेऊन होईस्तोवर अंधार व्हायलाच आला.
चिंगीला हाक घालून मी देवाजवळचा दिवा लावला.
आई हळूहळू उठून बसली. अंगावरची गोधडी बाजूला सारून तिने मनूला उठवले.
दिव्याला नमस्कार करून सगळी स्तोत्र म्हणायला लागली.
मी परत चुलीत लाकडे सारली.
दारात काहीतरी हलल्यासारखे वाटले म्हणून मागे पाहिले तर शकूमावशी दोन बोचकी उंबऱ्याबाहेर ठेवून आत येत होती. अंधुक प्रकाशात ती आणखीनच गोरी वाटत होती.
आई चटकन उठून उभी राहिली. शकूमावशी थेट तिच्याकडेच गेली.
तलाठीभाउंशी बोलताना आईच्या शब्दांना आलेली धार आठवून क्षणभर माझ्या पोटात गोळा आला. पण शकूमावशी थेट जाऊन आईच्या पाया पडली.
आईने तिला खांद्याला धरून उठवले नि शकूमावशीच्या चेहऱ्यावरून नजर न हलवता ती म्हणाली, "बाबू, चिंगी नि मनूला घेऊन देवळाच्या ओसरीत जाऊन बस जरा".
बाबू त्या दोघींना घेऊन गेला. मी फुंकणी हातात घेऊन उभीच होते.
"शकू, कावळे बरे गं यांच्यापेक्षा. ते तरी जखम बघूनच चोच मारतात.
"आणि यांच्या स्वतःच्या जखमा काढल्या तर? पण काढणार कोण?
"शकू, ही चार पिल्लं पदरात नसती ना, तर, तर आज मी तुलाच काय, कुणालाच दिसले नसते.
"अगं, एकाच अगतिकतेत सापडलेली आपण, एकीला दपटवून दुसरीचा छळ करायला लावायचा असला अमानुष खेळ यांचा.
"पण इलाज नाही बाई. आज हे बलाढ्य. आजच नव्हे, उद्याही, परवाही."
या पिल्लांसारख्या क्षितिजावरच्या ताऱ्यांकडे नजर लावून दिवस काढायचे.
"प्रार्थना करीत, की यातला एखादा तारा निखळू नये. "
शकूमावशीने एकदम आईच्या तोंडावर हात ठेवला आणि ती सायसाखरेसारख्या स्निग्ध स्वरात म्हणाली, "वत्सलाताई, भोग आहेत, भोगायचे छातीत श्वास शिल्लक असेपर्यंत. देव नुसताच प्राण देता तर ठीक होते. पण त्याने दिला हा स्त्रीदेह, जिच्या वाट्याला कायमची विटंबनाच लिहिलेली. "
शकूमावशी थांबली.
आणि अचानक तगमगून कापऱ्या आवाजात म्हणाली, "पहिल्यापासून हे असं का ताई?
"या असल्या अपेशी जन्माला यायचंच का?
"एकापुढे असो, नाहीतर अनेकांपुढे, बाजारच ना मांडायचा आपला गुरासारखा?
"ही अशीच ना आपल्या स्वतःच्या माणसांपासून तुटून जायची शिक्षा भोगायची? "
गदगदत ही आईच्या खांद्यावर डोके ठेवून उभी राहिली.
आई तिला थोपटत राहिली.
मग संथ स्वरात आई म्हणाली, "शकू, तिकडे मुंबईला म्हणे हल्ली या युद्धामुळे खूप नोकऱ्या मिळतात. बायकांनादिखिल. वाळकेश्वराच्या देवळातला पुजारी माझा लांबचा आतेभाऊ आहे. करीलही मदत बहुतेक. आणि हे ठेव. "
आई लगबगीने गेली आणि कोपऱ्यातली ट्रंक उघडून एक गुलाबी कागदातली पुरचुंडी घेऊन आली.
"एक तोळा आहे. आमच्या पंचकोनाला काही याने फारसा धर यायचा नाही. तुला काही काळ तरी झगडता येईल. "
डोळ्यांतील अश्रू पुसून शकूमावशी वळली.
मी हातात फुंकणी घेऊन उभीच होते.
शकूमावशीने मला एकदम जवळ घेतले आणि ती एवढेच म्हणाली, "दुर्गाक्का, जपून रहा. "
ती परत जायला वळली तोच आई म्हणाली, "शकू, थांब. कुंकू लावते. "
त्यानंतर "मोठी झाल्यावर कळेल तुला" असे आई कधीच म्हणाली नाही.

Post to Feedउत्तम...
सहमत
जी.ए. यांची आठवण झाली

Typing help hide