ट्रान्स

नीट विचार केला की समजतं की आपल्या बऱ्याचशा आवडी-निवडी ह्या इतरांकडूनच घेतलेल्या असतात. म्हणून मला असं वाटतं की आपल्याला काय आवडतं आणि काय आवडत नाही, ह्या दोन्ही गोष्टी स्वतःच्या स्वतःला आणि वेळेत कळणं हे फार महत्त्वाचं असतं.
सुदैवानं एक-दोन गोष्टी तरी अश्या आहेत की ज्या माझ्या मला समजल्या आणि आवडू लागल्या.
अश्या मोजक्या गोष्टींमधली एक म्हणजे 'ट्रान्स' !
अनेक प्रकारचं संगीत, अनेक गायकांची, चित्रपटातील गाणी ऐकून झाली. पण 'अपलिफ्टिंग ट्रान्स' जसा ऐकू लागलो, तेव्हा एकदम खात्री झाली, की हेच ते संगीत जे आपल्या मनाला भिडतंय !
कानातल्या हेडफोनवर 'ट्रांस' सुरू असला की तो आतलं जग आणि बाहेरचं जग यांच्यातील एक भिंत बनून जातो. मनात खूप वेळापासून सुप्त असणारे विचार बाहेर पडू लागतात, प्रश्नांची उत्तरं मिळतात आणि एक एक गोष्ट मार्गी लागायला सुरुवात होते.
मी अक्षरशः त्या संगीतावर स्वार होतो. एक प्रवास सुरू होतो आणि तो मला अलगदपणे एका शांत, मला आवडणाऱ्या ठिकाणी नेऊन ठेवतो.
गाणं एकदा शब्दबद्ध झालं की मग त्यातले भाव हे त्या शब्दांशी बांधले जातात. परंतु जर फक्त संगीत असेल तर तसं होत नाही. त्यातले भाव हे प्रत्येक श्रोत्यासोबत बदलत जातात. अश्या संगीतामध्ये वेगळी ताकद असते.
माझ्या बाबतीत ट्रान्स हा  नकळत मनातल्या आठवणींच्या कप्यात हात घालतो, एक सुंदर पान बाहेर काढतो, आणि ते चित्र समोर उभं करतो. जुन्या आठवणी मनात तरळू लागतात. भूतकाळातील त्या क्षणांच्या आपण अगदी जवळ असतो. स्वतः:ला बघत असतो. जणू एका स्पर्शाच्या अंतरावर !
ते ऐकताना कधी अंगावर काटा येतो, तर कधी कंठ दाटून येतो आणि डोळ्यातून नकळत एखादा थेंब ओघळून जातो.
काही गाणी असतात ज्यात शब्द असतात आणि गायकाने उत्तम पद्धतीनं गायलेले असतात. त्याला वोकल ट्रान्स म्हणतात. अशीच काही वोकल ट्रान्सची गाणी मनाला स्पर्श करतात.
खरंतर गाण्यातील शब्दांचा, त्यातील गायिकेच्या आवाजाचा माझ्याशी काय संबंध? आपलं सुख, दु:ख त्या संगीतकाराला आणि त्या गायिकेला काय माहिती? ते ऐकताना अस का वाटतं की हे तर आपल्याच आयुष्यावर, आपल्याच इच्छांचा आणि भूतकाळाचा अभ्यास करून बनवलेलं गाणं आहे?
माहीत नाही !
तो  मला एका वेगळ्या धुंदीत नेतो. मग अश्या वेळेस सोबत कोणीतरी असलं की 'डिस्टर्ब' चं होतं.
कोण्या अनामिकेने म्हटलंय त्यात थोडासा बदल करून मी म्हणतो -
"माझं माझ्यावर खूप प्रेम आहे, आणि ट्रान्स ऐकताना ते वाढतंच जातं."
-भूषण