ब्रह्माचा शोध (पूर्वार्ध)

           ब्रह्म हा शब्द प्रथम कानावर अगदी लहानपणी पडला त्याचे कारण आमच्या गावात घडणारा कीर्तन महोत्सव. बाळासाहेब पंतप्रतिनिधी हे औंध संस्थानचे राजे होतेच पण त्याचबरोबर  दोन गोष्टींबद्दल प्रसिद्ध होते.त्यातील एक म्हणजे सूर्यनमस्कार .आचार्य अत्रे यांनी सूर्यनमस्काराचे विडंबन आपल्या ' गुरुदक्षिणा ' नाटकात केल्याबद्दल बाळासाहेब हयात असेपर्यंत त्याना औंधात प्रवेश नव्ह्ता .तो बाळासाहेब गेल्यावरच "श्यामची आई’ सिनेमा काढण्यासाठी त्याना करता आला. असो ! आणि दुसरी गोष्ट त्यांची कलांची आवड.त्यात चित्रकला,मूर्तिकला,याबरोबर कीर्तनाचा समावेश होता,आषाढ महिन्यात महिनाभर औंधात कीर्तनमहोत्सव चालायचा.त्या कीर्तनास आमच्यासारखी (त्यावेळी)लहान (असलेली)मुले गेली तरी त्यांचे स्वागत असे फक्त आम्ही त्या कीर्तनात काही गोंधळ केला तर मात्र आमची उचलबांगडी होत असे. 
         या कीर्तनात एकदा एका कीर्तनकाराने एक गोष्ट सांगितली.त्या गोष्टीत संत रामदास (किंवा दुसरे कोणी संत असतील)एका गावात राहिले असता तेथील एका मंबाजीबोवांना त्यांची परीक्षा घ्यायची लहर आली व त्यांनी आपल्या एका शिष्याला एक मोकळी वाटी देऊन स्वामींच्याकडे पाठवले आणि निरोप पाठवला," महाराज कृपया या शिष्याबरोबर वाटीभर ब्रह्म पाठवून द्यावे’ यावर रामदास यानी शिष्याबरोबर निरोप पाठवला "अवश्य महाराज, पण त्यासाठी वाटी रिकामी करून पाठवावी."
         वाटीभर ब्रह्म म्हटल्यावर आमच्यासारख्या पोरांना बहुधा हा बासुंदी अथवा सुधारस असा पदार्थ असावा असे वाटून नाही म्हटले तरी असे पदार्थ त्या काळी क्वचितच म्हणजे अगदी सणावारीच मिळत असल्याने त्या आठवणीने तोंडाला पाणी सुटते न सुटते तोच समर्थांचे उत्तर ऐकल्यावर एकदम फुसकन आमच्या मनोरथातील हवा निघून जायची शिवाय  वाटी मोकळी असून ती मोकळी करून पाठवावी असा निरोप समर्थानी पाठवावा व त्यामुळे त्या मंबाजीबोवांची फजिती व्हावी त्या अर्थी ब्रह्म म्हणजे हवेसारखा पदार्थ असावा अशी समजूतही झाली 
         त्यानंतर आत्तापर्यंत  वाटीभरच काय पण चमचाभर ब्रह्माचीही आवश्यकता न पडल्यामुळे कोणाकडे ब्रह्म मागण्याची पाळी आली नाही पण घरातही वडील कीर्तनकार असल्यामुळे  त्यांच्याकडून तरी ब्रह्मप्राप्ती नाही झाली तरी ब्रह्म या शब्दाचा अर्थ कळेल असे वाटत होते.पण कीर्तन करताना शान्तिब्रह्म वाटणारे वडील मी असा प्रश्न विचारल्यावर कसा प्रतिसाद देतात याविषयी मी साशंक होतो.
          माझे आवडते शिक्षक कदाचित या प्रश्नाचे उत्तर देतील अशी आशा करून त्यांना मी धीर करून विचारण्याचे ठरवले. हे शिक्षक  स्वत:स कवी समजत व प्रत्येक वर्षी वर्गातल्या सगळ्या मुलांची नावे एकत्र गुंफून कविता करणे हा त्यांचा छंद व तीच त्यांची कवितेची मोठी मजल.तरी पण एकदा त्यानी "बापूजींनी बांना आश्रमातील लोकांची काळ्जी घेण्यास सांगितले" याचा अर्थ बापूजींनी आपल्या बापाला आश्रमातील लोकांची काळजी घेण्यास सांगितले "असा सांगितला  व मी स्वत:स वर्गातील शहाणा मुलगा समजत असल्यामुळे त्यांना   "अहो मास्तर(त्यावेळी गुरुजी म्हणण्याची पद्धत नव्हती) बा म्हणजे बाप नाही तर बा म्हणजे कस्तुरबा" अशी दुरुस्ती सुचवल्यावर त्यानी माझी ही समजूत (माझ्याबद्दलची) चूक ठरवून "गप्प बस उगीच काही तरी बडबडू नकोस बा म्हणजे बापच " असे म्हणून मलाच वेड्य़त काढले आता बा म्हणजे बापच अशी ठाम समजूत असणाऱ्या गुरूकडून ब्रह्मज्ञान  मिळवण्याची शक्यता बाळगणे म्हणजे ज्ञानदेवांचे रेड्याच्या तोंडून वेद बोलविण्याचे चमत्कारकौशल्य माझ्या अंगी असण्यासारखेच होते आणि तसे ते असते तर ब्रह्म म्हणजे काय हे मीच इतरांना शिकवू शकलो असतो.  म्हटल्यावर त्यांच्याकडून ब्रह्मज्ञान होण्याची शक्यता मावळली . 
         शेवटी त्या कीर्तनकारासच गाठावे असे मी ठरवले कारण त्यांचा मुक्काम महिनाभर गावातच असे.ते अंघोळीसाठी तळ्यावर निघाले असता मी वाटेत त्यांना गाठले व विचारले ,"बुवा एक प्रश्न विचारू का?" मास्तरांचा मुलगा म्हणून बुवांना माझी माहिती होती व कधी कधी आमच्या घरी त्याना जेवायलाही बोलावले जायचे त्यामुळे त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केले नाही उलट "अरे वा वा विचार ना बाळ" असे म्हणून उत्तेजनच दिले. त्यामुळे उत्साहित होऊन त्यांना विचारले "कालच्या कीर्तनात रामदास स्वामींची जी गोष्ट तुम्ही सांगितली त्यात वाटीभर ब्रह्म हा काय प्रकार आहे आणि वाटी रिकामी असताना ती मोकळी करून पाठवा असे उत्तर स्वामींनी का दिले?" 
        माझ्या या प्रश्नावर बुवा काही काळ विचारात पडले आणि मग म्हणाले,"बाळ तू अजून लहान आहेस ब्रह्म म्हणजे काय हे इतक्या लहान वयात समजणे अवघड आहे." पुढे त्यांनी तुझ्या वयाला योग्य असा प्रश्न विचार असे म्हटले नाही, नाही तर  बाल पु.ल.देशपांडे यानी न.चिं.केळकरांनी त्याना तसेच सांगितल्यावर "आज बाजारात आंब्याचा भाव काय ?" असा उलट प्रश्न विचारण्याचे जे धाडस केले तसे मला करावे लागले असते व तसे ते माझ्या अंगी नसल्यामुळे संवाद इथेच संपला.अर्थात ब्रह्म म्हणजे काय हे समजण्याची एकुलती एक आशाही मावळली.
      तरी ब्रह्म हा शब्द मात्र कानावर पडायचे राहिले नाही.कधी कधी आईसुद्धा मी फार बडबड करून बाकी काम मात्र काडीचे करत नसल्यामुळे मलाच उद्देशून "लोकां सांगे ब्रह्म ज्ञान आणि आपण कोरडा पाषाण "म्हणे  तर कधी मी केलेले (की बिघडवलेले) काम पाहून केलास का सगळा ब्रह्म घोटाळा असे उद्गार काढे. म्हणजे मी केलेला घोटाळा चांगला की वाईट कारण  ब्रह्मज्ञान म्हणजे चांगलेच असणार पण घोटाळा चांगला कसा असणार असा प्रश्न विचारून आईचे "चल फाजिल कुठला" हे ब्रह्मवाक्य ऐकून  पळ काढणे एवढेच माझ्या हातात होते.
      त्यानंतर एका  अद्भुत कथेत एक ब्रह्मराक्षस भेटला तर मुंजीत एकदम भलत्याच ठिकाणी ब्रह्म भेटले ते म्हणजे जानव्याला मारतात ती गाठ तिला ब्रह्मगाठ म्हणतात.असे कळले.व जी कधीच सोडवता येत नाही ती ब्रह्म गाठ हे त्यावेळी कळले  पुढे जेव्हां जेव्हां ब्रह्म या शब्दाला अडखळलो तेव्हा त्याचा जोडशब्दच महत्वाचा आहे असे मानत गेलो उदाहरणार्थ "लोकां सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा पाषाण" या म्हणीतील ब्रह्मज्ञान म्हणजे काहीतरी शहाणपणाचा प्रकार असेल असेच मी समजून चाललो   
          याहूनही इतर बरेच गहन प्रश्न त्या काळात माझ्या बालबुद्धीला सतावत असल्यामुळे वाटीभर ब्रह्मासाठी जीव आटवण्याची आवश्यकता भासली नाही.त्या वयात हा प्रश्न पडायचे कारणही नव्हते  शिवाय वडील आणि शिक्षकांनी ते माझ्या आवाक्यातले काम नाही असे एकदा मला पटवल्यावर  रामरक्षा, भगवद्गीता यांचे पाठांतर झाले तरी ते संस्कृत असल्यामुळे त्यातले बरेच शब्द कळण्याची जशी आवश्यकता नव्हती तसेच "ब्रह्म" शब्दाचे झाले.ब्रह्म हा शब्द ज्याच्या मागे किंवा पुढे लागतो ती त्या प्रकारची उच्च स्थिती समजावी उदा: ब्रह्मानंद किंवा नादब्रह्म व त्यामुळे मोठेपणीही बायकोचा शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य शिवाय मी जे काही करावयास जातो तो ब्रह्मघोटाळा हे तिनेच पढवल्यामुळे ब्रह्माची अधिक चौकशी करण्याचे फारसे मनावर घेतले नाही मुख्य म्हणजे ब्रह्म म्हणजे काय हे न कळताच माझे आयुष्य अगदी सुरळीतपणे चालले होते. "ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या " असे  बऱ्याच ठिकाणी उल्लेखलेले पाहिल्यावर तर एकदा जगच मिथ्या असल्यावर ब्रह्म म्हणजे हे कळून तरी काय उपयोग असा सूज्ञ विचार मी केला. पण माझ्या चौकस मनाला हे जाणून घेण्याई उत्सुकता गप्प बसू देत नव्हती.