ऑगस्ट २०१९

ब्रह्माचा शोध (उत्तरार्ध)

       लहानपणापासून जरी ब्रह्म हा शब्द याप्रकारे कानावर पडत असला तरी हिंदू धर्मातील तत्त्वज्ञान आपल्याला एक हिंदू म्हणून माहीत हवे असे वाटून गीता ज्ञानेश्वरी व दासबोध या ग्रंथांचे व काही उपनिषदांचे वाचन केल्यावर ब्रह्म म्हणजे बरेच काही आहे त्याचे अनेक प्रकारही आहेत असे दिसून यायला लागले . चतुर्दश ब्रह्मनिरूपण या दासबोधातील सातव्या दशकातील तिसऱ्या समासात श्रोत्यांना सावधान होऊन ब्रह्मज्ञान सांगतो असे सांगून श्रीसमर्थ रामदास अनुक्रमें १)शब्द २)मीतिकाक्षर (ॐ)  ३)खं ४)सर्व ५)चैतन्य ५)सत्ता ७)साक्ष ८)सगुण ९)निर्गुण१०)वाच्य ११)अनुभव१२)आनंद १३)तदाकार १४)अनुर्वाच्य अशी चौदा ब्रह्मे सांगतात. तरी मूळ ब्रह्म मात्र अज्ञातच रहाते कारण याच समासात समर्थ सांगतात,"पदार्थ ऐसा ब्रह्म नव्हे ।मा ते हातीं धरून द्यावे । असो हे अनुभवावें । सद्गुरुमुखें ॥५२॥
     एकूण ब्रह्माचा अर्थ देताना वापरण्यात आलेल्या शब्दरचनेत शेवटी ते अज्ञातच रहाते(असे मला वाटते) उदा तैत्तरिय़ोपनिषदातील पहिल्याच प्रकरणात उल्लेख आहे तो असा,
वरुणाचा पुत्र भृगु आपल्या पित्यापाशी"हे भगवन् मला ब्रह्माचा बोध कर" असे म्हणत गेला,त्याला पिता असे म्हणाला, "शरीर,प्राण,चक्षु,श्रोत्र,मन,वाक् ही ब्रह्माच्या ज्ञानाची द्वारे आहेत."त्याला पुढे तो म्हणाला ,"ज्याच्यापासून ही भूते उत्पन्न होतात,उत्पन्न झालेली ज्याच्या योगाने जिवंत रहातात,लीन होताना ज्यात प्रविष्ट होतात त्याला विशेषत: जाणण्याची इच्छा कर ते ब्रह्म आहे"
म्हणजे परत ब्रह्म काय हे जाणण्याची जबाबदारी वरुणाने भृगूवरच टाकलेली दिसतेय. तैत्तरीयोपनिषद जवळजवळ पूर्णपणे ब्रह्मालाच वाहिले आहे तीच गोष्ट केनोपनिषदाची 
त्यातही
 यद्वाचानभ्युदितं येन वागभ्युद्यते ।
तदेव ब्रह्म त्वं विद्धि नेदं यदिदमुपासते ॥४॥
वाचा उच्चारि ना ज्याला शब्द उच्चार ज्यामुळे  
जाण तेची असे ब्रह्म न जे जेथ उपासती ॥४॥(मराठी अनुवाद माझा)
या पद्धतीने सर्व ज्ञानेंद्रिये ज्याला जाणत नसतात पण ज्याच्यामुळे ती इंद्रिये कार्य (म्हणजे ब्रह्म काय हे जाणण्याव्यतिरिक्त कान ऐकण्याचे,डोळे पहाण्याचे इ.) करतात ते ब्रह्म या पद्धतीने ब्रह्माची व्याख्या केलेली दिसते.अर्थात अशी कबुलीच उपनिषदाने दिल्यावर ब्रह्म काय हे मला म्हणजे माझ्या ज्ञानेंद्रियांना कळण्याची शक्यताच मावळते.
      प्रश्नोपनिषदात ब्रह्म हा शब्द दोनच ठिकाणी येतो.प्रश्नोपनिषदाचे स्वरूप सहा ऋषींनी विचारलेले प्रश्न व त्यांची पिप्पलाद ऋषींनी दिलेली उत्तरे अश्या प्रकारचे आहे.त्यातील तिसरा प्रश्न 
अथ हैनं कौसल्याश्चाश्वलायन: पप्रच्छ ।भगवन्कुत एष प्राणो जायते कथमायात्यस्मिञ्छरीर आत्मानं वा प्रविभज्य कथं प्रातिष्ठिते केनोत्क्रमते कथं बाह्यमभिधत्ते कथमध्यात्ममिति ॥१॥
त्यानंतर आश्वलायन कौसल्य याने त्याना विचारले,"भगवान,हा प्राण कोठून जन्मला,तो या शरीरात कसा आला,आणि पंचेंद्रियात स्वत:स विभागून तेथे कसा वास्तव्य करतो.तो शरीरास सोडून बाहेर कसा जातो व बाह्य व आंतर जगामध्ये कसा वास करतो?
तस्मै स होवाच अतिप्रश्नान् पृच्छसि ब्रह्मिष्ठोऽसीति तस्मात्तेऽहं ब्रवीमि ॥२॥
 यावर ते त्याला म्हणतात,"अवघड प्रश्न विचारला आहेस (संस्कृत अर्धवट जाणणाऱ्यास "फारच प्रश्न (अतिप्रश्न)विचारतोस बुवा असा अर्थ आहे असे वाटायचे)पण ब्रह्माविषयी तुला तीव्र जिज्ञासा आहे म्हणून उत्तर देतो" (अलीकडील दूरदर्शन वाहिन्यांवरील मुलाखत असेल तर उत्सवमूर्ती अश्या प्रश्नावर प्रथम,"चांगला प्रश्न विचारलास " असे स्मितहास्य करून म्हणतात तेव्हां खरे तर प्रश्नकर्त्याला समुद्रात बुडवून टाकायला हवे हा विचार त्याच्या मनात असतो.) पण असे म्हणाले तरी शेवटपर्यंत ते ब्रह्माविषयी चकार शब्द काढत नाहीत.ते उत्तर वाचून काय जो निष्कर्ष निघेल ते ब्रह्म असे असले तरी तरी मला ते समजले नाही.
आश्वलायन हा ऋग्वेदाचा विद्वान अध्यापक आहे.असा शिष्य अतिशय अभ्यासू वृत्तीने भगवन्ताकडे म्हणजे परमगुरूकडे जाऊन विचारतो,
नेहमी सत्वगुणी सत्पुरुष ईश्वरभक्त ज्या गूढ व श्रेष्ठ ब्रह्मविद्येचा शोध घेतात तिचे मला ज्ञान द्यावे.तिच्यामुळे अविलंबाने पापमुक्ति होऊन विद्वान परमेश्वरास (परात्पर पुरुषास ) प्राप्त करतात.
त्यावर पितामह त्याला म्हणतात,"ज्या ज्ञानाची तू अपेक्षा करतोस ते तुला श्रद्धा,भक्ति आणि ध्यानयोग यांच्या एकत्रिकरणाने मिळ्वायचे आहे.कोठल्याही कर्माने,कोणाच्या सहाय्याने अथवा धनाने ते अमृतत्व तुला मिळणार नाही.ती अवस्था स्वर्गीय सुखाच्या पलीकडील आहे  आणि स्वत:च्या बुद्धीच्या गुहेत ती गुप्तरूपात वसत असते.जी तुझ्या बुद्धीस प्रकाशमान करते.जिची यतिजन अपेक्षा करतात.परमेश्वराच्या प्राप्तीसाठी अथक परिश्रम वेदान्त विज्ञान जाणणारे,संन्यासयोगाने पूर्ण श्रद्धा,ध्यानयोग यामुळे अन्त:करण शुद्ध झालेले ,अमरत्व प्राप्त करणारे व मोक्ष प्राप्ती झालेले आपल्या शरीराच्या अंतकाली आपल्या कर्मापासून मुक्त होतात.
यत् परं ब्रह्म सर्वात्मा
विश्वस्य आयतनं महत् ।
सूक्ष्मात् सूक्ष्मतरं नित्यम्
तत् त्वं एव त्वमेव तत् ॥१६॥ 
या पद्धतीने जे सर्वत्र आहे,सर्वांच्या आत्म्यात आहे आणि जे तू आहेस ते सर्व ब्रह्म आहे असे सांगून ठेवले आहे.
   ईशोपनिषदात मात्र ब्रह्म हा शब्द आलेला नाही पण त्यातील पहिलाच श्लोक जो शान्तिपाठही आहे तोच ब्रह्माचेच वर्णन करतो असे म्हणता येईल,
ॐ पूर्णमद: पूर्णमिदम् पूर्णात् पूर्णमुदच्युते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥ॐ शान्ति: शान्ति: शान्ति:
हा शान्तिपाठ बृहदारण्यकोपनिषदातून घेतला आहे.पूर्णत्वाचा विचार यातून प्रकट होतो.ते पूर्ण आहे.तेच ब्रह्म आहे.हे (इदम्)जग पूर्ण आहे.या पूर्ण ब्रह्मातूनच इदम् चा जन्म झाला आहे.असा पूर्णातूनच पूर्णाचा जन्म झाला आहे.तरीही मूळचे पूर्ण पुन्हा पूर्णच अवशेष उरते.
      या पद्धतीने पाहिल्यास ब्रह्म म्हणजे काय हे समजल्यासारखे वाटते समजले असते असे नव्हे.

Post to Feed
Typing help hide