ऑगस्ट २०१९

ब्रह्माचा शोध ( निष्कर्ष ?)

 राहुल सांकृत्यायन यांचे "व्होल्गा ते गंगा " हे पुस्तक वाचल्यावर मात्र आपण हा सगळा खटाटोप उगीचच करतोय असे वाटू लागले.राहुल सांकृत्यायन यांचे मूळ नाव केदारनाथ पांडे त्यावेळच्या उत्तर प्रदेश मधील आझमगडमधील भूमिहार ब्राह्मण कुटुंबात जन्मून नंतर स्वामी दयानंद सरस्वतींचे अनुसारी म्हणजे आर्य समाजिस्ट व शेवटी बौद्ध धर्म स्वीकारून सांकृत्यायान झालेले.दररोज ते संस्कृत भाषेत दैनंदिनी लिहीत. "वोल्गासे गंगातक " हे मूळ हिंदी भाषेत लिहिलेले पुस्तक बहुतेक प्रमुख भारतीय भाषा व इंग्रजीत अनुवादित झाले आहे.
      या कादंबरी स्वरुपात लिहिलेल्या पुस्तकात आर्यांचे वोल्गा (रशिया) नदीच्या तीरापासून गंगेच्या (भारत)तीरापर्यंत झालेल्या स्थलांतराचा पट उलगडला आहे.( लो.टिळकांनीही ’आर्क्टिक होम ऑफ द वेदाज्‍ ’मध्ये आर्यांचे उगमस्थान उत्तर धृवाजवळ असावे असा निष्कर्ष काढला आहे.त्याचा आरंभ गीतेतील ’मासानां मार्गशीर्षोहं ----- " या श्लोकातून त्याना सुचला. असे त्यानी म्हटले आहे)  वोल्गा से गंगातक या पुस्तकाच्या मराठी अनुवादातील पृ.९४ वरील आठव्या "प्रवाहण" या प्रकरणापर्यंत मूळच्या रानटी टोळीसदृश वसाहतींचे संक्रमण होत त्यातील वरचढ झालेल्या टोळ्यांनी स्वत:कडे कसे उच्चवर्णीयत्व घेतले त्यातूनच इंद्रादि देवतांची निर्मिती व पूजा यांची परंपरा कशी निर्माण झाली,या उच्चवर्णीयांनी आपले वर्चस्व टिकवण्यासाठी यज्ञसंस्था व त्यातून या देवतांचे माहात्म्य यांचा कसा वापर केला याचे रेखाटण केले आहे आठव्या प्रकरणातील प्रवाहण हा या उच्चवर्णीयांचा प्रतिनिधी व लोपा ही त्याची प्रेयसी. प्रवाहण व लोपा ब्राह्मण आहेत पंचाल पूरच्या राजसिंहासनाचा  अधिकारी आहे.व तिन्ही वेद व सर्व विद्याध्ययन लवकरात लवकर संपवून टाकण्याचा त्याचा विचार आहे.पण त्याच बरोबर विद्या ब्राह्मणांपर्यंतच का मर्यादित आहे असा प्रश्नही त्याला पडतो.शिवाय जटाजूट बाळगण्याची सक्ती त्याला नकोशी वाटते पण लोपाच्या प्रश्नावर उत्तर देताना हे सारं मान प्रतिष्ठा मिळावी म्हणून असे उत्तर देतो त्या काळातही दस्यु (गुलाम) पद्धत होती. (अगदी हरिश्चंद्राच्या तारामतीवरही ती पाळी आली होती.)कुरुराज लोपाच्या वडिलांना गांव गन्ने,हिरण्य,सुवर्ण,दास दासी घोडी रथ दान करतात.आधीच घरी पुरेश्या दास दासी आहेत आता यांना द्यायला काम नाही असे ती म्हणते व पुढे म्हणते,"वाईट याचे वाटते की आम्ही ब्राह्मण आहोत,आम्ही इतरांपेक्षा जास्त शिकलो,ज्ञानी झालो कारण तशा सोयी प्राप्त आहेत येवढेच.मी या दासांचे आयुष्य पहात्ये तेव्हां मला ब्रह्मा,इंद्र,वरुण या साऱ्या देवतांचा तिरस्कार वाटतो.तिटकारा वाटतो मला वसिष्ठ,भरद्वाज,भृगु,अंगिरादि ऋषींचा तिरस्कार वाटतो.तिटकारा वाटतो (कारण वेदात व उपनिषदात यांनी या देवतांच्या स्तुतीचे पाट वाहवले आहेत )तिन्ही वेदांच पठण मी केलं नाही पण समजावताना ऐकले आहे.त्यांच्यात फक्त डोळ्यांना न दिसणाऱ्या वस्तु,लोक व शक्ति यांचा लोभ किंवा भय मात्र दाखवण्यात आलेलं आहे."
      तिच्या या मताशी प्रवाहणास सहमत होणे शक्य नव्हते उलट त्यापुढे तो आपण ब्रह्म ही कल्पना प्रसृत करणार आहोत असे तिला सांगतो व त्याचे कारण देताना म्हणतो," ही राजकारणा वेगळी वस्तु नाही.राज्याला आसरा देण्यासाठीच आमच्या पूर्वजांनी वसिष्ठ विश्वामित्रांना सम्मानित केले.ते ऋषी इंद्र अग्नि आणि वरुण यांच्या नावावर लोकांना राजाज्ञा मानायला प्रेरित करीत असत." यावर लोपा विचारते,"त्यासाठी त्या जुन्या देवता पुरेशा होत्या त्यात या ब्रह्माची भर घालण्याची गरज काय ?"
"पिढ्या लोटल्या तरी  कोणीदेखील या देवता पाहिल्या नाहीत.आता कित्येकांच्या मनात संदेह निर्माण होऊ लागलाय."
"मग ब्रह्म काय संदेहातीत राहील ?"
"ब्रह्मस्वरुप मी असे सांगितले आहे की त्यामुळे कोणीही त्याला बघण्याबद्दल आग्रह धरणार नाही .जे आकाशाप्रमाणे असतं पण दिसत नाही,किंवा ऐकायला येत नाही,जे इथे तिथे सर्वत्र व्यापलेले आहे ते मुळी बघण्याचा प्रश्नच उद्भवत नाही"
"पण तू तर ब्रह्माचे दर्शन व सत्ता याबद्दल बोलत असतोस"
"सत्ता असली तर दर्शन पण व्हायलाच हवं पण इंद्रियांच्या योगे नव्हे कारण मग संदेहवादी त्याचं प्रत्यक्ष प्रमाण मागतील म्हणून मी म्हणतो की त्याच्या दर्शनासाठी दुसरंच सूक्ष्मेंद्रिय असतं व ते इंद्रिय निर्माण करण्याची मी अशी काही साधनं सांगतो की लोक छपन्न पिढ्या भटकत राहतील आणि श्रद्धा पण कायम राखतील.पुरोहितांची स्थूल अस्त्रं निकामी झाली असं पाहून मी हे सूक्ष्म अस्त्र निर्माण केले--------- काही काही ब्राह्मणांना यातील रहस्याचा पत्ता लागला तरी देखील ते माझे हे रहस्य(उपनिषद)आपल्याला फायदेशीर शस्त्र मानतात.--------- आणिक या आकाश ब्रह्मापेक्षा देखील मोठा असा मी दुसरा शोध लावला."
"कोणता?"
"मरून पुन्हा परत जगात येणं पुनर्जन्म " 
"हे तर मोठं मजबूत जाळं दिसतेय"
"आणि सर्वात उपयुक्तही. ज्या ज्या प्रमाणात आम्हा सामंत,ब्राह्मण,व्यापाऱ्यांच्या जवळ अपार संपत्ति एकत्रित होऊ लागली,त्या त्या प्रमाणात साधारण प्रजा निर्धन होऊ लागली या निर्धन कारागिरांना,शेतकऱ्यांना व दास दासींना उत्तेजित करणारे देखील आता दिसू लागले आहेत.ते सांगतात’तुम्ही आपली कमाई दुसऱ्यांना देऊन स्वत: मात्र कष्ट करता.ते तुम्हाला फसवायला सांगत सुटतात की या त्याग,कष्ट दानांच्या योगाने तुम्ही स्वर्गात जाल.कोणी देखील मरून ते स्वर्गसुख पाहिल नाही’ ---याचं उत्तर मी जे देणार ते असे हे असंआहे--’या जगात जे उच्चनीच भेद आहेत ते सर्व पूर्वजन्माच्या कर्मफलामुळे!’ अशा रीतीने आम्ही पूर्वजन्मीच्या सुकृत--दुष्कृताचं प्रत्यक्ष फळ दाखवून देतो.---------एक काळ असा येईल की त्यावेळी साऱ्या दरिद्री प्रजा या पुनर्जन्माच्या भरंवशावर जीवनातील कटुता ,कष्ट आणि अन्याय सहन करण्यास तयार होईल.स्वर्ग व नरक समजावून सांगायला हा किती सोपा उपाय मी काढला." 
"पण आपल्या पोटासाठी शेकडो पिढ्यांना आगीत लोटण्यासारखं होतं हे !"
"वशिष्ठ आणि विश्वामित्रांनी पोटासाठीच वेद रचले,उत्तर पंचालचा राजा दिवोदास यानं काही शबरदुर्ग जिंकले म्हणून त्याच्या विजयावर कविताच कविता रचल्या.( येथे ऋग्वेदातील  ऋचा ६/२६/२५ उद्धृत केली आहे)" 
त्वं तदुक्थमिन्द्र वर्हणा क: प्रयच्छता सहस्रा शूर दर्षि: अव गिरेर्दासं शंबरं हन प्रावो दिवोदासं चित्राभिरुती ॥ 
हे वीर इंद्र, तू ज्या वेळेस लढणाऱ्या हजारो शत्रूंचा वध केलास त्यावेळेस तू स्तुतीचे फल दिलेस.पर्वताच्या दास शम्बराचा तू वध केलास आणि चमत्कारिक साधनानी दिवोदासाला मदत केलीस
        डॉ,सांकृत्यायन यांचे निष्कर्ष सध्याही अनेक बाबा बुवा आणि राजकारणी भोळ्या जनतेला ज्या पद्धतीने लुटताहेत त्यावरून खरे असावेत असे वाटते.या वाचनामुळे माझा ब्रह्माचा शोध घेण्याचा अट्टाहास तरी थांबला असे म्हणावे लागेल.(कारण प्रवाहणानेच ती एक कल्पना आहे असे सांगितले आहे)

Post to Feedनिष्कर्ष चुकीचा असला तरी
धन्यवाद !
ब्रह्माचा शोध कसा घेणार ?
माझे मत
धन्यवाद !

Typing help hide