अष्टावक्र संहिता : ३ : जनकाचा उदघोष!

                                                              अहो अहं, नमो मह्यमेकोअहं देहवानपि ।

                                                             कचिन्नगन्ता नागन्ता व्याप्य विश्वमवस्थित: ॥२ - १२ ॥ 

जनक म्हणतो,  मी आश्चर्यमय आहे  ! मला माझा नमस्कार !  देहधारी असूनही मी  अद्वैत आहे .  कुठेही न जाता, न येता मी विश्वाला व्यापून स्थित आहे !
काय अर्थ आहे याचा ? आपण स्वतःला व्यक्ती समजत असलो तरी आता, या क्षणी ही वस्तुस्थिती आहे.  आपल्याला देहाची जाणीव आहे, आपण देह झालेलो नाही.  आपल्याला आपण देहाच्या आत आहोत असं वाटतंय. वास्तविकात आपण देहाच्या आत आणि बाहेर आहोत, सर्व देह व्यापून आहोत. निराकार अभेद्य आहे कारण ती निर्वस्तू आहे, त्यामुळे आपण अद्वैत आहोत.  
देहाच्या आत आहोत असं वाटल्यामुळे देहाबरोबर आपण ही चालतोय, वावरतोय असा भास होतो; वास्तविकात आपण कुठेही जात येत नाही.  त्यामुळे देहासकट आपण सर्व विश्व व्यापून आहोत !  विश्व आपल्या बाहेर नाही कारण ते जाणिवेचाच भाग आहे आणि जाणीव देहात आहे. जाणिवेचा क्षेत्रात जोपर्यंत काही येत नाही तोपर्यंत ते अस्तित्वातच येत नाही.  भले तो सूर्य असो की पत्नी की आणखी काही. ज्या क्षणी  एखादी गोष्ट जाणिवेचा कक्षेत येते तेव्हा ती देहातच डीकोड होते  (किंवा मेंदूत प्रकट होते); त्यापरता दुसरा मार्गच नाही. आणि देह तर आपण व्यापून आहोत त्यामुळे सारे विश्व आपण व्यापून आहोत. जाणिवेशिवाय विश्वाला प्रकट व्हायला अन्य उपायच नाही.  त्यामुळे जनकाचं विधान साहसी वाटलं तरी ती साधी वस्तुस्थिती आहे. 
                                                                           प्रकाशो मे निजं रुपं नातिरिक्तोअस्म्यहं तत: ।
                                                                           यदा प्रकाशते विश्वं तदाहं भास एव ही ॥ २ - ८ ॥ 
प्रकाश माझे स्वरूप आहे. मी त्याहून वेगळा नाही. जेव्हा विश्व प्रकाशित होते, तेव्हा ते माझ्याच प्रकाशाने प्रकाशित होते. 
जनक पुन्हा तीच गोष्ट वेगळ्या स्वरूपात मांडतो.  प्रकाश माझे स्वरूप आहे,  प्रकाशाचा अर्थ उजेड किंवा अमक्या तमक्याचा प्रकाश असा नाही कारण त्या प्रकाशाला अंत आहे. प्रकाश  म्हणजे जाणिवेची विश्वाला प्रकट होऊ देण्याची क्षमता.  जाणिवेशिवाय काहीही प्रकट होऊ शकत नाही. त्यामुळे जनक म्हणतो विश्व जेव्हा प्रकट होतं ते माझ्याच प्रकाशामुळे प्रकट होतं. प्रत्येक गोष्ट प्रकट होण्यासाठी जाणीव हजर असायलाच हवी, त्यापरता काहीही प्रकट होणं असंभव आहे त्यामुळे हे विश्वसुद्धा माझ्या जाणिवेमुळेच प्रकाशित आहे. 
                                                                             अहो अहं नमो मह्यं, दक्षो नास्तीह मत्सम: ।
                                                                             असंस्पृश्य शरीरेण येन विश्वं चिरं धृत‌म्   ॥ २ - १३॥ 

मी आश्चर्यमय आहे, मला माझा नमस्कार. माझ्यासारखा दक्ष कुणीही नाही. शरीराला स्पर्श न करता  मी सारे विश्व धारण करून आहे.
जनक पुन्हा तीच वस्तुस्थिती वेगळ्या अंगानं मांडतो.  पण या सूत्रात एक फार मोठं रहस्य आहे.  माझ्यासारखा दक्ष कुणीही नाही ! ही दक्षता दिवसा तंद्रा आणि रात्री निद्रा याविरुद्धची स्थिती आहे.  निराकार अद्वैत आहे त्यामुळे अद्वैतातून द्वैत निर्माणच होऊ शकत नाही.  तस्मात तंद्रा आणि निद्रा या दक्षतेविरुद्धच्या स्थिती  वाटल्या तरी  वास्तविकात त्या दक्षतेचं भासमय रूपांतरण आहेत.  निराकारत्व ही दक्षतेची सर्वोच्च स्थिती आहे आणि दगड ही निराकाराची अंतिम निद्रिस्तता आहे.  जाणीव ही  निराकार निद्रिस्त व्हायला लागण्याची प्रथम अवस्था आहे आणि निर्जीव दगड ही जाणिवेचं अंतिम सघनीकरण आहे. मूर्ती दगडाच्या घडवण्यामागे निराकाराची अंतिम निद्रिस्तता दर्शवणं  आहे.  पण लोक जाणीव दक्षतेत रूपांतरित करण्याऐवजी दगडाच्या मूर्तीची पूजा करण्यात धन्यता मानतात. 
जाणिवेचं दक्षतेत रूपांतरण होण्याचा अवकाश की आपण देहापासून वेगळे आहोत आणि देहाला स्पर्श न करता सारे विश्व व्यापून आहोत हा तुमचा अनुभव होईल.