काश्मीरमधील वास्तव

     काश्मीर आणि कलम ३७०चा मुद्दा हा नेहमीच वादाच्या भोवऱ्या त अडकलेला.राजकीय स्वार्थापोटी काश्मीरला धगधगत ठेवणारा याच विषयावर, ‘मुंबई तरुण भारत’च्या प्रतिनिधी योगिता साळवी यांना मुंबईत काश्मिरी पंडित महिलांशी संवाद साधण्याचा योग आला. त्या महिलांचे काश्मीर व कलम ३७० विषयीचे विचार, त्यांच्याच शब्दात  हा लेख घटनेतील अनुच्छेद ३७० रद्द करण्यापूर्वीचा आहे.
कश्मिरी पंडित महिलांशी बोलण्याचा योग आला. त्यातील काही संवाद. त्यांच्यातील एकजण म्हणाली, ‘‘तुम्हाला सांगते मी कामानिमित्त काश्मीरच्या बाहेर असायचे. सुट्टीमध्ये घरी काश्मीरला आले. सासूबरोबर भाजीमार्केटमध्ये भाजी घ्यायला गेले. सब्जी कैसी दी? विचारल्यावर समोरच्या काश्मिरी मुसलमान सब्जीवाल्याने भाजीचा भाव ६० रूपये किलो सांगितला. हा भाव तर सरळ सरळ जास्त होता. पण मनात आले, ‘‘असेल काश्मीरमध्ये महागाई.‘‘ इतक्यात एका बुरखा ओढलेल्या महिलेने भाजीचा भाव विचारला तर तिला त्याने भाजीचा भाव ३० रू किलो सांगितला. मी सासूला विचारले, ’’हिला ३० रू किलो आणि आपल्याला ६० रू किलो असे का?’’ सासू मला विनवू लागली, ’’गप्प बसं, हे काश्मीर आहे. आता ते त्यांचे आहे. ते आपल्याला ‘बाहेरचे’समजतात. म्हणून आपल्याला जास्त दराने वस्तू विकतात.’’
पुढे ती सांगू लागली, ’’तुम्हाला माहिती आहे का? काश्मीरमध्ये त्यावेळी हिंदू महिलांना मोठी बिंदी लावण्याची सक्ती केली होती. म्हणजे लोकांना कळावे की, ही हिंदू स्त्री आहे, मुस्लीम नाही. मग ती हिंदू आहे हे ‘आयडेंटीफाय’ झाले की, तिच्याशी कसे वर्तन करायचे, याची आपोआपच खूणगाठ समोरच्याकडून बांधली जायची. तुमच्यासोबत कधी काय होईल, याची शाश्वचती नाही. या गोष्टी १९९० पूर्वीच्या. त्यावेळी मीडिया इतका ‘फास्ट’ नव्हता. आता जर अशी परिस्थिती असती तर कदाचित लोकांना पटकन कळली असती. पण सांगू शकत नाही, आताही तसेच असेल, पण घाबरून कुणी उघडपणे काही बोलत नसेल,’’ असे म्हणून ती काश्मिरी महिला गप्प बसली.
एकजण म्हणाली, ’’आम्ही असे देशभर विस्थापित झालो, तर लोक बोलतात तुम्ही भित्रेभागूबाई आहात.’’ ‘‘तुमच्यावर होणार्या  अन्यायाला तुम्ही विरोध का केला नाही?’’ त्यावर ती महिला म्हणाली, ‘‘पण इथे आम्ही काश्मीरमध्ये अल्पसंख्यक आहोत. त्यावेळी आजुबाजूच्या प्रार्थनास्थळांमधून मोठमोठ्या आवाजात आम्हाला घर सोडून जायला सांगितले गेले. आमच्या दरवाजावर पेन्टने रंगवले गेले, काफिरो अपनी जायदाद और औरत-बेटिया छोडके चले जावो. ही केवळ एक पोकळ धमकी नव्हती. कारण काश्मीरमध्ये आमच्या नात्यातल्या, ओळखीच्या कितीतरी बायकामुलींची अब्रू लुटून त्यांचा खून झाला होता. किड्या-मुंग्यांसारखी माणसे मारली जात होती. मग आम्ही काय करणार? कोणाच्या सहाऱ्यावर तिथे राहणार?’’
एकजण म्हणाली, ’’आमची शोकांतिका इथेच सपंत नाही. आम्ही रातोरात आमचे जानसे प्यारा काश्मीर सोडले. पण, आमचे घर काश्मीरमध्येच राहिले. इथे आल्यावर काश्मीरमधल्या आमच्या शेजाऱ्याला फोन केला. घराकडे लक्ष ठेवा सांगू लागलो. तेव्हा शेजाऱ्याने सांगितले, तुमचे घर जिहादींनी पूर्ण लुटले. खरं तर त्यांनी नुसते घरचं लुटले नव्हते तर लुटल्यानंतर जाळूनही टाकले होते. काफिरांची एकही आठवण नको म्हणून. विशेष म्हणजे विस्थापित झाल्यानंतर आम्ही आता कुठे आहोत, याचा ठावठिकाणा आम्ही काश्मीरमध्ये कोणालाही सांगितला नव्हता. पण, आमचा पत्ता कोणालाही सांगितला नसतानाही, एक दिवस काश्मीरहून दोनजण आम्हाला भेटायला आले. अर्थात तेही मुसलमान होते. त्यांनी अमन, शांती, भाईचार्यालच्या गोष्टी केल्या. आमच्या दु:खदायक परिस्थितीवर अक्षरश: हुंदके देऊन शोक व्यक्त केला आणि नंतर हलकेच म्हणाले, पंडितजी तुम्ही तर परत कधी काश्मीरला येणार नाही. मग तुमच्या घराचं काय? विकून टाका आम्हाला. आम्ही म्हणालो, शक्य नाही! लुटलं असेल, जाळलं असेल तरी घराची जागा,जमीन तर आमची पुशतैनी आहे. जरा शांत झाला की, आम्ही पुन्हा येऊ तिथे आणि समजा दुर्दैवाने आम्हाला परत काश्मीरमध्ये जाता आले नाही तरी आम्ही आमचे पुशतैनी घर कोणालाही देणार नाही. कितीही किंमत दिली तरी! यावर ते दोघे शांतपणे म्हणाले, जेवढे मिळतात तेवढे तरी घ्या. कारण उद्या तुमच्या घरातल्या एखाद्या मेबंरचा रस्त्यात अपघात होऊ शकतो. काहीही होऊ शकते. अख्या फॅमिलीचेही काहीही होऊ शकते. जमाना खराब आहे. उद्या अल्ला न करे सगळ्यांना काही झालं तर त्या घराचे काय? असचं बेवारशी? नाही का? ही खरं तर धमकीच होती. आम्ही काश्मीरमध्ये हिंसा, रक्तपात, निर्दयता पाहिली होती. अशाच थंड, शांत स्वरूपातल्या कुणालाही कळणार नाही, अशा सुचनावजा धमक्या आम्हाला नवीन नव्हत्या. आपलं काहीही झालं तरी माणसाला काही वाटत नाही, पण बात जेव्हा मुलाबाळांवर येते, तेव्हा सगळी शेरदिली संपते. जी माणसं पाळत असल्यासारखी काश्मीरच्याबाहेर आम्हाला शोधून काढून आमच्याच घरात आम्हाला धमकी देऊ शकतात, ते काहीही करू शकत होते. आम्ही मुकाट्याने करोडोचे घर कवडीमोलात विकले. नंतर म्हणे, अशा गोष्टी सरकारच्या कानावर गेल्या आणि पंडितांना धमकवून कोणी घर विकत घेऊ नये, म्हणून सरकारने काश्मिरी पंडिताच्या घर खरेदी-विक्रीला बंदी आणली. तुम्हाला वाटेल इथे सगळे आलबेल झाले असेल, पण आता समोरच्या निर्दयी लोकांनी नवीन चाल खेळणे सुरू केले आणि ती त्यांच्यासाठी फारच फायद्याची होती. ते आता आमच्याकडून घर विकत घेत नाहीत. तर हिंदू घरमालकांकडून धमकावून ‘पॉवर ऑफ ऍटर्नी’ करून लिहून घेतात की, आम्ही आमच्या मर्जीने, पूर्ण होशोहवासमध्ये माझे घर, जमीन, घरातील सर्व वस्तू यांचे पूर्ण हक्क अमुकअमूकला दिले आहेत. आता तुम्हीच सांगा हक्क दिले म्हणजे कायद्याने ते आमच्या घराचा, जमिनीचा फुकटात वापर करतात. त्यांच्या विरोधात आम्ही काही करू शकत नाही.‘’
काही काश्मिरी लोक इथे मेहनतीने उद्योगधंद्यात स्थिरावले आहेत. त्यातल्या एका महिला उद्योजिकेचा अनुभव तर वेगळाच. ती म्हणते, ’’दोन वर्षांपूर्वी एक काश्मिरी युवती माझ्या कंपनीत अप्रेंडिसशीपसाठी अर्ज घेऊन आली. एकटी पोर, त्यातून आपल्या काश्मीरची. म्हणून मी तिची अप्रेंडिसशीप मंजूर केली. मी सहसा काश्मीरच्या आठवणी काढत नाही. कारण, मनाला वेदना होतात. पण,एका दुपारी ती मुलगी माझ्या केबिनमध्ये आली आणि मॅडम आपने काश्मीर क्यो छोडा, वगैरे बोलू लागली. मला तिचे कौतुक वाटले. किती निरागस मुलगी आहे. पण काम असल्यामुळे मी तिला म्हटले, बाळा नंतर बोलू ऑफिसात हा विषय नको. थोड्याच दिवसात काहीएक न कळवता तिने अप्रेंटिसशीपही मधूनच सोडली. मी हा विषय विसरून गेले. पण एक दिवशी टिव्हीवर ’आझाद काश्मीर’ या विषयावर बरखा दत्तचा कार्यक्रम होता आणि मला धक्का बसला. कारण हीच ती निरागस १९-२० वर्षांची सुंदर मुलगी आझाद काश्मीरचा झेंडा फडकवत काश्मीर आणि काश्मिरी मुसलमानांच्या हक्काच्या घोषणा देत होती. तिच्या नजरेत तोच जिहादी खुनशीपणा होता. देवा ही मुलगी माझ्या ऑफिसात कामाला? पुढे मी एका सेमिनारला गेले तर हीच मुलगी व्यासपीठावर ‘आजचा काश्मीर’विषयावर बोलायला बसलेली. अर्थात तिने आझाद काश्मीर, काश्मीरचे चांगले मुसलमान, मीडिया कसे त्यांचे वाईट चित्र रंगवते,भारतीय सैन्य तेथील लोकांशी वाईट वागते वगैर वगैरे रंगवून सांगायला सुरवात केली. तिथे जमलेल्या एका हिंदू पंडित स्त्रीने या सेमिनारला आक्षेप घेतला. कार्यक्रम संपला. ती मुलगी सभागृहाबाहेर आली. मीही तीच्या पाठी आले. तिला घ्यायला एक गाडी आली होती. त्यातून एक तरूण उतरला आणि ती त्या तरूणासोबत गाडीत बसू लागली. त्या तरूणाला पाहून तर मला काय करावे सुचेना. तो तरूण एका प्रतिष्ठित हिंदू घरचा होता. काही दिवसातच तो सैन्यामध्ये एका मोठ्या पदावर रूजू होणार होता. ही म्हणे त्याची खास मैत्रिण होती. मी तिला थांबवले. मला पाहून ती नजर चुकवू लागली. मी म्हणाले, ती तूच ना माझ्याकडे अप्रेंटिसशीपला होतीस. तू आझाद काश्मीरवाली आहेस? माझे बोलणे एकून तो तरूण चपापला. नही आंटी, आपको कुछ गलत फेहमी हुयी है, ये एसी नही है, वगैरे तीची बाजू घेऊन बोलू लागला. म्हणजे तिने त्यालाही अंधारात ठेवले होते.
     या उद्योजिकीचे बोलणे ऐकून मलाच काय कोणत्याही सूज्ञ माणसाला प्रश्नठ पडतील की, काश्मीरहून एक अतिसुंदर मुलगी येते काय?साध्या अप्रेंटिसशीपसाठी अर्ज करते काय? आणि तेही बरोबर एका काश्मिरी विस्थापिताकडेच अर्ज करते. काही न सांगता ऑफिस सोडते काय? आणि दोन-तीन महिन्यांत मुंबईच्या अतिअती उच्चभ्रू वर्तुळात प्रवेश मिळवून व्याख्यान बिख्यान देण्याची संधीही मिळवते. तिच्या उपजीविकेचे साधन काय? तिला अशा संधी मिळतात कशा? आणि तिने मैत्रीही केली ती सैन्यात उच्च पदावर जाणार्या? तरूणाशी? म्हणजे आपल्या मुंबईतही या लोकांची पाळेमुळे किती खोलवर रूजली गेली आहेत?
      अशाच प्रकारे मुंबईच्या उच्चभ्रू वस्तीत एक सेमिनार होते. सेमिनारला तथाकथित समाजवादी, विचारवंत, मानवतावादी, धर्मनिरपेक्ष वगैरे वगैरे उच्चभू् लोक उपस्थित होते. सेमिनारचा विषय होता, काश्मीर! सेमिनार सुरू झाला, पहिले सत्र संपले आणि प्रश्नि विचारण्यासाठी विशीतली अतिसुंदर मुलगी उभी राहिली. अतिशय गोड आणि नम्र स्वरात ती म्हणाली, ’’पण, काश्मीर हे स्वतंत्र आहे ना? म्हणजे काश्मीरला विशेष दर्जा आहे ना? म्हणजे काश्मीर इतर भारतीय राज्यांपेक्षा वेगळे आहे. स्वतंत्र काश्मीर यावर आपण बोलले पाहिजे.’’ यावर व्यासपीठावर बसलेल्या तथाकथित विचारवंतांनी त्यांच्या आंग्रळलेल्या स्वरात ’ओह या या’ असे म्हणून माना डोलावल्या. त्यावेळी श्रोत्यांमधून एक महिला उठली आणि म्हणाली, ’’आपण सार्वभौम भारतात आहोत. १९४७ साली राजा हरीसिंगांनी भारतात काश्मीरचे विलीनीकरण केले,त्याला जमाना झाला. ज्या अधिकारात जुनागढ, ग्वाल्हेर, हैदराबाद, नागपूर वगैरे संस्थाने आपल्या भारताचे अभिन्न अंग झालेत, त्याच अधिकारात काश्मीरही भारताचे अभिन्न अंग आहे. राजा हरीसिंगांनी विलीनीकरणाच्या ज्या मसुद्यावर सही केली, त्यात मुळातच लिहिले होते की, कोणत्याही कारणाने, सबबीवर काश्मीरचे भारतातले विलीनीकरण रद्द करण्याचा हक्क कोणालाही नाही. मग इतक्या वर्षांनंतर मुंबईसारख्या शहरात काश्मीर भारतातचे अभिन्न अंग आहे की नाही या, मुद्द्यावर जर सेमिनार होत असेल तर ते होऊच नये. माझा या मुद्द्याला तीव्र आक्षेप आहे आणि माझ्या मते तर अशा विषयावर सेमिनार होत असेल तर ते सेमिनारही देशद्रोही सेमिनार आहे.’’ संतापाने, भावनातिरेकाने तिच्या डोळयात अश्रू जमा झाले होते. ती बोलायची थांबली आणि श्रोत्यांनी उत्स्फूर्तपणे टाळयांचा कडकडाट केला. सेमिनारच्या आयोजकांनी क्षमा मागितली.
मनापासून भारतीय असलेल्या या काश्मिरी पंडित महिलेचे नाव आहे शक्ती मुन्शी. मुन्शी सांगतात, ’’मी भारतीय आहे. काश्मिरी आहे,याचा मला जाज्वल्य अभिमान आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्याबद्दल फारच सकारात्मक आणि मानवी भूमिका घेतली आहे. भारतात इतक्या वर्षाने काश्मिरी पंडितांच्या हक्काची भाषा बोलणारे कोणीतरी सत्ताधारी आले आहेत. यामुळे दिलासा वाटतोय. माझ्या काश्मिरी पंडित म्हणून काही सुचना आहेत - पिढ्यानपिढ्यांचा वारसा असणारे आमचे काश्मीरमधील घर, आमचे असणे हा आमचा हक्क आहे. मला काश्मीरमध्ये सरकारने घर दिले तर मी तिथे कायम वास्तव्य करावे की गरजेनुसार राहावे हे भारतीय नागरिक असल्याने माझ्या निर्णयावर आहे. तसेच, १९४७ साली पश्चिरम पाकिस्तानातून हजारो हिंदू निर्वासित काश्मीरमध्ये आले. फारूख अब्दुल्लांनी त्यांना सीमाभागात वसविले, जेणेकरून भूभाग अडला जाईल. भूभागाचे संरक्षण होईल आणि तिथे घुसखोर येणार नाहीत. तेव्हापासून तिथे वसलेले हिंदू, हे भारताचे नागरिक आहेत. पण, काश्मीरच्या विशेष दर्जामुळे १९४४ साली जे काश्मीरमध्ये राहात होते,तेच नागरिकांचा दर्जा प्राप्त करू शकतात. त्यामुळे या १९४७ साली भारतात आलेल्या विस्थापित हिंदूंचे हाल होत आहेत. तिसरे असे की, काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांना नोकरीमध्ये आरक्षण आहे. पण, आरक्षणाअंतर्गत एकदाच सरकारी नोकरी मिळू शकते. जर पहिली सरकारी नोकरी सोडली तर दुसरी नोकरी मिळणार नाही. हा कसला अजब कायदा?‘‘ मुन्शी म्हणत होत्या, ‘‘नोकरीचा विषय निघालाय तर मी स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना खूप धन्यवाद देते. महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार असताना त्यांनी आम्हा काश्मिरी पंडितांसाठी सरकारी नोकर्यां मध्येही आरक्षण लागू करण्यासाठी आदेश दिले. काश्मिरी पंडिताना बाळासाहेबांचा खूप आधार होता. आता नरेंद्र मोदींमुळेही काहीतरी सकारात्मक होईल असे वाटते.’’
त्यानंतर विषय निर्वासितांच्या छावण्यांचा निघाला. यावर बहुतेकांचे म्हणणे असे की ’’आपल्याच देशात निर्वासितांचे जगणे जगणार्याा काश्मिरी पंडिताचे संक्रमण शिबीर म्हणजे काश्मिरी पंडितांच्या जखमांवर चोळलेले मीठ आहे. अपुर्याक सोयीसुविधा, आम्हाला शिबिरात दिलेली छोटी घरे आणि त्यातून राहणारी एकाच कुटुंबातील तीन-तीन पिढ्यांची माणसं. भयानक परिस्थिती, खुराड्यातल्या कोंबड्यासारखे जगणे. त्यामुळे नेहमी शांत असलेले काश्मिरी पंडित इथे आपसात भांडताना दिसतात. घटस्फोटाचे प्रमाणही वाढले आहे. सगळ्यात भयानक म्हणजे, या सगळया ताणतणावांमुळे काश्मिरी पंडित महिलांची मासिकपाळीही वेळेआधी बंद होत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात काश्मिरी पंडित नामशेष होतील. आमच्या वंशाची शुद्धता कालौघात गौण आहे. पण काही वर्षांनी शुद्ध काश्मिरी वशांची व्यक्ती सापडणे दुर्मिळ असेल.’’
एकंदर काश्मिरी पंडिताची स्थिती दुर्दैवी आहेच, पण तरीही हे पंडित सुशिक्षित आहेत. माता सरस्वतीचा त्यांच्यावर वरदहस्त आहे. त्यामुळे काश्मीर सोडल्यानंतरही त्यांना इतरत्र बाहेर नोकरी मिळाली. पण १९४७ साली पाकिस्तानातून जे हिंदू निर्वासित झाले, ते मुख्यत: मागासवर्गीय होते. वाल्मिकी समाजाचे होते. त्यांना काश्मीरच्या ३७० कलमामुळे ना नागरिकत्वाचा दर्जा मिळाला ना आरक्षण मिळाले, ना शिक्षणाच्या, रोजगाराच्या संधी. ते बिचारे गरिबीमुळे, अज्ञानामुळे आहेत, त्या परिस्थितीत जगत आहेत. त्यांचा रोजगार काय तर संपूर्ण काश्मीरची सफाईची चतुर्थ श्रेणीची कामे करणे. त्यापलीकडे त्यांना रोजगाराच्या संधी नाहीत. इतकेच नव्हे तर, १९५६ साली जम्मू-काश्मीरचे तत्कालिन पंतप्रधान बख्शी गुलाम मोहम्मद यांनी पंजाबहून जम्मूच्या सफाई सेवेसाठी ६० वाल्मिकी कुटुंबांना आणले होते. आज त्यांची जवळ जवळ ६०० कुटुंब आहेत. पण आजही ते काश्मीरमध्ये ‘नागरिक’ नाहीत. ते कितीही शिकले तरी ते सफाई कामगार म्हणूनच काम करू शकतात. काश्मीरमधील दलित बांधवांची स्थिती अतिशय दयनीय आहे. मनात आले अरे कुठे गेले मानव अधिकारवाले? संपूर्ण भारतभर दलितांसाठी लढणार्याी अगणित संस्था, राजकीय पक्ष आहेत. त्यांना २१व्या शतकातील काश्मीरमधल्या दलितांची वेदना दिसत नाही का?
काश्मीरमधील दलित बांधवाच्या दयनीय स्थितीलाही खरे कारणीभूत आहे कलम ३७०. हे सगळे माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य होत आहे, कलम ३७०च्या आडून. त्यामुळेच काश्मीरमधील दलितांना आरक्षण आणि मूलभूत नागरिकत्वही मिळू शकत नाही. काश्मीरला कलम ३७० लागू करण्यामागे काही तात्कालिक आणि अस्थायी धोरण होते. त्यावेळी नुकताच देश स्वतंत्र झाला होता. भारत-पाकिस्तान युद्ध सुरू होते. थोडी फार अंतर्गत बंडाळी सुरू होती. म्हणून १७ ऑक्टोबर १९४९ रोजी गोपालस्वामी अय्यंगार यांनी कलम ३७० कलमाची मांडणी केली. असे म्हणतात की, या कलमाची भलावण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी करावी म्हणून जवाहरलाल नेहरूंनी काही प्रतिनिधींना बाबासाहेबांकडे पाठवले. तेव्हा बाबासाहेब या ३७० कलमाबद्दल म्हणाले, ’’तुम्ही म्हणता की, भारताने काश्मीरचे रक्षण करावे. काश्मिरींना भारतामध्ये भारतीयांप्रमाणे समान हक्क असतील. पण भारताला आणि भारतीयांना काश्मीरमध्ये काही हक्क नसतील? मी माझ्या देशाशी, भारताशी होणार्याा कोणत्याही धोक्याला, विश्वातसघाताला कधीही समर्थन करणार नाही.’’
थोडक्यात बाबासाहेब आंबेडकरांचा या ३७० कलमाला विरोध होता आणि या कलमाला ते देशाचा विश्वाेसघात मानत. पण कमाल वाटते ती एका गोष्टीची की, मागच्यावेळी केंद्रात शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेणारे कॉंग्रेस सरकार होते आणि त्यांनी म्हणे काश्मीरमध्ये शांती, स्थैर्य, सुख निर्माण व्हावे यासाठी २०१० साली एक अभ्यास समिती नेमली. त्यात पत्रकार दिलीप पाडगावकर,माजी केंद्रीय सुचना आयुक्त एम. एम. अन्सारी आणि राधाकुमार होते. २०१२ साली त्यांनी १७६ पानांचा अहवाल सादर केला. त्या अहवालाचा बहुतेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात आला. कारण, या अहवालातील काही चर्चित कलमे होती
१. काश्मीरमध्ये तैनात असलेल्या सैन्य व अर्धसैनिकी दलाच्या संख्येत कपात करावी. सैन्याला दिलेले विशेषाधिकार तत्काळ रद्द करावे.
२. राजनैतिक कैद्यांना सोडून द्यावे.
३. छोटे आणि ज्यांनी पहिल्यांदा अपराध केला आहे, अशा गुन्हेगारांना सोडून द्यावे.
४. कलम ३७० पुढे ‘अस्थायी’ शब्द आहे तो काढून टाकावा.
आणि इतरही अशीच बरीच कलमे. आपण जरी राजकीय पंडित नसलो तरी या कलमांचा आणि काश्मीरमध्ये झालेल्या, चाललेल्या हिंसाचाराचा संबंध काय आहे? हे आपल्याला कळते. सैन्य कमी करा, काश्मीरात आझाद काश्मीरच्या नावाने हैदोस करणार्याप राजकीय गुन्हगारांना सोडा, अपराध्यांना सोडा कशासाठी? आणि जे ३७० कलम हटावे म्हणून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींनी बलिदान दिले, त्या ३७० कलमाच्या समोरील ‘अस्थायी’ शब्द हटवून ते कलम कायम करण्याचा घाट या समितीचा का? अनेक प्रश्ना या अहवालामुळे निर्माण झाले. आताही भाजपा सरकारने काश्मिरी पंडितांना काश्मीरमध्ये वसण्याची संधी दिली आणि ती संधी एकदम सुरक्षित होती. हिंदू वस्ती संघटितरित्या वसेल अशा रितीने रचना केली होती. पण, याला काश्मीरमधल्या मुस्लीम नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ’’हिंदूंना संघटित अशी चारही कोनांवर वसलेली वस्ती नको. तर हिंदुना पूर्वीसारखेच मुस्लीम वस्त्यात वसू द्या, थोडक्यात हिंदू वस्त्या एकसंघ नको, तर विखुरलेल्या असू द्या.’’
       काश्मिरी पंडित तुलामुलाच्या खिराभवानीमातेला खूप मानतात, त्याला स्मरून ते म्हणतात, ’’यातही चाल आहे. आम्ही विखरून राहिलो की ते आमच्यावर हल्ला करू शकतात. म्हणून आमच्यासाठी असलेली एकसंध वस्ती ते नाकारतात.’’
          जम्मू-काश्मीरच्या केवळ १४ टक्के भूभागामध्ये हे आझाद काश्मीरचे खुळ आहे. तेही काही गल्ल्यांमध्ये. पण, यांना सीमापलीकडून शस्त्रे, पैसे येत असतात म्हणून ते शिरजोर होतात. त्यातच काश्मीरमध्ये सत्तेवर येणारी लोकं ही काश्मीरविषयी प्रेम नसलेले राजकारणी आहेत, ज्यांना केवळ आपली सत्ता काश्मीरवर हवी आहे. तेच या जिहादी लोकांचा बाऊ करतात आणि मग हे जिहादी डोक्यावर चढून निष्पाप माणसांना त्रास देतात. जर यांच्याशी व्यवस्थित वागले तर काश्मीरची समस्या नक्कीच कमी होऊ शकते. कारण, या जम्मू-काश्मीरमध्ये जसे मुस्लीम आहेत तसे हिंदूही आहेत. बौद्धही आहेत. शिखही आहेत आणि या सार्यांगचे भारतदेशावर प्रेम आहे. परिस्थिती सुधारू शकते.’’
काहीही असले तरी काश्मिरी पंडितांना काश्मीरची ओढ आहे. काश्मीरचा दुरावा अजूनही त्यांच्या डोळयात पाणी आणतो. खिराभवानी माता या काश्मिरी पंडितांना काश्मीरमध्ये सुरक्षित वातावरणात सुखात आणि शांततेत जगण्याची परिस्थिती निर्माण करो, हीच इच्छा !