अष्टावक्र संहिता : ४ : जनकाचा उदघोष - २

                                                              अहो अहं, नमो मह्यम् यस्य मे नास्ति किञ्चन ।
                                                              अथवा यस्य मे सर्वं यद्वाङ्मनसगोचरम् ॥२ - १४ ॥ 


जनक म्हणतो मी आश्चर्यमय आहे, मला  माझा नमस्कार !   एकतर मी काहीही नाही किंवा मग मी,  वाणी आणि मनाचा विषय होऊ शकेल ते सर्व काही  आहे.
या श्लोकात जनक बुद्ध आणि उपनिषदातला वाद संपवतो.   बुद्ध म्हणतो  शून्य ही मूळ स्थिती आहे  आणि शून्य  ही वस्तू नाही, त्यामुळे ते दर्शवता येत नाही. शांतता आहे कारण तिच्याशिवाय विश्वात ध्वनी उत्पन्न होणं असंभव आहे. तरीही शांतता नक्की कुठे आहे ते दर्शवता येत नाही.   ती स्थान किंवा कालबद्ध नाही.   स्वतःच्या निराकारत्वाचा अनुभव आल्यावर जनक म्हणतो मी काहीही नाही, मी स्थल-काल रहित आहे.   आणि जे स्थल-काल रहित आहे ते स्थलकालातल्या प्रत्येक प्रकटीकरणाला व्यापून आहे! त्यामुळे तो पुढे म्हणतो किंवा मग मी वाणी मनाचा विषय होऊ शकेल ते सर्व काही आहे. म्हणजे जे काही जाणिवेत प्रकट होऊ शकेल ते सर्व माझ्यातच आहे कारण मी जाणिवेच्या पूर्वी आहे.  उपनिषदात पूर्णं  इद‍म् म्हटलंय आणि बुद्ध पूर्णाला शून्य म्हणतो इतकाच काय तो फरक !

                                                             ज्ञानं, ज्ञेयं तथा ज्ञाता त्रितयं नास्ती वास्तवम् ।
                                                            अज्ञानाद्भाति यत्रेदं सोअहमस्मि निरञन: ॥ २ -१५ ॥

या श्लोकात जनक म्हणतो की  जाणणं, जाणलेलं आणि जाणणारा ही त्रयी वास्तविक नाही.  अज्ञानामुळे ही त्रयी ज्यावर भासते तो शुद्ध निरंजन मी आहे. 
वास्तविकात जाणणारा असा कुणीही नाही कारण जाणणं ही निराकारात घडणारी प्रक्रिया आहे. चालताना तीन गोष्टी भासतात, चालतोय हे ज्ञान, ज्यामुळे ते होतंय ती जाणीव आणि जो चालतोय तो ज्ञाता.  या तीन गोष्टी भासण्याचं एकमेव कारण म्हणजे आपण स्वतःला शरीर समजणं.  कारण वास्तविकात देह चालतोय आणि मेंदूत त्याची जाणीव होतेय;  चालणारा असा कुणीही नाही. आणि ही घटना ज्यावर घडतेय तो निराकार आपण आहोत.  आपण घटनेपासून अबाधित आहोत कारण जे काही घडायचं ते देहाला घडेल; आपल्याला नाही.  त्यामुळे जनक म्हणतो ही त्रयी ज्यावर भासते तो शुद्ध निरंजन मी आहे. 
 
                                                                       मय्यनन्तमहाम्भोधावाश्चर्यं जीववचिय: ।
                                                                      उद्यन्ति न्धन्ति खेलन्ति प्रविशन्ति स्वभावत: ॥ २ - २५ ॥
आश्चर्य आहे की अनंत समुद्ररुप माझ्यात जीवरुपी तरंग, आपल्या स्वभावानुसार उठतात, परस्परांशी लढतात, खेळतात आणि लयाला जातात. 
हा जनकाचा सर्वोच्च श्लोक आहे.  विज्ञानाच्या कार्यकारण मीमांसेला तो संपूर्ण छेद देतो.  जनक म्हणतो सर्व वैश्विक घटना प्रकटीकरणाच्या स्वभावानुसार घडतायत, त्या घडवणारा कुणीही नाही.  वस्तू खाली पडण्याच्या क्रियेला गुरुत्वाकर्षण म्हटलं तरी गुरुत्वाकर्षण मुळात कशामुळे आहे हा उलगडा असंभव आहे.  जनक म्हणतो ते स्वभावतःच आहे, त्याला काही कार्यकारण भाव नाही. 

कार्यकारणाची मीमांसा करण्यात आश्चर्य मावळतं.  विज्ञानाला विरोध नाही पण त्यानं जर प्रत्येक बाबतीत नुसता उहापोह होऊन आश्चर्य लयाला जात असेल तर जीवन निरस होतं.  जैनधर्मात स्त्रियांबद्दल अपकर्षण निर्माण होण्यासाठी  तिच्या देहाच्या प्रत्येक अंगाचं विदारक विश्लेषण केलं जातं. यातून अपकर्षण जरूर निर्माण होतं पण जीवन निरस होतं, शिवाय त्यामुळे स्वरुपोलब्धी होण्याची शक्यता शून्य.  कारण स्वरूप देहातीत आहे. तद्वत अन्नाच्या घटकपदार्थांंचं विश्लेषण करत गेलं तर अस्वादाची  मजाच हरवते. आणि विज्ञानानं शोधलेल्या कार्यकारण भावामुळे जगण्यात अनेक सुखसुविधा निर्माण झाल्या आहेत हे नाकारता येत नसलं तरी  कार्यकारण भाव स्वतःप्रत आणू शकत नाही कारण स्व हा कार्यकारण रहित आहे. त्याच्या असण्याला कोणतंही कारण नाही.