कॉफ़ी ६१

    आज अजून एक बायोडेटा तिच्या हाती पडला. विकेंड आला की ठरलेल्या मुलाला भेटायचं. फुकटची कॉफी प्यायची आणि मग "कळवते" असं म्हणून निघायचं. नकार द्यायला नवीन नवीन कारणं शोधायची.
कित्येक विकेंड तिचं हेच सुरू होतं.
आज पुण्याचं स्थळ होतं.
"सावकाश जा. काही लागलं तर लगेच कळव. आणि छान बातमी घेऊन ये. माझं बोलणं झालय त्याच्या घरच्यांशी.. खूप चांगलं घर आहे.."  - आई
"क्लिक व्हायला पाहिजे गं आई... किती वेळा सांगू तुला....जाऊदे चल बाय .."
शिवनेरी निघाली तसा तिनं मोबाईल काढला आणि हेडफोन लावला. गाणी ऐकत त्या मुलाचा बायोडेटा वाचायला तिच्याकडे पुढचे तीन तास होते.
नळस्टॉप वर शिवनेरी थांबली आणि ती उतरली. रिक्षा करून 'कोलाज कॅफे'ला पोचली. पाच मिनिटं वाट बघून त्याला फोन लावला.
"कुठे आहेस? मी पोचलीये"
"आलोच, गाडी पार्क करतोय"
"चला जायचं आत?" तो आला, त्यानं तिला ओळखलं, तो बोलला.
अचानक समोर येऊन त्याच्या बोलण्यानं ती जराशी गडबडली, तिनी फक्त होकारार्थी मान हालवली.
"दिसायला चांगला वाटतोय"- तिच्या मनात.
"हम्म चांगलीये की दिसायला, ड्रेसिंग सेन्स पण चांगलाय" - त्याच्या मनात.
"बोल काय घेणार.. " - तो
"सँडविच चालेल आणि कॉफी.. " - ती
त्यानं ऑर्डर दिली.
"सॉरी तुला फक्त ह्याच्यासाठी मुंबई वरून यावं लागलं." - त्यानं सुरुवात. 
"हो. पण कधी कोण क्लिक होईल काय सांगता येतंय? त्यामुळे इटस ओके." - ती
दोघांच्या गप्पांना सुरुवात झाली.आवडी निवडी, प्रोफेशन, मुंबई-पुणे, घरी कोण असतं, जॉब कुठे करतो, येण्या जाण्याची वेळ काय, पगार किती, घर कोणत्या एरियात..अश्या अनेक विषयावर गप्पा सुरू झाल्या. दोघंही एकमेकांच्या कॉन्फिडन्सवर खूश होते.
दोघांनीही बरीच स्थळं बघितली होती. त्यामुळे ह्या गोष्टी अगदी प्रश्नमंजूषा असल्यासारख्या बोलून संपल्या.
आतापर्यंत ऑल ओके !
"काय वाटतं ? आपल्या अश्या एकदोन भेटीमध्ये कसं काय लग्न ठरवणार आपण ?" ती
हा म्हणजे इंटरव्यूच्या सेकंड  राऊंड चा प्रश्न होता.
"अगदी मनातलं बोललीस.. एखाद दोन भेटीत कसं कळणार समोरच्या बद्दल ? आणि तेव्ह्ड्यावर त्याला आयुष्याचा साथीदार बनवून टाकायचं?  छे ..
मला वाटतं किमान पाच सहा वेळा भेटून मनातल्या जास्तीत जास्त भावना व्यक्त करायला पाहिजेत. जर वाटलं की पोरगी 'क्लिक' होतीये, तर मग पुढे जायला हरकत नाही .. पुढे मागे काही झालंच, तर उगाच पश्चात्ताप नको व्हायला की साथीदार निवडताना फार घाई केली .."
हे उत्तर ऐकून ती मनात प्रचंड इम्प्रेस झाली. अनेकांना तिनी हा प्रश्न विचारला होता, आज पहिल्यांदा पटेल असं उत्तर तिला मिळालं होतं.
"चांगलाय की हा .. अरेंज कसं काय करतोय .. ह्याचं नक्कीच रीसेंटली ब्रेक अप वगैरे झालं असणार.." - तिच्या मनात
"कमाल आहे, इतकी छान आणि स्पष्ट मुलगी, कशी कोणाला आवडली नाही.." -त्याच्या मनात
"एक विचारू ?" तो
"हो प्लीज.. " ती
"कितवी कॉफी ही तुझी ?" तो हसत हसत... 
"एकवीस किंवा बावीस बहुतेक .... आणि तुझी ?.. " ती मोकळेपणाने, स्मित हास्य करत.
"साठ".
"व्हॉट ?? सीरियसली ?" ती
"हो .. काय करणार.. नाही अजून कोणी भेटली जिच्याशी लग्न करावंसं वाटलं .."
"हम्म .. पास्ट मध्ये कोणाशी रिलेशन वगैरे?" तिनी तोफ डागली.
तो गोंधळाला !
"अम्म... म्हणजे .. हो .. पण आता आता तसं काहीच नाही.." - नजर चोरून सांगताना त्याची मान किंचित खाली झुकलेली..  मनात ही संधी गमावण्याची भीती.
"अरे इट्स टोटली ओके .. तू प्लीज काही वेगळं नको वाटून घेऊस. मला तुझ्या भूतकाळात अजिबात इंटरेस्ट नाही. पण समजा आपण पुढे गेलो आणि लग्न केलंच, तर भूतकाळ मध्ये यायला नको.. इतकंच ..
तसा माझाही होता एक.. त्याच्याशिवाय तर मी जगूच शकणार नव्हते ... आणि आज .. ही बघ मी तुझ्यासमोर बसलीये... एकदम ठणठणीत !!"  - ती मोकळेपणाने हसत, किंचित लाजत ....
आणि तो मनातल्या मनात हसत होता.. 
दोन मिनिट वातावरण शांत.
"आईला सांगतो पोरगा पसंत आहे....
नको नको, थांब .. केवळ एका भेटीत ??..  थांब, घाई नको".. तिचं मन तिच्याशीच...
"आईला सांगतो पोरगी पसंत आहे...
नको नको,  थांब.. केवळ एका भेटीत ??..  थांब, घाई नको" .. त्याचं मन त्याच्याशीच...
एव्हाना बाहेर मुसळधार पाऊस चालू झालेला. दोघंही चोरून एकमेकांकडे बघत होते. गप्पांचा आजचा कोटा संपला होता.
दोघांनीही इंटरव्यूचा दुसरा राउंड क्लिअर केला होता. 
"सर, हॉटेल बंद करतोय. अजून काही ऑर्डर करायचंय??" - वेटर नी शांतता भंग केली.
"बाप रे.. पावणे अकरा? आपण गेले चार तास इथे आहोत?" - ती
"हो ना .. कळलंच नाही.." - तो
"बरं ऐक ना, मला वनाझला सोडतोस का? शिवनेरी मिळेल मला तिथे.. " - ती
"खूपच उशीर झालाय गं ! ठीके एक फोन करतो फक्त घरी .. एकच मिनिट..मग निघूच" त्यानं थोडं बाजूला जाऊन घरी फोन केला.
"निघूया ? कार पर्यंत तरी भिजतच जायला लागेल" - तो.
त्या मुसळधार पावसात पळत जाऊन कार गाठेपर्यंत दोघंही प्रचंड भिजलेले. ती कार मध्ये बसली तितक्यात त्याच्या आईचा तिला फोन.
ती गोंधळली !
"तुझ्या आईशी बोलणं झालंय, दोघंही इकडे घरीच या. उद्या सकाळी सहाच्या शिवनेरी मध्ये देईल तुला तो बसवून.. " - त्याची आई.
उत्तर द्यायची तिला हिंमतच होईना ! तिनं त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला, तो हलकेच  हसत होकारार्थी मान डोलवत होता.
"ठीके काकू, येते"- ती.
फोन ठेवला. तिनं घरी फोन लावला.
"त्याच्या आईशी बोलणं झालंय, तू आत्ता तिकडे त्यांच्या घरीच जा. उद्या सकाळी सहाच्या शिवनेरी मध्ये देईल तुला तो बसवून.." - तिची आई.
ती अजून गोंधळली !
तिनं त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला, तो हलकेच  हसत होकारार्थी मान डोलवत होता.
"ठीके आई." तिनी फोन ठेवला.
"अरे काय चाललंय काय .." ती मनात.
तसं त्याला नकार द्यायचं कारण नव्हतंच तिच्याकडे.. पण असं त्याच्या घरी राहणं वगैरे .. तेही अजून काही नसताना .. तिला स्वतःच्या मनाला समजावताना अवघड जात होतं. 
दोघं घरी पोचले. त्याच्या आईशी अगदी मोजक्या गप्पा झाल्या. त्याच्या लहान बहिणीनं तिला तिच्या रूम मध्ये नेलं.
तो आवरून हॉल मध्ये आला, त्यानं गादी टाकली आणि त्यावर आडवा झाला.
सर्व जण झोपले होते आणि ती बेडवर छताकडे बघत पडली होती. सकाळ व्हायची वाट बघत.
दोनेक तास निघून गेले असतील.
तिला किचन मधून भांड्याचा आवाज आला. तिनी पाय लांब करून बेडरूमच दार किंचित उघडलं.
किचन मध्ये तो होता.
त्यानं कपात साखर आणि कॉफी टाकली होती. गॅसवर दूध गरम व्हायची वाट बघत होता.
बेडरूमचा दरवाजा उघडला आणि ती शेजारी जाऊन उभी राहिली.
तो शांत आणि स्थिर. तिला बघून त्यानं अजून एक कप लावला.
कॉफी तयार झाली, त्यानं एक कप तिच्या हातात दिला.
दोघंही ओट्याला टेकून उभे होते. एकमेकांकडे बघत.
कॉफी संपेपर्यंत त्यानं तिचा हात केव्हा हातात घेतला ते तिलाही कळलं नाही.
इंटरव्यूचा  लास्ट राउंड क्लिअर झाला होता.
समाप्त