रूम सर्व्हिस!

जाग आली सकाळी..
"हवं ते मागा, मिळेल!" असं म्हणणाऱ्या हॉटेलच्या लाघवी receptionist chi आठवण आली...
उचलला फोन..
पलीकडच्या आवाजाला म्हणालो,
हात लांब केल्यावर...
एरवी माझ्या हाताला लागणारा;
ढाराढूर पंढरपूर  झालेला;
माझ्यामधला सगळा दर्प गेला..
सगळी समज गेली..
सगळे ढग आणि सगळी धग गेली.. 
तर जे उरेल त्याचंच जणू प्रतीक असलेलं माझं पिल्लू...
त्याला माझा लागणारा एक धक्का पाठवून द्या एक पटकन...
म्हणालो त्या आवाजाला,
एरवी..
"सक्षम स्त्री" 
"स्त्री - पुरुष एकता" 
वगैरेवर ठाम असलेल्या माझ्या मनातल्या 
सगळ्या दुटप्पीपणाला 
चर लावणारा.. 
तिचा किचनमधून आमच्यासाठीचा नाश्ता बनवतानाचा आवाज नाहीये इथे...
पाठव म्हटलं त्या आवाजाला पटकन! 
पंख्याच्या पात्याला
आमच्यामधला घट्टपणा 
उधार घेऊन चढलेली धूळ
अजिबात म्हणजे अजिबात नाहीये इथे... 
ती पण लागेल म्हटलं मला!
भिंतींवर पिल्लाने काढलेल्या,
माझ्याच एकंदरीत वागण्या बोलण्याच्या तऱ्हांची आठवण आणून देणाऱ्या, 
वेगवेगळ्या रंगांच्या आडव्या तिडव्या रेघोट्या..
एकटक पाहत राहिले तर
काहीतरी अर्थपूर्ण असल्याचा
भास करून देणाऱ्या...
त्या पण नाहीयेत इथे...
पाठवा म्हटलं कोणाला तरी 
त्या घेऊन लगेच.. 
(काय अवघड आहे ना त्यात, २० रुपयाला १५ रंगांचे क्रेयोन मिळतात बाजारात..)
हे काय आणि, 
आवडतो म्हणून त्या टोण्याला -
(म्हणजे आपला टोनी स्टार्क बरं का, आयर्न man!) -
कुशीत घेऊन झोपला नाही का यश काल? 
रोज सकाळी टोचतो मला तो...
आज काय झालं? 
बरं बरं राहू द्या, 
तो नसला तरी चालेल!
बाकी पाठवा सगळं पटकन...