उंच ख़िडकी!

उंच खिडकी!
थोड्या उंच बेडचं प्रयोजनच मुळी खिडकी बाहेरच्या सरी अगदी अंगावर येताहेत असं वाटावं असं होतं.
आज पहाटे न ठरवता त्या अगदी आधी ठरवल्या सारख्या अंगावर येताहेत असं वाटलं! 
मग वाटलं उशी व्हावी माझ्या दंडाची (माझा तसाही ठाम विश्वास आहे, देवाने आम्हा पुरुषांना तिथे स्नायू तेवढ्याच साठी दिले आहेत). टेकवावे तिने डोके त्यावर!  आणि विसरावी तिने तिची "ऑफिसला जाताना कोणता ड्रेस घालावा?" ही काळजी!  मी सुद्धा विसरावे "जागतिक मंदीची ठळक कारणे!"
पण...
तिला त्याच खिडकीतून दिसतो प्रकाश, "उजाडलं पण?" असं म्हणत माझ्या उशीला हिरमुसले करत, दोन्ही हात वरती करून केस बांधत, "आई-बाबा आवरून तयार असतील, मस्त थालीपीठ करते त्यांच्यासाठी, काय बोलतो?"
मी काय बोलणार, दंडामधले स्नायू दुर्लक्षित होतात, पोटामधल्यांच्या लाडामुळे...
(डोळ्यांपुढे तीच ती, दोन्ही हात वर करून ह्यावेळी खिडकी बाहेरील सरी बांधून ठेवत असलेली..)