दिल देके देखो !

        "दिल देके देखो" या आपल्या पहिल्याच चित्रपटाच्या संगीताने रसिकांची मने जिंकणाऱ्या संगीतकार ऊषा खन्ना (आपण उषा म्हणत असलो तरी )यांना "गान सम्राज्ञी लता मंगेशकर "पुरस्कार मिळाला.५ लाख रु. मानपत्र स्मृतिचिन्ह.असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार यापूर्वी  संगीतकार राम लक्षमण, उत्तमसिंग, प्रभाकर जोग,पुष्पा पागधरे,कृष्णा कल्ले यांना प्रदान करण्यात आला होता.
         ऊषा खन्ना यांना यापूर्वी म्हणजे तसा नुकताच रेडिओ मिर्चीचा  जीवन गौरव पुरस्कारही मिळाला आहे. त्याशिवाय त्याना नॅशनल फ़िल्म असोसिएशनचा नॉनफ़ीचर फ़िल्म चा पुरस्कारही "अजीब घर " या फ़िल्मसाठी मिळाला आहे.
       ऊषाजींचा जन्म ७ ऒक्टोबर १९४१. ग्वलियर, येथे .वडील मनोहर खन्ना शासकीय जल नियोजन खात्यात अधीक्षक असले तरी स्वत: गायक व कवी पण होते त्यामुळे दोनशे रु.प्रतिमास मिळवून देणाऱ्या नोकरीवर लाथ मारून ते मुंबईस जद्दन बाई या पहिल्या स्त्री संगीत दिग्दर्शक यांच्याकडे दरमहा  बऱ्याच अधिक .पगारावर गीतकार म्हणून आले.( त्याना पहिल्या तीन गीतांसाठीच आठशे रु.मिळाले.) कन्या उषाला संगीताची गोडी असल्याचे दिसून आले व शशधर मुखर्जींकडे ओ.पी.नय्यर यांनी शिफारस केल्यावर मुकर्जी यांनी तिला दररोज २ गीतांना संगीत दे असे सांगितले (गीतकार घरात होतेच) व त्यांना तिच्या कुवतीचा अंदाज आल्यामुळे त्यानी "दिल देके देखो" या चित्रपटास संगीत देण्याची संधी तिला दिली व या संधीचे तिने सोने केले. आश्चर्य म्हणजे या पहिल्या चित्रपटातील दोन तीन गीते बिनाका गीतमाला मध्ये वाजू लागली व "दिल देके देखो" या गाण्याने अनेक वेळा पहिल्या क्रमांकावर आपली मोहोर उठवली. त्यामुळे त्यानंतर  मुखर्जी यांनी आप्ल्या पुढच्याच "हम हिंदुस्तानी" या चित्रपटासाठी त्यानाच संधी दिली.
         पन्नास वर्षाच्या आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत ऊषाजींनी जवळ जवळ १५० हून अधिक हिंदी चित्रपटांना संगीत दिले व काही इतर भाषिक चित्रपटांनाही त्यानी संगीत दिले व त्यातील "मूडल मन्जू" या मलयालम चित्रपटातील संगीत विशेष गाजले त्याशिवाय मलयालम मधील "अग्नि नीलावु" व "पुठूरम पुथ्रि उन्नियार्चा"  या चित्रपटांचे संगीतही बरेच लोकप्रिय झाले.
            संगीतकार ऊषा खन्ना यांच्याविषयी पहाताना एक गोष्ट जाणवते ती म्हणजे संगीत दिग्दर्शन क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग कमी प्रमाणात आढळतो.तसाही चित्रपट क्षेत्रातच काय पण प्रत्येकच घराबाहेरील क्षेत्रात भारतीय स्त्रियांचा सहभाग उशीराच सुरू झाला त्यामुळे त्यांची संख्या संगीत दिग्दर्शन क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत कमीच असणार हे उघडच आहे.अगदी इंग्लंड, अमेरिका या पाश्चात्य देशातही हीच अवस्था आहे.तरीही  जद्दन बाई व सरस्वती देवी या  त्यांच्या पूर्वी झालेल्या स्त्री संगीतकार त्यामानाने खूपच लवकर या क्षेत्रात आल्या होत्या व त्यांचा आदर्श इतरही संगीतजाणणाऱ्या स्त्रियांनी पुढे ठेवायला हरकत नव्हती. ऊषा खन्ना यांना या क्षेत्रात स्त्री म्हणून येण्यास कसलाच संकोच वाटला नाही फक्त इतक्या लहान वयात आपल्याला लोक स्वीकारतील की नाही असा विचार मात्र मनात आला असे त्यांच्या मुलाखतीत त्यानी स्वत:च नमूद केले आहे.स्वत: गाऊ शकत असतानाही त्यानी गायिका होण्यापेक्षा संगीत दिग्दर्शनाचे क्षेत्र निवदले हे विशेष.कदाचित लताजी, आशाजी अशा श्रेष्ठ गायिकांसमोर आपला निभाव लागणार नाही हाही विचार त्यानी केला असावा.तशी त्यानी म्हटलेली काही गीते त्यांच्या चित्रपटात आढतातही.तसे पहाता तलत मेहमूद वा मुकेश हेही अभिनय क्षेत्रात प्रवेश करण्याच्या हेतूने चित्रपटक्षेत्राकडे आकर्षित झाले होते तरी शेवटी ते गायक म्हणून सुस्थिर झाले हे आमच्यासारख्या कानसेनांचे  सुदैव !
        ऊषा खन्ना यांच्याबरोबर इतर स्त्री संगीत दिग्दर्शकांचा शोध घेतला असता इशरत सुलताना (बिब्बो)यांनी "अद्ल-ए-जहांगीर" या चित्रपटास १९३४ मध्ये ,  जद्दन बाई यांनी "तलाशे हक" या चित्रपटास १९३५ मध्ये तर सरस्वती देवी यांनी अच्हूतकन्या व जीवननय्या याशिवाय एकूण ३४ चित्रपटांना संगीत दिल्याची माहिती मिळते.
      आजच्या घडीला अनेक स्त्रिया या क्षेत्रात लक्ष घालताना दिसत आहेत.त्यात ऊषा खन्ना यांच्याप्रमाणेच अगदी कमी वयात या क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या स्नेहा खानवलकर,जस्लीन रॉयल,अलोकनंदा दासगुप्ता,सविता अरोरा,परंपरा ठाकूर,या बॉलिवुडमध्ये तर श्रुति हासन ( कमाल हासन यांची कन्या) व भावधरिणी (सं.दि.इलाई राजा यांची कन्या) आणि ए.आर.रैहाना ही सं.दि.ए.आर.रहमान यांची भगिनी यांचा उल्लेख करता येईल.     माहितीस्रोतावरून  सध्या एकूण ४१ स्त्रिया या क्षेत्रात कार्यरत असून त्यात वीणा सहस्रबुद्धे व वैशाली सामंत या दोन मराठी नावांचाहि समावेश आहे. असे दिसते त्यामुळे बऱ्याच भारतीय नारींनी याही क्षेत्रात "दिल देके देखेंगे "असा विचार केला आहे असे दिसते.