सप्टेंबर १६ २०१९

लास्ट गूडबाय

    "कुठे भेटतोय? मला उद्या दुपारी जमेल. अगदी थोडा वेळ."
त्याच्या इ-मेलला जवळपास दोन आठवड्यांनी आलेला तिचा रिप्लाय वाचून त्याच्या मनात चाललेली चलबिचल थोडी कमी झाली.

"ट्रॅव्हल कॅफे. एस बी रोड. दुपारी तीन ?"

"मी आलेय."
त्यानं धावत रस्ता क्रॉस केला आणि तो आत शिरला. एका कोपऱ्यातल्या बेंचवर ती पाठमोरी बसली होती. तो तिच्या समोर जाऊन बसला.
"का बोलावलंयस मला ?"
"मी बोलावलं, आणि तू आलीस.. का आलीस?"

"काय बोलायचंय तुला?"

"त्या दिवशी मिरवणुकीत इतका वेळ समोरासमोर असून आपल्याला एकमेकांना ओळख दाखवायची हिंमत झाली नाही !
का बरं?
एकमेकांसाठी आपण क्षुद्र तर नाही ना? आणि ना ही आपण सात जन्माचे वैरी.
द्वेष, मत्सर, तिरस्कार..असंही काही नाही..
मग का नाही आपली हिंमत झाली एकमेकांना किमान 'हायऱ्हॅलो' बोलायची?
का आलेलीस तिकडे? तेही अचानक इतक्या  वर्षांनी?"

"मी नाही रे असला काही विचार करत. मी नाही तुला हाय करू शकले.. नाही ओळख देऊ शकले तुला.. पण तू तरी कुठे ओळख दिलीस?
आणि तिकडे का आले म्हणजे? तुला नाही बघवलं का मी तिथे आलेय ते?"

"प्रश्नाला उलट प्रश्न केला की झालं नाही का?
हो... नाही बघवलं मला.. घाबरलो मी.. किती अनपेक्षित होतं तुझं तिथे असणं..
किती वर्ष झाली आपण वेगळं होऊन? सहा? सात?
प्रत्येक क्षणाला माझ्या मनात हेच - की तू कधीतरी समोर दिसशील आणि काळजाचा ठोका चुकेल!
आणि त्या दिवशी ती वेळ आली !.. तू आणलीस... अक्षरशः काळजात  चर्रर्र झालं......
तेव्हा कळलंच नाही कसं वागावं"

"समजू शकते... पण आता काय .. का भेटलोय आज आपण?
आता एकमेकांबद्दल वाटून काही होणारे का ?"

"इथून पुढे काही व्हायला पाहिजे असं अजिबात नाही! आणि नकोच..
त्या काळाला फार फार मागे ठेवून आपण दोघंही आपापल्या आयुष्यात पुढे गेलो आहोत.
हो ना ?"

"हम्म..खरं." 

"पण मग त्या भीतीचं काय? तुला नाही वाटत की काहीतरी अपूर्ण राहिलं आपल्यात?
भविष्यात तू केव्हातरी समोर दिसशील तेव्हा तुला कमीत कमी हाय तरी म्हणू शकेन ना मी? किमान तेव्हडी हिंमत तरी जमवायला नको?"

"खरंय तुझं ! तुला चोरून, तिरप्या नजरेनं बघत होते...
आणि मला माहितीये की तू ही मला बघत होतास.."
तिच्या डोळ्यातून अश्रूचा थेंब येऊन टेबलावर विसावला.

"ए अगं वेडाबाई.. इट्स ओके...
इथे का बोलावलं हा प्रश्न अजूनही आहे तुला?"

"आपल्यात जे काही होतं, ते फार वाईट पद्धतीनं संपलं गं... वेगळं झाल्यावर काय करायचं, कसं वागायचं ते समजलंच नाही.."

"कशी आहेस?" त्यानं अलगद तिच्या हातावर हात ठेवला. तिला अजिबात वेगळं वाटलं नाही.
त्याच्या सौम्य आवाजानं तिला आपल्या मनावर फुंकर मारल्यासारखं वाटलं.

तिनं त्याला मोबाईल दाखवला.
"रिया... अडीच वर्षाची आहे.." 

"आईगं .. कित्ती गोड..अगदी तुझ्यावर गेलीये!"  तो काही सेकंद फोटो मध्ये रमून गेला. त्याचेही डोळे पाणावले.

"खूप छान वाटतंय.. इतका आनंद होतोय ना..  कसं सांगू तुला.." - त्याच्या चेहऱ्यावर अपार आनंद झळकत होता.

"समजतंय..समजतंय ..आज तोंड कमी आणि डोळे जास्ती बोलतायत तुझे!"

पुढची पाच मिनिटं दोघंही एकमेकांकडे बघत होते..

"निघायचं? वेळ संपत आली." - तिनी भानावर येत स्वतःला सावरलं.
"हो.." तो रुमालाला डोळे पुसत उठला.

तिची रिक्षा गर्दीमध्ये दिसेनाशी होईपर्यंत तो तिथेच घुटमळत होता.
डेस्क वर जाऊन त्यानं मोबाईल बघितला.
तिचा मेसेज आलेला.
"थँक्स!"

त्यांच्या नात्यातला अपुरा राहिलेला शेवटचा क्षण आज पूर्ण झाला होता.

Post to Feedआवडली

Typing help hide