ऑक्टोबर १४ २०१९

अष्टावक्र संहिता : ७ : मला एकाग्रता साधावी लागत नाही कारण मला विक्षेप नाही !

                                                                 क्व विक्षेप क्व चैकाग्र्यं निर्बोधः क्व मूढता ।
                                                                  क्व हर्षः क्व विषादो वा सर्वदा निष्क्रियस्य मे ॥ २० -९ ॥

              जनक म्हणतो सर्वदा क्रियारहित असणाऱ्या आत्मस्वरूपाला विक्षेप, एकाग्रता, अज्ञान आणि मूढता किंवा हर्ष अथवा खेद नाही.

अष्टावक्र गीतेतला हा एक अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे, कारण तो सर्व मानशास्त्राला पार करून जातो. अध्यात्मात मन हा सत्योपलब्धित एकमेव विक्षेप समजला गेला आहे.  मानवी जीवनातला सर्व कोलाहल केवळ मनामुळे आहे, त्यामुळे सिद्धावस्था ही निर्मन अवस्था मानली गेली आहे. सर्व आध्यात्मिक साधना किंवा ध्यानप्रक्रिया मनाच्या निस्सरणाचेच विधी आहेत कारण मनामुळे आपण स्वतःप्रत येऊ शकत नाही किंवा शांतता हे आपलं मूळ स्वरूप आहे हा उलगडा होऊ शकत नाही. 

हर्ष आणि खेद या मनाच्या अवस्था आहेत आणि त्या प्रसंगाकडे व्यक्तिगत दृष्टिकोनातून पाहिल्यामुळे निर्माण होतात ही उघड गोष्ट आहे. लहानपणी सायकल चालवताना फटाक्यासारखा आवाज आला तर मजा वाटायची आणि मग यथावकाश पडताळणी नंतर  आपलीच ट्यूब फुटली हे लक्षात आल्यावर कमालीचा खेद व्हायचा. वास्तविक ट्यूब फुटणं ही एक घटना आहे, ती कुणाच्याही बाबतीत आणि केव्हाही घडू शकते. पंक्चर काढल्यावर किंवा ट्यूब बदलल्यावर स्थिती पूर्ववत होते पण माझ्याबाबतीत हे कसं घडलं ? हा दृष्टिकोन वास्तविक  घटनेला वैयक्तित्त्व देतो आणि परिणामी खेद होतो. सायकल इतर कुणाची असेल तर आपण त्यावर हसून पुढे निघून जातो.  संपूर्ण आयुष्य हे असंच आहे, प्रत्येक घटना केवळ एक वास्तविकता आहे, मग ती  घटना कोणतीही  असो. पण ज्या क्षणी त्या घटनेकडे आपण व्यक्तिगत दृष्टिकोनातून पाहतो तेव्हा हर्ष किंवा खेद होतो.  एकदा कोणत्याही घटनेकडे केवळ घटना म्हणून बघण्याची सवय झाली की दृष्टिकोन वस्तुनिष्ठ होतो आणि घटनेतून बाहेर पडण्याचा मार्गही लगेच दिसतो; कारण मनाच्या उहापोहाला वावच मिळत नाही

इथपर्यंत मानशास्त्र सर्वांच्या लक्षात येण्याजोगं आहे पण जनक म्हणतो मला एकाग्रता नाही कारण मला विक्षेप नाही, हे कमालीचं विधान आहे ! जगातल्या कोणत्याही धुरंधराला त्यानं आत्मसात केलेलं कोणतंही कौशल्य सादर करण्यापूर्वी एकाग्रता साधावी लागते.  जर ही एकाग्रता साधली गेली नाही तर त्याचं सादरीकरण केवळ त्याच्या पूर्वी केलेल्या अथक परिश्रमाच्या जोरावर (आणि खरं तर लोकांच्या अवधानाच्या बळावर ) निभावून नेलं जातं. अशा सादरीकरणाचा न त्याला आनंद होतो न श्रोत्यांना पण केवळ नावलौकिकावर तो वेळ मारुन नेतोही एकाग्रता हाच प्रयास आहे आणि तो करावा लागण्याचं कारण विक्षेप आहे आणि हा विक्षेपच मन आहे ! थोडक्यात, जोपर्यंत एकामागून एक येणारे विचार थांबत नाही तोपर्यंत एकाग्रता असंभव आहे कारण विचार लक्ष वेधून घेतात; विक्षेप निर्माण करतात. पण जनक म्हणतो मला एकाग्रता नाही कारण मला विक्षेप नाही !  आणि याचं रहस्य त्याच श्लोकात आहे. 

जनक म्हणतो निर्बोधः क्व मूढता ! जगातल्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या सीमित बुद्धिमत्तेची खंत आहे आणि प्रत्येक व्यक्तीला आपण मूर्ख आहोत असा पुरेपूर न्यूनगंड आहे. खरं तर आपला न्यूनगंड झाकण्यासाठी आणि तो कधी किंवा कसा उघडा पडेल या भीतीखाली व्यक्ती अहोरात्र वावरत असते.  हा न्यूनगंडच व्यक्तीला आपण इतरांपेक्षा वेगळे आणि श्रेष्ठ आहोत हे दर्शवण्याला भाग पाडत असतो; मग ते संपत्तीद्वारे असो, कोणत्या कौशल्याद्वारे असो, सत्तेमुळे असो, ज्ञानामुळे  की सौंदर्यामुळे;  पण एकूण सर्व प्रयास न्यूनगंड झाकण्याचाच असतो.थोडक्यात,  आपण मूर्ख नाही हे दाखवण्याचा असतो.  

जनक म्हणतो,  मी अज्ञानी किंवा मूर्ख ठरण्याची शक्यताच नाही ! कारण काय ? आता प्रत्येक घटना ही केवळ वास्तविकता आहे, त्यातून व्यक्तिमत्त्व निर्मिती होत नाही कारण  सर्वदा निष्क्रियस्य मे ! मी कायम क्रियारहित आहे. जे घडतंय ते शारीरिक आणि मानसिक पातळीवर घडतंय पण त्याचा मला स्पर्श होत नाही. मी क्रियारहित असल्यानं माझ्यात घटनेचे पडसाद उमटत नाहीत.  

स्वरुप हे निव्वळ स्वातंत्र्य आहे. ती एक मोकळीक असलेली स्थिती आहे. तिथे सर्व कळतंय पण खुद्द त्या स्थितीला काहीही होत नाही. ती स्थिती चित्रपटाच्या पडद्यासारखी आहे किंवा अगदी यथार्थ वर्णन करायचं तर रंगमंचासारखी आहे. पात्रांच्या आयुष्यात अनंत घडामोडी होतात पण रंगमंच कायम समस्थितीत आहे; त्याला काहीही होत नाही. रंगमंचाला कोणताही न्यूनगंड नाही, की हर्ष नाही की खेद नाही. तो सर्व खेळात समरस आहे, सर्व घटनात उपस्थित आहे पण त्याला स्वतःला काहीही होत नाही. जनकाचा निर्देश त्या रंगमंचाकडे आहे. प्रकट अवस्थेत जरी तो जनक असला तरी त्याची मूळ स्थिती रंगमंचासारखी झाली आहे !  पात्राच्या जीवनात काय वाट्टेल ते घडू शकतं पण रंगमंच कायम स्थिर आणि अबाधित आहे. तो कायम क्रियारहित आहे आणि तेच स्वरुपोलब्धीचं रहस्य आहे :  सर्वदा निष्क्रियस्य मे !

याचा अर्थ सत्योपलब्ध व्यक्ती कर्महीन होते असा नाही तर अशा व्यक्तीला ती स्थिती गवसते जी हरेक स्थितीत अकर्ता आहे.  त्या स्थिर स्थितीवर सर्व घडतंय पण ती स्थिती मात्र कोणत्याही घडण्यापासून मुक्त आहे.  अशी व्यक्ती पात्र म्हणून सर्व काम करते, अगदी समरसूनआणि कौशल्यपूर्वक  करते, पण आपण रंगमंच असल्याचं तीचं भान कदापिही हरवत नाही. 

अध्यात्माचं खरं कौतुक हेच आहे ! अध्यात्म म्हणजे जीवनातून पलायनवाद नाही. ती फक्त पात्र म्हणून जगण्याऐवजी; पात्र अधिक रंगमंच म्हणून जगण्याची कला आहे. त्यामुळे पात्राचं जगणं तर बहारदार होतंच शिवाय रंगमंचालाही अभिव्यक्तीची मजा येते.  अध्यात्म न समजलेल्या अज्ञानी लोकांनी ते विरक्त आणि अनासक्त असल्याचं भासवून जीवन पुरतं रसहीन केलं आहे पण वास्तविकात अध्यात्म ही जीवन समरसून जगण्याची कला आहे.  जगणं रंगतदार व्ह्यायला त्यापरता दुसरा कोणताही मार्ग नाही; अन्यथा केवळ पात्र म्हणून जगण्यात सुख-दु:खाचे हेलकावे खात सरते शेवटी खिन्न होऊन  रंगमंचावरून एक्झीट घ्यायची इतकाच पर्याय आहे. Post to Feedअध्यात्म...
मनाचं निस्सरण म्हणजे
पहिल्या मुद्याच्या अनुषंगानं आणखी थोडं
जाणीव
बुद्धावस्थेची तुम्ही फक्त कल्पना करतायं!
विक्षेप
मन किंवा विचार हा विक्षेप आहे !
बर!
तुमचे अध्यात्माच्या व्याख्येपासूनच गोंधळ आहेत !
बर... बर... :-))
तुमचा घोळ निस्तरायलाच तयार नाही !
असो
अध्यात्मात
संजयजी क्षमस्व !
हे पाहा
नाही...
सांख्य हा द्वैतवाद आहे ?
हे वाचून तर हास्यस्फोटच झाला !
माझा रोख
तुमच्या प्रश्नाला
ह्म्म...
आता हा नवा घोळ !

Typing help hide