कॅन्सर

रविवार दुपारची वेळ. वीणा स्वयंपाकघरात दुपारचा चहा करत होती. एवढ्यात सुरेंद्र डोकावला. "आणते रे मी चहा, थांब जरा ५ मिनिट, दूध गरम होतंय"
"स्मिता आलीय, तिचा पण कर चहा" म्हणून सुरेंद्र परत हॉल मधे गेला. बायकोच्या स्वयंपाकघरात डोकावणे हे सुरेंद्रचे आवडते काम, वीणाला माहितच होते ते.
"काय ग स्मिता, अचानक दुपारी कशी काय आलीस. सगळं ठीक आहे ना?" वीणाने विचारले.
"आधी चहा घेऊ मग बोलूया का आपण" सुरेंद्रने मधेच थोडासा व्यत्यय आणला. 
चहा संपेपर्यंत स्मिताच्या चेहऱ्यावरचा तणाव स्पष्ट दिसत होता, सुरेन्द्रही थोडा तणावाखाली वाटला तिला पण तिने दुर्लक्ष केलं कारण स्मिताचा चेहरा बराच उदास होता. 
चहा पिऊन होईपर्यंत ची ५ मिनिटे स्मिताला एखाद्या तासाएवढी मोठी वाटली. 
"छान झाला होता चहा, तुमच्या हाताला खरंच चव आहे वीणा ताई"  - स्मिता अगदी मनापासून म्हणाली 
"थँक यू स्मिताबाई " वीणा थोडी मूड मधे आली 
"आता सांग दुपारी कसं काय येणं केलंत स्मिताबाई " - वीणा चेष्टा करायच्या मूड मधे होती 
"ताई मी जे सांगणारे ते सगळं स्पष्ट सांगणारे पण तुम्ही रागावणार नाही हे आधी मला वचन द्या"
वीणाला थोडे विचित्र वाटले पण स्मिताला चांगली ओळखत असल्याने ती लगेच हो म्हणाली , "नाही रागवत सांग बिनधास्त" 
"७-८ महिन्यांपूर्वी तुम्ही कामाचा व्याप वाढल्याने सुरेंद्र आणि मला एकत्र एक जबाबदारी दिलीत. कामानिमित्ताने मी आणि सुरेंद्र जवळपास रोजच ऑफिस मधे आणि फिरतीवर एकत्र राहू लागलो. सुरेंद्र खूप चांगले आहेत आणि सभ्य आहेत. त्यांनी मला कधीच दुय्यम अथवा चुकीची वागणूक दिली नाही."
"पण सततच्या जवळीकीने आमच्यात मैत्रीचे नाते निर्माण झाले आहे. आणि गेल्या महिन्यापासून ह्या मैत्रीच्या नात्यात माझा तोल अनेकदा जातोय की काय असे मला वाटून राहिले आहे. सुरेंद्र खूप सभ्य आहेत पण असेच आम्ही जवळ राहिलो उद्या आमचे नाते फारच घट्ट होईल आणि तुमच्या सुखी संसारात आग लागेल."
"मला माफ करा वीणा ताई पण मी आता तुमच्या कडे काम नाही करू शकत. मला जाऊ द्या." असे म्हणून स्मिता हुंदके देऊ लागली. 
"शांत हो आधी, रडणं थांबव बघू" वीणाने तिला जवळ घेतले. सुरेंद्र मान खाली घालून बसला होता. 
स्मिताला शांत करून वीणा दोघांना म्हणाली. 
"आता मी काय सांगते ते नीट ऐका. सुरेंद्रा, तुला आठवतंय का गेल्या वर्षी मला अचानक ताप येऊन मी आजारी पडले होते. ३ महिने थोडी थोडी आजारीच होते. 
औषध गोळ्या दिल्या डॉक्टरांनी पण माझी तब्येत आजही ठीक नाहीये. "
"मला जो संशय आला होता तो खरा ठरला आणि शेवटी मला आपल्या कंपनीची आणि सुरेंद्र तुझी सुद्धा सोय बघायची होती "
"देवाने मला जास्त कष्ट दिले नाही आणि ही स्मिता मला आयतीच सापडली अगदी माझ्या जवळ"
"माझ्या कंपनीची प्रचंड काळजी घेणारी ही मुलगी तुझ्याकडे सुद्धा तेवढेच लक्ष देईल ह्याची खात्री होती मला आणि म्हणूनच मी तुम्हा दोघांना एकत्र काम करायला दिले"
"सहवासाने प्रेम नक्कीच वाढते त्यामुळे तुम्ही प्रेमात पडाल ही खात्रीच होती मला" 
स्मिता आणि सुरेंद्र अवाक होऊन बघत राहिले , ही वेडी तर झाली नाही ना असेच भाव होते दोघांच्या डोळ्यात. 
५ मिनिट शांतता होती, त्यानंतर वीणा पुढे बोलू लागली . 
"माझा संशय खरा होता, मला ब्लड कॅन्सर आहे शेवटची स्टेज. ३-४ महिन्यात मी जगाचा निरोप घेईन."
"तुझी निवड करण्यात माझी काहीही चूक नाहीये हे तू आज दाखवून दिलेस स्मिता, माझी कंपनी आणि माझा नवरा योग्य हातात दिलाय ह्याचे समाधान मिळाले मला" 
"खरवस खाणार का तू स्मिता, तुला आवडतो ना म्हणून मी करून ठेवलाय" 
पुढचे काही वीणाताई बोलण्याच्या आत स्मिताने त्यांना घट्ट मिठी मारली.