आठवणीतला पाऊस

माझ्या "आठवणीतला पाऊस"
एकदा तरी अनुभवून बघ
भिजलेले ते सुंदर क्षण
माझ्या नजरेतून जगून बघ
कुंद त्या वातावरणात जेव्हा
काहुर माजेल मनामध्ये
नकळत का होईना तेव्हा
आयुष्यच थांबेल त्या क्षणामध्ये
गुंफत आठवणींचे धागे
झेलशील जेव्हा पाऊस-पाणी
उरातील कोलाहाल
ओघळेल मग आसवे बनूनी
करड्या पुंजक्यातून डोकावणारी
ती सोनेरी किरणे पाहून
क्षणभर का होईना पण
नक्किच शहारेल तुझे मन
धुंद हवा, गंध नवा
गर्द धुके हे आठवणींचे
अनुभवता हा ॠतु सोहळा
स्मरतील क्षण ते सोबतीचे
माझ्या "आठवणीतला पाऊस"
एकदा तरी अनुभवून बघ