ये दिल और उनकी निगाहोंके साये.......................

पर्वत, पक्षी, नद्या, झाडं, धुके.. सगळा निसर्गच  प्रेमाशी संलग्न आहे. प्रेम ही सगळ्यात हवीहवीशी उत्कट भावना! आपण प्रेमाचे पडसाद भवतालच्या रम्य निसर्गात शोधत राहतो. 
निसर्गा  च्या  सहवासात  भावना अधिक उत्कट पणे व्यक्त होतात आणि आतला आवाज ऐकू येतो. मन आणि भान हरपून जाणारा निसर्गाचा विलोभनीय सहवास!
सगळ्या गाण्या-कवितांत  खळखळत्या नद्या, हिरवीगार  शेतं , नाजूक फुलं, पहाड- पर्वत यांची वर्णनं आढळतात....  .... प्रेम, कल्पना, सौंदर्य यांना व्यक्त करणारी. प्रेमाची प्रतीकंच जणू! 
प्रेमात असलेला माणूस तर सगळ्याच गोष्टींचा संबंध प्रेमाशी अथवा प्रेमिके शी जोडतो. तो प्रेमात इतके आकंठ बुडालेले असतो की आजूबाजूच्या सगळ्याच गोष्टी तिच्याशी जोडतो. प्रत्येक ठिकाणी तीच दिसते. 
हा सुंदर निसर्ग आहे, तू  मन व्यापून  राहिलेली आहेस, मनभर आनंद ओसंडतो आहे......!   जगायला  खरंच अजून काय हवं?
कुठेतरी रमणीय पहाडीवर, हिरव्या वनराईत, झुळझुळत्या नदीच्या किनारी तुम्ही त्याच्या विचारात रममाण झाला आहात. तो सोबत असताना किंवा नसताना..........सदैव ऐकावसं वाटणारं हे गीत....लताचा स्वर्गीय आवाज ...!
तिचा आवाज आणि हा आजूबाजूचा बहारदार, हिरवागार आसमंत......जयदेव च्या संगीतावर तिचे मधुर बोल...
हं ह्म...ह्म   ह्म.. हं 
संतूर आणि बासरीची साथ. थोडासा मटका ताल आणि ढोलक ही. मधुर असं स्वरमंडल आपल्याला प्रेमाच्या धुंदीत नेतं.
ये दिल और उनकी निगाहोंके साये
मुझे घेर लेते वो बाहोंके साये
माझे  मुठी एव्हढे हृदय काय ते उरले आहे...ते ही माझ्या ताब्यात नाही. .तर त्याच्या एकटक नजरेच्या छायेत.  
न बोलता तो मला आपल्या बाहुपाशांत हलकेच लपेटून घेतो.  ...
जिथे पर्वत दर्‍यांना भेटतात त्या वळणावर, जिथे धुक्याने वेढलेली हिरवाई आहे, प्रेमाच्या आवेगाने अंगावर अधिकचा शहारा आणणारी थंड झुळूक मन सुखावते आहे अशा निसर्गाच्या कुशीत संगीत तुम्हाला अलगद घेऊन जातं! 
प्रेम पर्बत मधलं हे अप्रतिम गीत!
जयदेव यांनी संगीतबद्ध केलेलं. स्त्री प्रधान गीतांना संगीत देतांना जयदेव यांची प्रतिभा नेहमीच अगदी तरल, धारदार व प्रसन्न असायची आणि सुरावटी तरी किती श्रीमन्त ! 
गाण्याच्या सुरुवातीलाच पहाडांच्या प्रतिध्वनीचा प्रसन्न पणा आहे. पाण्याचा खळखळाट, लख्ख सूर्यप्रकाश यांनी मिळणारा निरागस आनंद यांची प्रचीती देणारा. 
एकमेकांत बेमालूम पणे मिसळून गेलेल्या संतूर आणि बासरीचा अप्रतिम वापर.  राग पहाडीवर आधारीत असलेलं गाणं. 
पहाडोंको चंचल किरन चूमती है
हवा हर नदी का बदन चूमती है
यहा से वहा तक है चाहोंके साये
सूर्याची कोवळी किरणे पर्वत माथ्याला स्पर्श करताहेत; हवेची झुळूक नदीवरुन लहरत जाते.
मला सगळीकडे, अवती भवती आपले प्रेमच दिसते आहे. प्रेमाच्या आश्वासक छाया सर्वत्र  भरुन राहिलेल्या आहेत. 
लिपटते ये पेडॉंसे बादल घनेरे
ये पल पल उजाले ये पल पल अंधेरे
बहोत ठंडे ठंडे है राहोंके साये
घनदाट ढग झाडांना वेढून आहेत. ऊन सावल्यांचा लपाछपीचा खेळ चालू आहे. माझ्या पुढल्या वाटेवरचा प्रवास किती आनंददायी असेल याची ही जणू नांदीच आहे.
धडकते है दिल कितनी आजादीयोंसे
बहोत मिलते जुलते है इन वादीयोंसे
मुहब्बत की रंगीन पनाहोंके साये
या मोकळ्या, दिलखुलास दर्‍यांसारखीच आपली हृदयं पण धडधडत आहेत. निसर्गाच्या विलोभनीय दुनियेत प्रीतीने आसरा घेतला आहे. मुक्त , आनंदमयी आणि सर्वस्व असणारी तुझी माझी आश्वासक प्रीत सगळीकडे भरुन राहिली आहे.
जयदेव यांच्या उत्कट स्वरसाजाने जां निसार अख्तर यांचे काव्य खुलले आहे. कवितेचा मूळ गाभा अशा मेलोडियस संगीताने अधिकच झळाळून उठतो. यात प्रेमिकेने प्रियकराबरोबर व्यतीत केलेले प्रेमाचे क्षण आहेत. ती त्या प्रेमात इतकी हरवून गेली आहे की आजूबाजूच्या निसर्गात ती त्याचीच प्रतिबिंबे शोधते. त्याच्या सोबत घालविलेल्या क्षणांची उत्कटता, असोशी आठवत राहते. अविचल, मनभर आनंदाचा खजिना आणि अनुरागाच्या पडछाया........
लताचा अतिशय गोड स्वर, मधुर संगीत आणि उसळत्या, खळाळत्या निसर्गाचे वर्णन करणारे अप्रतिम शब्द.....
एक  प्रेमगीत साकार होतं....
ये दिल और उनकी निगाहोंके साये........................