वाढदिवस

    सकाळी नेहमीप्रमाणे जाग आली आणि उठून बसल्यावर सौ.ची काहीतरी खुडबूड ऐकू आली व पाठोपाठ तिने आत येऊन पुष्पगुच्छ हातात ठेवत "वाढदिवसाच्या शुभेच्छा" म्हटल्यावर लक्षात आले की काही वर्षापूर्वी आजच्या दिवशी या पृथ्वीवर आपले आगमन झाले होते.तसे पाहिले तर हा दिवस स्वतःपेक्षा इतरांनीच लक्षात ठेवायला हवा कारण आपण जन्मताना पंचांग किंवा कॅलेंडर शोधून "अरे वा ! आजा आपण जन्मलो बरंका " असे म्हणण्याची शक्यता नसते, त्यामुळे हा दिवस इतरांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारावरच आपण ठरवलेला असतो, त्यामुळे अगदी सैन्यदलप्रमुखानाही सेवानिवृत्तीच्या वेळी आपला वाढदिवस एक वर्ष उशीरा असल्याचा साक्षात्कार झाला होता. मग माझ्यासारख्या सामान्य माणसाला आपल्या वाढदिवसाची निश्चित कल्पना बरेच दिवस नव्हती यात आश्चर्य नव्हते, अर्थात शाळेतील  नोंदवहीत माझ्या जन्मदिनांकाची नोंद होती  .पण त्यावेळी जन्माची नोंद ग्रामपंचायत अथवा महापालिका  या ठिकाणी करण्याचे बंधन नव्हते  आणि असली तरी शाळेत प्रवेश घेताना ते प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक नसायचे.यामुळे वडिलांनी का कोणास ठाऊक सगळ्या अपत्यांच्या जन्मतारखा त्यांच्या मनात त्या दिवशी जी तारीख योग्य वाटेल येईल तश्या लावल्या होत्या.त्या तारखा ठरवताना सेवानिवृत्तीच्या वेळी फायदा व्हावा असाही दृष्टिकोण
त्यानी ठेवलेला नव्हता कोणाची जन्मतारीख एकाद्या वर्षाने कमी तर कोणाची सहा
महिन्याने अधिक तर कोणाची जेमतेम दोन दिवसांनी कमी लावलेली असा एकूण प्रकार होता बरे आम्हाला आमच्या जन्मतारखा माहीत असायचे काही करण नव्हते व आईला सगळ्यांच्या तिथ्या पाठ होत्या पण त्यांचा जन्मतारखांशी मेळ घालण्याचा उपद्व्याप कोण करणार ? त्यामुळे त्या जन्मतारखा सगळ्यांच्या तश्याच चालू राहिल्या.
           काही दिवस आई आमचे वाढदिवस साजरे करत असे म्हणजे सकाळी आम्हाला ओवाळत असे आणि शिऱ्यासारखा गोड पदार्थ करत असे.पण ते तिथीनुसार असे.त्यातही माझा जन्म अधिक मासात झाला.(त्यामुळे माझे एक नाव धोंडिराम असेही होते) मोरारजींचा वाढदिवस २९ फेब्रुवारीला असल्यामुळे प्रत्येक लीप वर्षात तरी जसा निश्चितपणे येत असे तसा ज्या अधिक मासात माझा जन्म झाला तोच अधिक महिना परत उजाडायला अनेक वर्षे लागत त्यामुळे मोरारजींच्या जन्मतारखेप्रमाणे माझी जन्मतिथी चार वर्षातून सुद्धा एकदा उजाडेल याची खात्री नसे.त्यामुळे माझी खरी जन्मतारीख लग्न होईपर्यंत मलाही निश्चित माहीत नव्हतीच आणि ती जाणून घेणे हे शिवजयंतीइतके महत्त्वाचे काम नसल्यामुळे त्याविषयी कोणालाच काही औत्सुक्य नव्हते.शाळेतील जन्मतारखेप्रमाणे माझे व्यवस्थित चालले होते उलट लग्नानंतर त्या जन्मतारखेस माझे अभीष्ट चिंतन करणाऱ्या सौ.ला मी ती माझी खरी जन्मतारीख नाहीच हे सांगून तिचा हिरमोड केल्यामुळे तो दिवस तिचा जरी नाही तरी माझा सुखाने पार पडला होता. आणि अनेक वर्षे  माझे वय  वाढदिवस शुभेच्छावाचून सुखात वाढत होते. 
    पण एकदिवस बरेच जुने कागद माझ्या बायकोला सापडले आणि त्यात आम्हा सगळ्या भावंडांच्या जन्मपत्रिकाच सापडल्या आणि त्यामुळे तारखांचा अगदी लेखी पुरावा उपलब्ध असूनही सगळ्यांच्या जन्मतारखा वडिलांनी अगदी जश्या मनात आल्या तश्या टाकल्या होत्या हे उघडकीस आले..पण काही का असेना आपला खरा जन्मदिवस कोणता हे त्यादिवशी मला कळले व मी सर्व भावंडांना त्यांच्या तारखा कळवून त्यांच्या खऱ्या वयाची जाणीव करून दिली. त्यादिवसापासून माझा जन्मदिवस या पद्धतीने मला झोपेतून उठवून सौ.साजरा करू लागली व वाढीव वयाची जाणीव करून देऊ लागली. 
.    त्यावेळी फोनची सुविधा आलेली नव्हती आणि शुभेच्छांची देवाणघेवाण पत्रद्वारे करणे म्हणजे या वाढदिवसाच्या शुभेच्छा पुढील वाढदिवसापर्यंत पोचल्या तरी खूप अशी शक्यता असल्यामुळे तो औपचारिकपणा पाळण्याचे बंधन कोणी पाळत नसे.पण फोनची सुविधा आल्यावर मात्र फोनवरून शुभेच्छांची देवाणघेवाण सुरवातीला होत असे पण आठवण ठेऊन ते करणे जमतच असे असे नाही त्यामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्या तरी वहावा नाही आल्या तरी वहावा अशी परिस्थिती होती.येऊन जाऊन परदेशस्थ मुलांना व नातवांना आम्ही व ते आम्हाला बहुतेक न चुकता शुभेच्छा देऊ लागलो.ईमेलचीही तीच अवस्था होती.
   आता व्हॉट्सऍप आल्यावर मात्र परिस्थिती एकदम बदलली कारण संदेशाची देवाणघेवाण क्षणोक्षणी होऊ लागली.शिवाय एक संदेश आला की आपल्या वाढदिवसाची आठवण आपल्याला नसली तरी आपल्या परिवारातील सगळ्यांना होते आणि मग संदेशांचा पाऊस पडू लागतो आणि मग सगळ्यांचे आभार मानण्यासाठी आपल्याला अगदी दक्ष रहावे लागते कारण एकाद्याने शुभेच्छा संदेश न पाठवल्याबद्दल त्याच्यावर रागावण्यापेक्षा ज्याने शुभेच्छा संदेश पाठवले त्याचे आभार मानण्याचे राहून गेल्यावर त्याला येणाऱ्या रागाची पर्वा करणे महत्त्वाचे होऊन बसते.
        कुसुमाग्रज या बाबतीत फारच निरिच्छ ! अश्या थोर व्यक्तीचा जन्मदिवस अनेक लोकांना माहीत असणार, त्यामुळे त्यादिवशी ते शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करणार. त्यांना टाळण्यासाठी ते दूर कोणाला न कळेल अश्या ठिकाणी जात. विश्राम  बेडेकर यांचाही स्वभाव असाच होता.पण भा.वि.ऊर्फ मामा वरेरकरांना मात्र सर्वांनी आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला यावे असे वाटायचे त्यामुळे आदल्या दिवशी जो कोणी भेटेल त्याला ते दुसऱ्या दिवशी  आपला वाढदिवस आहे याची अगदी कटाक्षाने आठवण करून द्यायचे. अश्या बाबतीत आपण मामा वरेरकरांइतके आग्रही नसलो तरी कुसुमाग्रज किंवा विश्राम बेडेकर यांच्यासारखे निरिच्छही राहू शकत नाही असा माझा अनुभव आहे,म्हणजे जोपर्यंत माझी खरी जन्मतारीख मलाच माहिती नव्हती तोपर्यंत इतरांनीही माझ्या शाळेत नोंदवलेल्या जन्मतारखेची नोंद घ्यावी असे मला वाट्त नव्हते पण एकदा ती माहीत झाल्यावर मात्र सर्वांनी त्यादिवशी आपल्याला शुभेच्छा द्याव्यात असे मात्र वाटू लागले. आणि तसे झाले नाही की थोडी   रुखरुख लागल्याशिवाय राहत नाही.