आत्मपूजा उपनिषद : १२ - १३ : मी सत्य आहे हा भावच नमस्कार आणि मौन हीच स्तुती !

                                                                          सोअहं भावो नमस्कार:  ॥ १२ ॥

                                                                  मी सत्य आहे हा भाव म्हणजेच नमस्कार 
                                                                                 मौनं स्तुतिः  ॥ १३ ॥
                                                                                 मौन हीच स्तुती 


अहंकाराच्या भ्रामक कल्पनांनी भारतीय मानसिकतेची युगानुयुगं, दुहेरी वाट लावली आहे. एकतर आपण स्वतःला इतकं दुय्यम समजतो की आपणच सत्य आहोत ही वस्तुस्थिती साधकाला मान्यच होत नाही. तो वाट्टेल ती साधना करेल, सतत गुरू बदलेल आणि मरेपर्यंत सत्याचा शोध घेत राहील; पण स्वतःला सत्य मात्र कदापि समजणार नाही !  दुसरा प्रकार तर त्याहून जालीम आहे; सिद्धत्व चमत्कारांशी जोडून साधकाच्या मनात असा काही न्यूनगंड तयार केला गेलाय की त्याचा विज्ञानवादी आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोन पार संपला आहे.  सिद्धत्व हे प्रत्येकाचं स्वरूप आहे, त्याचा चमत्कार करता येण्याशी काहीही संबंध नाही आणि मुळात चमत्कार हा विज्ञानाच्या कसोटीवर कायम फेल गेलेला प्रकार आहे, इतकी उघड गोष्ट साधकाला समजत नाही. अमक्यानं भितं चालवली म्हणजे आपल्याला जोपर्यंत ती चालवता येत नाही तोपर्यंत आपण छपरी आहोत ही भावना त्याच्या मनात पक्की बसली आहे. वास्तविक भितं एकदा चालली की त्या घटनेचा कार्यकारण भाव उलगडायला विज्ञानाला फारसा वेळ लागणार नाही आणि मग कुणीही भितं चालवू शकेल.
 जाणीव एक आहे  फक्त कर्णपिशाच्च अवगत होण्याचा अवकाश की इथे बसून लंडनमधल्या माणसाशी विनासाधन संवाद साधता येईल;  अशा निर्बुद्ध कल्पनांपायी साधकांनी जन्म घालवले आणि मोबाइलचा शोध लावून ती गोष्ट पाश्चात्त्यांनी सर्वसामान्यांनाही  शक्य करून दिली. तरी भारतीय मानसिकता अजूनही सिद्धत्व आणि चमत्काराची निर्बुद्ध सांगड सोडायला ज्याम तयार नाही.  तस्मात, आपण सत्य आहोत ही उघड गोष्ट साधक मानायला तयारच होत नाही. 

भगद्वगीतेत कृष्णानं आत्म्याचं इतकं यथेच्छ वर्णन केलंय की तो आज जगातला प्रमाण ग्रंथ समजला जातो; अध्यात्मिक चर्चेत 
भगद्वगीतेचा उल्लेख न येणं अशक्य. पण इतक्या मौलिक ग्रंथात कृष्ण एका शब्दानं अर्जुनाला सांगत  नाही की तूच आत्मा आहेस. नैनं च्छिंंदंती शस्त्राणी  हे तुझंच मूळ रूप आहे.  त्यामुळे कृष्ण कायम उच्चासनावर आणि साधक नेहेमी याचकाच्या भूमिकेत राहीला आहे; मग तो अर्जुन असो की इतर कुणी. तद्वत, दासबोधासारख्या दुसऱ्या प्रमाण ग्रंथात बव्हंशी वर्तणुकीच्या सुधारणेवरच उहापोह आहे; वास्तविक आचरणाचा आणि स्वरूपाचा सुतराम संबंध नाही. स्वरूप कायम अकर्ता आहे पण दासबोध वाचणारे मात्र,  आपण वर्तणुकीत काय सुधारणा केली की रामदासांच्या दृष्टीनं  मूर्ख ठरणार नाही याच्याच विवंचनेत  दिसतात. 
थोडक्यात, आपण कोणत्याही पूर्वअटी शिवाय सिद्ध आहोत; आपल्याला माहीत नसलं तरी आहोत, मंजूर नसलं तरी आहोत आणि आपली सांपत्तिक, शारीरिक, बौद्धिक  परिस्थिती काहीही असली तरी आहोत. कोणत्याही साधनेशिवाय आपण सत्य आहोत आणि जन्मभर कितीही प्रयत्न केले तरी आपण सत्यापासून वेगळं होण्याची शक्यता नाही कारण सत्य या एकाच तत्त्वानं सारं अस्तित्व बनलं आहे. जे जे काय म्हणून प्रकट आहे ते आपल्याच अप्रकट स्वरूपाचं दृश्य रूप आहे. आपल्यात आणि सत्यात काहीही अंतर नाही आणि कदापिही पडू शकत नाही कारण जाणीव एकसंध आणि अविभाज्य आहे; ती स्थिती आहे, वस्तू नाही. सत्यात वेळ नाही त्यामुळे अशी कोणतीही वेळ नाही की ज्यावेळी आपण असत्य होतो त्यामुळे साधक, साधना आणि सिद्धी हा निव्वळ अपप्रचार आहे; ती अफवा आहे. आपण कायम सत्यच आहोत कारण सत्यापरता इथे काहीही नाही. अहं ब्रह्मास्मी वगैरे उदघोषाची सुद्धा गरज नाही कारण आपणच ब्रह्म आहोत. 
तस्मात,  सोअहं भावो नमस्कार:, म्हणजे   मी सत्य आहे हा भावच नमस्कार आहे. कुणाही देवते पुढे, गुरू पुढे, किंवा कोणत्याही ग्रंथा पुढे झुकण्याची  अथवा नतमस्तक होण्याची काहीही गरज नाही. !
-------------------------------------
आता मनाकडे वळू. भाषा ध्वनीजन्य आहे आणि तिचा स्रोत शांतता आहे. शांतता हे आपलं मूळ स्वरूप आहे कारण तिथे शिकण्याचा संबंधच नाही. ध्वनी निर्मितीपूर्वीच आपण आहोत. तस्मात, ब्रह्म वाक्य, संस्कृतचं ज्ञान किंवा वेद, ऋचा अथवा कोणत्याही ग्रंथातल्या कोणत्याही श्लोकाचा अर्थ माहिती नसला काय किंवा तो वाचता देखिल आला नाही तरी आपल्या शांततेत यत्किंचितही फरक पडत नाही. अस्तित्वातल्या कोणत्याही उच्चारणापूर्वी, त्याच्या कालावधीत आणि तो विरल्या नंतरही शांततेला काहीही धक्का पोहोचत नाही. तस्मात,  भाषाज्ञान किंवा अज्ञान यांचा आपल्या स्वरूपाशी अजिबात संबंध नाही. सत्य ही शिष्यवृत्ती नाही, ते आपलं अनभिषिक्त स्वरूप आहे आणि आपल्याला मुळातच प्राप्त आहे; किंबहुना आपणच शांतता आहोत. तस्मात, मनाच्या निस्सरणासाठी सुद्धा कोणत्याही साधनेची गरज नाही कारण मनाच्या सक्रियतेपूर्वीच आपण आहोत, मनाच्या हरेक दशेत आपण अविभाज्य  आणि अबाधित आहोत.  
मौनं स्तुतिः याचा अर्थ कोणत्याही आरतीची, वेदघोषाची, जपाची, नामस्मरणाची, मंत्रसाधनेची आपल्याला गरज नाही. आपलं मौनत्व हीच स्वरूपाची किंवा खुद्द आपली स्तुती आहे. 
थोडक्यात, आत्मपूजा उपनिषद काय की कोणताही ग्रंथ काय, कुणीही कितीही सोपं करून सांगितलं; कितीही प्रभावीपणे आणि निर्विवादपणे मांडलं;  अगदी कुंडलिनी जागृत झाली, सर्वत्र प्रकाशच प्रकाश झाला आणि अंगोपांग सुगंध दरवळला; तरी आपण सत्य आहोत हे साधकच जोपर्यंत मान्य करत नाही तोपर्यंत साधना चालूच राहणार. सरते शेवटी, स्वतः ला सत्य  समजायचं की व्यक्ती हा निर्णय साधकच घेणार आणि जेव्हा साधकच मानायला तयार नाही, त्याच्या स्वतःच्याच अटी आणि शर्ती जोपर्यंत संपत नाहीत;  तिथे शोधाला अंत नाही !