आत्मपूजा उपनिषद : १४ - १५ : संतोष हाच प्रसाद आणि आपणच ब्रह्म आहोत हा अनुभव म्हणजे मुक्ती !

                                                          सर्वसंतोषो विसर्जनं, इति स एवं वेद  ॥ १४ ॥

                                                          सर्वसंतोष हेच (पूजेचं विसर्जन) आणि संतोष हाच प्रसाद !
                                                     सर्व निरामय परिपूर्णो अहंस्मिती मुमुक्षुणां मोक्षेकं सिद्धीर्भवती  ॥ १५ ॥
                                                       मी निरामय आणि परिपूर्ण आहे ही अनुभूती म्हणजेच सिद्धत्व !
                                                                                    इत्युपनिषत ॥
                                                                                    उपनिषद संपन्न !


प्रथम संतोष ही काय भानगड आहे ते पाहू. आता हे उपनिषद त्याची परमावधी गाठतंय त्यामुळे लक्षपूर्वक वाचा.
१) आत्मस्वरूपाची (किंवा आपली) तीन वैशिष्ट्य आहेत;  पहिलं म्हणजे आपलं सर्व आयुष्य हा केवळ अनुभव आहे. अनुभवाव्यतिरिक्त आपल्या जगण्यात दुसरी गोष्ट नाही.  वस्तू (किंवा जडं) हा भ्रम आहे; उदाहरणार्थ,  खुर्चीला आपण जडं समजतो, पण वास्तविक खुर्ची हा आपला अनुभव आहे;  ती डोळ्यांना दिसते, तिचा स्पर्श जाणवू शकतो, तिच्यावर बसणं आपण अनुभवू शकतो. दिसणं, स्पर्श, बसण्याची जाणीव किंवा ते सुख; हे सर्व आपले अनुभव आहेत. केवळ सोयीसाठी आपण या सर्व अनुभवांचं एकत्रिकरण करून त्याला खुर्ची असं नांव दिलं आहे. 
तद्वत, तथाकथित जडाशी किंवा संपूर्ण प्रकट जगाशी आपला संबंध हा केवळ अनुभवाचा आहे. पत्नी  ही देखिल व्यक्ती नाही,  संवाद, स्पर्श, गंध,  वेगवेगळ्या भाव-भावनांचे वेळोवेळी आलेले अनुभव यांच्या एकत्रीकरणाला आपण व्यावहारिक सोयीसाठी पत्नी असं नांव दिलंय. थोडक्यात, जग किंवा जडं असं काही अस्तित्वातच नाही; ते आपल्याला वेळोवेळी आलेले आणि येणारे अनुभव आहेत.
२) या सर्व अनुभवांची दोन वैशिष्ट्य आहेत;  पहिलं म्हणजे  कोणताही अनुभव आपल्या असण्याशिवाय असंभव आहे. अगदी मृत्यू जरी म्हटला तरी त्या अनुभवाला देहासमवेत आपली हजेरी अनिवार्य आहे.  कितीही पराकोटीच्या निराशेचा अनुभव असेल तरी आपल्याशिवाय तो उद्भवणंच अशक्य आहे. अशा प्रकारे आपलं असणं ही  प्रत्येक अनुभवाची पूर्वअट आहे.  जीवनातल्या प्रत्येक अनुभवाला आपण अनिवार्यपणे हजर होतो आणि हजर असणारच! 
थोडक्यात, अनुभव आणि आपण हे अद्वैत आहे. कोणताही अनुभव आपण स्वतःपासून वेगळा करू शकत नाही.  अनुभव आणि आपण हे इतकं अद्वैत आहे की प्रत्येक अनुभव  आपल्यातच घटीत होतो. कोणताही अनुभव येण्यासाठी जाणीव (किंवा आपण) अनुभवाशी  संलग्न होणं अनिवार्य आहे.  उदाहरणार्थ चालणं घडण्यासाठी  शरीराच्या उठण्यापासून ते दुसऱ्या ठिकाणी पोहोचेपर्यंतची सर्व क्रिया जाणिवेतच घडायला हवी, अन्यथा चालण्याचा अनुभव किंवा मुळात चालणंच असंभव आहे. थोडक्यात, जाणीव आणि चालण्याची संपूर्ण  क्रिया  सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत जाणिवेतच (किंवा आपल्यातच) घडायला हवी तरच चालणं घडेल आणि चालण्याचा अनुभव येईल. थोडक्यात, प्रत्येक अनुभव जाणिवेतच घडतो; जाणीव आणि अनुभव यात द्वैत नाही, प्रत्येक अनुभव ही जाणिवेत झालेली हालचाल आहे; मग ती एखादी शारीरिक क्रिया असो,  मनात उमटलेला विचार असो, की भावना असो की कोणतंही आकलन, त्या सर्व जाणिवेत झालेल्या हालचली आहेत.  

अशा प्रकारे संपूर्ण आयुष्य ही केवळ जाणिवेत घडणारी हालचाल आहे, जाणीव आणि जग एकसमायवच्छेदानंच कार्यान्वित होतात. पत्नी जाणिवेच्या कक्षेत आल्याशिवाय; पत्नी अशी गोष्टच अस्तित्वात नसते.  दरम्यानच्या काळात, पत्नी स्मृतीत असली तरी ती स्मृती जाणीवेसमोर आल्याशिवाय पत्नी या कल्पनेला कोणतीही वास्तविकता नसते.

३) प्रत्येक अनुभूती जाणिवेतच घटीत होत असली तरी ती जाणिवेला स्पर्श करू शकत नाही. उदाहरणार्थ चालण्याची क्रिया जाणिवेत घडते पण जाणिवेत कोणतीही हालचाल होत नाही. आपल्याला चालण्याची जाणीव होते तेव्हा शरीर चालतं, आपण चालत नाही. सर्व जाणिवांची नोंद स्मृतीत होते आणि स्मृती वेगवेगळ्या आणि अनेकविध असल्यानं त्या स्मृतीसंचयाचे आपण मालक आहोत असा एक वैश्विक भ्रम तयार होतो आणि त्याचा परिपाक म्हणजे  प्रत्येकाला आपण व्यक्ती आहोत असा कमालीचा आणि ठाम भ्रम होतो. या भ्रमातच प्रत्येक जण स्वतःला (आणि पर्यायानं दुसऱ्यालाही) व्यक्ती आहोत असं समजून जगतो. वास्तविक स्मृतीचा उपयोग केवळ जगण्याच्या सोयीसाठी आहे पण लोकांनी त्यातून व्यक्तिमत्त्वाचा भ्रम करून घेतला आहे आणि हा भ्रमच सर्व असंतोषाचं मूळ कारण आहे !

४) जाणीव निराकार आणि निर्वैयक्तिक आहे, त्यामुळे आपण जाणीवेचे जाणते आहोत असा भास झाला तरी केवळं जाणणं आहे, जाणणारा असा या अखिल अस्तित्वात कुणीही नाही. असणं आणि जाणणं हे आपलं स्वरूप आहे पण ते वैश्विक आहे, व्यक्तिगत नाही. थोडक्यात, असणं आणि जाणणं हे प्रत्येकाचं स्वरूप आहे,  ते सार्वत्रिक आहे, ती कुणाची व्यक्तिगत मालमत्ता नाही 

तर तात्पर्य असं की सर्व आयुष्य हे केवळ अनुभवणं आहे, त्या अनुभवांचा जाणता असा कुणीही नाही आणि कोणत्याही अनुभवाचा जाणीवेला स्पर्श सुद्धा होत नाही. रुपकात्मकतेनं सांगायचं तर जाणिव अवकाश आणि आरश्याच्या संमिश्रणासारखी आहे; कोणताही अनुभव किंवा घटना तिच्याबाहेर घडू शकत नाही आणि ती सर्व अनुभव केवळ प्रतिबिंबित करते;  खुद्द जाणिवेला मात्र अनुभवाचा स्पर्श सुद्धा होत नाही ! शिवाय ती सार्वत्रिक असल्यानं देहबद्ध नाही तर देहाला अंतर्बाह्य व्यापून आहे ; त्यामुळे देहाबाहेरच्या घटनांच्या आकलनाचा आणि दैहिक संवेदना किंवा विचारांचा तिला (किंवा आपल्याला) बोध होतो; पण बोध होणारी व्यक्ती अशी कुणीही नाही.

एकदा हा उलगडा झाला की व्यक्तिमत्त्वाचा निरास होतो आणि कोणत्याही अनुभवाचा आपल्याला स्पर्शच होत नाही  म्हटल्यावर अनुभव काय येईल किंवा घटना काय घडेल आणि तिचा परिणाम काय होईल हा धसकाच संपतो ! याची  एकूण परिणिती सर्वसंतोषात होते !

____________________________________

आपण व्यक्ती नसून, निराकार आणि परिणामशून्य जाणिव आहोत हा  उलगडा आपल्याला जाणिवस्वरूप म्हणजे परिपूर्ण करतो.  सर्व न्यूनत्व आणि इच्छा या स्वतःला व्यक्ती समजण्यामुळे आहेत. रूप, बुद्धी आणि संपत्ती यांच्याशी झालेलं भ्रामक तादात्म्य न्यूनगंड निर्माण करतं आणि तेच सर्व असंतोषाचं कारण आहे. न्यूनगंडामुळेच व्यक्ती सतत काही तरी जगावेगळं आणि अचाट करायला जाते आणि स्वतःची किंमत दुसऱ्यांच्या नजरेत बघायला आणि परिणामी दुसऱ्यावर वर्चस्व गाजवायला जाते. न्यूनगंडामुळेच व्यक्ती परिणामांना घाबरून नवीन काही शिकायचं किंवा वेगळं काही करायचं साहस करत नाही.  जाणिव ही पूर्णपणे मुक्त, कायम एकसंध  आणि परिणामरहित स्थिती आहे;  आपण व्यक्ती नसून ती स्थिती आहोत हा उलगडा जीवन कृतार्थ करून जातो; हेच अध्यात्माचं आणि आत्मपूजा उपनिषदाचं फलित आहे !