डिसेंबर ३१ २०१९

निष्काम कर्म

श्री. रंगाचारी हे वेल्लोरच्या एका महाविद्यालयात प्राध्यापक होते. तेलगू भाषेचे गाढे पंडितही होते. त्यांनी एकदा रमण महर्षींना 'निष्काम कर्म' या संकल्पनेचा अर्थ विचारला. महर्षींनी लगेच कुठलेही उत्तर दिले नाही. थोड्या वेळानी महर्षी अरूणाचल पर्वतावर रोजच्या परिक्रमेसाठी निघाले. त्यांच्या मागोमाग शिष्यवर्गही निघाला, ज्यात पंडितजीही सामील झाले. 


पायवाटेवर एक काट्याकुट्यांनी भरलेली लाकडी काठी पडलेली होती. महर्षींनी ती उचलली आणि अगदी सहजतेने तिच्यावर काम करायला सुरूवात केली. काटेकुटे कापून काढत, वेड्यावाकड्या गाठी तासून काढत त्यांनी त्या काठीचे अगदी एकसंध मुलायम छडीत रूपांतर केले. झाडाच्या एका खरबरीत पानाने घासून तिला अगदी लख्ख उजळवले. हे सगळे काम एकीकडे अव्याहतपणे जवळजवळ ६ तास सुरू होते. बघणारे आश्चर्यचकित होऊन म्हणत होते की ही छडी अगदी चकचकीत धातूने बनवावी तशी दिसते आहे.


थोडे पुढे जाताच एक धनगर मुलगा त्या पायवाटेनजिक उभा असलेला दिसला. त्याची गुरे हाकण्याची छडी खोल दरीत पडून नाहीशी झालेली होती आणि त्यामुळे तो व्यथित होता. काय करावे हे त्याला सुचत नव्हते. महर्षींनी बनवलेली छडी जाता जाता त्याच्याकडे सोपवली आणि अवाक्षरही न उच्चारता ते पुढे निघाले. त्या मुलाचा आनंद गगनात मावत नव्हता. पंडितजी सहज बोलून गेले, की एकही शब्द न उच्चारता महर्षींनी त्यांच्या निष्काम कर्मविषयक प्रश्नाचे अगदी मार्मिक आणि सोदाहरण उत्तर दिले होते.

Post to Feedमस्त
कर्मयोग !
अकर्ता ...
अकर्त्याचा उल्लेख वरील दोन्ही श्लोकात आहे
निष्काम कर्म
मस्त !

Typing help hide