अहोभाव

महान संत भगवान रमण महर्षी यांच्या जीवनातली ही एक घटना आहे. एकदा रमणाश्रमाच्या परिसरात फिरता फिरता महर्षी स्वयंपाकघराजवळ पोचले. स्वयंपाकघराजवळच्या मैदानावर त्यांना मूठभर तांदुळ सांडलेले दिसले. त्यांनी लगेच काळजीपूर्वक तांदळाचे एक एक शित गोळा करायला सुरूवात केली. महर्षींना असे एक एक कण तांदुळ वेचताना पाहून तिथे उपस्थित असलेल्या शिष्यांना नवल वाटले आणि बघता बघता एक एक करून बरेच शिष्य त्या ठिकाणी गोळा झाले. ईश्वरप्राप्तीच्या ओढीने आपले घरदार आणि लौकिक जगातल्या मायापाशाचा त्याग करून विरक्त जीवन व्यतित करत असलेला हा ज्ञानी मूठभर तांदुळ वेचण्यासाठी इतके कष्ट घेईल यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. शेवटी धारिष्ट्य करून एका शिष्याने विचारले, "गुरूदेव, आपल्या कोठीत तांदळाच्या पोत्यांचा पुरेसा साठा आहे. आपण या मूठभर धान्यासाठी इतका त्रास का करून घेता आहात?"
महर्षींनी उत्तर दिले, "तुम्हाला हे निव्वळ मूठभर धान्य दिसते आहे, पण ते इथवर येण्यामागे काय काय दडले आहे ते पाहण्याचा प्रयत्न करा. योग्य नियोजन करून ज्याने शेतजमीन वेळेत तयार केली, तिथे बीज पेरले त्या शेतकर्‍याचे काबाडकष्ट यात आहेत. अमर्याद पसरलेल्या सागराच्या उरात सामावलेल्या पाण्याच्या अंशमात्राचे का असेना यात खचितच मोलाचे योगदान आहे. पर्जन्यरूपाने बरसलेली वरूणदेवतेची असीम कृपा यात सामावलेली आहे. सूर्यदेवाने प्रदान केलेल्या उबदार सूर्यप्रकाशात भूमातेच्या मृदुमुलायम गर्भातून हे धान्य प्रसवले आहे. आपल्याला माहित असलेल्या आणि माहित नसलेल्या कित्येक घटकांच्या एकत्रित सांघिक प्रयत्नातून हे धान्य इथवर पोचलेले आहे. या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील, तर धान्याच्या प्रत्येक कणाच्या सृजनात ईश्वराचा हात असल्याचे तुम्हाला स्पष्टपणे दिसेल. त्यामुळे हे मूठभर धान्य वाया घालवू नका किंवा त्याला पायदळी तुडवू नका. तुम्हाला खाण्यायोग्य वाटत नसेल, तर ते पक्ष्यांना खायला मिळेल अशी तजवीज करा"
शिष्यवर्गाने यातून योग्य तो बोध घेतला हे वेगळे सांगायला नको.