श्रद्धा आणि गंतव्य

एके दिवशी रमण महर्षिंच्या भेटीला आलेल्या एका आगंतुकाने आपली व्यथा बोलून दाखवली: "स्वामी, मी आपल्या भेटीला वारंवार येत असतो, कारण मला अशी आशा वाटते की आपली भेट घेत राहिल्याने असे काहीतरी घडेल की माझ्यात बदल होईल. आजमितीला तरी माझ्यात कुठलाही बदल झालेला आहे असे मला दिसत नाही. मी जसा होतो तसाच आहे: एक दुर्बळ आणि स्खलनशील माणूस, ज्याची जित्याची खोड काही केल्या जात नाही असा एक महापातकी" असे बोलून तो दीनवाणे होउन घळघळा रडायला लागला.
भगवानांनी उत्तर दिले, "या मार्गावर चालत असताना वाटेत मैलाचे दगड दिसत नाहीत. त्यामुळे आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत हे तुम्हाला कसे समजणार? त्यामुळे रेल्वेच्या प्रथम दर्जाने (फर्स्ट क्लास) प्रवास करणारा प्रवासी जे करतो तेच तुम्ही पण का करत नाही? तो आपले गंतव्य स्थान गार्डला सांगतो, आपल्या कक्षाचे दरवाजे बंद करून घेतो आणि निश्चिंतपणे झोपी जातो. बाकी सगळी काळजी तो गार्डवर सोडतो. रेल्वेच्या गार्डवर ठेवता तेवढाच विश्वास तुम्ही तुमच्या सद्वुरूंवर ठेवाल , तर ते तुमचे गंतव्य स्थान गाठण्यासाठी पुरेसे आहे. तुमचे काम इतकेच आहे की सगळी दारे खिडक्या बंद करून घेणे आणि स्वस्थपणे झोपी जाणे. तुमचे गंतव्य स्थान आले की गार्ड तुम्हाला उठवेलच.
(श्री रमण लीला या ग्रंथातून)