प्रसंग!

"तो गेला आहे! अगदी कायमसाठी!"
"सत्य" कधी कधी वाटतं फक्त मानण्यावर असतं की  काय? 
कारण 
मला तर तो दिसत राहतो.. 
डोळे उघडले असता दिसणाऱ्या प्रत्येक दृश्यांत त्याचा वावर भासतो मला...
बोटामधून निसटणाऱ्या रांगोळीच्या कणा-कणांतून ती ना जाणे किती वेळ स्वतः:शीच संवाद करणार होती.. 
त्यातच.. 
अनवधानाने गाल पुसायला जाता, 
रांगोळीच्या कणांनी  माखलेल्या हाताचे भान नाही राहिले तिला!
गालाला लागलेला रंग आपल्या कृष्ण-धवल कांतीवर अजूनच उठून दिसत असेल, 
ह्याचे भान आले 
आणि 
जड अंत:करणाने 
काहीश्या तत्परतेने 
दुसऱ्या हातात पदर  घेऊन गाल पुसताना 
तिचे डोळे 
गोल
आणि 
ओले 
होत राहिले... 
ओल्या डोळ्यांनी समोरील दृश्य अंधुक होत असतानाच एक जुना प्रसंग अगदी स्पष्ट दिसू लागला तिला, 
तिच्या एका निरागस आणि खोड्याळ वाक्याला, प्रतिसाद म्हणून त्याने लावलेला त्याच छटेचा रंग!
तिच्या पदराने तिने जरी पुसले असतील रांगोळीचे गालावरले रंग, 
पण अंतर्मनाला ठाऊक होतं की 
तो असाच भेटत राहणार आहे 
इथून पुढे कायम 
प्रत्येक गोष्टींमधून, 
प्रत्येक श्वासांमधून.. 
तिला हसू ही आलं आणि रडू ही!