फेब्रुवारी १३ २०२०

धक्का!

निदान! 
भर रस्त्यात चार चाकी चालवताना, 
सोबत सगळे कुटुंब असताना..
काळे डाग क्षणभर दिसून नाहीस होऊ लागले! 
wiper केला सुरू पण क्षणार्धात जाणवले की दोष दृष्टीचा आहे! 

आजवर 
दुखावलेले स्नायू, 
अपघाताने मोडलेली हाडे, 
तडकलेल्या टाचा,
आंधळ्या झालेल्या जखमा, 
मधून अधून येणारी डोकेदुखी,
अचानक कमी झालेले प्लेटलेट्स..

वगैरे दिव्य नित्यनेमाने अनुभवली असूनसुद्धा मी स्वास्थ्याबाबत स्वतःला नशीबवान समजत आलो आहे! 
पण हे असे ज्ञानेंद्रियांनी त्यांची क्षमता सोडून वागणे पहिलेच आणि म्हणून बहुतेक 'बेदम टरकावे' असे होते!

वेळ न गमावता, ताबडतोब त्यातल्या त्यात इतक्यातल्या दिव्यांमध्ये ज्यांची मदत घेतली होती अशा डॉक्टर कडे गेलो! 

डॉक्टर्स
विक्री व्यवसायापेक्षा बहुदा जास्त बदनाम क्षेत्र! 
बहुतेक विक्री व्यवसायाशी जास्त जवळीक केल्यामुळेच असावे असे, पण मी ही शक्यतो टाळत आलो होतो ह्या भेटी! 

"कामाचा प्रचंड ताण"
रक्तदाब वगैरे तपासून डॉक्टरांनी निदान केले! 
"मी कामाच्या अजिबात न घेत असलेल्या ताणामुळे" सदैव ताणात असलेला माझा तत्कालीन साहेब तेव्हा तिथे असायला हवा होता.
एवढ्या टरकलेल्या अवस्थेतसुद्धा मला हा विचार स्पर्शून गेला. 

मी - योग्य निदान व्हावे ह्या अपेक्षेने - स्वच्छ सांगितले तसे की मला नसतो एवढा ताण! असे काळे डाग-बीग दिसावेत इतका तर अजिबातच नाही! 

"It was an extreme attack of migraine!"
अवचेतन अवस्थेमध्ये अशा गोष्टी कशा गोळा होतात आणि आधी अर्धे डोके दुखते आणि मग हे असे दिसायच्या अडचणी कशा येतात - ह्यावर जवळ जवळ अर्धा तास बोलून त्यांनी वरील इंग्रजी वाक्यामध्ये संगता केली. 

माझी टरकण्याची क्षमता एव्हाना संपलेली होती, मी निमूटपणे 
"बरं मग अता काय?"
असा होऊन वाट पाहू लागलो..

अगम्य भाषेमध्ये कागदावर पेन चालला. 
सकाळ-दुपार-संध्याकाळ दररोज ३ ह्या हिशोबाने १५ दिवसांचा कोर्स कसा पूर्णं करायचा ते डॉक्टरांनी अगदी नेहमीच्या सवयीने सांगावे तसे सांगितले. 

६८८/- रुपयांच्या गोळ्या फक्त त्यांच्या ठेवणीतल्या दुकानांत मिळणार होत्या. त्या काउंटरवरील गर्दीमुळे थोडा वेळ मिळाला! 

आणि मी गूगलवर मायग्रेन ची कारणं आणि इलाज शोधायला सुरुवात केली. 

वातावरणातील बदल (म्हणजे गाडीमधल्या थंड एसीतून एकदम बाहेर उन्हात येणे!) अनेक कारणामधील हे कारण मला "माझे" वाटले. पुढे असंही लिहिलं होतं की नक्की कारण व इलाज अजूनतरी माहीत असल्याचा ठोस पुरावा वैद्यकीय शास्त्राकडे नाही. 

डॉ बी. एम. हेगडे यांचे "there is an ill behind every pill!" वाक्य स्मरून त्या ४५ गोळ्या न घेता परत घरी आलो! 

अधून मधून तो न झालेला "काळा व्यवहार" स्मरतो कधी कधी, काळे डाग मात्र नाहीत दिसले त्यानंतर कधीच!

Post to Feed
Typing help hide